का???? चमकलात का????? अश्या मथळ्याचे लेख काय फक्त अँजेलिना जोली, किंवा रिचर्डकाका हिल्टन ह्यांची कन्यका (हिचा 'पॅरीसस्पर्श' झालेले किती असतील कोण जाणे), लिंडसे लोहान, ब्रिटनी स्पीअर्स (माहितीसाठी आभारः टाईम्स ऑफ इंडिया चा "पुणे टाईम्स" वा "पुणे मिरर"), किंवा आपल्याकडचे मातब्बर म्हणजे ऐश्वर्या (ओबे)राय-खान-बच्चन (मध्ये एखादं नाव राहिलं नाही ना? ), टकल्या फिरोज खान, अगदीच ताज्या दमाचे म्हणजे इम्रान हाश्मी वा "मी नाही त्यातली" फेम तनुश्री दत्ता अश्यांनीच लिहावे काय? आता आमच्या प्रेमप्रकरणांची जाहीर चर्चा होत नसली म्हणून काय झालं.
नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी......... नाचू......!!!
'काला कौवा... काट खायेगा.... ', जीभ काढित्यात हो लोकं, जीभ? प्राण्यांमध्ये जीभ काढणारा मी एकच प्राणी पाहिला आहे....कुत्रा. आता जर का मी एखाद्याला म्हटलं ना, टाळ नीट वाजव, तर तो म्हणेल, 'महाराज, ही घ्या तुमची टाळ, ही घ्या तुमची माळ, आता आपली भेट सरळ नवरदेवासमोर, वन्स मोर, "काला कौवा".
नीलांगण राज्यात दोनच प्रकारचे लोक राहत असत. सदैव खरे बोलणारे बेडर, नि सदैव खोटे बोलणारे बेरड. त्यांच्या बाह्य शरीर-लक्षणांत काहीही फरक नव्हता.
एकदा हे बेडर-बेरड प्रकरण माहीत असलेला अजय त्यांच्या राज्यातून प्रवास करताना रस्ता चुकला. फिरत फिरत एका तिकटीवर तो पोचला तेव्हा त्याला तिथे दोन व्यक्ती दिसल्या.
माझ्या आयुष्यातल्या नाटकात बरीच पात्रं आहेत. त्यांच्या शिवाय हे नाटक होणे शक्य नव्हते. त्यातल्या काही पात्रांची आता मी आपल्याशी ओळख करून देत आहे.
साने काका - श्रीहरी साने
आमच्या पांडव गँगचे धर्मराज. अनुभवाने नि वयाने सर्वात मोठे. ३-४ वर्षात निवृत्त होतील. एकदा मी चुकून आमच्या इथल्या ब्राह्मण सभेच्या मीटिंगला गेलो. गेलो म्हणजे बाबा घरी नसल्याने आणि त्या दिवशी कमिटीची निवडणूक असल्याने मला जावं लागलं. निघताना बाबांनी मला फोन करून 'भिड्यांनाच मत दे, मतदान झालं की लगेच सटकू नकोस, शेवट पर्यंत थांब आणि घरी आलास की तिथे काय काय झालं ते फोन करून मला सांग' असे बजावले. पहिल्या १५-२० मिनिटांत मतदान झाल्यावर नंतर वेग-वेगळी भाषणं सुरू झाली. अर्थातच, मी स्वतः विषयी च्या स्वतः च्या अपेक्षांना जागलो आणि मला लवकरच डुलक्या येऊ लागल्या. तेवढ्यात मला कुणी तरी कोपर मारून जागे केले. बायको तर घरी होती मग आता इथे आपल्या झोपेवर उठणारे कोण हे बघण्यासाठी मी मान न उचलताच नुसते डोळे फिरवून बघितलं तर एक पन्नाशीचे काका होते. म्हणाले 'चल खाली जाऊन चहा घेऊन येऊ.' मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगेच त्यांच्या सोबत निघालो. थोडं पुढे गेल्यावर एका गल्लीत 'रसवंती रस गृह' लागले. काका आत शिरले. एका बाकासमोर आम्ही बसलो. दारापाशी ठेवलेले ऊस आणि आत जागोजागी टांगून ठेवलेली फळं बघून मी म्हणालो 'अहो काका इथे चहा नाही मिळणार'. काका 'मला मिळतो. तुक्या २ चहा आण रे.' आणि अर्जुन जसा कुठेही बाण मारून गंगा अवतरवत असे तसे काकांच्या आज्ञे वरून चहाचे २ ग्लास आमच्या समोर आले. माझ्या चेहऱ्या वरचे प्रश्नचिन्हं बघून काका म्हणाले 'अरे ह्या तुक्याचा बाप जेव्हा इथे किराणा मालाचं दुकान चालवत होता तेव्हा पासून येतोय मी इथे.'
