पाकसिद्धी: एक मार्गदर्शन

.,,.इरादे पाक (पवित्र ) असतील तर कृतीला समर्थन मिळणारच !


पाकसिद्धी: एक मार्गदर्शन


परवाच मित्राला म्हणालो की मी आमच्या संकेतस्थळावर पाककलेवर एक मार्गदर्शनपर लेख लिहिणार आहे. पाककलेपेक्षा 'पाकसिद्धी' हाच शब्द मला जास्त योग्य वाटतो. कला काय हो थोड्याशा प्रयत्नाने साध्य ही होईल पण सिद्धीसाठी तपश्चर्याच हवी !


'मी लेख लिहिणार आहे पाकसिद्धीवर' मी.


'का sssssय ' हा सदगृहस्थ अंगावर पाल पडल्याप्रमाणे किंचाळलाच. पुण्यात सारे जण एकमेकाला  सदगृहस्थच समजतात, जग काय समजतं माहीत नाही.


'का ? काय झालं एव्हढं ?' मी.


' तसं नाही रे पण जेनु काम तेनु थाय, बीजा करे सो गोतु खाय' सदगृहस्थ


'मी मराठी पदार्थांवर लिहिणार आहे गुजराथी नाही !' मी.


' अरे हे बघ, तुला ना कधी पाककृती लिहिताना पाहिलं ना, प्रतिक्रिया देताना. हा विषय काही सोपा नाही. संजीव कपूर, अमर राणे हे काही तुला त्यांच्या 'पंक्तिला' बसु देणार नाहीत.  तुला काहीही अनुभव नाही मग कुठल्या अधिकाराने तु हे लिहिणार आहेस ?'


'मी पुण्याचा आहे!' मी उत्तरलो;


''मी पुण्याचा आहे! म्हणजे कळलं नाही. सदगृहस्थ.


' यात न कळण्याजोगं काय आहे? ''मी पुण्याचा आहे! याचा अर्थ असा की कुणालाही कुठल्याही विषयातील ज्ञान देताना आम्हाला तो विषय आलाच पाहीजे अशी अट पुणेकरांना नसते. आता यालाच  काही लोक शहाणपणा शिकवणे असे म्हणतात पण असो. तर मंडळी याची पार्श्वभूमि सांगितली पाहिजे,ती अशी, एकदा रविवारी अश्विनी माझी बहीण आली आणि म्हणाली,


'दादा काय करतोयस ?'


'काय पाहीजे बोल लवकर मी जरा कामात आहे.'


'तू आणि कामात ?' अश्विनी (अस्पष्ट आणि सुस्पष्ट यांच्या सीमीरेषेवरचं हसु.)


'अश्विनीss मार खायचाय का ?' मी.


'अरे तसं नाही तु कामाचा आहेस म्हणून तर आले ना. बरं मला शिरा लिहुन देतोस ?' अश्विनी


'शिरा करून हवाय तर आईकडे जा ना माझ्याकडे कशाला आलीस ?' मी


'तु नीट ऐकलं नाहीस मला शिरा लिहून म्हणजे शिऱ्याची पाककृती लिहून हवीय . मला संकेतस्थळावर टाकायचीय आमच्या.' अश्विनी


' वा गं वा ! म्हणजे गिरवायला मी आणि मिरवायला तु ? जमणार नाही. चल मला काम करु दे' मी.


बरं ठीक आहे मग मी राणीकडूनच लिहून घेईन ती आल्यावर' अश्विनी


' राणी दिसत नाहिये गं दोन- चार दिवस ? कुठे गेलीय ?' मी.


'ती ना....... बरं ते जाऊ दे ,तु कामात लक्ष दे बघू!'अश्विनी


'जाs पेन आणि कागद घेऊन ये.' मी


'ती मामाकडे गेलीय वास्तुशांतीसाठी, शनिवारपर्यंत येईल.'अश्विनी.'


