"तीसरी कसम उर्फ़ मारे गये गुलफ़ाम" / फणीश्वरनाथ "रेणु"

काही लोक आपल्या वेळाचे व्यवस्थापन करण्यात वाकबगार असतात. ते योजनाबद्ध रीतीने त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्थपूर्ण करतात, करू पाहतात. हे लोक वाचनही ठरवून करतात व ते त्यांच्या स्वारस्याच्या विशिष्ट क्षेत्रातले असते, उगीच मिळेल ते वाचण्यात हे आपला वेळ वाया घालवत नाहीत. दुर्दैवाने मी या लोकांत मोडत नाही (नाहीतर कुठल्या कुठे गेलो असतो हो!).
मी एक वेश्यावृत्ती वाचक आहे (इंग्रजीतल्या व्होरेशस या शब्दाचे स्पेलिंग थोडे बदलून अर्थ होईल तसा).  आपला त्या विषयाशी संबंध आहे की नाही याची पर्वा न करता समोर येईल ते वाचण्याच्या या माझ्या सवयीमुळे अवांतर वाचन करता करता शाळा-कॉलेजांची हिंदी पाठ्यपुस्तकेसुद्धा मी पुष्कळ वाचली. त्यातूनच "रेणु"जींसारखा हिरा हाती आला.


 "तीसरी कसम" नावाचा जुना कृष्णधवल हिंदी चित्रपट आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल. माझ्यासारख्या अनेकांना तो आवडला तर कित्येकांना राज कपूर चा तोवर बोजड झालेला देह गाडीवान नायकाच्या भूमिकेत बघवला नाही. पण येथे त्या चित्रपटापेक्षा अधिक त्याच्या मूळ कथेविषयी लिहू इच्छितो.
श्री. फणीश्वरनाथ "रेणु" यांनी लिहिलेली ही दीर्घकथा. हे प्रेमचंदांचे उत्तरकालीन म्हणता येतील. प्रेमचंद हे जुन्या काळातले अतिशय प्रसिद्ध लेखक. असे असले तरी त्यांच्या कथा जुनाट, एकरंगी, गुडी-गुडी व जुन्या नैतिकतेचे वर्णन करणाऱ्या असाव्यात, असणार असा समज करून घेऊन आमच्या काळातील वाचकांनी त्यांच्याकडे काहीसे दुर्लक्षच केले. खरे तर त्यांच्या काही कथा खरोखरच तिरकस व वास्तवतेचे अचूक भान देणाऱ्या आणि आमच्या आधुनिक मनांनाही भावण्याजोग्या होत्या.
रेणु हे सुद्धा प्रेमचंदांसारखेच ग्रामीण पार्श्वभूमीवर लिहिणारे. पण या दरम्यान काळ पुढे गेला होता. आपल्याकडे ज्याप्रमाणे द. मा. मिरासदार व व्यंकटेश माडगूळकर यांच्या लिखाणात फरक दिसून येतो तसाच प्रकार वरील दोघांबाबतीतही आहे. रेणुजींचे लिखाण ग्रामीण संस्कृतीला पक्के धरून असले तरी त्यात वुडहाउसिअन पद्धतीने वास्तवतेकडे काणाडोळा करून स्वतः:चे काल्पनिक विश्व निर्माण केलेले नाही.
त्यांच्या इतरही चांगल्या कथा आहेत पण मला माहीत असलेल्या कथांपैकी एक उत्कृष्ट कथा म्हणजे "तीसरी कसम उर्फ़ मारे गये गुल्फ़ाम".  मी ही कथा अनेक वेळा वाचलेली आहे. दर वेळी तीच मजा आली. अमुक तपशील गाळून पुढे जावे असे कधी वाटले नाही.
आपण बहुतांश मराठी माणसे हिंदी साहित्य फारसे वाचत नाही. शिवाय हिंदीतले चांगले लेखकसुद्धा बहुधा आपल्या परिचयाचे नसतात. या कथेच्या निमित्ताने "रेणु" कोण हे आपल्याला समजावे व आपल्यालाही ही कथा प्रयत्नाने मिळवून मुळातून वाचण्याची प्रेरणा व्हावी या हेतूने हा लेख लिहितो आहे.
