चंदनापरी मज, माझ्यावर जळणारे
जातात देउनी काळिज दरवळणारे
का उगा शोधिसी रानफुलांची वस्ती?
बाजारी खपती झेंडू झळझळणारे
वाटले किती घेतील भरारी आता!
ते किडेच होते साधे वळवळणारे
सावकाश गेलो मी माझ्या वाटेने
बाजूला पडले पुढे-पुढे पळणारे
उत्तुंग डवरल्या इमारतींच्या बागा
आले सळयांचे वसंत सळसळणारे
तक्रार नेहमी असते ही अर्थाला
हे शब्द बिलंदर, बाराचे, छळणारे!
कोसळतानाही अश्वत्थाला चिंता
"जातील कुठे हे पक्षी अवखळणारे?"
वाहतेच आहे खोल नदीचे पाणी
ते झरे आटले नुसते खळखळणारे!
—चित्तरंजन