मोहन गेला कुणीकडे ?----१
"प्रतोद परत येत आहे" चे प्रतिसाद पाहून माझी एक दुसरी विज्ञान काल्पनिका येथे देत आहे.मनोगतीना आवडेल अशी आशा आहे
जाहिरातींच्या अतिरेकामुळे दूरदर्शन बघणे शिक्षाच वाटत असली तरी कधी कधी रद्दीतून रत्न निघाव तस एकाद्या जाहिरातीच होत. त्यादिवशीची ती जाहिरात बघताच मी आणि विद्या दोघेही एकमेकाकडे क्षणभर पहातच राहिलो आणि नंतर पुन्हा ती जाहिरात केव्हा दाखवतात याची वाट पहात राहिलो.पुन्हा ती दाखवतील ही आमची अपेक्षा थोड्याच वेळात पूर्ण झाली आणि त्यातील अक्षर न् अक्षर आम्ही डोळ्यात आणि कानात प्राण आणून साठवू लागलो.
"नोकरदार दांपत्यानो,आता तुमची घरकामे करण्याची,मुलाना संभाळण्याची कसलीच काळजी करू नका,तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पहात होता तो रोबाट म्हणजे यांत्रव आता प्रत्यक्ष उपलब्ध झाला आहे आता फक्त तुम्ही मागणी नोंदवण्याचा अवकाश की सकाळी तुम्हाला मंजूळ आवाजात किंवा हलक्या हाताने हलवून जागे करण्यापासून तुमचे कपडे भांडी स्वच्छ करणे तुमच्या बाळास संभाळणे त्याला अंगाई गीत म्हणून झोपवणे वा आणखीही तुम्हाला हवी असतील ती कामे बिनबोभाट पार पाडणारा यांत्रव अथवा यांत्रवी आता प्रत्यक्षच येऊन पहा आणि खात्री करून घरी घेऊन जा. "
अक्षरशः वाळवंटात प्रवास करणाऱ्यास ओऍसिस दिसाव असं झाल आमचं. विद्या लगेचच चित्कारली ," चल चल आत्ताच चल त्या यांत्रव निर्मिती केंद्रात " पण त्यावेळी रात्रीचे दहा वाजले आहेत याची कल्पना तिला देताच ती भानावर आली,पण मग तिची मनोराज्ये चालूच राहिली," आता त्या कल्पनाची ( ही कल्पनेहूनही अधिक सुधारलेली आमची कामवाली बरका, तिला ब्यूटी पार्लरमध्ये जाण्यासाठी आठवड्यात एक सुट्टी द्यावी लागते.)दररोज आरती करायला नको."
कल्पना ही विद्याची या वर्षातली चौथी अस्सिस्टंट हो हा शब्दही तिचाच !कामवाली मोलकरीण या शब्दाची तिला ऍलर्जी होती सकाळी तिचा बॉयफ्रेंड ( हाही तिचाच शब्द )त्याच्या बाईकवरून तिला सोडायला येई.तरी अजून अमेरिकेतील कामवाल्यांप्रमाणे ती स्वत:च्या कारमधून येत नाही पण आम्हाला खात्री होती की एकदिवस ती कारवाला बॉयफ्रेंड गाठेल आणि मग मात्र असिस्टंट कोण याचा आम्हाला पेच पडॅल शिवाय आमच्या आठ वर्षाच्या छोकरीच मिनीच आणि तिच एक मिनिटही पटत नसे ते वेगळच, अर्थात अशा संकटात पडलेल्या आम्हाला आणि आमच्यासारख्या अनेकाना या जाहिरातीने मोठाच दिलासा दिला असेल.
