या वेळच्या पैचिंग भेटीत अनपेक्षित पणे भिंतभ्रमणाचा योग आला. या आधी दोन वेळा मी भिंतभ्रमण केले होते त्यामुळे यावेळी भिंतीवर स्वारीचा विचार नव्हता, अर्थात वेळही नव्हता. रविवारी सायंकाळी पैचिंग येथे आगमन, सोमवारी पैचिंगमधील एका कंपनीच्या मुख्यालयाला भेट, तिथे बैठक, चर्चा, प्रदर्शनीतील उत्पादनांची पाहणी, दूरगामी व्यापार धोरण वगरे चर्चा. सायंकाळी हॉटेलवर परत. मंगळवारी सकाळी हंग्झौ ला प्रस्थान असा मूळ कार्यक्रम होता. सोमवारी सकाळी ते लोक साडेआठ वाजता न्यायला येणार होते. साडेआठ च्या पाच मिनिटे आधीच आवरून तयार होऊन आम्ही खाली आलो तेव्हढ्यात पानचा भ्रमणध्वनी आला की काही कारणास्तव तो उशीरा येत आहे. तेंव्हाच शंकेची पाल चुकचुकली. साडेनउला पेनी आली व आम्ही त्यांच्या मुख्यालयाकडॆ निघालो. वाटेतच पेनीने शुभवर्तमान ऐकविले की काही अपरिहार्य कारणास्तव त्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक परदेश दौऱ्याहून परतू शकलेले नाहीत, सबब ते आज भेटू शकणार नाहीत. त्यांनी समजावले, दिलगिरी व्यक्त केली तरी आमचा विरस झालाच. इतक्या लांबून आलो आणि भेट नाही. नाइलाज होता. त्यांच्या कचेरीत थोडीफार चर्चा वगरे झाली, काही जुजबी माहिती वगरे देऊन मग साधारण ११.३० लाच आमची भेट संपत आली. मुख्य अधिकारीच नाहीत तर काय चर्चा करणार? पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करींत पेनी म्हणाली की आता काम तर फारच लवकर संपले आहे, तर आपल्याला पैचिंग शहर पाहायला आवडेल का? माझ्या बरोबर आमच्याच समूहातील एका नव्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता. तो पैचिंगला प्रथमच येत होता. मग काय? भिंत आणि प्रनिषिद्ध नगर असा कार्यक्रम ठरला. गाडी बादालिंगच्या दिशेने निघाली.