दत्तूच्या बाजूला आणखी कुणीतरी खुर्ची ओढली. गणपतनाना आले म्हणताच दत्तू आदबीने बाजूला सरला. गणपतनाना उगाचच हसले. त्यांनी हातातील पुस्तक व काठी काळजीपूर्वक खिडकीत ठेवली व आपली व्हॉयोलिनवर शोभणारी लांबसडक बोटे जुळवून ते खेळ पाहू लागले. साऱ्या क्लबात दत्तूला फक्त गणपतनानांविषयी कुतूहल व आदर वाटत असे. त्या गृहस्थाने खोऱ्याने पैसा ओढला. सुपासुपाने खर्च केला. साऱ्या आयुष्यभर शौकही असा कलंदर केला की ते अत्तराच्या दिव्यांनी सुगंधी प्रकाशले. चाळीस वर्षांपूर्वी एल.एल.बी. ला पहिला वर्ग मिळवलेले गणपतनाना आजपर्यंत हायकोर्ट जज्ज होऊन जायचे. पण त्यांनी काढली मोटर कंपनी. मोठमोठ्या पिशव्यांतून गल्ला बँकेत भरला. गावातला पहिला रेडिओ गणपतनानांचा. पहिले सिनेमा थिएटर त्यांचे. त्यांच्या दिवाणखान्यात मोठमोठ्या गायकांच्या मैफली झडल्या. त्यांचे कपडे असे ऐटबाज असत की, कधी तरी कंपनीच्या कामाला विजापूर - बागलकोटकडे ते गेले की त्यांचा रुबाब पहायला लोक मुद्दाम येत. एका संस्थानिकाकडे असलेल्या एका कोकिलकंठी कुलवतीला त्यांनी उघडपणे मोटारीतून आणले. तिची पहिली शेज झाली ती म्हणे रुपये व फुले यांच्या शय्येवर! पण तिने पत्नीला एक शब्द उर्मटपणे बोलताच भर अंगणात त्यांनी तिला वेताने फोडून काढले. मुंबईला कंकय्या खेळणार, पुण्याला बालगंधर्वांचे 'स्वयंवर' लागणार म्हटले की, गणपतनाना फर्स्ट क्लासमधून लवाजम्यासह चालले. नवीन शाळेसाठी मदत मागायला त्यांच्याकडे काही लोक आले त्या वेळी, आपले नाव शाळेला न देण्याच्या अटीवर ड्रॉवरमधून पंचवीस हजारांच्या नोटांचा अस्ताव्यस्त ढिगारा त्यांनी त्या लोकांपुढे टाकला. गावातल्या सहा मोठ्या विहिरी त्यांनी बांधल्या. गावातल्या सध्याच्या निम्म्या डॉक्टरवकीलांचे शिक्षण त्यांच्या आतषबाजीतून झाले. पण बहर ओसरला. सारा पैसा गेला. पण तो स्वतः मिळवलेला. वडीलोपार्जित मिळकत त्यांनी जशीच्या तशी मुलाच्या हवाली केली. आपली दोन हजार इंग्रजी पुस्तके नेटिव्ह लायब्ररीला देऊन टाकली. मैफल संपून गेली, पण ना खंत ना खेद. कुठे चिकटून राहिल्याची खूण नाही, काही तुटून गेल्याचा डाग नाही. आता ते एका खोलीत राहात, पांढरा शुभ्र, गुढग्यापर्यंत नेहरू शर्ट घालीत, पांढरे झालेले केस सारे मागे वळवीत. हातात नेहमी चांदीच्या मुठेची काठी, व हातात डिक्सन कार किंवा गार्डनरचे एक पुस्तक. ते स्वतः कधीच रमी खेळत नसत. साऱ्या आयुष्याचा धुंद जुगार करणाऱ्याला पै-आण्यात काय आकर्षण वाटणार? अलिप्त नजरेने ते सारा खेळ पाहात, दोनचार आण्यासाठी चाललेली बाचाबाची ऐकत, निर्लज्जपणे देणी बुडविणाऱ्यांकडे 'काही समजत नाही' अशा नजरेने पाहात. एखादा ग्रीक देव माणसांच्या किरकोळ जगात येऊन जावा त्याप्रमाणे त्यांचे क्लबला येणे असे.