एका कवितेचा जन्म आणि मृत्यू

एका कवितेचा जन्म आणि मृत्यू


मनोगतावर रोज पाहता कवितांची गर्दी
मजला वाटे मीही लिहावी कविता एखादी  -१-


गझला, कविता, मुक्तक, सुनिते तशाच चारोळ्या
काव्याच्या दिसतात येथ किती परी वेगवेगळ्या -२-


कागद पुढती, हाति लेखणी घेऊन मी बसले
समय लोटला किती तरी परि काही नच घडले -३-


विधा कोणती, वृत्त कोठले, रस कुठला घेऊ
विचार करुनी मेंदु शिणे निद्रा लागे येऊ -४-


मनी म्हणे मी "वृत्त, छंद तुज नको तुला गेयता
बहुत जाहले आली जर का यमके तुज जुळविता" - ५


लिहून खोडले, खोडुनी लिहिले, ताव किती फाडले
अखेरीस मग लहानसे एक कवन इथे घडले -६-


वाचून बघता पुन:श्च मी त्या ओळी आठदहा
नवनिर्मितीचा मज झाला आनंद किती तो अहा! -७-


लगोलग तिला दिले धाडुनी मनोगतावरती
भाग्य थोर हे इथे नसे "साभार परत"ची भिती -८-
...
...
...
संतापाने वाचक वदले "ही कसली कविता!
आमुचा आणि संगणकाचा वेळ फुका दवडता!" -९-


क्रूरपणाने पुढे म्हणाले "एक गोष्ट ही खरी
यापरीस ती आगगाडीची समय-सारणी बरी!" - १०-
------------------------------------------------------