चिऊताईची आणि आपली मैत्री अगदी बालपणापासूनची. लहान मुलांसाठीच्या बडबडगीतात, गोष्टींमध्ये साधारण चिऊ गरीब, कष्टाळू, शहाणी व चतुर तर काऊ जरा डामरट, खलप्रवृत्तीचा व काहीसा वेंधळा वा मूर्ख असे रंगवलेले दिसते. निरर्थक म्हटल्या तरी याच काऊ-चिऊच्या गोष्टी ऐकत बाळ मोठे होत असते. घरात कावळा येणे अशुभ मानले गेले असले तरी चिऊचा मात्र मुक्त वावर घरात असतो. म्हणजे असायचा. आता काँक्रीटच्या जंगलात हिरवळ वाचताना मारामार, तर पक्षी कुठून येणार? तसे पक्षी अनेक आहेत. अगदी संग्रहित केलेले पक्षी सोडले तरी चिमणी, कावळा, साळुंकी, कबुतर, पोपट हे रोजच्या वावरात अगदी सर्रास दिसून येणारे पक्षी. क्वचित घार वा बगळेही दिसतात, कधी दुकानात पिंजऱ्यात घालून विकायला ठेवलेले काकाकुवा वा प्रणयपक्षीही दिसतात. मात्र कबुतर हा आपल्याच तारेत असणारा व घाण करून ठेवणारा पक्षी. पांढऱ्या कबुतराला भले शांतीचे प्रतीक मानत असतील तरी मुलांचे याच्याशी सूत नसते. पूर्वी चाळीत कुणी भिंतीवरल्या खोक्यांमध्ये कबुतरे पाळताना दिसत असत. साळुंकी जरा कर्कशच, शिवाय काहीशी आक्रमक दिसणारी. पोपट बिचारा पिंजऱ्यात. मग या सर्वांच्या मानाने घरात वावरणारी पण तरीही कधी कुणी न पाळलेली चिमणी अगदी घरातली वाटते. चिमणी आपली कुणाच्या अध्यात ना मध्यात. गरजाही फार कमी. टिपायला चार दाणे, वळचणीला एक घरटे की ती खूष! कसलाही बडेजाव नाही, उपद्रव नाही तसेच मोठे देखणे रूप वा मंजुळ आवाज वगरेही नाही. तरीही आवडणारी.