प्रायोजित साती

                            प्रायोजित साती


     आजकाल हे मला फार म्हणजे फारच जाणवायला लागलंय. म्हणजे या पूर्वीही असंच होतं, असंच चालतंही सगळीकडे , पण मला मात्र आता हे कुठेतरी खुपायला लागलंय.


म्हणजे त्याचं असं झालं की मी गेल्या आठवड्यात काही महत्त्वाच्या धड्यांच्या छायाप्रती काढायला(शुद्ध मराठीत सांगायचं तर इम्पॉर्टंट टॉपिक्सच्या झेरॉक्स करायला) गेले होते. तिथे नेमका एक एम. आर. (औषध कंपनीचा प्रतिनिधी) आला.
"अरे, अरे मॅडम... हे काय करताय? अशी छोटी मोठी कामे आम्हाला सांगत चला की "
"अं .., हो, नाही.. थोडी घाई होती ना म्हणून मीच आले स्वतः"
'घाई होती ना' म्हणजे? घाई नसती तर मी एखाद्या एम. आर. ला (थोडक्यात आम्ही एमार म्हणतो) फोन केला असता. त्याने माझ्याकडून पुस्तक घेऊन प्रती काढून दिल्या असत्या आणि त्याबद्दल दोन मिनिटे त्याची त्याच्या कंपनीच्या औषधासंबंधीची बडबड मला ऐकून घ्यायला लागली असती.


त्या दिवसापासून हे फारच मनात घोळायला लागलंय की किती काय काय आपण या एमारांकडून घ्यायला लागलोय.आयुष्यातल्या किती गोष्टी हे एमार प्रायोजित करायला लागलेयत..


रोजचा दिनक्रम.


मी गजर झाल्यावर सकाळी उठते --- घड्याळ प्रायोजित
दात घासते --- ब्रश, टूथपेस्ट प्रायोजित
स्नान करते--- साबण, शांपू, कंडिशनर इतकंच काय टॉवेलसुद्धा प्रायोजित
चहा करते--- दूध पावडर, टी बॅग्ज, साखर, मग, चमचे सगळं काही...
अभ्यास करते--- बरीचशी पुस्तके ,नोटस् , वह्या, पेन सगळं काही प्रायोजित.
तयारी करून कामाला जायला निघते तर महागडी कॉस्मेटिक्स सुद्धा प्रायोजित.
ओ.पी.डी. त मी जाण्याअगोदरच एमार येऊन बसलेले असतात. हातात त्यांच्या कंपनीच्या जाहिराती आणि बॅगेत प्रायोजित वस्तू.
''पेशंट बघेपर्यंत एकाही एमारला आत पाठवायचं नाही' असा सज्जड दम मी दारावरच्या शिपायाला दिलेला असतो म्हणून आजकाल हे एमार मध्येमध्ये घुसत तरी नाहीत. पण मग शिपायाला सांगून त्याच्या हातून मध्येच परदेशी कंपनीचा ऑरेंज ज्यूस पाठव, मोठालं चॉकोलेट पाठव असं चालूच असतं. पेशंट संपताच टोळधाडीसारखे घुसतात सगळे आत.


"मॅडम, हे नवं अँटीमलेरियल--- याचे हे फायदे-- हे इतरांपेक्षा चांगलं" सँपलच्या दोन गोळ्यांबरोबरच एखादं उंची पेन, एखाद्या मेडिकल जरनलाचा नवा इश्यू ज्यात या औषधाची भलामण केलेली असेल, आणि एखादी प्रायोजित भेट किंवा गिफ्ट. बरं ही गिफ्ट काय असेल याचा त्या प्रॉडक्टशी काही संबंध नाही.
मलेरियाच्या औषधाबरोबर 'येरा' चे ग्लासेस, रक्तदाबाच्या गोळ्यांबरोबर कपडे ठेवायचं बकेट, पेनकिलरबरोबर इमर्जन्सी लाइट काहीही. एक पठ्ठा तर डायबेटीसच्या गोळ्यांबरोबर नेहमी शुगरक्युब्ज(साखरेचे ठोकळे?) देतो. "मॅडम यू विल रिमेंबर मी एवरी मॉर्निंग " ही वर साखरपेरणी.


औषधाच्या किंमतींच्या चढत्या भाजणीप्रमाणे गिफ्टची किंमतही चढत जाते. एखादं नवं अँटिबायोटिक आलं की सगळ्या कंपन्या तो मॉलेक्यूल लाँच करायला धावतात. (रेणू प्रकाशित करायला? बाजारात आणायला?) 'आमचाच मॉलेक्यूल कसा ओरिजिनल, कसा भरवशाचा, कसा इंटरनॅशनल'  हे सांगायला सोबत गिफ्टची खैरात असतेच. नव्या मॉलेक्यूलचं लाँच नेहमी एखाद्या पंचतारांकित हॉटेलात . तिथे नावापुरतं एखादं लेक्चर झालं की खाणं आणि पिणंही.