काका - तुम्ही केव्हा पासून बोरिवलीत?
मी - १९८४
काका - छान. त्या आधी.
मी - गिरगावात. पोर्तुगीज चर्च च्या मागच्या गल्लीत...
काका - अरे वा वा वा, म्हणजे तू तर आमचा गाववाला. आम्हीही आधी गिरगावातच राहायचो. गाय वाडी वरून थोडं पुढे गेलं की उजव्या हाताला चौथ्या गल्लीत कुमठेकराची चाळ आहे. तिथे. नाव काय तुझ्या बाबांचं.
मी सांगितलं
काका - अरे वा, आम्ही दोघे एकाच शाळेत होतो. म्हणजे तू तर माझ्या मित्राचा मुलगा. बरं झालं भेटलास. त्याला किती वर्षात भेटलो नाहीये. तो बोरिवलीला राहायला आलाय हे कळलं होतं, पण भेटायचं राहून गेलं हे खरं. पत्ता नि फोन नंबर दे, घरी येईन एकदा.
म्हटलं नक्की या.
अशा प्रकारे आमची पहिली भेट संपली. दुसरी भेट झाली तेव्हा आमची चांडाळ चौकडी कट्ट्यावर बसून नेहमीप्रमाणे पक्षी निरीक्षणात आणि कुचाळक्या करण्यात मग्नं होती. तेवढ्यात मागून पाठीवर थाप पडली. बघतो तर साने काका. बाबांचा मित्र आला म्हणून हातातली सिगारेट लपवली. तेवढ्यात काकाच म्हणाले 'अरे वा, तू पण अग्निहोत्री का? सांगायचं नाहीस का? त्या दिवशी चहा प्यायल्यावर धूर सोडायची हुक्की मित्राच्या मुलासमोर नको म्हणून दाबून ठेवली. पुढचे दोन तास कसे तळमळत काढलेत हे माझं मलाच माहिती.' मी म्हणालो 'मी पण.' 'तू पण काय? पुढल्या ५ मिनिटांत फोन आला म्हणून खाली जाऊन सिगारेट ओढून आलास ना? मी हसलो. 'त्या दिवशी फार म्हणजे फारच बोअर झालो बाबा. सगळे म्हातारे कसले तावा-तावाने भांडतात अरे. म्हणजे मी पण त्यांच्यातलाच आहे. पण मनाने अजून तुमच्यातच आहे.' असं म्हणून काकांनी मला कोपरखळी मारून मागे बघायला सांगितले. वळून बघितलं तर एक विलक्षण प्रेक्षणीय स्थळ चालत येत होतं. 'काय काका तुम्ही?' ह्यावर काका भलतेच खूश झाले नि जोरदार हसले 'साली तुम्ही आजकाल ची पोरं भारीच बाबा शामळू. अरे तुझ्या वयाचा असताना मी, आमच्या चाळीतला बोक्या आणि तुझे पिताश्री ह्यांनी गिरगावातला प्रत्येक कट्टा गाजवलाय. असो. तर काय करता आपण भिडू लोग?' आणि त्या दिवशी नंतर साने काका आमच्या गँगचे रेग्युलर मेंबर झाले.
मध्या - माधव रानडे
मध्या माझा बालमित्र. पूर्णं नाव माधव रमाकांत रानडे. मध्या चौथीत असताना त्याच्या वडिलांची मुंबईत बदली झाली आणि मध्या आमच्या शाळेत आला. माझ्या बाकावर एक जागा रिकामी होती म्हणून मास्तरांनी त्याला माझ्या बाजूला बसवला. मास्तर गेल्यावर मी त्याला बजावला 'हे बघ, बसायचं तर बस, पण कडेला मी बसणार. तुला कोपऱ्यात बसावं लागेल.' तो हो म्हणाला. दुसऱ्या दिवशी मी वर्गात आलो तर मध्या माझ्या जागेवर बसलेला. त्या दिवशी शाळा सुटल्यावर आमची बम्म मारामारी झाली. कुणीच थांबत नाही म्हटल्यावर आमच्या मध्ये बसणारा मुलगा म्हणाला 'भांडू नका, आलटून पालटून बसा.' तो प्रश्न तेवढ्या पुरता निकालात निघाला. त्या नंतर हळू हळू माझी आणि मध्याची दोस्ती वाढत गेली. अभ्यासा विषयी प्रचंड तिटकारा आणि उचापत्या करण्याची आवड ह्या समान गुणांमुळे आम्ही एकदम घट्ट मित्र झालो. एकमेकांची साथ मिळाल्याने आम्हा दोघांची न्युसंस व्हॅल्यू दिवसेंदिवस वाढतच गेली. बाईंनी आम्हाला वेग-वेगळ्या बाकावर बसवण्याचे बरेच विफल प्रयत्न केले पण वर्गातली बाकीची जनताही आमच्या मैत्रीला जागून होती. १-२ दिवसात काही ना काही खोट्या तक्रारी करायचे. मग आम्ही आपले पुन्हा एकत्र. शाळेत असताना आम्ही अगदी दहावी पर्यंत एकाच बाकावर बसत असू.
