मी डावा बोलतोय

मी डावा बोलतोय.


(पाच प्रश्न ह्या चर्चेत श्री.भोमेकाकांनी दिलेल्या डावे/उजवे ह्या प्रतिसादावरून सुचलेले काहीतरी(च!)).


खरं म्हणजे आम्ही दोघे सख्खे भाऊ. नुसते सख्खेच नाही तर जुळे. अर्थात जुळे असलो तरी एकाला झाकावं आणि दुसऱ्याला दाखवावं इतके सारखे नाही पण मी आरशात पाहिले तर तो दिसावा आणि त्याने आरशात पाहिले तर त्याला मी दिसावे इतके सारखे. 


असे असले तरी मला मात्र सावत्र मुलासारखी वागणूक मिळते. अगदी छळ होत नसला तरी माझ्याकडे हवे तितके(मला!) लक्ष दिले जात नाही. आता हेच पहा ना. धार्मिक रीतीरिवाजांमध्ये आम्ही अशुभ! बाजारात मिळणारी उपकरणं, यंत्रं सगळी अशा रीतीने बनवलेली असतात की जणू काही आमच्या हाताचा कोणी उपयोगच करत नाही. आम्ही कुणाच्या खिजगणतीतच नाही.


पैसा आमच्या हाताला कधी लागायचा नाही. एखादा बंड्या किंवा बाळू आमच्या हाताने पैसे द्यायला किंवा घ्यायला लागला तर लगेच त्याचे आजोबा त्याच्या पाठीत धपाटा घालून खेकसणार "गधड्या, लक्ष्मी तीऽऽ, तिला डावा हात लावतोस!!" झालं! चुकून झालेला लक्ष्मीचा स्पर्श सुद्धा आमच्या हाताला फार काळ मिळत नाही.


हिणकसपणा, उणेपणा, निकृष्ट दर्जा यांचे आम्ही प्रतिनिधी! एखादा महान कलाकार स्त्रियांच्या बाबतीत जरा 'हा' असला की लोक कसं म्हणतात? "फार मोठा कलाकार आहे हो, पण चारित्र्याची बाजू मात्र डावी आहे."  एखाद्या कादंबरीचे समीक्षण करताना समीक्षक लिहितात, "प्रस्तुत कादंबरी वाचनीय असली तरी ह्याच विषयावरील अमुक लेखकाच्या कादंबरीच्या तुलनेत भावाविष्काराच्या बाबतीत डावी ठरते." 


मला तर वाटतं, 'डावलणे' हे क्रियापद आमच्यावरूनच आले असावे. कमी महत्त्व देणे, दुर्लक्ष करणे म्हणजेच डाव्याला जसे वागवतो तसे वागवणे ते डावलणे अशी व्युत्पत्ती असावी.


हा हिणकसपणा, कमी दर्जा हेही आम्ही चालवून घेतलं असतं पण आमचा संबंध पापाशी लावला जातो तेव्हा वाटतं काय पाप केलं म्हणून हे आमच्या वाट्याला आलं! हे वचन पहा "वाममार्गाने मिळालेला पैसा कधी पचत नाही."  बऱ्याचदा असेही कानावर येते. "चांगल्या सुसंस्कृत घरातला मुलगा पण वाममार्गाला लागला!" खरं तर लहानपणी आईवडिलांनीच त्याला सांगितलेले असते की डाव्या बाजूने जावे. तेच त्याने जरा ताणून मोठेपणी लाक्षणिक अर्थाने आचरणात आणलेले असते!


भारताच्या राजकारणात तर आम्हाला अत्युच्च स्थान कधी मिळाले नाही. आम्ही आपले नेहमी दुय्यम. दुय्यम कसले? खरं तर तिय्यमच!


हिणकसपणा, पाप यांच्याशी आमचा संबंध लावला जातो त्यामुळे मनाला किती क्लेश होतात! वाटतं, संप पुकारावा (त्यात आम्ही पटाईत आहोतच!) म्हणजे तरी लोकांना आमचं महत्त्व कळेल. एका हाताने टाळी वाजत नाही हे सांगणाऱ्याने आमचे महत्त्व पटवून देण्याचा थोडाफार प्रयत्न केला आहे पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. तेव्हा आम्ही जातोच संपावर. मग बघा काय होतंय ते!


आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील ........


टिंबांच्या जागी भरता येतील अशा शब्दांची यादी खूऽऽप मोठी होईल आणि मग तुम्हाला आमचं महत्त्व कळेल. मग ओढा तर कळपट्टिका पुढे आणि करा सुरुवात शब्द टंकायला!


जाता जाता कुणीश्या हिकमती (बहुतेक डावखुऱ्या) माणसाने सांगितलेले एक वचन
 Lefts too have rights!
-------------------------