तुला स्मरताक्षणी इतके बरसले चांदणे



तुला स्मरताक्षणी इतके बरसले चांदणे

तुला स्मरताक्षणी इतके बरसले चांदण
चिरेबंदिस्त एकांतात घुसले चांदणे

उन्हातान्हातही ज्याला गवसले चांदणे
अशा वेड्यास सांगा काय, कसले चांदणे!

दवाचा स्पर्श का होतो निखाऱ्यासारखा?
धुके नाहीच हे आहे धुमसले चांदणे

धुरामध्ये चुलीच्या गोड दिसली पौर्णिमा
भुकेल्या आसमंती मुग्ध हसले चांदणे

जसा मी पाहिला हा चंद्र कोणी पाहिला?
मला दिसले तसे कोणास दिसले चांदणे?

चित्तरंजन

[जमिनीचे सौजन्य - कविवर्य वैभव जोशी ह्यांचे चांदणे ही मस्त गझल.]