शाळेनंतर आम्ही एकाच कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. कॉलेजचा पहिला दिवस अजून आठवतो. गेट वरच सीनियर्स नि रॅगिंग करायला पकडलं. नाव काय, कुठे राहतोस वगैरे विचारून झाल्यावर त्यांनी मध्याला विचारलं 'बाबा काय करतात रे तुझे.' मध्या ने शांतपणे उत्तर दिलं 'कांदिवली पोलिस स्टेशन मध्ये सीनियर इन्स्पेक्टर आहेत.' मुलांनी गुपचुप पणे जा म्हणून सांगितलं. पुढे त्याच मुलांशी आमची मैत्री वगैरे झाली. कॉलेज मध्ये आम्ही आमच्या किडेगिरीला नवीन पैलू पाडले. उचापत्यांमधल्या वेग वेगळ्या लेवल्स पार केल्या. पुढे कधीतरी त्या मुलांना कळलं की मध्याने त्यांना बाबांच्या बाबतीत गंडवलंय पण तोवर आम्ही त्यांच्यातलेच एक झाल्याने सोडून दिलं.
आम्ही आमच्या वर्गातल्या मुलांबरोबर कधीही नसायचो. कायम सीनियर्स सोबतच. कारण ते सगळ्याच बाबतीत आमच्या १ लेवल पुढे होते. म्हणजे, वर्गात न बसता प्यून करवी हजेरी लावणे, कँटिनवाल्या कडून फुकट नाश्ता उकळणे, कॉलेज मध्ये पालकांना बोलावल्यावर कुठूनतरी मोठा भाऊ पैदा करणे, अभ्यासाची वेगवेगळी पुस्तकं आणि कॅसेट्स मिळवणे, इत्यादी. ती मुलं पास होऊन बाहेर पडल्यावर आम्ही तो वारसा पुढे चालवला आणि पुढच्या पिढीला त्याचा फायदाही करून दिला.
आता पर्यंतच्या आमच्या मैत्रीत आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र केल्या. सायकल चालवायला एकत्र शिकलो, बाइक सुद्धा एकत्रच चालवू लागलो, पहिली सिगरेट एकत्र ओढली, पहिली बियर सुद्धा एकत्र प्यायलो. सिनेमे, नाटकं, मारा-माऱ्या वगैरे फुटकळ गोष्टी तर खूपच. ह्यावर कळस म्हणजे प्रेमातही एकत्रच पडलो. नशिबाने वेगवेगळ्या मुलींच्या. त्याचं झालं असं की आम्ही फायनल इयर ला असताना फर्स्ट इयर ला २ अत्यंत आगाऊ कार्ट्यांनी प्रवेश घेतला. मध्या सांस्कृतिक मंडळावर असल्याने त्यांची आमच्याशी ओळख झाली. पुढे यथावकाश आम्ही त्यांच्या प्रेमात पडून त्यांच्याशी आमचं लग्न झालं. (ही कथा पुन्हा केव्हातरी)
ह्या मागच्या १५-१६ वर्षांत बर्याच मुला-मुलींशी मैत्री झाली पण आमच्या दोघांत तिसरा आला नाही. तो यायला बराच काळ लोटला. तर अशी ही आमची मैत्री अजूनही तशीच आहे आणि दिवसेंदिवस अजूनच घट्ट होते आहे.
विन्या - नरेंद्र विनायक दामले
ह्याला विन्या हे नाव कशावरून पडलं हे तुमच्या लक्षात आलं असेलच. विन्या खरं म्हणजे माझ्या बायकोचा लांबचा लहान भाऊ. मूळचा नागपूरचा पण आता पोटापाण्यासाठी मुंबईला असतो. ह्याला नोकरी लागली तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं. पण तरी आधीच मला मनाने नवरा मानल्याने बायकोने त्याचे राहा-खायची व्यवस्था करायचं काम माझ्यावरच टाकलं. एकदा ह्याला आपल्या घरीच राहायला सांगावं असा एक आळशी विचार मनात आला होता. पण घरात लग्ना नंतर जागा उरणार नव्हती. म्हणून ह्याची एका मित्राच्या घरात, जे तो भाड्याने देतो, सोय केली.