'हे बघ मी तुला डिक्टेशन देणार आणि तु लिहून घे फॉरमॅटप्रमाणे'


'बरं,सांग' .अश्विनी


'वाढणी : ४- ५ जणांसाठी


जिन्नस : रवा- २ वाट्या


साखर- २ वाट्या


तुप -२ वाट्या


पाणी-२ पेले


सुका मेवा (काजू, बेदाणे, बदाम, विलायची, चारोळी बारीक तुकडे) -२ वाट्या


क्रमवार मार्गदर्शन : १. रवा तुपात लालसर भाजून घ्या.


२. पाणी घालून शिजवा


३. त्यात साखर घालुन शिजत ठेवा.


४. शिजत असताना सुकामेवा घाला.


५. पुर्ण शिजला की गॅसवरुन  खाली  उतरवून घ्या.


स्त्रोतः सौ. आई


अधिक टीपा: लहान मुलांना हा शिरा फार फार आवडतो परत परत मागून खातात. एकदा खाल तर खातच रहाल !


दुसऱ्या दिवशी अश्विनी कॉलेजातुन आली. आईने दिलेले पाणी पिले आणि सरळ रिमोट घेऊन काहीही न बोलता (ही बोलत नसली की काही तरी बिनसलेलं असतं.) चॅनेल्स सारखी बदलत होती. चॅनेल्स बदलायचा वेग हा अस्वस्थतेच्या समप्रमाणात . आज वेग जोरातच होता. म्हंटलं गप्प  बसलेलंच बरं.  खुप वाट पाहून निराशा झाली आणि मला ऐकू येईल अशा आवाजात म्हणाली,


' इथं माझ्यावर एव्हsढी टीका झाली त्याचं आहे का कुणाला काही ? '


' काय झालं आणि कुणी केली टीका  ?' मी


' माझ्या शिऱ्यावर  टीका करणारी पहीली प्रतिक्रिया आली देखील !' अश्विनी


' काssय ?? तुझ्या शिऱ्यावर टीका ? स्रोत आई, लिहीणार मी तरी असं कसं झालं ? आणि काय लिहीलं आहे टीकाकारांनी ?' मी.


'दोन वाट्या रव्याचा शिरा आणि ४०- ५० जणांसाठी काहीहीहीहीहीही....'अश्विनी


' अगं पण मी ४-५ जणांसाठी सांगितलं होतं ना, मग ?' मी.


' हो रे पण कशी काय चूक झाली कळत नाही आणि मी ४०- ५० जणांसाठी  लिहून बसले. टाईपिंगची चूक रे साधी.' अश्विनी.


' साधी ? आधी चूक करायची आणि वर टीका झाली म्हणून कांगावा करायचा काय हे अश्विनी ? पाककृती लिहीतेस काय ? घे ना, असंच पाहीजे' मी.


'टीका करायला तुच कशाला हवाय ? तिथे खुप जण आहेत की. तु काही सुचवशील म्हणून सांगितले. मला तर पुढची प्रतिक्रिया येण्याआधीच वाचता येतेय. ' अश्विनी


'कुठली प्रतिक्रिया ?' मी.


'शिऱ्याची पाककृती तशी बरी आहे पण दोन वाट्या रव्याचा शिरा ४०-५० जणांसाठी पुरेल की नाही शंकाच वाटते बुवा ! ' अश्विनी


'हाs हाs हाss' मी.


' हास तु आणि उद्या कॉलेजात मी रडते मैत्रिणींपुढे' अश्विनी रडवेली झाली.


' हे बघ एव्हढी एम. बी. ए. करतेस ना मग स्वतः चे डिसिजन्स घ्यायला शिक ना, दरवेळी मी काय म्हणून ?' मी.


' पण 'तुझ्याकडे येण्याचं ' डिसिजन मीच घेतलं ना ?  अश्विनी.


'बरं, बरं. जा पेन आणि कागद घेऊन ये. आणि स्पष्टीकरण असं काही दे की ते सारवासारव नाही वाटलं पाहीजे. ' मी.


'म्हणजे कसं सांग ना,  मी लिहून घेते.' आता अश्विनीची कळी खुलली.


'हं लिही,


स्पष्टीकरण....


