शनिवारचा दिवस होता तो. सलग तीन दिवस सुट्टीच्या आनंदात मी अक्षरशः वेडा होण्याच्या बेतात होतो. शनिवार, रविवार आणि सोमवारी दसऱ्याची सुट्टी!! जीवनात सुख यापेक्षा वेगळे ते काय असते? मग मी एक प्लॅन केला. शनिवारी सगळी महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत आणि रविवारी आणि सोमवारी सुट्टीचा मनसोक्त आनंद उपभोगावा असे ठरवले. मग एक यादी घेऊन मी शनिवारी सकाळी माझ्या दुचाकीवरून निघालो. निघालो म्हणजे काय, फुलपाखरासारखा बागडत निघालो! पहिलं काम गाडी (म्हणजे दुचाकी, पुण्यात सायकलीला देखील गाडी म्हणतात.) सर्व्हिसिंगला टाकणे. मस्त शीळ वाजवत मी गॅरेजला पोहोचलो. बघतो तो काय तिथे तोबा गर्दी. आधीच १२५ गाड्यांची सर्व्हिसिंग करायची आहे आणि आता नवीन गाडी घेतली जाणार नाही असे तिथल्या माणसाने नम्रतेने (विश्वास बसतोय का बघा!) सांगीतल्यावर मी माझा मोर्चा पुणे महानगरपालिकेच्या कोथरुड क्षेत्रीय कार्यालयकडे वळवला. मिळकत कर नावाचा एक कर भरायचा असतो तो भरण्यासाठी मी हिम्मत करुन निघालो होतो. शासकीय कामे करायची म्हणजे हिम्मत लागते आजकाल. कसंबसं मी बळ एकवटलं आणि निघालो. शिवाय दंडाची भीती ही होतीच. म्हटलं भरून टाकावा एकदाचा. हा कर कशासाठी आकारला जातो तेच मला कळलेलं नाहीये आजतायागात. म्हणजे घर घ्यायचं आम्ही, कर्ज घ्यायचं आम्ही, हप्ते भरायचे आम्ही, फर्निचर घ्यायचं आम्ही आणि हे शहाणे त्यावर कर घेणार. हे पाणी देणार नाहीत, चांगले रस्ते देणार नाहीत, रस्त्यांवर रस्तेच नाहीत म्हणून दिवे देणार नाहीत, सक्षम सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था देणार नाहीत, माजलेल्या बिल्डर्सविरुद्ध कायदेशीर आणि चटकन संरक्षण देणार नाहीत, भ्रष्टाचारविरहीत शासन यंत्रणा देणार नाहीत, घरांची सुरक्षा देणार नाहीत आणि मोजून कर मात्र घेणार पगारदारांकडून!! अजब आहे सगळं! असो. मी निघालो. मला वाटलं खूप गर्दी असेल पण नव्हती. माझा पहिलाच प्रसंग मिळकत कर भरायचा! आतापर्यंत मिळकतच नव्हती तर काय कप्पाळ भरणार मिळकत कर! मनाचा हिय्या करून मी मनपा कार्यालयाच्या आवारात शिरलो. एक अनामिक हूरहूर लागून राहिली होती. लग्नाच्या आधी मुलींना भेटतांनादेखील वाटत नव्हती अशी भीती वाटत होती. सगळीकडे शासकीय कार्यालयाचा जणू शिक्का उठून दिसत होता. मी जरा घाबरतच एका कर्मचाऱ्याला मिळकत कर कुठे भरतात असे विचारले. तो कर्मचारी कुठल्या कर्मात गुंग होता हे त्याचं त्यालाच ठाऊक. पण त्याने साधे मान वर करून देखील पाहिले नाही. मी पुन्हा अजीजीने विचारले. साक्षात ऐश्वर्या रायला देखील मी माझ्याशी लग्न करशील का असे एवढ्या अजीजीने नसते विचारले. करशील तर कर नाहीतर उडत जा कुठल्यातरी फिल्म फेस्टिवलला असे ठणकावले असते आणि माझी झोपमोड झाली असती. एवढेच नव्हे तर तुझे चित्रपट तसेही चालत नाहीत त्यामुळे आता डोक्यावर अक्षता पाडून घेऊन माझा संसार तरी नीट चालव असेही ऐटीत म्हटलो असतो. पण इथे गोष्ट जरा नाजूक होती. तो सरकारी कर्मचारी होता. त्याने क्रिकेटमध्ये अंपायर बोट वर दाखवून आऊट दर्शवितात तसे वर बोट केले आणि परत त्याच्या शासकीय कर्मात गुंतला. मी जरा गोंधळून त्याला पुन्हा विचारावे असे ठरवले पण उगीच त्याच्या कामात व्यत्यय नको म्हणून अंदाजाने वरच्या मजल्यावर गेलो.