श्री समर्थ रामदास स्वामी श्रीरामचंद्रांचे परमभक्त होते. परमेश्वराच्या भक्तीने असाध्य ते साध्य होते, अनेक चिंतांचे हरण होते,नकारात्मक प्रवृत्ती दूर होऊन व्यक्ती विकास होतो असे ते सांगत. ज्याच्या मनात, विचारात देवाचे वास्तव्य आहे, असा मनुष्य अनेक दुर्गुण आणि पापांपासून दूर राहतो आणि सात्त्विक समाजाची निर्मिती होते. ज्या समाजात जास्तीतजास्त सात्त्विक वृत्तीच्या व्यक्ती आहेत असा समाज शांतताप्रिय, तसेच द्वेष, वैर आणि कलह विरहित असतो. अशा समाजाची आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भौतिक प्रगती होण्यास कसलाही अडसर उरत नाही.