शास्त्रीय संगितावर आधारलेली गाणी

श्री. विनायक यांनी "संगिताच्या क्षेत्रात औरंगजेब आहे" आणि "शास्त्रीय संगितावरचा विश्वास उडाला" असे लिहिल्यामुळे हे लिहायला घेतले आहे.  त्यामुळे शास्त्रीय संगिताबद्दल थोडीफार माहिती व्हावी हा मुख्य उद्देश आहे.


एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे कि श्री. विनायक हे संगीत मर्मज्ञ आहेत.  त्यांच्याइतकी हिंदी चित्रपट संगिताची माहिती फार क्वचित इतरांना असेल.  विशेषतः त्यातले काव्य आणि शब्दार्थ याचे ते विशेष जाणकार आहेत.


हिंदी (आणि मराठी सुद्धा) चित्रपट संगीताचा उगम शास्त्रीय संगितातूनच झाला.  मराठी नाट्यसंगीत सव्वाशे वर्षे शास्त्रीय संगिताच्या आधारेच प्रचंड लोकप्रिय झाले आहे.  पं. बखले, मा. कृष्णा, गोविंदराव टेंबे, मा. दिनानाथ, बाबुजी, पं. हृदयनाथ, आनंदघन (स्वरलता) यांनी दिलेल्या चाली या त्यांच्या शास्त्रीय संगिताच्या ज्ञानाच्या बैठकीतूनच साकारलेल्या आहेत.


सर्व आघाडीचे संगीतकार हे शास्त्रीय संगीत स्वतः शिकले आहेत किंवा त्यांना त्याची पूर्ण माहिती आहे.  बाबुजींना गरिबीत उदरनिर्वाह नव्हता म्हणून गवैय्याचा पेशा सोडून ते संगीत दिग्दर्शनात उतरावे लागले.  रोशन अल्लाउद्दीनखान कडे शिकत राहिले असते तर रविशंकर, अलि अकबरखान सारखे शास्त्रीय दिग्गज झाले असते.  नौशाद, शंकर जयकिशन, सचीनदेव, सलील, रवि, जयदेव, वसंत देसाई, सारखे सर्व संगीतकार शास्त्रीय संगिताच्या आधारानेच गोड गाणी देऊ शकले.  AR सुद्धा अपवाद नाहीत.


अर्थात चित्रपटगीते आणि भावगीते यांचे गेयता आणि अर्थवाहन हे मुख्य काम असते.  शास्त्रीय संगिताच्या सुबद्ध नियमातल्या चौकटीमध्येच राहण्याचे त्यांना बंधन नसते.  त्यामुळे जरी गाणे हे शास्त्रीय संगितावर आधारले असले तरी त्यात वेगळे स्वर घेण्याची त्यांना मुभा असते.  थोडी उदाहरणे घेऊ या.


जाग दर्दे इष्क जाग -अनारकली; ना बोले ना बोले - आझाद, घडी घडी मोरा - मधुमति, आ जारे परदेसी - मधुमति, नैन से नैन नही मिला - झनक झनक पायल, ही सर्व गाणी बागेश्री मधली आहेत.  ती तुम्हाला आवडतात ते त्यांच्या गेयतेमुळे.  त्यामध्ये स्वरांचे साम्य आहे पण प्रत्येक गाण्याचे व्यक्तिमत्व वेगळे आहे.  ती संगीत दिग्दर्शकाची कला आणि देणगी आहे.  या प्रत्येक गाण्यात शास्त्रीय बागेश्रीबरोबर इतर काही वेगळे स्वर घेतले जातात.  तसेच बागेश्रीचे मूळचे स्वरहि वेगळ्या रितीने, म्हणजे आरोह, अवरोह, आलाप, ताना, पलटे अशा आखीव स्वरूपात न घेता काव्य, वृत्त, छंद याला अनुरूप गुंफले जातात.


हिंदी चित्रपट गीतात भैरवी आणि यमन हे दोन राग फार मोठ्या प्रमाणत वापरले आहेत.  दोन्ही राग विस्तारायला, गीते बांधायला मुबलक वाव देतात.  त्यामुळे तोच तोचपणा न येता या रागांत मनोहर रचना होऊ शकतात.


रागांवर आधारित चित्रपट गीते  तुम्हाला या दुव्यावर मिळतील.  ती बघा आणि तुमची उत्सुकता चाळवेल अशी माझी खात्री आहे.  तिथे प्रत्येक रागाची माहिती सुद्धा आहे.  अशी आणखीहि ठिकाणे आहेत.


डॉ. ठाकूर यांचे "राग कसे ओळखावे" असे एक पुस्तक संगीतप्रेमी लोकांनी अवश्य संग्रही ठेवावे.  याची पुण्यात रु.२०० किंमत आहे.  यांत सुमारे १०० रागांची जुजबी माहिती आणि प्रत्येक रागावर आधारलेली मराठी आणि हिंदी लोकप्रिय गाणी दिली आहेत.  त्यावरून तुम्हाला त्या रागांची तोंडओळख होईल.


BTW बाबुल मोरा ह्याचे श्रेय सैगल ऐवजी मी RC बोराल यांना देईन.


मंडळी आपल्याला काय वाटते ते कळू द्या.


कलोअ,
सुभाष