माझा होणारा साला असल्याने पहिल्या दिवशीच मी त्याची सगळी चौकशी केली. तेव्हा तो ही आमच्या प्रमाणेच सर्व गुण संपन्न असल्याचे कळलं. मग काय, हा घोडाही आमच्या कळपात सामील झाला. पण ताईला टरकून असल्याने त्याने माझ्या विषयी जास्त लिहू नकोस म्हणून विनंती केली. मी त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला 'अरे काय साल्या (द्व्यर्थी संवाद) आता मोठा झालास आता तू. अजून ताईला कसला घाबरतोस. ती काय वाघ आहे का तुला फाडून खायला? तुझ्या ताईला मी पण घाबरतो पण ते ताई म्हणून नाही.' असो.
का उगाच बिचार्याला टेन्शन द्या असा एक परोपकारी विचार करून मी त्याची ओळख इथेच थांबवत आहे.
विज्या - विक्रम जयकर
विज्या - माझ्या नी मध्याच्यात आलेला तो तिसरा प्राणी म्हणजे विज्या उर्फ विक्रम जयकर. हा प्राणी आम्हाला अपघातानेच भेटला. आमची पहिली भेट झाली माझ्या पहिल्या जॉब इंटरव्ह्यूच्या वेळी कुलाब्यामधे. इंटरव्ह्यू माझा होता पण मध्याही माझ्या सोबत असंच म्हणून आला होता. मी आत गेल्यावर मध्या घसा शेकायला बाहेर पडला. मी थोड्या वेळाने केबिन मधून बाहेर आलो तर तो दिसला नाही. बिल्डिंग खाली असेल म्हणून बाहेर बघितलं तर तिथेही नाही. म्हणून त्याला सेल वर फोन केला तर साहेब म्हणाले अरे आम्ही माँडेगार मध्ये बसलोय. आम्ही? मी जाताना ह्याला एकटा सोडून गेलो होतो. माँडीज मध्ये गेलो तर एका टेबलवर मध्या कुणासोबत तरी बसला होता. त्यानेच ओळख करून दिली 'मी विज्या'. स्वतःची अशी अनौपचारिक ओळख करून देणारा प्राणी तसाच मोकळा ढाकळा असला पाहिजे हा माझा अंदाज खरा ठरला आणि ३ तासांनी आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा तिघे अगदी जुने मित्र असल्यागत गप्पा मारत होतो. पण हे दोघे भेटले कसे? त्याचं झालं असं की मध्या खाली ज्योत धरून उभा असताना विज्याने त्याला पाहिलं. लगेच ओळखलं. विज्या आमच्या कॉलेज मध्ये आम्हाला ज्युनियर होता. तेव्हा आमची मैत्री वगैरे नव्हती पण आम्ही त्याच्यावर एकदा उपकार केले होते. (२०० रुपये घेऊन प्यून करवी त्याची हजेरी पूर्णं करवली होती. काय काय करावं लागतं सीनियर्स ना आपल्या ज्युनियर्स साठी) त्यामुळे त्याच्या आम्ही लक्षात होतो. ह्याने लगेच मध्याला ओळख दिली. गप्पा टप्पा झाल्यावर विज्याने इंटरव्ह्यू नंतर प्रोग्रॅम काय असे विचारले आणि मला तिकडेच बोलवून घेऊ असे म्हणून दोघे माँडीज कडे रवाना झाले.
विज्या सुद्धा बोरिवलीतच राहत असल्याने तोही आमच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह कट्ट्यावर हजेरी लावायला लागला. आता ह्या गोष्टीला साधारण ५-६ वर्षं झाली. ह्या काळात विज्या ने आमची आणि आम्ही विज्याची प्रत्येक प्रसंगात साथ दिली. मध्याच्या वडिलांना अटॅक आला तेव्हा माझ्या आधी विज्या तिथे पोचला होता. मध्याच्या बहिणीच्या लग्नात माझ्या सोबत हा सुद्धा न सांगता सगळं करत होता. विज्याचं एका गुजराथी मुलीवर प्रेम बसलं. घरून परवानगी मिळणार नाही म्हणून ह्यांनी पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं. तेव्हा त्याला 'असं करू नको, आई बाबांपासून पळून कुठे जाणार?' असं समजावून आम्ही त्याच्या घरच्यांशी बोलायला गेलो होतो. त्याच्या बाबांना हे प्रकरण आधीच माहिती होतं आणि मुलगी परजातीय असली तरी चांगल्या वळणाची आणि चांगल्या घरची असल्याने त्यांची काहीच हरकत नव्हती. हाच बिंडोक मनात धरून बसला होता की आई बाबा नाही म्हणतील. त्याच्या बायकोला भाऊ नसल्याने लग्नात आम्ही विज्याचे कान सुद्धा अगदी ताकद लावून पिळले होते.