ज्यांची चित्रपट पाहण्याचीही संधी हुकली त्यांच्यासाठी कथा थोडक्यात सांगतो (चित्रपट पाहिला असल्यास पुनरावृत्तीबद्दल क्षमस्व).
आणि हो, पुष्कळ वर्षांनी आठवणीच्या भरवशाने लिहितो आहे, चू.भू.द्या̱̱.घ्या.

हीरामन हा एक गावंढळ युवक आणि आपला कथानायक. आपले गाव व आसपासची गावे;  घर, भाऊ, वहिनी यापलीकडचं जग माहीत नसलेला. आपल्या बैलगाडीतून मालाची ने-आण करून चार पैसे मिळवणारा. स्त्री-पुरुषांतील नाते-संबंधांविषयी काहीच न जाणणारा.
एकदा गाडीतून बांबू घेऊन जात असताना त्या बांबूंची जुडी सुटली व ते इकडे-तिकडे पडून त्याची भलतीच तिरपीट उडाली. तेव्हा त्याने शपथ घेतली की यापुढे गाडीतून बांबू घेऊन जायचे नाहीत. नंतर एकदा दोस्तांच्या नादी लागून तो चोरीचा माल घेऊन जाण्याच्या मोहाला बळी पडला पण पोलीसांच्या नाकेबंदीत अडकून जीव मुठीत धरून पळ काढावा लागला. याचा धसका घेऊन त्याने दुसऱ्यांदा शपथ घेतली की चोरीचा माल घेऊन जाणार नाही. असा हा पापभीरू.
तिसरी कसम त्याला खाण्याची वेळ का व कशी आली? अशा निरुपद्रवी वाटणाऱ्या प्रश्नाच्या उत्तराशीच ही कथा गुंतलेली आहे.
एक जण सवारी घेऊन आलेला आहे, सांगतोय "कंपनीकी औरत है", तिला अमुक गावी (छत्तापुर-पचीरा किंवा असेच काहीतरी) लवकर पोचले पाहिजे, रेल्वे गाडी निघून गेलेली. मी तिथपर्यंत जाणार नाही, तू नेशील का? चांगली रक्कम मिळेल. हीरामन मान्य करतो, "औरत" त्याच्या गाडीत बसते व गाडी निघते.
पण ही औरत साधीसुधी नव्हे. हिचे नाव हीराबाई. ही जातिवंत हिरॉइन. कंपनी नौटंकीची. बाई बारा गावचे पाणी प्यायलेली, दुनिया पाहिलेली. माणसांना, पुरुषांना ओळखून असणारी पण त्या जगाला काहीशी विटलेली, त्या जगाकडून आता फारशा अपेक्षा न उरलेली.
मग सुरू होतो बैलगाडीचा दीर्घ पण अविस्मरणीय प्रवास. तो गप्पा मारत व गाणी म्हणत गाडी हाकतोय, ती थोडेसे अंतर राखून. काही वेळातच तिच्या लक्षात येते की हा तर अगदीच निरागस आहे, याच्या मनात आत-बाहेर असे काही नाही, हिऱ्यासारखा निर्मळ आणि पारदर्शक आहे हा. शहरांची नावेही ऐकलेली नाहीत त्याने. बाई कानपुराहून आली हे ऐकून, हे कसलं बुवा नाव, असे वाटून चमत्कारून म्हणतो "वाह रे कानपुर, तब तो नाकपुर भी होगा!" बाई सौम्यपणे म्हणते, "हां,  नागपुर भी है". 
