सारे प्रवासी 'गाडी' चे

ज्याने उपनगरी गाडीने प्रवास केला तो खरा मुंबईकर. मुंबईकर असण्यासाठी ज्या अटींची पूर्तता करणे आवश्यक असते त्यापैकी ही एक प्रमुख अट. या गाडीला मुंबईची जीवनरेखा म्हटले जाते ते अगदी सार्थ आहे. विरार ते चर्चगेट आणि कर्जत/कसारा ते छत्रपती शिवाजी अंतिमस्थानक या दरम्यान दररोज अर्ध्या कोटीहून अधिक मुंबईकरांना घरून कामाला आणि कामावरून घरी अशी ने-आण करणारी ही गाडी अर्थातच मुंबईच्या जीवनाचे व संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. मामाच्या गावाला नेणाऱ्या झूक झूक गाडीपेक्षा मुंबईकराला ही सुसाट धावणारी उपनगरी गाडी अधिक जवळची.

मुंबईकराचे आयुष्य या गाडीच्या वेळापत्रका बरोबर धावत असते. गाड्या भले अनियमित असोत, वेळापत्रक मात्र ८.२८ वा ९.०४ असे असते! अगदी काटेकोर. जग हे बंदिशाला च्या चालीवर या गाडीत देखिल जो आला तो रमला अशी गत असते. बंदिशालेप्रमाणे इथे देखिल समस्त प्रवासी क्रमांकाने म्हणजे त्याच्या गाडीच्या वेळेने ओळखले जातात. ठाणे स्थानकात गर्दी भेदून शिरताना डाव्या हातात वर्तमानपत्राची गुंडाळी आणि उजव्या हाताने काखोटीला मारलेली चामड्याची थैली अशा चिरपरिचीत अवतारातले रेघांचा सदरा घातलेले जाड चष्म्याचे गृहस्थ लगबगीने बाहेर पडताना दिसले तर समजायचे की ९.०४ ठाण्यातून बाहेर पडली. मोठ्ठा आधुनिक काळा चष्मा धारण केलेला गोरा मुखडा दिसताच जाणकार कुजबुजत 'आज ९.२४ वेळे आधी आलेली दिसते'. इथे गाडी कधी येते यापेक्षा कोणती येते हे महत्त्वाचे. ९.११ चा समुदाय समोर उशीराने आलेली ९.०४ दिसली तरी अजिबात पाय टाकणार नाही. याला म्हणतात निष्ठा! शिवाय प्रत्येक गाडीचा एक विशिष्ट प्रवासीसंग्रह असतो. आधीच गाडीत असलेले, आपल्या बरोबर गाडीत चढणारे आणि पुढील प्रत्येक स्थानकावर चढणारे चेहरे हे ठरलेले असतात. शाळेत असताना 'आतले आणि बाहेरचे' असा एक धडा होता, त्याची हटकून आठवण येते. नवख्या माणसाला चटकन एखाद्या घोळक्यात प्रवेश मिळणे कठीणच. पण एकदा शिरकाव झाला की जणू आपण बालपणापासून यांच्यात वावरतोय असे आलेल्याला वाटावे.

