देवाच्या राज्यातील गमती

देवाच्या राज्यातील गमती*


काही लोक कसे दरवर्षी सुट्टी घेऊन गोवा, काश्मीर, अंदमान-निकोबार अशा वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तिथे काय पहायचं असतं ते पहातात, खरेद्या करतात आणि हे सगळं अगदी आनंदाने करतात. मला अशा लोकांचं  फार कौतुक वाटतं. मला स्वतःला ह्याची अजिबात आवड नाही. केल्याने देशाटन ..वगैरे खरं असलं तरी माझ्या मुळातल्या आळसामुळे मला वाटतं, नाही आलं ते चातुर्य तरी चालेल पण तो प्रवास, ते साईट सीइंग, त्या खरेद्या नको. मायबाप सरकारने दिलेल्या सगळ्या 'एलटीस्या' मी भुवनेश्वर-मुंबई आणि मुंबई -भुवनेश्वर प्रवास करण्यात घालवल्या. ह्यावेळी मात्र जरा वेगळंच घडलं! निमित्त झालं मुलाच्या पहिल्या वहिल्या नोकरीतील प्रशिक्षणाचं. ते त्रिवेन्द्रमला आहे असं कळलं. मुलगा पहिल्यांदाच घरापासून लांब रहाणार. अनोळखी गावात त्याची घडी बसवून द्यायला त्याच्याबरोवर जावं असं वाटलं. पतिराजांना विचारलं, "जायचं माझ्या मनात आहे, आपण दोघेही त्याच्याबरोबर जाऊ या का?" आणि त्यांनीही लगेच होकार दिला.


तिकिटं काढली. काही दिवसांनी कळलं की मुलाची रहाण्याची सोय कंपनीने केली आहे. तिथेच जेवणाखाणाची व्यवस्था पण आहे. म्हणजे आता खरे तर 'घडी बसवून देणे' हा मुद्दाच नव्हता. पण आता मागे वळून बघणे नाही! मग आम्हीही आमच्या रहाण्याची व्यवस्था केली. ठरलेल्या दिवशी आम्ही निघालो आणि ठरलेल्या वेळी त्रिवेंद्रमला पोहोचलो. आमच्या हॉटेलातही पोहोचलो. हॉटेलमधील स्वागतिका वगैरे यांना इंग्रजी आणि 'दोडे दोडे' हिन्दी येत होते पण हॉटेलच्या बाहेर मात्र मोठीच समस्या. आम्हाला शाळेत शिकवलं होतं, "क्रियापद हा वाक्याचा प्राण असतो." त्या नियमानुसार पुढचे काही दिवस आम्ही आणि त्रिवेन्द्रम मधील माणसे यांचा संवाद 'निष्प्राण' व्हायचा!   


साईट सीइंग नावाच्या प्रकारासाठी केरळ राज्याच्या पर्यटन विभागाच्या बसने गेलो. कन्याकुमारी, विवेकानंद स्मारक, महात्मा गांधी स्मारक वगैरे सर्व पाहिलं. निरनिराळी वस्तुसंग्रहालये, त्रावणकोरच्या राजाच्या महाल आणि बरीचशी मंदिरे पाहिली.  केरळातील बहुतेक मंदिरात 'ड्रेस कोड' असते. पुरुषांनी शर्ट,बनियन घालायचे नाही. धोतर नेसण्याची सक्ती नाही, पँट चालते. ह्या मागचा उद्देश कळला नाही. स्वच्छता हा नक्कीच नाही. कारण शर्ट,बनियन गुंडाळी करून काखोटीला मारून देवळात जाता येत होते. असो. तर त्या देवळातल्या उघड्याबंब पुरुषांच्या गर्दीत मला माझे पतिराज सापडेनात. म्हणजे त्यांना शोधावे कसे हे कळेना. कारण नेहमी अशा वेळी शर्टाचा रंग लक्षात ठेवलेला असतो आणि ही पद्धत तर आता निरुपयोगी. मग वळून वळून प्रत्येक पुरुषाचा चेहरा पहाणे आले. ('काय बाई आहे!' असे कुणी म्हणाले की नाही कळले नाही.) शेवटी पतिराजांचा चेहरा दिसला आणि हुश्श झालं.