आता मित्र म्हटल्यावर हे सगळं आपण न सांगताच करतो. पण माणूस म्हणून एखादा माणूस कसा आहे हे कळण्यासाठी अशा गोष्टी सांगाव्या लागतात.
आता सर्वात शेवटी मी - ऍडी जोशी
मी स्वतःच स्वतः बद्दल लिहिणार हे कळल्यावर विज्या आणि मध्या सटकलेच.
विज्या / मध्या: साल्या म्हणजे तू जगाला आमची आतडी काढून दाखवणार आणि स्वतःचा मात्र गुळगुळीत दाढी केलेला फोटो लावणार. हे जमेश नाय. तुझ्या बद्दल आम्हीच लिहिणार.
मी - अरे असं काय बोलता मित्रांनो, तुमचा माझ्यावर विश्वास नाही?
विज्या आणि मध्या - हे हे हे हे.
(इतक्या वर्षांच्या मैत्री नंतर आमचा अशा प्रसंगी एकमेकांवर अजिबात विश्वास नसतो ह्यापेक्षा आमच्या मैत्रीचा मोठा पुरावा अजून काय देऊ? ज्यांना खरे मित्र आहेत त्यांना हे वाक्य नक्की कळेल. अशा नाजूक प्रसंगी आपल्याला काही वाटणार नाही हे माहिती असल्याने आपले सख्खे मित्रच आपला गेम कसा करतात हे अनुभवानेच कळतं. आणि असे असंख्य गेम पचवूनही खंबीरपणे उभी असते तिच खरी मैत्री.)
मी - बरं. ठिकाय. लिहा साल्यांनो.
असं मी म्हणताच त्यांनी माझ्या समोरच माझं पोस्ट-मॉर्टेम करायला घेतलं. त्यांना लिहायची कष्ट घ्यायचे नसल्याने त्यांनी बोलावं आणि मी ते नंतर लिहावं असं त्यांनी ठरवलं. 'नीट ऐक रे साल्या आम्ही काय बोलतोय ते' असं म्हणून सुरुवात केली. मी धन्य धन्य जाहलो.
तर आता मी - ऍडी जोशी, विज्या आणि मध्याच्या नजरेतून अथवा संवादातून.
मध्या - ऍडी हरामखोर आहे.
विज्या - मला वाटतं नालायक हा शब्द जास्त योग्य आहे.
मध्या - तसा मधून मधून आम्हाला मदत वगैरे करतो. पण तशी आम्हाला जास्त कुणाच्या मदतीची गरज भासत नसल्याने आमचेच त्याच्यावर जास्त उपकार आहेत.
विज्या - आणि ऍडी प्रचंड माजखोर आहे.
मध्या - येस्स्स. ऍडी प्रचंड माजखोर आहे. हा, पण विज्या एक मात्र मान्य करावंच लागेल, साला आळशीपणात ह्याचा हात धरणारा माणूस मी तरी अखंड विश्वात पहिला नाहीये. तू पाहिलायस का रे?.
विज्या - नाही बॉ. हा माणूस सलग कितीही तास झोपू शकतो. दिवसचे दिवस एकच जीन्स न धुता वापरतो. दाढी महिन्या दीड महिन्या आड केस कापतानाच करतो.
मध्या - अजून काय रे?
विज्या - आठवतोय रे. हां. आपण लै भारी असा त्याचा समज आहे. पण त्यात त्याचा दोष नाही. आमच्या सारखे मित्र मिळाल्यावर कुणालाही असंच वाटेल. मी अजून एका बाबतीत ह्याला मानतो.
मध्या - कोणती रे?
विज्या - आठवत नाही.
मध्या - ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
विज्या - ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
आपली इतकी स्तुती सहन न होऊन मी मध्येच तोंड उघडलं - अरे मेल्यांनो मी इथेच बसलोय. जरा तरी ठेवा माझी. जगा समोर काढताच. आता मी असतानाही? मला मी असण्याचा इतका कॉम्प्लेक्स देऊ नका.