मुंबईकर तसे रोखठोक. उगाच खोटी औपचारिकता नाही. आमच्या मामलेदार सारखा इथे देखिल खरा 'समभाव' पाहायला मिळतो. नुकत्या नोकरीला लागलेल्या बॅंक लिपिका पासून ते परदेशी आस्थापनेत उच्चपदावर असलेल्या पर्यंत आणि समभाग दलाला पासून ते व्यावसायिकापर्यंत सर्वजण इथे सारखेच. तेच जात-धर्माच्या बाबतीत. ब्राह्मण, अब्राह्मण, मागासवर्गीय, अमराठी - म्हणजे सिंधी, गुजराथी, मद्राशी सगळे या दिंडीत सामील. पोटासाठी धावणाऱ्या मुंबईकराला असे फालतू भेदाभाद करायला वेळ नसतो आणि स्वारस्य त्याहून नसते. जो आपल्या कंपूत आला तो आपला. इथे खरी कंपूबाजीही पाहायला मिळते. गाडी स्थानकात शिरतानाच दारात झुलणाऱ्यांपैकी 'आपले कोण' याचा शोध घेत एका हाताने फलाटावरील आपल्या माणसांच्या हातातील पेट्या घेत दारालगत टाकतात व त्यांना पकड घेण्यासाठी त्यांचे हात मोकळे करतात. अख्खा कंपू आत शिरताच एकदा हजेरी होती, न आलेल्यांचा परामर्श घेतला जातो, थेट पहिल्या स्थानकापासून आलेल्यांना नमस्कार चमत्कार होतात. एकमेकाची टिंगल टवाळी चालते; मात्र मस्करीची कुस्करी होत नाही.

एकदा कंपूतला म्हटला की त्याला सोडत नाहीत. नेहमी दाराच्या अलीकडे आत दांड्यालगत उभा राहणारा हरी जर चुकून आत आत सरकत पहिल्या वर्गाच्या डब्याचा टोकाला म्हणजे महिला प्रथम वर्गाच्या दुभाजकाच्या दिशेने सरकला तर 'काय हऱ्या, अरे ढापण आले लेका आता तरी डोळे फाडून बघायची सवय सोड' असा उपदेश कुणी कंपूबाज ठणठणीत आवाजात करतो आणि डब्यात हास्याचा फवारा उडतो. एकदा आपल्या कंपूतला आहे ही स्थिती एखाद्याला प्राप्त झाली की त्याचे वय, शिक्षण, हुद्दा वगैरे सगळे गौण असते. आता बंडूकाकांचेच पाहा ना! आमच्या कंपूत दोन बंडूकाका;पैकी एकांना टक्कल असल्याने त्यांना डेव्हिड काका असे नाव पडले होते. का? तर त्यांचे टक्कल अगदी हुबेहूब डेव्हिड या जुन्या हिंदी नटासारखे दिसते असा शोध कुणाला तरी लागला म्हणून. ते देखिल मोठे खमंग. चिडायचे अजिबात नाहीत, मात्र आम्हा विशीतल्या पोरांना सटासट टपल्या हाणीत सांगायचे, 'साल्यांनो माझ्या वयाचे व्हाल तेव्हा वाकलेले दिसाल, असे ताठ उभे राहून दाखवा त्या वयात'. दुसरे बंडूकाका एका बहुराष्ट्रीय आस्थापनेत होते. नुकतेच त्यांच्या आस्थापने चे नाव बदलले होते. त्याच सुमारास शुक्रवारी संध्याकाळी कुठेतरी जायची टूम निघाली. बंडूकाकांनी सध्या काम फार असल्याने जमणार नसल्याचे सांगताच दुसरे बंडूकाका म्हणजे डेव्हिडकाका म्हणाले, 'बरोबर आहे रे बंड्या, तुला जुन्या कागदपत्रांवर नव्या नावाचा शिक्का मारायची कामगिरी दिली असेल! उगाच जुने नाव असलेले कागद वाया जायला नकोत, नाहीतरी एरवी याला काय काम आहे? सगळा डबा खोखो हसत होता. आता हे ज्येष्ठ लोक आम्हाला मोठे वाटले तरी आपापसात एकमेकाचा असाच उल्लेख करीत असत व आम्हाला त्याची मोठी गंमत वाटायची. साहजिकच आहे हो, ज्याचे केस पिकले आहेत, ज्याच्या मुलीचे लग्न झाले आहे त्याला कुणी ए बंड्या म्हणतोय याची गंमत वाटायचीच.