हळूहळू हीराबाई आपले व्यवहारी जगाचे भान विसरून काही काळ त्याच्या त्या निरागस जगात रमून, हरवून जाते. पुन्हा या दोघांचे नाव एकच, हे एक आगळेच नाते. बाई हीरामनला सांगते, आमच्याकडे असे सारखे नाव असलेले लोक एकमेकांना "मीता" म्हणतात. हे हीरामनला आवडते व दोघे एकमेकांना मीताच म्हणू लागतात. हीरामन मोठ्या स्नेहाने बरोबर आणलेले पोहे ("चिउडा") तिला खाऊ घालतो. गावोगावच्या दंतकथा - महुवा घटवारिन च्या अयशस्वी प्रेमाची कहाणी - सांगतो. "सजन रे झूट मति बोलो" वगैरे गाणी म्हणून दाखवतो. एखाद्या स्वप्नासारखा हा प्रवास चालत राहतो.
स्वप्न कधीतरी संपणारच. बाईचा मुक्काम येतो. इकडून तिकडून त्याच वेळी गाड्या घेऊन आलेले लालमनी, भगत, इ. दोस्त हीरामनला भेटतात. बाई त्याला व त्याच्या दोस्तांनाही नौटंकीचे पास देते व बघून जा असा आग्रह करते. दोस्तही दुजोरा देऊन, जाशील रे दोन दिवस उशीरा, म्हणून त्याला थांबवून घेतात. वहिनीला आता काय सांगावे असे त्याला क्षणभर वाटून जाते पण हीरामन थांबतोच.
आता हीरामनची पाळी एक वेगळेच जग पाहण्याची, अनुभवण्याची. कधी नौटंकी न पाहिलेला तो नकळत त्याने भारून जातो. हीराबाईला पुन्हापुन्हा भेटावे असे त्याला वाटू लागते, तीही त्याला आपल्या तंबूत बोलावून त्याचा पाहुणचार करते. पण शेवटी व्यवहार आड येतोच.
गावचा एक रईस येऊन हीरामनच्या उपस्थितीतच हीराबाईसमोर आपल्या रुबाबाचे प्रदर्शन करून तिच्याकडून काही वेगळी अपेक्षा बोलून दाखवतो. नौटंकीचा ठेकेदारही मिळू पाहणाऱ्या पैशाच्या लोभाने जमीनदाराला व हीरामनला वेगवेगळे वागवू लागतो. हीरामनचा हिरमोड होतो. हीराबाई बोलावून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करते पण हीरामन दुखावला जातोच. या दुनियादारीचे नियम त्याच्या समजण्याच्या पलीकडचे असतात.
या प्रसंगाचा व आपल्या सगळ्या आयुष्याचा क्षणभर उबग येऊन हीराबाई आगगाडीने परत (किंवा दुसऱ्या गावी) जायला निघते. हीरामन तिला पोचवायला जातो, पण या कहाणीचा शेवट तिथेच आहे याची तीव्र जाणीव दोघांनाही होते.
हा हिंदी सिनेमा नव्हे. नेहमीचा रेल्वे स्टेशनवरील टिपिकल शेवट इथे अशक्य आहे.
दुनिया पाहिलेल्या हीराबाईला हे पक्के माहीत आहे की हीरामनला तिच्या किंवा तिला त्याच्या जीवनात कुठलेही स्थान नाही. या कहाणीचा, तिला अचानकपणे दिसलेल्या अद्भुत विश्वाचा, या क्षणी अंत होतो आहे हे तिला स्पष्ट दिसते आहे.
बिचाऱ्या हीरामनचे मन तर हे काहीच कळण्याएवढे प्रगल्भ नाही. काहीतरी मिळाले व काहीतरी हरपले हेसुद्धा त्याला नीटसे कळलेले नाही. घाव बसला आहे, जखम तर झाली आहे, तिची कळ अजून जाणवलेली नाही, कधी जाणवेल देव जाणे. मनाला एक प्रकारचा बधिरपणा, सुन्नपणा, आला आहे. निघून जाताना हीरामन त्याच्या एकमेव सोबत्याला, त्याच्या बैलाला म्हणतो आहे, "खा कसम, कंपनी की औरत को गाडी में नहीं बिठायेगा!" या क्षणी त्याला एवढाच बोध झाला आहे.