मध्या - हे बघ, जे तोंडावर खरं बोलतात तेच खरे मित्र हे कायम लक्षात ठेव.
मी - चला, लय फुटेज खाल्लंत. शाल श्रीफळ द्या आता.
मध्या + विज्या - ठिकाय. तर लोकहो ऍडी विषयी एका वाक्यात सांगायचं तर 'ऍडी एक प्रचंड नालायक, उद्धट, उर्मट, आळशी, ऐतखाऊ, (अजून काय रे?) हां, निर्लज्ज, कोडगा आणि माजोरडा माणूस आहे तरी त्याला आम्ही आपलं म्हटलंय ह्या वरून आम्ही किती चांगले आणि महान आहोत ह्याची तुम्हाला कल्पना येईलच.'
मी - झालं?
विज्या - इतक्यात?? अरे अजून हाफ पण संपली नाही ना राव. (साल्यांच्या प्रायॉरिटीज क्लियर आहेत)
मी - अरे बैलांनो, माझ्या विषयी ओकून झालं का?
मध्या - होय बा. आता इतकंच आठवतंय.
कोरस - ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ...
नुकतेच मटामध्ये भारत सरकारच्या टांकसाळीची जाहिरात पाहिली की, "पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची १५० वर्षे" च्या स्मृतीत १०० रु ची नाणी इच्छुकांना विकण्यासाठी नोंदणी सुरू आहे. त्यांच्या संकेतस्थळावरही अशीच काही १०० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. अर्थात ही नाणी चलनात नसतील हे ही त्यांनी नमूद केले आहे. मी ती नाणी घेण्याची शक्यता नाही. पण ते वाचून मी पाहिलेली वेगवेगळी नाणी व त्यांचे वापर डोळ्यासमोर येऊन गेले.
आजकाल बक्षीस देण्यासाठीच्या काही रेडीओ/टि. व्ही वरच्या कार्यक्रमांत असे काही प्रश्न विचारतात (आणि उत्तरासाठी असे हास्यास्पद पर्याय देतात) की हसावे की रडावे ते कळत नाही. बक्षीस दिले जाते आणि वस्तूची जाहिरात पण होते.
नमस्कार! आम्ही आपल्याला काही प्रश्न विचारणार आहो. नीट उत्तरे द्या. सगळी उतरे बरोबर देणाऱ्याला जगप्रसिद्ध महागडा टि. व्ही. मोफत.
मित्रहो,
तुम्ही सगळे आत्ता आत्ता ह्या जन्मात मनोगत वर आलात. पण मी मागच्या जन्मापासून इथला रहिवासी आहे. माझं सद्ध्याचं वय २९, पण मी मागची ३८ वर्षं इथे आहे. ह्या जन्मीही मला तेच अकाउंट वापरू दिल्या बद्दल मी मनोगत चालकांचा मनापासून आभारी आहे.
प्रवेश तिसरा - वेसण
मी - अगं ए, तुझ्या कडे थोडे पैसे असतील तर दे, मध्या कडे जतोय.
ही - नाहियेत.
मी - अग काल बँकेत गेली होतीस ना पैसे कढायला, काढले नाहीस का?
ही - काढले पण ते घर खर्चाला आहेत.
मी - अगं मग काय झालं, मी नवरा आहे तुझा, विसरलीस का?
ही - तू परवाच ATM मधून २००० रुपये कढलेस, विसरलास का?
मी - आयला... तुला कसं कळलं?
ही - तुझ्या अकौंट चे Transaction Alerts आज काल माझ्या मोबाईल वर येतात.
मी - अगं ते पैसे संपले.
ही - संपले? ३ दिवसात २००० रुपये संपले? हिशोब दे, त्या शिवाय काहीही मिळणार नाही.
(एक संध्याकाळ मित्रांसोबत घोट घोट घालवल्यावर हिशोब कोण ठेवतो?)
मी - मी कधी बाबांना पण हिशोब दिला नाही.
ही - मग बाबांकडूनच माग तुझ्या. बाबा, ह्याला १० रुपये द्या हो.
मी - काय??? फक्त १० रुपये???
ही - अरे तुम्ही बाईक वरून भटकणार. बाईक मधे पेट्रोल आहेच. हे १० रुपये तुला वर खर्चाला देतेय, नवरा म्हणून.
मी - अगं पण... बाबा हिला काही तरी सांगा ना.
बाबा - तुका म्हणे ठकासी मिळे महा ठक.
