दरवर्षी दिवाळीचा सण आला की साझे मन आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून मागे जात जात थेट आमच्या जमखंडीच्या वाड्यापर्यंत जाऊन तिथे स्थिरावते. माझ्या लहानपणीच्या काळात सुद्धा त्या गांवाला खेडे म्हणत नसत कारण तिथे मॅट्रिकपर्यंत शिक्षण देणारी शाळा होती, सरकारी इस्पितळ, मामलेदार कचेरी, तीन चार पोलिस चौक्या आणि एक तुरुंगसुद्धा होता. गांवापासून थोड्या अंतरावर तेथील माजी संस्थानिकांचा एक अत्यंत प्रेक्षणीय पण निर्जन झालेला संगमरवरी राजवाडा होता. त्याच्या आजूबाजूला एके काळी सुंदर बगीचा केलेला असावा असे दर्शवणारी बाग होती. त्यात जागोजागी युरोपियन कारागिरीचा नमूना दाखवणारे नग्न स्त्रियांचे पुतळे उभे होते. टेनिस कोर्ट, बिलियर्ड टेबल वगैरेनी युक्त असा क्लब, विस्तीर्ण पोलो ग्राउंड, प्रशस्त सार्वजनिक वाचनालय, देखणा टाउन हॉल वगैरे अनेक शहरी सुबत्तेच्या खुणा त्या काळात सुद्धा तिथे होत्या.