कंपू तीन प्रकारचे. एक आमच्या सारखे साधे कंपू. दुसरे गाडीचा पत्रा बडवत तारस्वरात भजन गाणारे कंपू आणि तिसरे पत्ते वाले 'कुटाळकंपू'. पण कसा ही असला तरी ज्याला त्याला आपापला कंपू प्रिय. ही कंपूतली ओळख म्हणजे पाण्यात असूनही कोरड्या असणाऱ्या कमलपत्रासारखी. म्हटले तर अगदी रोजचे, सलोख्याचे मित्र, एकमेकाच्या कचेऱ्या वा घर कुठे आहे हे साधारण माहीत,मात्र कौटुंबिक चौकश्या कुणी फारसे करत नसे. कोणाच्या घरी कोण असते, घरी काय आहे वगैरे कौटुंबिक माहिती कुणी स्वतः: ह्वून सांगेपर्यंत कुणी विचारत नाही. कुणी डब्यात पेढे वाटतो तेव्हा समजते की याचा मुलगा दहावीला होता. मात्र  एखाददा कामानिमित्त त्या बाजूला गेलं तर एक कंपूबाज हमखास त्या कचेरीत आपल्या सहप्रवाशाला हुडकून काढल्या खेरीज राहणार नाही. मग दोघे मित्र चहा घेणार. कधी चुकून गाडी वेळेआधी एखादं मिनिट पोचली तर छ. शि. ट. ला उतरल्यावर समोर 'आराम' मध्ये सामूहिक चहापान व्हायचे, मात्र इथे खर्च ज्याचा त्याने करायचा अशी पद्धत. अनेक अबोल वा भिडस्त प्रवासी संकोचून जरा लांब उभे राहत असले तरी मनाने ते कंपूत असायचे. रविवारी फिरायला बाहेर पडले असताना असा चेहरा दिसला तर स्मितांची देवाण घेवाण व्हायची पण बरोबरच्याने हे कोण? असे विचारले तर 'सहप्रवासी' इतकेच उत्तर असायचे. मात्र आपल्या गाडीचा प्रवासी ही ओळख प्रचंड असते.

१९८४ च्या मे अखेरची गोष्ट. आमचा कंपू नेहमीप्रमाणे ९.११ ला होता. ठाणे-दादर-भायखळा-छ.शि.ट. असा प्रवास करणारी गाडी कुणी चुकून द्यायचा नाही. त्यादिवशी काहीतरी गोंधळ होता. दादरच्या अलीकडे गाडीने संथ होत खडखडत सांधा बदलला. द्रुतमार्गावर बहुधा लांबची गाडी खोळंबली असावी. गाडी ३ क्रमांकाला लागणार म्हणजे प्रवासी ज्या दिशेला उतरण्यासाठी एकवटले होते त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला फलाट! अचानक प्रवाह उलटला, गोंधळ झाला, दाराच्या दिशेने लोंढा आला. गाडी स्थानकात शिरता शिरता नक्की काय झाले समजले नाही, पण मला अचानक मी गाडीत नसून गाडीला समांतर प्रवास करत असल्याचे लक्षात आले व पुढच्याच क्षणी मी फलाटावर घासत आदळलो. गलका उडाला. सगळा कंपू आपल्याला होणाऱ्या उशीराची वा कचेरीत खोळंबलेल्या कामाची पर्वा न करता उतरून आला. बाप्याने माझी पेटीही उतरवून आणली. तसे फार लागले नव्हते पण डोक्याला मागच्या बाजूला वरच्या भागात जखम झाली होती. सगळा सदरा डोक्यातून वाहणाऱ्या रक्ताने भरला होता. स्थानकाधिकाऱ्याने किरकोळ उपचार केले पण टाके घालणे शक्य नव्हते. एव्हाना एक जण नवा सदरा आणायला दादर स्थानका बाहेर पडला होता. नुकत्याच होवून गेलेल्या हिंदू-मुसलमान दंग्याच्या पार्श्वभूमीवर रक्ताने भरलेला सदरा फार भयंकर दिसत होता. बाप्याने सगळ्यांना सांगीतले की तो दांडी मारणार आहे तेव्हा तो मला घरी नेईल, इतरांना थांबायची गरज नाही. आता गेले तरी चालेल अशी खात्री झाल्यावर 'जपून जा रे'- 'बाप्या याला घरपोच कर', असे सांगत मंडळी पुढच्या गाडीने रवाना झाली. घरी आल्यावर दोन टाके घालून झाले, तसे विशेष लागले नव्हते. बाप्या माझा जुना म्हणजे गाडी आधीचा मित्र. चला, आज या निमित्ताने सुट्टी झाली आहे, चल मस्त पैकी गप्पा मारू असे म्हणत त्याला घरी नेला. दुसऱ्या दिवशी नेमका सकाळी पाऊस आला. मला छत्रीसह पाहून काका लोकांनी माझी अक्कल काढली. अरे मूर्खा, डोक्याला टाके असताना या पावसात कशाला मराला आला आहेस? अरे दोन दिवस गेला नाहीस तर काही तुझी कंपनी बंद पडणार नाही की तुला काढून टाकणार नाही असे म्हणत कंपूतल्या काकांनी वडीलकीच्या अधिकाराने मला घरी परतवले.