मी - बाबा तुकारामांनी असं काहीही म्हटलेलं नाहीये. पण हिच्या सारख्या आवड्या असल्यावर नवरे भजनाला लागणारच.
ह्यावर बाबांनी मला टाळी दिली. ते बायकोनी बघितलं. ती त्यांच्यावर घसरली. आणि अनवधानाने बोलून गेली
'बाबा, टाळी काय देताय त्याला? आपलं काय ठरलंय?'
नकळत आपण काय बोलून गेलो हे कळून तिने जीभ चवली.
मी - अछा, म्हणजे हे तुम्हा सगळ्यांच कारस्थान आहे होय. हे बघ, मी कुणालाही कुठलेही हिशोब देणार नाहीये.
ही - नको देउस, आता तुझ्या कडे उधळायला पैसेच नसणारेत.
मी - म्हणजे?
ही - म्हणजे माझा राजा, तुला आठवतंय का एका रम्य रविवार सकाळी तू लोळत पडला असताना मी तुझ्या कडून तुझं Account Joint करायच्या फॉर्म वर सही घेतली.
मी - आठवतंय अंधुकसं.
ही - त्यात एक ECS चा फॉर्म पण होता. आता तुझ्या account मध्ये पगार जमा झाला की आपोआप ३ तारखेला ५००० सोडून बाकी सगळे पैसे माझ्या account मध्ये जमा होणार. कर चैन. खा, रोज मटार उसळ खा, शिकरण खा. ही ही ही
मी - आयला, हा अन्याय आहे.
बाबा - हा हा हा हा
ही - हा हा हा हा
मी - बाबा हसताय काय, हिला सांगा ना काही तरी.
बाबा - बाळा. ये, बस ईथे.
मी बसल्यावर माझ्या डोक्यावर हात फिरवत बाबा शांतपणे म्हणाले -
आता पर्यंत उभ्या आयुष्यात आपण एकदाही बापाच न ऐकून सुद्धा आता बाप आपलं ऐकेल असं खरंच तुला वाटतं का?
असं म्हणून बाबांनि हिला टाळी दिली. ही गाणं गुणगुणत आत निघून गेली. आता शेवटचा जालीम उपाय म्हणजे आई. पण ती घरी नव्हती. आणि आमचा बाप सुद्धा जिला टरकतो ती आमची आजी कोकणात आंबे खायला गेली होती. त्यामुळे टेंपररी पराभव मान्य करून मी घराबाहेर पडलो. वाटेत २-३ रिक्षावाल्यांना शिव्या घातल्या. तेवढच जरा बरं वाटलं.
मध्या कडे आलो. मध्या माझा बालमित्र. त्याचंही माझ्या २ आठवड्या आधीच लग्नं झालंय. त्याची बायको, संध्या, ही सुद्धा मला आधी पासून ओळखते, त्यामुळे ती ही मला मुड आला की झापत असते. मध्याच्या बिल्डिंग खाली येऊन खुणेची शीळ वाजवली. संध्या बाल्कनीत आली 'टवाळ मुलांसारख्या शिट्या काय वाजवतोस? वर ये.' मी वर गेलो तर मध्या हॉल मध्ये TV समोर सुन्न पणे चॅनल बदलत बसला होता. कालच्या घोटांच्या गोटात हा ही होता. मी म्हटलं 'काय रे साल्या उतरली नाही का अजून?' इतक्यात आतून हॉल मध्ये एंट्री घेत संध्या म्हणाली 'तू नि मध्या (ही नवऱ्याला मध्या च म्हणते. लग्नं आत्ता झालं. गेली १० वर्षं ह्याच नावाने ओळखतेय. आत्ताच का बदलू. ईती संध्या) तू नि मध्या आता वारा प्यायलेल्या वासरांसारखं उंडारणं बंद करा.' 'आम्ही वारा कुठे पितो???...' तेवढ्यात मी एक विनोदाचा क्षीण प्रयत्न करून बघितला. संध्या लगेच तिच्या मुळ स्वभावावर येउन म्हणाली 'PJ नकोयत. तू नि मध्यानी आता गुपचूप थंड घ्यायचं, कळ्ळं नं. नाही तर मला नि विद्द्याला (माझं सौभग्य) काहितरी ठोस पावलं उचलावी लागतील. आता ह्यातलं पहिलं ठोस पाऊन नुकतंच घरी उचलल्या गेल्याने मी मध्या ला सावध करण्या साठी तोंड उघडलं तेवढ्यात संध्या म्हणाली 'त्याने कालंच फॉर्म वर सही केली.' मी कपाळावर हात मारून मध्या कडे बघितलं. त्याने पुन्हा एकदा चॅनल बदललं.