'शिऱ्याची पाककृती तशी बरी आहे पण दोन वाट्या रव्याचा शिरा ४०-५० जणांसाठी पुरेल की नाही शंकाच वाटते बुवा ! '


चूक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद! पण माफ करा चूक 'वाढणीच्या प्रमाणात' नसून पदार्थाच्या 'शिर्षकात' आहे. पदार्थाचे नाव 'शिरा' असे नसून ' सत्यनारायणाचा शिरा ' असे आहे. त्यामुळे हा दोन वाटया रव्याचा शिरा प्रसादाप्रमाणेच चिमूट चिमूट  ४०-५० जणांना वाटावा. नाही तरी दोन वाट्या सुका मेवा खाणे आर्थिकदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या योग्यच नाही, नाही का ?


धन्यवाद


-अश्विनी


'वाsवाss दादा मानलं तुला ! किती रे तु हुशार ?' अश्विनी.


' ही इतकी साधी गोष्ट तुला एव्हढ्या उशीरा का बरं कळली ?' मी.


'बरं बरं !' अश्विनी


दुसऱ्या दिवशी,


' ल sलs लs लालाss, गर्रर्र.  गुणगुण आणि गिरकी एकत्र, म्हणजे अश्विनी खुशीत;


'काय गं एकदम खुशीत ?' मी.


'कुठे होतासे रे ? केव्हाची शोधतेय' अश्विनी


'जीमला गेलो होतो, काय झालंय काय ?' मी.


' माझ्या ' सत्यनारायणाच्या शिऱ्याचं कित्ती कित्ती कौतुक झालंय ?' अश्विनी


'तुझ्या? स्त्रोत आई, लिहीणार मी आणि शिरा मात्र तुझा ?' मी.


अरे पण टाईप करते मी ना ? मग ?' अश्विनी 


'हो चुकीचं !' मी.


' ते जाऊ दे रे, प्रतिक्रिया ऐक ना एक दोन,


नवोदीतांना प्रोत्साहन देणारी एक प्रतिक्रिया,


' अश्विनीदेवी,


आपला सत्य नारायणाचा शिरा छानच हो.  माझाही नमस्कार सांगा सत्यनारायणाला.


आपला (विष्णुभक्त) तात्यागुरुजी.


एक जिंदादील प्रतिक्रिया आखातातून,


' अश्विनी  ........छानच आहे गं तुझा सत्यनारायणाचा शिरा....... मीही न चुकता करते हं सत्यनारायण इकडे. त्यांचा शिरकुरमा आणि आपला शिरा म्हणजे............ मज्जाच मज्जा !


नेहमी सकारात्मक बदल सुचवणारी एक प्रतिक्रिया मुंबईतुन,


'अश्विनी, हा जर सत्यनारायणाचा शिरा असेल तर पावित्र्य आणि चव वाढावी म्हणून मी थोडासा बदल सुचवू का बघ कसं वाटतयं


 रवा तुपात परततानाच त्यात तुळशीचे पान घालून परतावे व मग पाणी घालावे.


' अभिनंदन अश्विनी' मी.


' धन्यवाद दादा, पण आता माझा कॉनफिडन्स वाढलाय त्यामुळे साधे सोपे गोड पदार्थ सुचविण्याच्या स्पर्धेत मी भाग घेणार आहे. मी 'पाकातल्या पुऱ्या' अर्थात 'पाकातील चिरोटे' देणार आहे. चल घे बघू लिहायला.' अश्विनी .


'वा काय पण वाढलाय कॉनफिडन्स; चल घे बघू लिहायला ! ते काही नाही पाककृती झाली म्हणून काय झालं हे चमच्याने भरवणं बंद ! तू कसे लिहीशील ते सांग.' मी.


' त्याय काय मोठ. आधी वाढणी, मग जीन्नस' अश्विनी,


' हो पण वाढणी लिहीताना जपून, नाही तर बसेल 'शुन्याचा फटका'.' मी


'हो रे बाबा, आणि मग क्रमवार मार्गदर्शनध्ये  प्रथमपुऱ्यां साठी मैदा व रवा मळून घ्या. आणि मग  .....'  अश्विनी .