सकाळी अर्थातच आमचा कार्यक्रम दुसरा तिसरा कुठलाही नसून यांत्रव केंद्रास भेट देण्याचाच होता हे ओघाने आलेच.आम्ही तयार होतो न होतो तोच माझा संस्थेतील तरुण सहकारी आणि मित्र विश्वास हातात पेपर नाचवीत आणि जवळजवळ किंचाळतच घरात शिरला त्यातही तीच जाहिरात होती,"सुध्या अरे वाचलीस का ही ऍड आपण तर बुवा एक झकास रूबी घरात आणणार""रूबी ही काय भानगड आहे?"त्याला थांबवत मी विचारले "अरे एवढेही नाही का समजत मामाच स्त्रीलिंग मामी, काकाच काकी तस रोबाट च रोबी,त्यालाच जरा गोजिरवाण रूप दिलय मी रूबी एवढपण कळत नाही ?"हा विश्या म्हणजे स्वत: ला भाषाप्रभु समजतो की काय ?आणि तेवढ्यावर थांबला तर तो विश्या कसला,त्यान तर त्याहीपुढे जात एकाद्या टुकार हिंदी सिनेमात शोभेलसे गाणही आपल्या भसाड्या आवाजात गायला सुरवात केली,"रूबी ओ रूबी तू मेरी बेबी खोये कमरेकी चाभी देखती रहेगी भाभी "आणखी त्याहीपुढे जात मला जणु खिजवत तो म्हणाला," बरका सुध्या ही माझी रूबी सकाळी मला गाण गाऊन उठवेल,मी कामावरून घरी आल्यावर माझ हसतमुखाने स्वागत करेल,माझे बूट उतरवेल,मला गरमगरम चहा आणि पोहे देईल ,माझे पाय चेपून देईल ---" "पुरे पुरे " त्याला अडवीत मी अगदी ओरडलोच कारण याची मजल आणखी कुठपर्यंत जाते कुणास ठाउक अशी भीती मला वाटली आणि खोट कशाला सांगू पण खर तर त्याचा थोडा थोडा हेवाही वाटू लागला मला.
"हं पुरे आता,रोबी म्हणजे काय एक यंत्र त्यात स्त्रीचा नाजुकपणा, कोमलता हळुवारपणा कुठून येणार आता दुधाची तहान ताकावर भागवायचा हा प्रकार म्हणत असशील तर ठीक आहे." मी त्याला टोमणा दिला.पण विश्या असा हार खाणारा थोडाच होता , उलट मला आणखीच वेडावत म्हणाला," तुमच्या वाटणीला दूध किती येतं माहीत आहे आम्हाला! सारखा तर कुरकुरत असतोस वहिनी मुळीच लक्ष देत नाहीत असा,माफ करा हं वहिनी .एक गोष्ट तर निश्चित ती रूबी चोवीस तास मला उपलब्ध राहील आणखी आनंदाची गोष्ट निदान यी माझ्याशी भांडणार तरी नाही"
"बरोबर आहे लेका ,ती रोबी खऱ्याखुऱ्या बायकोसारखी थोडीच भांडणार आहे? त्यातली गोडी तुला काय कळणार काय विद्या, बरोबर आहे की नाही ?"विद्यालाही आमच्या संभाषणात ओढत मी म्हणालो, विद्यानही ती संधी साधून "बरोबर आहे ती भांडणार नाही,रुसणार नाही फुगणार नाही आणि मग अजुनी रुसून आहे किंवा तेरा गुस्सा हमको प्यारा है अशी तिची आळवणी करण्याची मजाही तुम्हाला लुटता येणार नाही,जाऊदे भाऊजी तुम्ही आपली खरीखुरी बीबीच आणा बर लवकर !" अस म्हणत नेहमीच पालुपद आळवल.
"बर बुवा ती बीबी येईपर्यंत तरी रोबी आणु द्या आणि तुमच लग्न झाल तरी लेका तुम्ही पण चाललाय ना रोबाट किंवा रोबी आणायला ?बर ते जाऊदे पण मिनी येणार आहे ना ?" त्यान मिनीची आठवण काढताच मिनी तिथ हजर झालीच."हे काय विशाकाका मी तयारच आहे पण आज आमची खंडणी नाही वाटत ?"यावर खिशातन चॉकलेटचा मोठ्ठा बार काढत,"वा अशी कशी विसरेन ?" म्हणत तो तिच्या हातात त्याने खुपसला आणि आम्ही सगळेच बाहेर पडलो.
