अशोक, चबुतरा आणि पाणिनी

मी शाळेत असताना १०० गुणांचं संस्कृत घेतलं होतं. घेतलं होतं म्हणण्यापेक्षा घ्यावं लागलं होतं असं म्हणायला हवं. कारण 'अ' तुकडीतल्यांनी पूर्ण संस्कृत, 'ब' आणि 'क' तुकडीतल्यांनी अर्ध हिन्दी अर्ध संस्कृत तर 'ड', 'ई', 'फ' वाल्यांनी पूर्ण हिन्दी घ्यायचं असा शाळेचा नियम होता. अर्थात संस्कृत शिकायला माझी ना नव्हती, मला संस्कृत आवडायचं, अजूनही आवडतं. १० वी नंतरही ११ वी-१२ वी मधेही मी संस्कृत घेतलं होतं. विज्ञानशाखेच्या विद्द्यार्थ्यांनाही एक भाषा विषय घेणं अनिवार्य होतं. मी संस्कृत निवडलं.


११ वी-१२ वी मधे आम्हाला कुलकर्णी आडनावाच्या बाई संस्कृत शिकवायला होत्या. त्यांनी भासाच्या नाटकांवर Ph.D. केलेली होती. त्या संस्कृत नाटकं फारच छान शिकवायच्या. नाटक शिकावं तर ते कुलकर्णी बाईंकडूनच, असं आम्ही म्हणत असू. विज्ञान आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एकच अभ्यासक्रम असल्यामुळे आमचा तासही एकत्रच असायचा.


११ वी मधे एका धड्यामधे अशोकवृक्षाचा उल्लेख असलेली काही वाक्ये होती. त्यांचा अर्थ सांगून झाल्यावर बाई म्हणाल्या, "स्त्रियांचा आणि अशोक वृक्षाचा जवळचा संबंध आहे. आयुर्वेदामधे अशोकाला स्त्री-मित्र म्हणतात.  अशोकवृक्षापासून तयार केलेली औषधे अनेक स्त्रीरोगांवर उपायकारक आहेत. " मग मजेशीर चेहरा करून म्हणाल्या, "आणि माहित्ये का? असं पूर्वी म्हणायचे की सुंदर स्त्रियांनी मद्याची चूळ अशोकाच्या बुन्ध्यापाशी टाकून नाजुक पायांनी त्याला लत्ताप्रहार केल्याशिवाय अशोक म्हणे फुलायचा नाही!!!" नंतर  थोडावेळ थांबून म्हणाल्या, "कित्येक वर्षात मी अशोकाची फुलंच पाहिल्याचं आठवत नाहीये."


आमच्या वर्गातला एक (टारगट) मुलगा लगेच म्हणाला, " काय करणार मॅडम, हल्ली सुन्दर स्त्रियाच राहिल्या नाहीत! बिचारा अशोक तरी कसा फुलावा?" पण कुणाचा शब्द खाली पडू देईन तर ती मी कशी? मी ही लगेच म्हणाले, "तसं नाही हो मॅडम, सुन्दर स्त्रिया अनेक आहेत, पण झालंय काय की लत्ताप्रहार करण्यायोग्य दुसरी अनेक स्थळं आजूबाजूला दिसत असल्यामुळे त्यांचं बिचार्‍या अशोकाकडे मात्र दुर्लक्ष होतं!!" त्याचा चेहरा (सातव्या मजल्यावरून) खाडकन पडला.


बारावीपर्यंतचं शिकलेलं संस्कृत आवडल्यामुळे मी आणि माझ्या एका मैत्रिणीने (स्मिता) 'विज्ञान विशारद' (B.Sc.) करताकरता एकीकडे पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापिठामधून बाह्यत: 'संस्कृत विशारद' करायचं ठरवलं. घरी बोलल्यावर माझे बाबा मजेत म्हणाले, " म्हणजे तू आता सुसंस्कृत होणार तर!!" आम्ही दोघीही पुण्याच्या नसल्यामुळे पुस्तके मिळवून स्वत:च अभ्यास करायला सुरुवात केली. परीक्षा देण्यासाठी आठवडाभर पुण्यात जाऊन रहावं लागे. दुसर्‍या वर्षीच्या अभ्यासक्रमामधे बरीच नाटकं होती. आम्ही आमच्या कुलकर्णी बाईंना शिकवाल का विचारलं. त्याही लगेच हो म्हणाल्या. असंच एकदा शाकुंतल शिकवत असताना मधेच थांबल्या. आमच्याकडे बघून म्हणाल्या, "तुम्ही विज्ञान शिकणार्‍या मुली कशा अगदी रूक्ष असता. मी कला शाखेच्या विद्यार्थ्यांना शाकुन्तल शिकवत होते तर शकुंतलेच्या पाठवणीच्या प्रसंगाच्या वेळी मुलींच्या डोळ्यांत पाणी आलं. आणि तुम्ही मुली 'मग ठीक आहे, त्यात काय एवढं' असा मख्ख चेहरा करून बसल्या आहात!!"


एक भासलिखित नाटक (नाव आठवत नाही, बहुतेक स्वप्नवासवदत्तम असावं. इथे लिहिताना शेवटच्या अक्षराचा पाय कसा मोडायचा हे कुणी सांगेल का मला?) शिकत असताना नाटकातली प्रतिहारी राजाला त्याच्या महालातून बागेत जाण्याचा रस्ता 'इथून...इथून...' असं म्हणत दाखवत असते. स्मिता फिस्स करून हसली. म्हणाली, " हा कसला राजा, स्वत:च्याच महालातून स्वत:च्याच बागेत जायला त्याला प्रतिहारी कशाला हवी? बागेत कसं जायचं एवढंही लक्षात रहात नाही वाटतं?" बागेत गेल्यावर प्रतिहारी राजाला म्हणते "ज्या चबुतर्‍याजवळ दूध देणार्‍या गायी बांधल्या आहेत अशा चबुतर्‍यावर उभे रहा." आम्हाला दुसरी हास्यउकळी फुटली. एकूण ही महाकवी मंडळी महापाल्हाळीक. नुसतं चबुतरा म्हणून त्यांना पुरत नाही, 'ज्या जवळ गायी', आणि त्याही अशा-तशा नाहीत तर 'दूध देणार्‍या' अशी विशेषणं त्या चबुतर्‍याला आणि गाईंना जोडायलाच हवीत.  आम्ही उकळीला वाट करून देईपर्यंत बाई पुन्हा शिकवायच्या थांबल्या. 'आता काय झालं दात दाखवायला? चहाटळ मेल्या!!' असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर. स्मिता हसत म्हणाली, "आता गायी दूध देतात हे ही प्रतिहारीने राजाला सांगायची वेळ आली की काय? कठीण आहे बुवा!!" मी म्हणाले, " आणि पाल्हाळ तरी किती? इथे प्रतिहारी ऐवजी (व्याकरणकार) पाणिनी असता तर राजाला चबुतर्‍यावर उभं रहा असं सांगण्यासाठी 'च. उ.' एवढंच म्हणाला असता!". झालं, पुन्हा एकदा  आमच्या रुक्षपणाचा आणि विज्ञानशाखेचा बाईंकडून उद्धार झाला.