' थांब अश्विनी,  म्हणजे तुझा संकेतस्थळाचा अभ्यास नीट झालेला नाही. बी अ स्मार्ट रायटर ! लोकांचा वेळ वाचावा अशा प्रकारे तु छोटेखानी लेखन करायला हवेस. ' मी.


'म्हणजे कसे रे दादा ? उदाहरण दे ना' अश्विनी.


'उदाहरण म्हणजे हेच चिरोटे मी असे लिहिले असते,


''वाढणी : ४- ५ जणांसाठी


जिन्नस : रवा- २ वाट्या


मैदा-४ वाट्या


साखर- १० वाट्या


तुप -५ वाट्या


पाणी-१५ पेले


लिंबू-१


 क्रमवार मार्गदर्शन :


१. पुऱ्यांच्याकृतीसाठी येथे पहा 


२. पाकाच्या कृतीसाठी येथे पहा


३. क्र. २ प्रमाणे केलेल्या पाकात अर्धे लिंबू पिळा व त्यात क्र. १ प्रमाने केलेल्या पुऱ्या हलक्या हाताने सोडा.


अधिक टीपा: लिंबू पिळताना जोराने पिळू नये. त्यामुळे पाकाला कडवटपणा  येतो.  चिरोट्याच्या पाकाला आणि आयुष्याला कधीही कडवटपणा येऊ देऊ नये. मधुमेह्यांसाठी वैधानिक इशारा , चिरोटे खाणे मधुमेहासाठी धोकादायक असते. 


' काय कसं काय वाटलं ?'


' अरे दादा तु काय सुचवलस रे याच्यात, लिंबू पिळा आणि पुऱ्या उचलून पाकात टाका. अरे ही सरळ सरळ  उचलेगिरी झाली ना. ' अश्विनी


'हे बघ अश्विनी चांगलं कुणाचही उचलावं. आता पैसे म्हणजे लक्ष्मी, चांगली गोष्ट. रस्त्यात पैसे पडले असले तर आपण नाही का कुणालाही न विचारता, न सांगता उचलून घेत. आणि तुला  'आयुष्याला कधीही कडवटपणा येऊ देऊ नये' यासारखे जीवनविषयक तत्वज्ञान, मधुमेह्यांसाठी  आरोग्यविषयक सल्ला हे नाही का दिसत ? ठीक आहे आता तु पुढच्यावेळी काही लिहून माग, बघ देतो का लिहून!' मी चिडून म्हणालो.


' बरं बरं चिडू नकोस असा हा घे शिरा ! सरप्राईझ!' अश्विनी


' अरे वा, छानच झालाय शिरा. जमतो की तुला' मी.


' मी नाही काही आईनेच केलाय, एक्स्पर्ट असताना उगाच रिस्क घ्या कशाला ? 'अश्विनी


' म्हणजे जगाला ब्रम्हज्ञान शिकवून काय उपयोग, उद्या सासरी गेल्यावर सासूने म्हंटलं कर शिरा तर काय आईला बोलावणार आहेस का ?' मी.


' नाssही ! सासूशीच आईसारखं वागणार आहे मग नो प्रॉब्लेम !' अश्विनी


'वा काय मॅनेजमेंट आहे. यंदा एम. बी. ए .ला दुसरं कोण येणार ते सांग जरा, नाही कारण टॉपरचं नाव कळलचं आहे. ' मी.


' बरं रे वेळ झाला की सांगते हं . मला आता बाकरवड्या शिकायच्यात तुला...' 


'अश्विनी , इनफ हा आता जर तु काही लिहुन मागितलस ना तर तु केलेला कुठ्लाच पदार्थ मी यापुढे टेस्ट करणार नाही.'


अशा आमच्या बहीणाबाई, जरा कठीणच आहे. हिचे एकदा दोनाचे चार केले की मी सुखाने डोळे ....... **यला मोकळा.


                                                      ....अभिजित पापळकर