माझ्या यजमानांची २ वर्षांसाठी अमेरिकेत बदली झाली. आणि आम्ही भारत सोडून अमेरिकेत आलो. आम्ही आलो तेव्हा जून महिना संपतच आला होता. सर्व स्थिरस्थावर होईपर्यंत श्रावण सुरू व्हायचे वेध लागायला लागले. इथे आलो तरी आपले संस्कार विसरू शकत नाही. श्रावणातली लगबग इथे असणे शक्यच नव्हते. पण शक्य तितके सारे साजरे करायचे हे मनाशी पक्के ठरवले होते. त्याप्रमाणे सोमवारचा उपवास केला. नागपंचमीला नागाची पूजा केली. लाह्या नव्हत्या म्हणून पॉपकॉर्न वाहिले. शुक्रवारी जिवतीची पुजा केली. जिवतीचा पट भारतातून आणला होता. पुरणाचा नैवेद्य केला. मुलांना औक्षण केले.