त्यांचं आडनाव लेले नाही. म्हणजे, लेलेच आहे, की नाही, ते मला नक्की माहीत नाही. त्यांचा नक्की पत्ता मला माहीत नाही. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ कुठेतरी ते राहतात. एवढंच मला माहीत आहे. म्हणजे, माझ्या सहकाऱ्यानं मला त्यांच्याबद्दल सांगितलं, तेव्हा ते तिथं कुठंतरी राहतात, एव्हढंच मला कळलं होतं. तेव्हापासून, सिद्धिविनायकासमोरून येताजाताना मी त्या दिशेनं भक्तिभावानं हात जोडतो. अर्धा सिद्धिविनायकाला, आणि अर्धा त्या लेले, की कुणी, त्यांना... सिद्धिविनायकाच्या शेजाऱ्याला...
... त्या लेलेंची- आपण त्यांना लेले म्हणू- गोष्ट मला अरूणनं - माझ्या सहकाऱ्यानं - सांगितली, त्याला आता पाचसहा वर्षं उलटून गेलीत... पण तेव्हापासून ते माझ्या मनात घर करून राहिलेत... मला त्यांना भेटायचंय... सिद्धिविनायकाचा हा शेजारी, मलाही बघायचाय...
मी लेलेंना शोधतोय...
मी आणि अरूण- माझा समव्यवसायी- आणि शेजारी- नेहमीप्रमाणे ट्रेनमध्ये खिडक्या पकडून समोरासमोर बसलो, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या... नेहमीप्रमाणेच... आज कुणाची प्रेस कॊंफरन्स, मंत्रालयात कुठे काय, राजकारण कुठे चाललंय, जगात कुठे काय आणि अरूणचा अभ्यासाचा विषय... संरक्षण खातं- त्यावर त्यानं नुकतीच डॉक्टरेट मिळवलेली... मी त्याचा हक्काचा आणि मन लावून ऐकणारा श्रोता... जॊर्ज फर्नांडिस तेव्हा संरक्षणमंत्री होते, आणि शवपेट्यांचा वाद देशभर गाजत होता... बोलताबोलता गप्पांचा ओघ `माणुसकी'वर येऊन थांबला, नेमके तेव्हाच आमच्यासमोर एक दीनवाणा भिकारी, पाठीवरचं ओझं सांभाळत उभा होता... त्याच्या पाठीवर एक जर्जर, खंगलेला, म्हातारा अर्धमेल्या डोळ्यांची क्षीण उघडझाप करत केविलवाणेपणानं गाडीतल्या गर्दीकडे पाहत होता. कुणाचाही हात खिशात जावा, असंच दृश्य होतं... मी आणि अरूणनंही तेच केलं, आणि गप्पा लेलेंच्यापर्यंत आल्या...
असंच कधीतरी अरूण त्या लेलेंना प्रत्यक्ष भेटलेला... त्यांची कथा त्यानं ज्याच्याकडून ऐकली, त्याला घेऊनच अरूण लेलेंकडे गेलेला.
--------- -------------- -------------
सकाळचे साडेआठ-नऊ वाजलेले... अरूण आणि तो- दोघं सिद्धिविनायकाच्या शेजारच्या इमारतीतल्या एका फ्लॅटसमोर उभे राहिले, आणि त्यानं अरूणला खूण केली... अरूणनं दरवाज्यावरची बेल वाजवली, तेव्हा त्याचा ताणून धरलेला सगळा अधीरपणा त्या बेलच्या बटणातून आतल्या घरात घुमला होता... दरवाजा उघडण्यासाठी लागलेला मिनिटभराचा वेळदेखील अरूणला सोसवत नव्हता. म्हणजे, मला ते सांगतानाचा अरूणचा सूरच तसा होता... मी तेव्हाची त्याची मानसिकता समजू शकत होतो... अरूण बोलत होता, आणि तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जिवंत होत होता...
- दरवाजा उघडला, तेव्हा, बाहेर जायच्या तयारीत असलेला एक मध्यमवयीन माणूस आत उभा होता... बाहेरच्या दोघाही अनोळखींना पाहून त्यानं नमस्कार केला, आणि कोण, कुठले, वगैरे कोणतीही चौकशी न करता त्यांना आत यायची खूण केली... हातातली पिशवी बाजूच्या टेबलावर ठेवून तेही टेबलजवळच्या खुर्चीत बसले, आणि अरूणनं व्हिजिटिंग कार्ड त्यांच्यासमोर धरलं...
‘प्रेसवाल्यांशी बोलण्यासारखं माझ्याकडं काही नाही... काही काम असलं, तर सांगा... ’ झटकून आणि काहीसं फटकूनच बोलत लांबूनच ते कार्ड त्यांनी पाहिलं, आणि अरुण अवघडला...
`मला तुमच्यावर लिहायचंय'... अडखळत तो म्हणाला, आणि त्या माणसानं- लेलेंनी- टेबलावरची पिशवी उचलून उठत नमस्कार करून पायात चपला अडकवल्या...
`जाऊ दे... नाही लिहीत... पण आपण गप्पा तर मारू या'... आगंतुकासारखा त्यांच्या घरात घुसूनही, अरूण त्यांना सोडायला तयार नव्हता...
`ठीक आहे.. पण मला जास्त वेळ नाही’- मनगटावरल्या घड्याळाकडे पाहत ते पुन्हा खुर्चीत बसले.
`नाही, सहज इकडे आलो होतो सिद्धिविनायकाला, तर तुम्हाला भेटावंसं वाटलं, आणि न विचारताच आलो'... अरूण त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करत होता. आणि ते -लेले- निर्विकारपणे अरूणकडे पाहत होते.
‘मला समजलं, तुम्ही व्हीआरएस घेतली म्हणून... ’ अरूणनं आणखी एक खडा टाकला.
‘हो.. अलीकडेच... ’ लेले तुटकपणानं का होईना, बोलले.
`हे बघा, मी काहीही छापणार नाही. फक्त मला ऐकायचंय... तुमचा टर्निंग पॉंईंट’... अरूणनं पुन्हा दामटलं.
`नाही हो, कुणी काही छापावं, माझं कौतुक करावं, असं मी काही करत नाही... मी जे करतो, ते माझ्या समाधानासाठी... मला रात्री घरी आल्यावर शांत झोप लागते... बस्स... मी खूप समाधानी आहे'... लेले म्हणाले...
‘पण कधीपासून? '- अरूण म्हणाला, आणि लेलेही जरासे सैलावले.
अरूणशी बोलायला, गप्पा मरायला काही हरकत नाही, असा त्यांना विश्वास वाटला असावा...