देवाच्या राज्यातील गमती*
काही लोक कसे दरवर्षी सुट्टी घेऊन गोवा, काश्मीर, अंदमान-निकोबार अशा वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तिथे काय पहायचं असतं ते पहातात, खरेद्या करतात आणि हे सगळं अगदी आनंदाने करतात. मला अशा लोकांचं फार कौतुक वाटतं. मला स्वतःला ह्याची अजिबात आवड नाही. केल्याने देशाटन ..वगैरे खरं असलं तरी माझ्या मुळातल्या आळसामुळे मला वाटतं, नाही आलं ते चातुर्य तरी चालेल पण तो प्रवास, ते साईट सीइंग, त्या खरेद्या नको. मायबाप सरकारने दिलेल्या सगळ्या 'एलटीस्या' मी भुवनेश्वर-मुंबई आणि मुंबई -भुवनेश्वर प्रवास करण्यात घालवल्या. ह्यावेळी मात्र जरा वेगळंच घडलं! निमित्त झालं मुलाच्या पहिल्या वहिल्या नोकरीतील प्रशिक्षणाचं. ते त्रिवेन्द्रमला आहे असं कळलं. मुलगा पहिल्यांदाच घरापासून लांब रहाणार. अनोळखी गावात त्याची घडी बसवून द्यायला त्याच्याबरोवर जावं असं वाटलं. पतिराजांना विचारलं, "जायचं माझ्या मनात आहे, आपण दोघेही त्याच्याबरोबर जाऊ या का?" आणि त्यांनीही लगेच होकार दिला.