कर्नाळा पक्षी अभयारण्याचे गर्द जंगल, विविध प्राणी, पक्षी आणि कर्नाळाचा बेलाग सुळका, तसे हा सुळकाच ह्या परिसराची ओळख आहे. मनोगतावर लिखाणाची सुरुवात मी कर्नाळा ने करत आहे.
मुंबई - गोआ महामार्गावर पनवेल पासून १० किमी अंतरा वरती कर्नाळा आहे. लहान पणी कर्नाळाची ओळख फ़क्त अभयारण्यापर्यंत होती पण वर किल्ला आहे हे नंतर कळाले. तसे कर्नाळा किल्ल्या बद्दल ' अति परिचयात अवज्ञा' . लोक पायथ्याशी थोडा वेळ काढतात आणि मार्गस्थ होतात, पण हा ट्रेक सोपा आणि भरगच्च झाडी मुळे आल्हाददायक आहे.
दुपारी मुंबई हून मोटारसायकल ने निघालो, बरोबर सुमीत होता ( हा जाधवांचा). पनवेल ला वाहतूक कोंडी मुळे चार ला पोहोचलो. प्रत्येकी २० रुपये प्रवेश शुल्क भरून आम्ही ट्रेक ला सुरुवात केली.
मुख्य प्रवेशा पासून एक ते दिड किलोमीटर वर एक कमान आहे, डावी कड्ची पायवाट किल्ल्या वर जाते तर सरळ रस्ता पुढे चढत फ़ोरेस्ट हाऊस कडे जातो.तिथे मोठ्या पिंजऱ्यात वेगवेगळे पक्षी, कासव आहेत. थोडी मोकळी जागा आहे, सरळ पायवाटेने खाली उतरले तर एक बंधारा लागतो व पुढची वाट किल्ल्या कडे जाते. तशी ही वाट कमी वेळेची पण अवघड, उभ्या चढणीची आहे. पाया खालची माती सरकत असते, जितकी चढण्यास अवघड त्या पेक्षा उतरण्यास अवघड. आधी दोनवेळा ह्या वाटेने प्रयत्न केला होता, पण बरोबर सोबत नव्हती आणि वेळ पण कमी पड्ला. त्यामुळे मागे फ़िरलो होतो पण आज कर्नाळा सर करायचाच होता.
आम्ही परिचीत, रुढ वाटेने निघालो. कमानी च्या बाजूला मोठ्या बोर्ड वर कर्नाळ्याचा संक्षिप्त ईतिहास आहे. भोवताली गच्च झाडी, किर्रर्र शांतता, झाड्यांच्या फ़ांद्या मधून येणारी उन्हाची तिरीप या मुळे एक वेगळा अनुभव येत होता. साडे चार वाजून गेले होते, गड पाहून परतणारे लोक वाटेत भेटत होते. एक मध्यमवयीन जोडपे त्यांच्या मुलां सोबत भेटले, वेळ पाहून म्हणाले " पाठी फ़िरा, तुम्ही परत येई पर्यंत खूप अंधार होईल". त्यांचे बरोबर होते. इतके गर्द रान की ट्रेक करताना वर डोंगर माथा दिसत नव्हता. दिवसा उजेडी किती वाजले आहे हे देखील घड्याळानेच कळाले असते पण आम्ही दोघांनी तर ठरवूनच आलो होतो त्यामुळे आम्ही चालायला लागलो.
थोड्या वेळत माथा गाठला, मध्ये चिंचोळी वाट आणि दोन बाजूला उतरण. एका कोपऱ्यात पाटी होती " कर्नाळा १ किमी", चला अजून एक किमी ची रपेट होती. उंचा वरुन भोवतालचा प्रदेश रम्य दिसत होता. समोर कर्नाळा चा सुळका खुणावत होता. पावले भरभर पडत होती, दोन वेळा छोटी चढण लागली.