मयासुर यांत्रव केंद्रावर आम्ही पोचलो तेव्हां आमच्यासारखेच बरेच लोक तेथे येताना आम्हाला दिसले. प्रवेशद्वारापाशी एक उंचनिंच ( आणि विश्याच्या भाषेत टंच ) युवती हसतमुखाने आमचे स्वागत करण्यास उभी होती.'सुस्वागतम्" म्हणून हात जोडून तिने आमचे स्वागत केले.विश्याने 'हॅलो' म्हणत तिचे हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याला अपेक्षित प्रतिसाद न दिल्यामुळे त्याची निराशा झाली.आत मोठ्या सभागृहात आमच्यासारखी बरीच जोडपी आणि विश्यासारखे काही ब्रह्मचारीही बसले होते, काहींच्या बरोबर मिनीसारखीच वेगवेगळ्या वयाची बालकेही होती.आम्ही स्थानापन्न झाल्यावर सभागृह जवळ जवळ पूर्ण भरलेले पाहून व्यासपीठावर एका रुबाबदार चर्येच्या दाढीधारी व्यक्तीने प्रवेश केला.उत्तम प्रतीचा सूट त्या व्यक्तीने परिधान केला होता.आपल्या व्यक्तिमत्वाने सर्व सभागृहावर एकप्रकारची छाप टाकणाऱ्या त्या व्यक्तीच्या आगमनाने सभागृहात एकदम शांतता पसरली आणि तिचा भंग करीत त्या व्यक्तीने बोलायला सुरवात केली,"नमस्कार मित्रहो,बंधू आणि भगिनी आणि छोट्या दोस्तानो,सुप्रभात.मी डॉ. शुक्राचार्य आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो.यांत्रव तुमच्या घरी या आमच्या योजनेस भरभरून प्रतिसाद मिळेल याची आम्हास खात्री होतीच कारण जीवन अतिशय धावपळीचे झाल्यामुळे आणि हवी तशी मदत निरनिराळ्या वैयक्तिक कामात उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे आपला हा जीवनसंघर्ष अधिकाधिक कठीण बनत चालला आहे.त्यावर आपल्याला जास्तीतजास्त दिलासा देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे."
"आमच्या यांत्रवांविषयी मी काही सांगण्यापेक्षा एक गोष्ट सांगितली तरी आपल्याला आम्ही कोणत्या प्रकारे सहाय्य करणार आहोत याची कल्पना येईल. ती गोष्ट म्हणजे प्रवेशद्वारावर आपले स्वागत करणारी युवती दुसरी तिसरी कोणी नसून आमच्या पहिल्या मालिकेतील यांत्रवी - माफ करा हा शब्द मी स्त्री रोबाटविषयी वापरतो आहे,लक्षात घ्या हा पहिल्या मालिकेतील रोबाट आहे. या यांत्रवांच्या शरीरात फक्त विशिष्ट कार्यविषयक संकेततक्ते आम्ही बसवत असल्यामुळे तेवढे एक अथवा विशिष्ट कार्येच ते करू शकतात." हे वाक्य ऐकून विश्याचे समाधान झालेले दिसले आणि "तरीच तिने माझ्याशी शेकहँड केला नाही " असे तो माझ्या कानात पुटपुटला." पण यापुढील मालिकेत आम्ही अधिक कामे करणारे किंबहुना बहुतेक सर्वच कामे करू शकता येणारे यांत्रव बनवण्यात यशस्वी झालो आहोत"आपले बोळणे पुढे चालू ठेवीत डॉ. शुक्राचार्य म्हणाले."आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या यांत्रवांची छायाचित्रे ,त्यांची कार्यकौशल्ये आणि क्षमता आणि त्यांचे मूल्य याविषयी तयार केलेली पुस्तिका उपलब्ध आहे त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यकौशल्याचा प्रत्यक्ष परिचय देणाऱ्या सीड़ीज् ही आम्ही तयार केलेल्या आहेत,शेजारील सभागृहात त्या आपण पाहू शकता आणि आपला निर्णय घेऊ शकता त्याठिकाणी आपणास अधिक माहिती पाहिजे असल्या तेथे उपस्थित असणारे आमचे कर्मचारी आपणास योग्य ते मार्गदर्शन करतील. सीडी पहाण्यासाठी शेजारील सभागृहात व्यवस्था केली आहे.त्यानंतर आपला निर्णय आपण आम्हास प्रत्यक्ष, दूरध्वनीद्वारे अथवा ऑन लाइन अशा कोणत्याही पद्धतीने कळवून आपली मागणी नोंदवू शकता.आणि आपणास जास्तीत जास्त चांगला यांत्रव उपलब्ध होईल याची खात्री देऊन आता मी आपली रजा घेतो " म्हणून डॉ. शुक्राचार्य तेथून अंतर्धान पावले.शुक्राचार्यांच्या निर्गमनानंतर एका किरकोळश्या व्यक्तीने व्यासपीठाचा ताबा घेतला आणि आम्ही सीडी पहायला जाण्यास उत्सुक असताना आता हा काय सांगणार आहे याचा विचार आम्ही करेपर्यंतच त्याने विश्व बॅकेचा आपण प्रतिनिधी असून यांत्रव खरेदीसाठी बँकेकडून अगदी कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध असेल अशी घोषणा करून पुस्तिकेतील मूल्य आकडे पहायापूर्वीच आमच्या पोटात गोळा आणला.