या दिवाळीत या एमार लोकांनी पणत्या, कंदिलांपासून रांगोळीपर्यंत सगळं दिलं. मिठाया आणि ड्रायफ्रुट तर विचारूच नका. माझ्या रूममधलं फर्निचर आणि काँप्युटर सोडला तर जवळजवळ सगळ्या वस्तू स्पॉन्सर्ड आहेत. आता नको असे सांगितलं तरी घराबाहेर वस्तू ठेवून जातात.


आता हे सगळं टाळणं आमच्या आवाक्याबाहेर गेलंय. माझा एक मित्र आहे त्याचं नांव ज्ञानेश्वर. त्याच्या स्वभावामुळे त्याला सगळे संत ज्ञानेश्वरच म्हणतात(त्याच्या खऱ्या नांवात संत नाही हे आता त्यालासुद्धा आठवत नसेल). मी सोडून हे सगळं ज्याला खटकतं असा हा एकमेव प्राणी. तो खायच्या प्यायच्या वस्तू किंवा 'कंझ्युमर प्रॉडक्ट' या सदरात बसणाऱ्या कोणत्याच वस्तू एमारांकडून घेत नाही. पण पुस्तके, नोटस्, जर्नल्स,अभ्यासाच्या सीड्या घेतो. मला मात्र प्रश्न पडतो की असं करणं जास्त योग्य ठरेल की काहीच न घेणं?


एक दिवस माझ्या हुशार मित्राशी चर्चा करत असताना(हा अभ्यासाबरोबरच व्यवहारातही हुशार आहे असे सगळे म्हणतात) हा विषय काढला.


"हे बघ, एखाद्याकडून गिफ्ट घेतल्यावर तू त्याचंच प्रॉडक्ट वापरायचं असं करतेस का?"
"नाही"
"समजा, तुझ्या अनुभवावरून एखादं प्रॉडक्ट कमी प्रतीचं आहे असं लक्षात आलं तरीही एमार गिफ्ट देतो म्हणून तू ते प्रॉडक्ट पेशंटला लिहून देतेस का?"
"नाही"
"मग झालं तर..तुला एवढं हळहळायचं काही कारण नाही"
"तसं नव्हे रे हुशार, पण बघ बाजारात इतक्या कंपन्या एकच मॉलेक्यूल विकतात, जे एमार सतत येतात किंवा काही तरी देतात त्यांचंच प्रॉडक्ट आपण कळत नकळत देतो ना? ही सुद्धा एक प्रकारची चूकच नव्हे का?"
"कसली चूक कर्माची, अगं हे मार्केटिंगचं युग आहे, जो चमकतो तो खपतो"
"तरीपण.. आता तुलाही माहित्येय ते 'अबक' औषध एक कंपनी दहा रु. ला विकते आणि दुसरी पंचविसाला, दुसरीचा मालक तिच्या प्रमोशनसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतो म्हणून आज तो ब्रँड मार्केटमध्ये चालतोय ना? अन्यथा हेच औषध तयार करायला चार रु सुद्धा खर्च होत नाहीत"
"त्यात काय मोठंसं, कोका कोला पण हेच करतं"
"अरे पण कोका कोला सॉफ्ट ड्रिंक आहे रे , हेच तत्त्व औषधांसाठी कसं वापरता येईल?"
"साती, तू जास्त विचार करू नकोस, नाहीतर तुझं नांवही उद्यापासून 'संत सातीमा' होईल"
पुढे काय बोलणार?


पण आता हे वाढतच चाललंय. इतकी प्रलोभनं आहेत, की बळी न पडणारा मूर्ख ठरतोय.  हे खपवा आणि सिंगापूरची ट्रीप मिळवा, ते खपवा आणि प्लाज्मा टि. व्ही. मिळवा.. काय वाट्टेल ते प्रायोजित करू पण माल खपवा. आजकाल हृदयरोग्याच्या धमन्यांत स्टेंट कुठला बसवायचा हा निर्णयसुद्धा प्रायोजित व्हायला लागलाय. सरकारने वैद्यकीय व्यवसायाला ग्राहक संरक्षण कायदा लागू केलाच आहे, त्यामुळे आजकाल फारमा कंपन्या दुकानदार झाल्यात, रुग्ण एक ग्राहक आणि डॉक्टर..?


आजचा डॉक्टर एक दलाल होत चाललाय.