दुसऱ्या दिवशी आम्ही ज्याच्याबद्दल खूप ऐकले होते त्या 'बॅकवॉटर राईड'ला गेलो. ही राईड कोलम (पूर्वीचे क्विलॉन) ते अलेप्पी अशी आहे. (जाता जाता : कोलम वायलं, कोवलम वायलं! कोवलम हे त्रिवेंद्रममधील एका बीचचे नाव आहे. कोलम हे त्रिवेंद्रमच्या जवळच्या शहराचे नाव आहे. केरळातील बहुसंख्य गावांची/जागांची  नावे 'क'ने सुरु होणारी. एकता कपूर आधीच्या एखाद्या जन्मात केरळमध्ये राज्य करत होती की काय अशी एक शंका माझ्या मनात येऊन गेली.) त्रिवेन्द्रमहून आम्ही आगगाडीने कोलमला गेलो. कोलम स्टेशनहून इच्छित स्थळी जाण्यासाठी पुन्हा पतिराजांचा आणि रिक्षावाल्याचा निष्प्राण संवाद सुरू झाला. रिक्षावाल्याने काहीतरी आकडा सांगितला. तो मला नंदी असा ऐकू आला. पतिराजांना विचारलं, किती मागतोय? ते म्हणाले वीस. ते ट्वेंटी > त्वंदी असा प्रवास करत करत माझ्या कानापर्यंत पोचेतो नंदी झाले होते! रिक्षावाल्याने 'धक्क्यावर' पोहोचवले. तिथे बॅकवॉटर राईडबद्दल चौकशी केली. ती बोट साडेदहाला कोलमहून निघून संध्याकाळी सहाला अलेप्पीला पोहोचणार होती. म्हणजे अलेप्पीहून त्रिवेंद्रमला परतायला आम्हाला रात्रीचे ११ सुद्धा वाजले असते. आम्ही जरा विचारात पडलो. मग त्या लोकांनीच सुचवलं की सकाळी साडेदहालाच आमची एक बोट अलेप्पीहून इकडे यायला सुटते. तर अर्ध्या प्रवासानंतर आम्ही तुम्हाला त्या बोटीत बसवू म्हणजे तुम्हाला इथे साडेपाच सहापर्यंत येता येईल आणि मग त्रिवेंद्रमला पोहचायला फार रात्र होणार नाही. हा 'मध्यममार्ग' आम्हालाही एकदम आवडला. साडेदहाला बोट सुटली. दोन्ही बाजूला नारळाची झाडे, टुमदार घरे इ.(याहून जास्त वर्णन मला करता येणार नाही. ते प्रत्यक्षच अनुभवावे!) प्रवासात मजा येत होती. साधारण साडेबाराच्या सुमारास बोट एका उपाहारगृहाच्या जवळ पोहोचली. एका लटपटत्या पुलावरून आम्ही त्या उपाहारगृहात गेलो. बोटवाल्याचे आणि त्यांचे काही तरी साटेलोटे असावे. कारण पाने -खरोखरच केळीची पाने- वाढलेलीच होती. दक्षिणेत केळीचे पान आडवे मांडतात हे सर्वांना माहीत आहेच. पण जेवण झाल्यावर ते पान मध्ये दुमडायचे असते हे मला आमच्या फिरंगी सहप्रवाशाकडून कळले! जेवण करून पुन्हा त्या लटपटल्या पुलावरून बोटीत जाऊन बसलो. बोटवाल्याने आम्हाला सांगितले होते की साधारण सव्वादोन/अडीचच्या सुमारास तुमचा परतीचा प्रवास सुरू होईल. दोन वाजायला आले तसे मला वाटायला लागले की आता कुठे तरी 'धक्का' असेल. तिथे आपण उतरू. तिथे विरुद्ध दिशेने येण्याऱ्या बोटीची वाट पहायची आणि मग परतीचा प्रवास सुरू. म्हणजे मुंबईहून लोणावळ्यापर्यंत जायचे. तिथे उतरायचे आणि मग पुण्याहून येणाऱ्या गाडीने परत मुंबईला. हे सगळं माझ्या डोक्यात चाललेलं असताना आमचा बोटवाला आला आणि आम्हाला दोघांना म्हणाला, "चला, चला. बोटीच्या दारात उभे रहा." आम्ही गेलो. विरुद्ध दिशेने एक  बोट येत होती. दोन्ही बोटींच्या चालकांनी आपापल्या बोटी एकमेकींच्या शक्य तितक्या जवळ आणल्या आणि आम्ही एका बोटीतून दुसऱ्या बोटीत पाय टाकला! फारच रोमहर्षक अनुभव होता हा!


परतीचा प्रवास सुरू झाला. आता वेगळे सहप्रवासी. त्यांच्याशी गप्पागोष्टी चालल्या होत्या. पाऊस नसल्याने आम्ही सगळेच वरच्या डेकवर  बसलो होतो. तेवढ्यात काय झालं कुणास ठाऊक? बोट एकदम खूप हलायला लागली आणि आमच्यापैकी काहीजण(मी सुद्धा) खुर्चीवरून खाली पडले. कसंबसं आम्ही स्वत:ला सावरलं. हे अगदी अल्पकाळ झालं. त्याचं कारण असं की बॅकवॉटरमध्ये एका ठिकाणी समुद्रात लहानसे ओपनिंग आहे. तिथून समुद्राच्या लाटा येत होत्या. आमच्या आधीच्या प्रवासात हे झाले नव्हते कारण तेव्हा आम्ही खालच्या डेकवर होतो. त्यामुळे तेव्हा थोडीशी खळबळ होण्यापलीकडे आम्हाला काही जाणवले नव्हते. असो. आम्ही साडेपाचला पुन्हा कोलमला पोहोचलो. आता त्रिवेंद्रमला बसने जावे असा विचार केला कारण बसस्टँड अगदी जवळ होता.


