शेती - काही अपारंपारिक कल्पना

सध्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या हा सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. शेतींतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जफेड करू शकत नाही आणि अपेक्षित उत्पन्न न मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे पावसाची अनिश्चितता. एखाद्या वर्षी पाऊस किती पडेल हे सांगता येत नाही म्हणून पेरणी झाल्यावर अपेक्षित पाऊस नाही पडला तर नुकसान होते. यावर खालील पर्यायांचा विचार करावा.


१) पावसाळ्यांत शेती करू नये, पावसाळा संपल्यावर शेती करावी - पावसाळ्यांत पावसाचे पडणारे ज्यास्तीत ज्यास्त पाणी साठवून व जमिनींत जिरवून ठेवावे. पावसाळा संपल्यावर साचलेल्या व जिरलेल्या पाण्याच्या उपलब्धतेनुसर व उपयोगितेनुसार किती जमीन लागवडीखाली आणता येईल व त्यांत कुठले पीक घेता येईल ते (शेतकीतज्ज्ञांनी) ठरवावे व त्याप्रमाणे शेतकऱ्याला पीक घेण्यास सांगून त्यास पतपुरवठा करावा. यामुळे शेती उत्पादनांतील अनिश्चितता नाहीशी होईल. पावसाळ्यांत शेती न करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे शेतांत काम करणाऱ्याला भर पावसांत व चिखलांत काम करावे लागणार नाही.


२) समुद्राच्या पाण्यावर शेती - आपली शेती ही गोड्या पाण्यावर होते. जगांत गोडे पाणी जेवढे उपलब्ध आहे त्याच्या कितीतरीपट समुद्राचे खारे पाणी उपलब्ध आहे. त्याचे उर्ध्वपातनाने गोड्या पाण्यांत रूपांतर न करता थेट खाऱ्या पाण्यावर पीक वाढू शकेल असे काही करता येणार नाही का? अर्थात त्यासाठी नवीन प्रकारची बियाणे तयार करावी लागतील. प्रगत विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या साह्याने हे करता येईल असे वाटते. मात्र त्यासाठी त्या दिशेने संशोधन होणे आवश्यक आहे. (सुमारे ५० वर्षांपूर्वी "उद्यम" मासिकांत कोणीतरी ही कल्पना मांडली होती).  


आपणांस काय वाटते?