जेथे जातो तेथे..तु माझा सांगाती

एक असच आपलं आटपाट नगर होतं. त्या नगरात एक हजाम रहात असे. बरेचसे लोक त्याच्याकडे हजामतीसाठी येत. त्याच्या या व्यवसायामुळे अनेक लोकांशी त्याच परीचय होता. त्यामधे शहरातल्या अनेक विद्वान,प्रतिष्ठीत लोकांचाही समावेश होता. हजामतीच्या व्यवसायामधुनच येणारा की काय पण त्याच्या स्वभावात बोलघेवडेपणा होता. त्यामुळे कोणी व्यापारी आले की त्यांच्याशी राज्याच्या औद्योगिक स्थितीबद्दल, कोणी शिक्षक आले की त्यांच्याशी समाजाच्या शैक्षणिक जागरुकीबाबत आणि कोणी विद्वान तत्त्वज्ञ आले की त्यांच्याशी तात्त्विक बाबींबाबत देखिल वाद घालण्याची संधी तो सोडत नसे!
           असाच एक दिवस नगरातला एक अतिशय आदरणीय आणि महान तत्त्वज्ञ हजामतीसाठी आला... झालं...आता स्वतःची बौद्धीक पातळी किती उच्च दर्जाची आहे हे सिद्ध करायची त्या हजामाला लहर आली!
आणि ' परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ' हा गहन विषय त्याने चर्चेला घेतला. एकीकडे हजामत करता करता त्याच्या तोंडाची टकळीदेखिल अखंड चालु होती!
" परमेश्वर वगैरे म्हणुन या जगात नाहीच मुळी... सगळा कल्पनेचा खेळ ..अहो जर परमेश्वर असता, तर कोणी दुःखी दिसलं असतं का  जगात? प्रत्येकजण कसलं ना कसलं चिंतेच ओझं वाहतोय! परमेश्वर असता तर सगळ्यांची दुःख त्याने दूर नसती का केली? न्हाव्याने स्वतःचे मत मांडले.
उत्तरादाखल विद्वानाने त्याच्या कडे पाहुन केवळ एक स्मितहास्य केलं..आणि तो निघुन गेला. न्हाव्याच्या चेहऱ्यावर विजयोन्माद पसरला. एवढ्या विद्वान तत्त्वज्ञालादेखिल आपण आपल्या सडेतोड मुद्द्याने निरुत्तर केले या जाणिवेने त्याचा अहंकार सुखावला.
दुसऱ्या दिवशी तोच विद्वान एका दाढीमिशा वाढलेल्या, केसांच जंजाळ अस्ताव्यस्त पसरलेल्या माणसाला घेऊन त्या न्हाव्याच्या दुकानात दाखल झाला, आणि न्हाव्याला म्हणाला, " जगात कोणी न्हावी, हजाम नाहीतच मुळी! न्हावी असते तर अशी केस, दाढीमिशा वाढलेली माणसं दिसली असती का कधी?"
न्हावी स्तिमित होऊन त्याच्याकडे पहात राहीला.. "असं का म्हणता प्रभो? मी स्वतः एक न्हावी असुन तुम्ही मलाच हे सुनावताय? जगात न्हाव्यांची कमी नाही.. पण या माणसाने माझ्याकडे यायला नको का? मी कुठे कुठे जाणार अशी माणसं शोधायला? शेवटी मी पण.."
विद्वानाने त्याला मधेच थांबवले .. म्हणाला, " मित्रा, तु काल जे काही म्हणत होतास ना त्याला माझं ही असच उत्तर आहे. जगात परमेश्वर नाही असं नाहीये.. पण तुला काही दुःख, चिंता असतील तर स्वतःहुन त्याच्याकडे जा.‌ श्रद्धापूर्ण मनाने त्याला आठव...तुझं दुःख त्याला सांग... तुला कोणत्या ना कोणत्या रुपात त्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय आल्याखेरीज राहणार नाही...फक्त गाढ विश्वास तुझ्या मनी हवा..एवढं बोलुन विद्वान तिथुन चालता झाला.
न्हावी त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे पहातच राहीला.. परमेश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव घेण्याची ओढ त्याच्या मनी निर्माण करुन विद्वान तिथुन गेला होता!

अस्सा रुमाल सुरेख बाई..

साहित्य : उरलेली/एकदा वापरून झालेली लोकर ( एकाच रंगाची असायला हवी असे नाही. थोड्याथोड्या उरलेल्या अनेक लोकरींचे छोटे छोटे गुंडेदेखील वापरू शकतो ), क्रोशाची सुई आणि कपडे शिवून झाल्यावर उरणारे कापड, झिगझॅग प्रकारे कापणारी कात्री.

कृती : 

१ली ओळ : ४३ साखळ्या.

अंतर्नाद - दिवाळी २००६

मराठी साहित्यात स्वतःचे एक ठळक स्थान तयार केलेल्या 'अंतर्नाद' या मासिकाने या वर्षीचा दिवाळी अंक मराठी साहित्यविश्वातल्या वीस श्रेष्ठ पुस्तकांना वाहिला आहे. या पुस्तकांची निवड सर्वस्वी वाचकांच्या प्रतिसादांवर आधारित आहे. 'अंतर्नाद' च्या या दिवाळी अंकात अशा वीस पुस्तकांचा अल्प परिचय, त्याचा सविस्तर आस्वाद आणि आस्वादकर्त्याचा परिचय (मूळ लेखकाच्या रेखाचित्रासह )  दिलेला आहे.
ही वीस पुस्तके अशी :
१. शामची आई २.रणांगण ३.बनगरवाडी ४.ययाति ५.कोसला ६. चिमणरावांचे चऱ्हाट ७. कळ्यांचे नि:श्वास ८. तलावातले चांदणे ९. काजळमाया १०. सखाराम बाईंडर ११. संपूर्ण केशवसुत १२.विशाखा १३.मर्ढेकरांची कविता १४.मृदगंध
१५. युगांत १६. स्मृति-चित्रे १७.बलुतं १८.आहे मनोहर तरी... १९. व्यक्ती आणि वल्ली २०. माणसं!

