इकडे परदेशात आल्यानंतर मी सेल, डील्स्, ना नफा ना तोटा किमती (थ्रो अवे प्राईजेस?) या सगळ्यांना चांगलीच रुळले आहे. तसे पुण्यात असताना सेल ही संकल्पना नवीन नव्हती पण दिवाळी, दसरा आणि सेल हे समीकरण डोक्यात फिट बसले होते. कार बरोबर मोबाईल फुकट, फ्रीजबरोबर घड्याळ फुकट, टीव्हीबरोबर डीव्हीडी फुकट असा सपाटाच दुकानदारांनी लावलेला असायचा आणि त्याचे अप्रूपही वाटायचे पण इंग्लंडमध्ये आल्यावर उठसूठ रोज सवलती, जेवणाच्या वेगवेगळ्या डील्स, एकावर एक फुकट हे रोज बघून नवलाई कमी होत गेली आणि हळूहळू तेच अंगवळणी पडायला लागलं. अजूनही दुकानात गेलं की कुठे सवलती, कमी किमती आहेत का यासाठी डोळे भिरभिरायला लागतात.
घरी आठवड्यातून कमीत कमी २-३ वेळा तरी चकचकीत, गुळगुळीत आणि आकर्षक रंगसंगती असलेली माहितीपत्रके कुठे स्टॉक क्लिअरन्स (मराठी प्रतिशब्द?), बर्गर मिल डील, दोन पिझ्झा घेतल्यास कोक फुकट, तर कुठे इंट्रोडक्शन किमती (म.प्र.?) अशा डील्सने खच्चून भरलेली असतात.