'खानपान' किस्से!

ताजमहाल,बॉलिवूड आणि भारतीय जेवण यांचे फिरंगी मंडळींना विशेष आकर्षण आहे असे जाणवले.भारतीय दुकानात आणि उपाहारगृहात दिसणारी फिरंगी गर्दी पाहिली की हे आणखी प्रकर्षाने जाणवते.आमच्या काही सहकाऱ्यांचे आणि मित्रांचे खानपान किस्से सांगण्याचा मोह आवरत नाही.
इथे पंजाबी (सीमेच्या अलिकडचे आणि पलिकडचे) दुकाने आणि उपाहारगृहे बरीच आहेत,त्यामुळे लस्सी,समोसा,जिलबी इथे लोकप्रिय झालेली आहे.याच बरोबर बटाटेवडे आणि भजीप्रेमी झालेत आमचे ख्रिश्चन आणि सुझाना.त्यांना मी वडे आणि समोसे शिकवणार आणि 'तिरामिसु' ख्रिस मला शिकवणार असा आमचा भविष्यातला बेत आहे.
नील्स मुल्लर हा माणूस गेले ५,६ महिने 'नान' करण्याचे प्रयोग घरी करतो आहे,(त्याला सांगितलं,बाबा रे हे मला पण नाही येत करता अजून!) त्याच्या मेजाच्या खणात वेगवेगळ्या लोणच्यांच्या बाटल्या असतात.(लखूभाई पाठक झिंदाबाद!)आणि भारतातून येताना माझ्यासाठी 'रेसिपी बुक्स' आणा असं त्याचं सांगणं असतं.
आमची एक फ्रेंच मैत्रिण आहे पण ती राहते इंग्लंडात! तिलाही भारतीय जेवण खूप आवडतं. एकदा ती आमच्या कडे आली असताना म्हणाली एक खूप तिखट करी असते,त्यात कांदा,बटाटा घालतात आणि आणखी पण काही घालतात त्याचं नाव मी विसरले,पण तुला माहित आहे का ते काय असते ते? मी चक्क मिसळ केली आणि तिने चाटून पुसून खाल्ली,  सगळं वहीत उतरवून घेतलं आणि आता ती ही घरी करते!
गाबीचा ८ वर्षाचा मुलगा वाढदिवसाच्या पार्टीत भारतीय जेवण हवं असा हट्ट करतो आणि तुझ्या हपिसात एवढे भारतीय लोक आहेत तर शिकून घे ना स्वैपाक असा आदेशही देतो.मिशाईल बेसनाच्या लाडवांचा दिवाना आहे,तर कॉनी आणि तिचा नवरा  तिखट चिकन  रश्शावर तुटून पडतात.
बिबर आणि होमेल हे सत्तरीच्या दरम्यानचे आजोबा ढोकळ्याचं प्रात्यक्षिक करायला लावतात आणि  फ़्राऊ श्वार्झ फोन करून पुलावाची रेसिपी मागते.(हिला आम्ही काळेबाई म्हणतो.कारण श्वार्झ =काळा)आणि मार्सेलाला चिंचेची भेळीची चटणी आवडते.डॉ.मानफ्रेड हा आजोबांचा खास दोस्त शंकरपाळ्यांवर बेहद्द खुश आहे.मागच्याच जुलै मध्ये ७० वा वाढदिवस साजरा करणारा हा तरुण माझ्या बरोबरीने शंकरपाळे तळायला उभा असतो!
आजीआजोबा तर इडलीपासून गाजरहलव्यापर्यंत सगळंच आवडीने खातात पण त्यांचा आणि एक आवडता पदार्थ आहे फोडणीची पोळी!त्याचं असं झालं, एकदा आमचे ते सुप्रसिद्ध बकासुराचे मावस,चुलत इ.इ. भाऊ असलेले मित्र जेवायला येणार म्हणून ढीगभर पोळ्या केल्या आणि ऐन वेळी संगणकाच्या सिस्टीमच्या अंगात आलं. त्याचं भूत उतरवायला दिनेश सकट सगळ्यांनाच ऑफीसातच थांबावं लागलं आणि आमचा सगळा बेत बारगळला. एवढ्या पोळ्यांचं काय करायचं? हमखास उत्तर 'फो ची पो' शिवाय काही सुचलं नाही.मी पोळी फोडणीला टाकली आणि आजी काही कामासाठी वर आली.खमंग वासाने तिची उत्सुकता वाढली आणि तिने चाखून पाहिली.तिला इतकी आवडली की आजोबांसाठी पण पाहिजे म्हणून ती घेऊनही गेली.मला इकडे कसंतरीच वाटतं होतं,हा काही आवर्जून देण्याचा पदार्थ नव्हे.तसं मी बोलले सुद्धा! पण त्यांना फारच आवडली.आणि आता अधूनमधून त्यांची ही सुद्धा फर्माईश असते.मग मी ताज्या पोळ्यांच्या फोपोत मजा नाही म्हणून आदल्या दिवशी जास्त पोळ्या करते आणि त्यांना फोपो  नेऊन देते!
आजीआजोबांची खास दोस्तमंडळी दर २ महिन्यांनी दिवसभर एकेकाकडे जमतात.एकदा सर्व जेवण भारतीय पाहिजे असा आदेश आला.मग काय मी आणि आजीने श्रीखंड, पुरी,बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर,मसालेभात असा बेत केला! कधीतरी तिला बोलले होते श्रीखंडपुरी खायची तर चांदीच्या ताटातून! तिने सगळा चांदीचा सेट काढला आणि या मंडळींनी काटेचमचे बाजूला ठेवून अन्नब्रह्माचा आस्वाद घेतला.
खवय्यांच्या रसनासुखाची ही कहाणी!