आम्ही सीडी पहायला शेजारील सभागृहात शिरलो.तेथे छोट्या केबिन्स तयार केलेल्या होत्या आणि आपल्या विशिष्ट मागणीनुसार यांत्रव वा यांत्रवीच्या कार्यकौशल्याचे दिग्दर्शन करणाऱ्या सी.ड़ी.ज् दाखविल्या जात होत्या.त्या पहाण्यापूर्वी यांत्रव घ्यायचे की यांत्रवी याविषयी निर्णय घेणे आवश्यक होते. मिनी कदाचित यंत्रसुंदरीच्या बाजूने कौल देईल अशी वेडी आशा मला वाटत होती. पण "मिन्ये तुला सोबतीला यंत्रकाका हवेत की मावशी ?" असा प्रश्न विचारताच प्रश्न पूर्ण होतो न होतो तोच तिन " मला काकाच हवेत "अस उत्तर सुद्धा देऊन टाकल्यावर त्यातल्या त्यात विद्याला चिमटा काढण्याचा प्रयत्न मी केला " बघ पोरीला लळा बापाचाच असतो हेच खर !" पण त्या कार्टीन तेवढही समाधान मला मिळू दिल नाही म्हणते कशी"तस काही नाही बाबा ,मला लळा विश्याकाकाचा आहे" पोरटी काकाने दिलेल्या चॉकलेटच्या खुराकाला जागली होती. अर्थात आम्हाला यांत्रव सीड़ी. दाखवणाऱ्या कक्षात जावे लागले.विश्याच्या बाबतीत तो प्रश्नच नव्हता तो केव्हाच यंत्रसुंदरींच्या सीड़ी. दाखवल्या जाणाऱ्या कक्षात शिरून बसला होता.
सी.डी..मधील यांत्रव हुबेहूब माणसासारखेच दिसत असल्याने या खऱ्याखुऱ्या माणसांच्या सीड़ीज् तर नव्हेत ना असा संशय मला येऊ लागला.याउलट विद्याच्या शंकेखोर स्वभावानुसार सीड़ी कक्षातील सहकारी येवढेच काय खुद्द डॉ. शुक्राचार्य तरी माणूस होते की तोही यांत्रवच होता अशी शंका माझ्या कानात कुजबुजून तिने व्यक्त केली.आणि ते ऐकल्यावर तेथे उपस्थित असणारे आम्ही आणि आमच्या परिचयाचे काही लोक वगळता बाकी सगळीच माणसे यांत्रव असावीत असे मला वाटू लागले.आणि मग यांत्रव आणि मानव यात कसा भेद करायचा याविषयी डॉ. शुक्राचार्यांनाच विचाराव अस वाटू लागल . माझा विचार जणु कळल्यासारखे डॉ. शुक्राचार्य तेथे उपस्थित झाले आणि बोलू लागले, " मित्रहो आमचे यांत्रव इतके हुबेहूब माणसासारखे आहेत की त्याना माणसापासून वेगळे कसे ओळखावे याचा पेच तुम्हाला पडला असेल, पण त्याची काळजी करण्याचे तुम्हाला कारण नाही. जगप्रसिद्ध वैज्ञानिक आयझॅक असिमॉव यांच्या रोबोटिक्सच्या तीन नियमानुसारच हे यांत्रव तयार केलेले असतात.त्यामुळे त्यांच्यापासून मानवाला धोका संभवत नाही.तुम्हाला दिलेल्या पुस्तिकेत या तीन नियमांचा व्यवस्थित उहापोह केला आहे. तो भाग लक्षपूर्वक वाचावा आणि काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क साधावा."