एक कोडे...

नमस्कार...


मी सद्ध्या एका कंपनीच्या मुलाखत/परीक्षेसाठी अभ्यास करतीय.. त्यात प्रामुख्याने कोडी असतात.. त्यातीलच हे एक कोडे आहे. मला ते सुटत नाहीय.. उत्तर माहीती आहे, पण ते कसे आले ते कळले नाही..


N O O N + S O O N + M O O N = J U N E ?? ( हे alphabets म्हणजे  १ - ९ आकडे आहेत..)

ऍना फ्रँक

'डायरी ऑफ ऍना फ्रँक 'ची पारायणं केल्यापासून म्हणजे शालेय वयापासूनच तिच्याविषयी एक सुप्त उत्सुकता होती.त्यामुळे ऍमस्टरडॅमला गेलं की 'ऍना फ्रँक हाऊस'ला भेट द्यायची हे मी युरोपमध्ये राहण्याची सुतराम शक्यता नव्हती तेव्हाच ठरवून टाकलं होतं‍. माझ्या अनेक सोनेरी स्वप्नात तेव्हा अजून एक भर पडली होती.पुढे अनेक वर्षांनी जर्मनीला आल्यावर ऍना फ्रँकची डायरी परत खुणावायला लागली. जेव्हा आम्ही ऍमस्टरडॅमला जायचा बेत आखला तेव्हा गुप्ता,शर्मा, वर्मा ,चावला आदी मित्रमंडळीनी "अभी उधर जाके क्या है देखनेको?हम ट्यूलिप्स के सिजनमे जाएंगे.."असा फतवा काढला."ऍना फ्रँक? ये कौन है?" असे प्रश्न ऐकल्यावर आम्ही त्यांच्याशिवायच जाण्याचा सूज्ञ निर्णय घेतला.
'त्या' घरात शिरल्यापासूनच 'डायरी' आठवायला लागली.ऍना फ्रँक प्रतिष्ठानने ते फार सुंदर स्मारक केले आहे,तळमजल्यावरील हॉलमध्ये मूळ घर आणि फ्रँक कुटुंब तेथे आसऱ्यासाठी आल्यावर केलेले बदल अशी दोन्ही प्रारुपे (models?)ठेवली आहेत. जसजसे आपण घर पाहत जातो,तसतसे संदर्भ लागत जातात, तिथल्या भिंतींवर,जिन्यामधील जागेत ऍनाच्या डायरीतली वाक्ये उद्धृत करून ठेवली आहेत.त्याचाही परिणाम मनावर आपोआप होत राहतो.
'बुकरॅक'चे दार उघडून आत शिरलो की आपण दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच पोहोचतो. ऍना आणि मार्गोट(तिची बहिण)ने  पोस्टर्स लावून सजवलेल्या भिंती, त्यांच्या उंचीच्या पेन्सिलीने केलेल्या खूणा,त्यांचे खेळ,त्यांच्या अभ्यासाच्या वह्या सगळे जसेच्या तसे जपून ठेवले आहे.मसाल्याच्या कारखान्याच्या मागे लपण्यासाठी केलेला हा आसरा, तिथल्या बंद खिडक्याआड दडलेली वेदना डायरीच्या रुपाने जगासमोर आली. ही काही फक्त फ्रँक कुटुंबाची वेदना राहत नाही,तर त्या काळात असले दुःख भोगावे लागलेल्या साऱ्यासाऱ्यांची ती वेदना होते.तिथल्या पडद्यावर दाखवण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या चित्रफितीतून तो काळच समोर उभा राहतो,आणि सुन्न व्हायला होतं.तिची डायरी तिच्या बाबांना कशी मिळाली,त्यातून त्यांना आपलीच मुलगी कशी समजत गेली,याची ह्रद्य मुलाखत आहे.या कुटुंबाला मदत करणाऱ्या सुह्रदांच्या मुलाखती आहेत,ऍना छळछावणीत गेल्यावर आपला जीव धोक्यात घालून तिला बाहेरुन मदत करणाऱ्या मैत्रिणीची मुलाखत आहे.
एका भव्य दालनामध्ये ऍनाच्या या डायरीच्या जगभरातील भाषांमध्ये भाषांतरीत झालेल्या पुस्तकांच्या प्रती मोठ्या कलापूर्ण रीतीने मांडल्या आहेत.भारतीय भाषांमध्ये मंगला निगुडकरांची मराठी डायरी,आणि एक बंगाली डायरी आहे. छोट्या,छोट्या नावही न ऐकलेल्या देशांच्या भाषांमध्ये ऍनाची डायरी आहे.आणि एवढ्या मोठ्या खंडःप्राय देशातल्या फक्त दोनच भाषांमध्ये तिचे भाषांतर? असा एक विचार आला क्षणभर मनात आणि मी पुढच्या दालनात गेले.
ज्या डायरीची आपण पारायणं केली ती अशी मूळ स्वरुपात,खुद्द ऍनाच्या अक्षरातली ती 'किटी' पाहताना मनातले भावनांचे कल्लोळ डोळ्यातल्या पाण्यातून वाहू लागले,त्यांना शब्दांच्या चिमटीत पकडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न!