प्रेम करणे खरोखर गुन्हा आहे का ?

अमिताभ बच्चनचा डबल रोल असलेल्या एका चित्रपटात बाप बनलेला अमिताभ हातावर इंग्रजी ६ चा आकडा काढतो व पोरगा झालेल्या अमिताभ समोर धरून म्हणतो की 'तुला तुझ्या जागेवरून हा ९ दिसत असेल; पण मला तो ६ दिसतोय. आपण दोघेही बरोबर आहोत फक्त आपल्या जागा व दृष्टिकोन वेग-वेगळा आहे' असा काहीसा तो संवाद आहे.

तारुण्यात आलेली मुले/मुली एका बाजूला दृष्ट लागण्यासारखी प्रगती करीत असतानाच वर्तमानपत्रांतून वाचायला मिळणाऱ्या असल्या  काही बातम्यांनी मन अस्वस्थ करून टाकते.
दोन वेगवेगळ्या काळांतील माझ्या डोळ्यांसमोर घडलेली उदाहरणे देतो-
साधारण ७३-७४ सालातले म्हणजेच मी ४थी ५वीत असतानाचे. फारसे काही आठवत नाही पण "शेजारची माणिक पळून गेली" असे काही तरी आई म्हणाल्याचे आठवते. त्या काळात 'पळून जाणे' हा किती मोठा गुन्हा असावा व 'पळून जाणे' म्हणजे नक्की काय ? हे न कळण्याऱ्या वयांत हे वाक्य कानावर पडले होते. माणिकच्या आईने व आजीने बरेच दिवस अन्नत्याग वगैरे केला होता. तिचा भाऊ माझ्या बरोबर खेळायला येत असे तो अचानक बंद झाला. आई पण हल्ली त्यांच्या घरी फारशी जात नाही व जाऊन आली की पदराला डोळे पुसत येते इतकेच काहीसे अंधुक आठवत असे.
माणिकने ज्या गृहस्थांबरोबर लग्न लावलेले होते तो माणूस देवासारखा निघाला हे तिचे नशीब की तिने त्याच्या स्वभावाकडे बघून त्याच्यावर प्रेम केले हा खरोखर विचार करायला लावणारा विषय !
काही वर्षांनी खरी परिस्थिती कळली.... माणिकला टिबी जडला होता. त्यामुळे तिचे लग्न ठरत नव्हते. ज्या गृहस्थाशी तिने लग्न केले त्याने परिस्थिती डोळसपणे स्वीकारून तिच्याशी लग्न केले होते. काही वर्षांपूर्वी तिच्या मुलीचे लग्न झाल्याचे कानांवर आले !
म्हणजेच ही एक यशस्वी प्रेमकथा होती.
माझ्या अत्यंत जवळच्या मित्राची मेहुणी (बायकोची बहीण) जेमतेम १८ वर्षांची होते न होते इतक्यात 'पळून गेली'. रिक्षावाल्याशी कसे संधान बांधले गेले ते शेवटपर्यंत कळलेच नाही; आज घटस्फोटिता म्हणवून घेत माहेरी परत आली. शेवटी आई-वडिलांनीच मायेने पंखाखाली घेतले.

माझा स्वतः:चा प्रेमविवाह आहे ! सौ. च्या माहेरी आमच्या नशिबाने 'पळून गेली' असा शिक्का माथ्यावर बसला नाही !
ह्या/हीच्याशीच लग्न करायचे आम्हा दोघांचे निश्चित झाल्यावर सर्वप्रथम मी माझ्या मित्रवर्गाचा सल्ला घेतला. सर्वांनीच 'संमती' मिळवूनच लग्न करण्याचा सल्ला दिला. आज सर्व काही सुरळीत चालले आहे पण कधी तरी एक विचार मनांत चमकून जातो, जर संमती मिळाली नसती व लग्न करायचेच होते तर दुसरा मार्ग काय असता ?

ह्या सर्व प्रकारांतून / दिव्यातून आम्ही पार पडलो आहोत. त्या काळी कधी पोलिसांनी हैराण केले नाही (फक्त एकदा साध्या वेषातल्या दोघा पोलिसांनी पैसे मागितले होते ) पण तृतीय पंथींचा, भिकाऱ्यांचा त्रास नक्कीच जाणवला.

प्रेम करणं गुन्हा आहे का ? हा खरोखर प्रश्न पडावा अशी परिस्थिती ह्या बातमीवरून दिसतेय.

मुंबईत राहत्या जागेची कमतरता,
घरुन लग्नाला संमती मिळेल की नाही हा संभ्रम,
प्रेमविवाहांना समाजात मिळालेले दुय्यम स्थान,
अनेक एकतर्फी प्रेमातून घटणाऱ्या जाळपोळीच्या घटना,
पोलिसांवर येणारा सामाजिक दबाव,
त्यातही सुनील मोरे सारखे पोलिस शिपाई करीत असलेला पोलीसदलाचा नैतिक ऱ्हास,
तरुणवर्गाला ह्या अवस्थांत बघून आमच्या लहान मुलांवर विपरीत परिणाम होतील अशी काही पालकांची भूमिका, (योग्य/अयोग्य हा वाद नाही)
धर्माबाह्य लग्न केल्यावर होणारा स्वधर्मींयांकडून विरोध,
आकाशातले तारेच जणू काही तोडून दाखवत असल्याचा आव आणणारी मिडियातली मंडळी,
व मग टीव्ही वरच्या अशा चविष्ट बातम्या वाचून त्यावर पालकांचे खुपणारे शेरे......
व ह्या सर्वांतून मनांत उडालेला गोंधळ !

आजच्या प्रेमवीराने / वीरांगनेने करावे तरी काय ?
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे मान्य केल्यास आई-वडिलांची भूमिका योग्य की मुलांची ?
आजच्या तरुण वर्गाचे मत काय ?