कथेत असंख्य लहानसहान तपशील असले तरी रेणुजींनी उगीच शब्द वाया घालवलेले नाहीत. वर्णनांची भरताड नाही. हीरामनचे मित्र आले तरी उगीच ज्यादा भाव खाऊन जात नाहीत. उपकथानके नाहीत. कलाटणी तंत्र वापरण्याची गरज पडलेली नाही. कोणत्याही चांगल्या कथेप्रमाणे हिलाही अपरिहार्यतेची धार आहे. शेवटचा घाव अटळ तरीही जबरदस्त आहे.
असे म्हणतात की जगातल्या सर्व कथा काही ठराविकच कथानकांवर किंवा थीम्ज़वर आधारलेल्या असतात. उदा. अयशस्वी प्रेम, इनिशिएशन (जीवनातले पदार्पण वा "अरंगेट्रम्"), सूड, शापित सौंदर्य, इत्यादी.
रेणुजींच्या या कथेत यापैकी नक्की काय आहे याचे उत्तर मला सापडलेले नाही. प्रेम (की अनुराग?) आहे, ते अगदीच अव्यक्त, अबोध आहे. एका जगातून दुसऱ्या जगात पदार्पण आहे पण अशा प्रसंगी जाणीवांत मुळापासून बदल होतो तसे येथे दिसत नाही. दोन जगे आहेत - त्यांची टक्कर नाही, क्षणिक स्पर्श आहे. समोर येईल त्याचा विनाश करणाऱ्या शापित सौंदर्याची ही कथा नाही. "मारे गये गुलफ़ाम" ही दोघांचीही अवस्था झाली आहे. इथे एक प्रकारची सुंदरशी सिमेट्री आहे.

कवी शैलेन्द्र या कथेच्या प्रेमात पडले व त्यांनी पदरमोड करून "तीसरी कसम" हा चित्रपट काढला. तो बाजारात सपशेल आपटल्यामुळे शैलेन्द्रांनी हाय खाल्ली व लवकरच ते वारले असे ऐकले आहे.
चित्रपट मूळ कथेशी बराच प्रामाणिक आहे. राज कपूर व वहीदा रहमान या दोघांनी तो तोलून धरलेला आहे. शैलेन्द्रांनी अनेक गीते लिहून त्याला चांगला सजवला, पण गंमत म्हणजे त्यातली कितीतरी गीते अपूर्णावस्थेत का होईना मूळ कथेतही आहेत. शंकर-जयकिशन यांनी संगीत दिलेली ही गीते (सजन रे झूठ मत बोलो; दुनिया बनाने वाले क्या तेरे मनमें समाई, काहेको दुनिया बनाई; पान खाये सैंया हमारे; मारे गये गुलफ़ाम, अजी हां मारे गये गुलफ़ाम; चलत मुसाफ़िर मोह लियो रे पिंजडेवाली मुनिया इ. इ.), लोकप्रिय झाली, चित्रपट मात्र रखडला. कदाचित राज कपूरसारखा गोरागोमटा पण जाडजूड (किंवा याच्या उलट) नायक नसता तर चित्रपट मेनस्ट्रीमपेक्षा वेगळा वाटून चालला असता का? हल्लीच्या लाटेत याचा रिमेक व्हावा का? असो.

ते चित्रपटाचे जाऊद्या, पण कथा मात्र मिळाली तर वाचल्याशिवाय सोडू नका. आणि हो, रेणुजींच्या कुठल्याच कथा टाकाऊ नाहीत, काही तर भेदक म्हणण्याजोग्या आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे "ठुमरी" नावाचा त्यांचा एक कथासंग्रह आहे, पहा मिळाला तर .......       
___________________________________
टीप: गुलफ़ाम म्हणजे फुलासारख्या शरीराची व्यक्ती, म्हणजेच सुंदर स्त्री किंवा पुरुष. हे शीर्षकही अन्वर्थक आहे हे पटायला हरकत नाही.