आधी अंडे की आधी कोंबडी? या प्रश्नाचे समर्पक उत्तर कधी मिळेल असे वाटत नाही. पण आधी लेखन की आधी वाचन? या प्रश्नाचे ढोबळ उत्तर अगदी सोपे आहे. मुळात कांही लिहिलेलेच नसेल तर काय वाचणार? आता कवि लोक "डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे" वगैरे म्हणतात. पण ती लिपीच वेगळी असते आणि न देखे रवी ते पहाणा-या कविमंडळींना ती वाचता येते. जास्त विचार केला तर लक्षांत येईल की माणूस लहानपणी भाषा शिकतांना आधी बोलायला शिकतो, मग वाचायला आणि त्यानंतर लिहायला हा नैसर्गिक क्रम आहे. रोजच्या आयुष्यात आपण शेकडो अक्षरे या ना त्या कारणाने वाचतो पण कागदावर किती लिहितो? वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांतील हजारो पाने वाचतो. अनेक जणांनी लाखावर पाने वाचली असतील. पण किती पाने लिहितो आणि त्यातील किती इतर लोक वाचतात?
पूर्वीपासूनच मला सुध्दा अधून मधून कांही बाही लिहायची हुक्की यायची. उगाच प्रेरणा, ऊर्मी यासारखे मोठे शब्द वापरण्यात अर्थ नाही. पण कोरा कागद आणि लिहिणारे पेन शोधून काढून दोन चार ओळी लिहीपर्यंत मध्येच फोनची किंवा दरवाजावरील घंटी वाजायची किंवा "अहो, ऐकलत कां?" ची साद येऊन लिहिण्यात खंड पडायचा. त्यानंतर "आपण लिहिलेलं कोण वाचणार आहे?", "कोणी वाचणारच नसेल तर लिहायचं तरी कशाला ?" अशा विचारामध्ये ती हुक्की विरून जायची. आधी आपल्याला सुचेल तसं लिखाण करायचं? कां आधी निदान दोन चार तरी वाचक शोधून त्यांना रुचेल असं कांही लिहायचं? या घोळातच 'ढळला रे ढळला दिन सखया' असं झालं.