आज मी ब्रह्म पाहिले ... हे काही वेगळे असेल का? या ही दिवसांत, अशा पद्धतीने जगणारी माणसे आहेत? .. पाटी कोरी होण्यास सुरुवात झाल्याने, आयुष्यातल्या खऱ्या शिक्षणाला मघाशीच सुरुवात झाली होती.
'दैव देते पण कर्म नेते' हा वाक्प्रचार बहुधा कोकणस्थांमुळेच मराठी भाषेला बहाल झाला असावा. म्हणजे बघा ना! कोंकणात वस्ती, जिथे मागच्या वाडीत धोतरे वाळत घातली तरी भरतीनंतर काही मासे त्यांत अडकतील - व दारात नारळ, पण आम्ही मासे खाणार नाही.. अर्धपोटी राहिलो तरी बेहत्तर, हा बाणा माझ्या माहितीनुसार जगांत समुद्रकिनारी पिढ्यानपिढ्या वस्ती केलेल्या ह्या एकमेव जातीनेच बाळगला असावा. तर वाण नाही पण गुण असल्याने, माझेही नोकरी-व्यवसाय-संसार, म्हणजे जिवंत राहण्याचा - जगण्याच्या नव्हे - रहाटगाडग्यात गुंतून काही वर्षे -वाचन, संगीत शिक्षण वगैरे जगण्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. पण सुमारे एका तपानंतर आपण फक्त जगांत राहत आहोत, जगणे कुठल्याकुठे गेले आहे, हे उमजू लागले. आपण अजाण ही जाण येण्यासाठीही तप लागतेच. तेव्हा ताबडतोब जाऊन पुन्हा गुरुचे पाय धरले. तो खरा गुरुच, ""मध्ये खंड पडल्याने विस्मरण झाले होते, पण हरकत नाही पुन्हा सुरुवात करा, कुठल्याही गोष्टीला वेळ यावीच लागते'' इतके बोलून आमच्या सहवासाच्या पुढील पानाला सुरुवात झाली.