आम्हाला काही तल्ते (फॉर्म्स )भरायला देण्यात आले तेवढ्यात विश्याही हसत हसत तेथे आला आणि आम्ही तक्ते भरून देऊन तो एका सहकाऱ्याकडे सुपूर्द करून बाहेर पडलो.
दुसऱ्या दिवसापासून कामाच्या रगाड्यात आम्ही इतके बुडून गेलो की नेहमीप्रमाणे दिवस केव्हा उजाडतो आणि केव्हा मावळतो याचाही आम्हास विसर पडला.त्यामुळे यांत्रवाविषयी आम्ही विसरूनच गेलो म्हणाना ! याची आठवण आम्हास करून द्यायला आठ दिवसानंतर पहाटे सहा वाजता आलेल्या दूरध्वनीदर्शकाचा घंटानाद कारणीभूत झाला. पटलावर डॉ. शुक्राचार्यांचा चेहरा दिसू लागला." माफ करा या अवेळी आपल्याला तसदी देत असल्याबद्दल " हसतमुखाने ते बोलू लागले," आपल्या तक्त्यात भरलेल्या आपल्या माहितीनुसार आपण सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत घराबाहेर असता,त्यामुळे आपणाशी संपर्क साधायला हीच वेळ योग्य वाटली."
"ठीक आहे बेट्या, तुला काय बोलायचे ते बोल " असे म्हणण्याचे माझ्या ओठावर आले होते,पण तसे न म्हणता मी फक्त म्हणालो," बोला" डॉ. शुक्राचार्य बोलू लागले,
" आपला यांत्रव चंद्रमोहन लवकरच म्हणजे आठ डिसेंबर ही तारीख आपणास सोयिस्कर असेल तर त्यादिवशी आपल्याकडे पाठवण्यात येईल. आपल्याला सोयिस्कर वेळ आपण सांगावी."मी त्यानी सुचवलेली आठ डिसेंबर ही तारीख सोयीची आहे असे सांगितले आणि त्याना योग्य वेळ सांगितल्यावर त्यांची पटलावरील प्रतिमा धन्यवाद देऊन अंतर्धान पावली.
विद्याला ही बातमी सांगताच ती एकदम खूष झाली."बर झाल' ती म्हणाली,"पुढील आठवड्यात बऱ्याच कॉंफरन्सेसची तयारी करायची आहे त्यामुळे घरातली सगळी काम मोहन संभाळेल" तिन चंद्रमोहनचे लघुरूप केलेले दिसले आणि ते मिनीलाही आवडले आणि तीही " आता मोहनकाका येणार" म्हणून नाचू लागली.
आठ डिसेंबरला माझी कार फाटकातून आत शिरल्यावर पोर्चमध्येच मिनी कुणाबरोबर तरी गप्पा मारत असलेली दिसली.कारनधून मी खाली उतरताच दोघेही माझ्याकडे आले आणि त्याच्या हाताला लोंबकाळत मिनी म्हणाली,"बाबा कोण आलेय पहाना "तिच्याबरोबर गप्पा मारणाऱ्या रुबाबदार गृहस्थाकडे मी पहातच राहिलो कारण चेहरा तर ओळखीचा वाटत नव्हता,"शुभसंध्या श्रीमान सुधीर !"हस्तांदोलनासाठी हात पुढे करीत तो म्हणाला."मी मयासूर यांत्रव केंद्राकडून आलो आहे"असे ऐकल्यावर आम्ही मागणी नोंदवलेला यंत्रमानव चंद्रमोहन त्याला घेऊन हा आला आहे या समजुतीने खूष होऊन मी त्याला म्हणालो," नमस्कार मग आमच्या चंद्रमोहनला आपण घेऊन आलात काय?कुठ आहे तो ?"यावर त्याने दिलेल्या उत्तराने आपण बेशुद्धच पडणार अस वाटू लागल,कारण त्यान उत्तर दिल,"श्रीमान सुधिरजी मीच तो चंद्रमोहन !"
(भाग-२ लवकरच)