बसस्टँडवर जाऊन पुन्हा निष्प्राण संवाद. बसकडे बोट दाखवून 'त्रिवेंद्रम?' असं विचारायचं. चार वेळा याचं उत्तर 'नाही' असं आलं. पाचव्यांदा मात्र होकारार्थी उत्तर आलं, इतकंच नव्हे तर. 'हाँ हाँ. आरामसे जाके बैठिये' हेही झालं. आम्ही त्या बसमध्ये जाऊन बसलो आणि ती सुरू केव्हा होतेय याची वाट पहायला लागलो. तेवढ्यात बसमध्ये एकदम सुनामीची लाट यावी तसे सगळे लोक उभे राहिले आणि बसच्या दरवाज्याच्या दिशेने चालायला लागले. कुठली तरी अतिजलद बस आली असावी. "आपण नको हं आता घावपळ करायला, आपण इथेच बसू" असं मी पतिराजांना म्हणत असतानाच आम्ही दोघेही बसच्या दरवाज्याकडे केव्हा चालायला लागलो हे कळलंच नाही! आणि मग अशा प्रवासातला जो अंगुष्ठनियम, 'फॉलो द क्राऊड', ह्याला अनुसरून आम्ही त्या घोळक्यापाठोपाठ  जाऊन त्या अतिजलद बसमध्ये जाऊन बसलो आणि रात्री आठला हॉटेलात पोहोचलो.


दुसऱ्या दिवशी मुलाला सुट्टी होती. मग आम्ही त्याच्याकडे जायचं का त्यानं आमच्याकडे यायचं ह्याबद्दल फोनवर थोडी चर्चा करून मुलानंच हॉटेलमध्ये यायचं असं ठरलं. मुलाबरोबर त्याचे दोन मित्रही काही खरेदीसाठी 'गावात' आले होते. मला खरेदीची आवड नाही पण परत गेल्यावर "हे काय? तुम्ही केरळहून काऽऽऽही आणलं नाही?" हे ऐकायला नको म्हणून मग केरळचे जे वैशिष्ट्य त्या 'मसाल्याच्या पदार्थांची' खरेदी झाली. बांबू वगैरेच्या हस्तकौशल्याच्या बारीकसारीक वस्तू घेतल्या. (द्यायला घ्यायला बऱ्या पडतात!) मुलाच्या मित्रांची पण खरेदी झाली होती. मग आम्ही सगळे एका उपाहारगृहात गेलो. चहाकॉफीची ऑर्डर दिली: तीन कॉफी,दोन चहा; एक कॉफी विदाऊट शुगर, एक चहा विदाऊट शुगर. फारच गंतागुंतीची ऑर्डर! वेटरला ते कळलंय की नाही ही शंका होतीच. थोड्या वेळात वेटर पाच कप घेऊन आला. एक कप पुढे करून म्हणाला, "कॉफी विदाऊट?" मग ती कुणाला द्यायची ते सांगितलं. त्यानंतर दुसरा कप पुढे करून, "टी विदाऊट?" मुलाच्या मित्राला हसू आवरेना. वेटर गेल्यावर मुलगा मला म्हणाला, "हे बटाट्याच्या चाळीतल्या सारखं झालं.
"बटाट्याचं नाव घेऊ नकोस!"
"हो. म्हणजे कुठे रहाता विचारलं तर सांगा 'चाळीत रहातो'. बटाट्याच्या म्हणू नका. वजन वाढेल!""


मुलाला आणि त्याच्या मित्रांना रात्री वसतिगृहात परत जायचं होतं. त्यांना निरोप दिला. दुसऱ्या दिवशी आम्ही भुवनेश्वरला परत जाणार होतो. सकाळी लवकर निघायचे होते. त्यामुळे बॅगा वगैरे रात्रीच भरून ठेवल्या. सकाळी निघालो. सर्व सामान घेतले आहे याची खात्री करून घेतली. सामान सगळं होतं पण यापूर्वी कुठूनही  भुवनेश्वरला परतताना एक गोष्ट सामानात असायची. ती म्हणजे मुलांसाठी खाऊ किंवा छोटीशी का होईना पण एखादी वस्तू. ती मात्र यावेळी नव्हती!!      


---------------
* केरळ राज्याच्या पर्यटन विभागाच्या बोधचिन्हामधील मजकूर: "Official Host to God's Own Country"