पावसाळा म्हणजे गाड्यांचे गोंधळ हे ठरलेले. मात्र पावसाने गोंधळ घातला की मुंबईकर कचेरीत पोचण्यासाठी हट्टाला पेटतो; याला अगदी बायका देखिल अपवाद नाहीत. जर पावसामुळे लवकर सोडले तर उगाच गेले नाही म्हणून पूर्ण दिवसाची रजा लागायला नको, शिवाय रखडत रखडत पोचेपर्यंत व कसे आलो या गप्पा मारेपर्यंत कचेरी सोडून दिल्याचे फर्मान येणार; या विचाराने स्त्रीवर्ग हमखास स्थानकात ताटकळणार; तर घरी बसायचे त्यापेक्षा गाडी जाते तेथपर्यंत जाऊ, मजा करू नाहीच तर परत येऊ अशा महान हेतूने समस्त पुरूष मंडळीही स्थानकातच! ही मोठी पर्वणी असायची. तासभर प्रवास करून गाडी जेमतेम विक्रोळी गाठायची. मग सार्वमताने निर्णय होवून कंपू रूळ उतार व्हायचा. गच्च भिजून स्थानक गाठायचे, गरम गरम भजी, चहा असा मामला गरम करून कंपू रिक्शाने बस आगाराकडे जायचा. मग बस ला. ब. शास्त्री मार्गाने सरपटत जायची व अखेर कुर्ला -शींव दरम्यान पाणी रस्त्यात भरल्याने रद्द व्हायची. मग आमचा उलट प्रवास सुरू. पण इतकी आबाळ सोसूनही सगळे मोठे खुशीत असायचे. यापैकी पत्तेबाज मंडळींचा 'कुणाचे घर रिकामे आहे का?' याचा शोध सुरू व्हायचा. या अशा गोंधळात अंतरावर असलेले कंपूबाज नकळत एकेमेकाच्या थोडे अधिक जवळ यायचे.

एक मुंबईकर म्हणून अनेक वर्षे मीही असा कंपू मस्त उपभोगलाय. अचानक एखादा गाडीमित्र भेटतो आणि लग्न होवून परगावी गेलेल्या मुलीला बालमैत्रीण भेटावी तसा आनंद होतो.  गाडी सुटली तरी कंपू मनात तसाच आहे. कधी अचानक एखाद्या लग्नात एखादा किशोर भेटतो, पाचं वर्षे परदेशात वास्तव्य करून तो इथे गेल्याच वर्षी परतलेला असतो, नव्या व्यवसायात जम बसवू लागलेला असतो. गप्पा होतात. गाडीच्या आठवणी निघतात. कधी अचानक जीप मधून उतरून एखादा पोलिस गणवेशांतला अधिकारी समोर उभा ठाकतो. आपल्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहत हसू आवरत पटकन त्याची टोपी काढत विचारतो, 'काय राव? विसरलात? ....मोहन कांबळे हो.. ९.११