माझा पहिला परदेशप्रवास (दिवस पहिला-पुढे चालू))
आयुबोवान !!
विमान सुटलं तेव्हा ३ वाजून गेले होते म्हणजे दुसरा दिवस केव्हाच सुरू झाला होता. पण ते मेंदूला कसं कळणार झोप काढल्याशिवाय !!!
वैमानिकाने सूचना दिली आणि एकदम विमानाने वेग घेतला ... आजपर्यंत जास्तीतजास्त ताशी १२० कि.मी. वेगाची सवय ... हा वेग म्हणजे त्याहून 'कै-च्या-कै' होता. थोडा वेळ डोळे मिटून दीर्घ श्वसन करत बसले. साध्या अर्ध्या-एक तासाच्या बस प्रवासातही मला मळमळतं ... त्यामुळे मी मनाची तयारी करुन गेले होते. खिश्यात अव्हॉमिन होती. विमानात टेक-ऑफ़ आणि लॅंडिंगच्या वेळेसच त्रास होतो असं अजयनेच सांगितलं होतं. आश्चर्य म्हणजे मला काहीही त्रास झाला नाही. फक्त टेक-ऑफ़ केल्यावर डोकं एकदम जड झालं आणि दुखायला लागलं. पण त्यात जागरणाचा पण सहभाग होता असं आता मला वाटतंय. आदित्य खिडकीतून खाली पाहत 'आई हे बघ, ते बघ' करत होता. पण मी ते टाळलं. म्हटलं उगीच अजून त्रास नको व्हायला. आजी-आजोबांना काही त्रास झाला नाही. अजयला होणार हे अपेक्षितच होतं. आईला पण झाला थोडा. खूप पोट दुखून उलटी होईल की काय असं तिला वाटलं थोडा वेळ - पण तेवढंच.
श्रीलंकेच्या स्थानिक वेळेनुसार आम्ही पहाटे ५ वाजता पोचणार होतो. म्हणजे साधारण अडीच तासांचा प्रवास होता. 'आता जरा झोप काढूया' असा विचार करेपर्यंत खाणं-पिणं यायला सुरूवात झाली. पहाटे पावणेचारला कॉलिफ़्लॉवर मांचुरिअन खाईल का कुणी ??? बऱ्याच जणांनी खाल्लं; ऍपल ज्यूस प्यावंसं वाटेल का कुणाला? आदित्यला वाटलं !!! अर्थात, विमानप्रवासात काळवेळेचा विचार करायचा नसतो हे आम्ही पुढच्या १५ दिवसांत शिकलो आणि जे जेव्हा समोर येईल, ते तेव्हा निमूटपणे खायलाही शिकलो ... घड्याळाकडे न बघता !!!
जेमतेम डुलकी लागत होती तोपर्यन्त लॅंडिंगची सूचना ऐकू आली. पाण्यात भिजलेली कार्टून्स कशी मान हलवून पाणी झटकतात, अक्षरशः तशी मान झटकावी लागली डोळे उघडण्यासाठी ... आपण आपल्या देशाची हद्द ओलांडून आलोय याची जाणीव झाली, उत्सुकतेने पुन्हा उचल खाल्ली आणि २४ तासाच्या जागरणाला मागे ढकलले. श्रीलंकन क्षितीजावर फटफटत होतं, आमचं विमान उतरत होतं.
आपापलं सामान घेऊन निघालो. दारात हवाई सुंदरी होतीच 'आयुबोवान' करायला ... हा सिंहली भाषेतला 'राम-राम' !! (आणि हो, सिंहली भाषेत 'धन्यवाद'ला 'स्तुती' म्हणतात - ही माहितीत पडलेली अजून एक भर !) दरम्यान, कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिक गप्पा मारत बसलेले आदित्यने पाहून घेतले.
२२ ऑक्टो. - दुसरा दिवस.
बंदारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ - श्रीलंकेचा एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ. नकळत तुलना झाली. हा जास्त उजवा वाटला. पर्यटनाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न लक्षात आले लगेच. श्रीलंकेच्या चार महत्त्वाच्या उद्योगधंद्यांपैकी पर्यटन हा एक आहे.
Arrival Forms भरले. Visa on Arrival च्या रांगेत उभे राहिलो. पुन्हा एकदा, अतिशय आत्मविश्वासाने वावरणारा एक ११ वर्षांचा मुलगा माझ्या पुढे रांगेत उभा होता !!! त्याच्या नावाची हॅन्डबॅग एका हातात, दुसऱ्या हातात पासपोर्ट आणि फ़ॉर्म ... कुठल्याही प्रश्नोत्तरांना तोंड द्यायच्या तयारीत ... जणू या गोष्टी तो लहान असल्यापासून करत आलाय !!!
व्हिसा, सिक्युरिटी - सगळं पार पडलं. तिथून पुढे आलो. २४ तासांच्या आत पुन्हा इथेच यायचंय याची तेव्हा जाणीव झालेली नव्हती !!! आता डोळे आणि डोकं दोन्ही झोप, झापड, पेंग या सगळ्याच्या पलिकडे पोचले होते. सर्वांनी आपापली घड्याळं तिथल्या वेळेनुसार लावली. 'विमानात बसणे' या पाठोपाठ आदित्य या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता !!! त्याला त्याच्या घड्याळातली वेळ पुढे-मागे करण्यातली मजा अनुभवायची होती.