चहा पिऊन दोघे बाहेर पडलो. मध्या अजून उदासच होता. मी म्हटलं 'उदास नको होऊस प्यारे, काही तरी आयडीया काढतो.'२-३ महीने असेच गेले. काहीही आयडीया आली नाही. हालाखीचं जीवन तसंच सुरू होतं. चायनीज च्या गाड्या तशाच होत्या, बारही तसेच होते. फक्त आता आम्ही नव्हतो.
एके रविवारी मध्यरात्री ९ वाजत हिने अचानक मला उठवलं.
ही - ऍडी उठ, ९ वाजले.
मी - अगं ९ ही काय रविवारी उठायची वेळ आहे का?
ही - माणसाला ८ तास झोप पुरेशी असते. तुझी १० तास झाली आहे. आज पासून १२-१२ तास लोळणं बंद.
मी - मी माणूस आहे का? मी तुझा नवरा आहे. तुझ्या साठी मी देव आहे.
ही - हो का? मग उद्या पासून तुला नैवेद्याच्या वाटीतच जेवायला वाढते. उठ आता.
असं म्हणून ही पंखा बंद करून निघून गेली. ही आईची सवय हिला कशी लगली? मी उठत नसलो की आई अशीच पंखा बंद करून जाते. मग उकड्याने हैराण होऊन थोड्या वेळाने उठावच लागतं.
चहा नि सिग्रेट घेऊन बाल्कनीत आलो. मध्या ला फोन करावा असा विचार मनात आला. पण म्हटलं झोपला असेल हरामखोर. तेवढ्यात हिने कॉर्डलेस आणून दिला. पलिकडे मध्या. मी उडालोच.
मी - काय रे भXX, इतक्या लवकर कसा उठला तू?
मध्या - जसा तू उठलास तसाच मी उठलो.
मी - ह्म्म्म्म...
मध्या - ह्म्म्म्म...
मी - मध्या, आपला गेम झाला यार.
मध्या - हौ ना भौ.
मी - पण साला मी काय म्हणतो, थोडे दिवस वागून बघायचं का बायकांच्या मना प्रमाणे?
मध्या - अरे पण आपण आहोत तसे वाईट आहोत का? वाईट असतो तर ह्यांनी आपल्याशी लग्नं केलं असतं का?
मी - खरंय रे. पण तसंही त्या आपल्याला त्यांच्या मना प्रमाणे वागायला लावतातच. त्यापेक्षा, थोडे दिवस वागू त्यांना हवं तसं. जरा वातावरण निवळलं की आहेच पुन्हा जैसे थे.
मध्या - ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
मी - ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
तेवढ्यात पलीकडून २ स्त्रीयांचा आवज आल. क्रॉस कनेक्शन लागलं असेल असं मला वाटलं. पण आवाज ओळखीचे वाटले. मग लक्षात आलं ही आमच्या बायका पॅरेलल लाईन वरून आमच्यावर हेरगिरी करत होत्या.
ही - मध्याSSSS
संध्या - ऍडीSSS
कोरस - तुम्ही दोघेही अतिशय नालायक आहात. खटाक...
चाहुल लागली म्हणून मागे वळून बघितलं तर आमची रखुमाई विठ्ठला सारखी कमरेवर हात ठेउन उभी होती.
त्या संध्याकाळी आमची उ. न. क. (उपेक्षीत नवरे कमिटी) ची मिटींग ठरली. मंथ एंड असल्याने शबरी मध्ये भेटलो. १-१५ समाधान मधे बसतो. १५-३० आम्ही 'शबरी रेस्टोरेंट अँड फॅल्मीली बार आणि शुधा शांती ग्रुह इथे वीज आणि फोन ची बिले भरली जातील प्रो. बाळा काळे' मधे भेटतो. ठरल्या प्रमाणे ७ वाजता नेहेमीच्या टेबल वर नुकतेच लग्नाळलेले मी, मध्या, नी विज्या, लग्न ठरलेला विन्या आणि गेली १५-२० वर्षं बायकोच्या गोलंदाजीवर यशस्वी पणे पॅडींग करणारे साने काका जमलो. आमच्या ह्या गँगला चांडाळ चौकडीच्या तालावर साने काकू 'पाचकळ पांडव' म्हणतात. त्यांच्यामुळे आमची ही गँग सगळी कडे पांडव गँग म्हणूनच फेमस आहे.
आम्ही बसल्यावर कौंटर वरून बाळा काळे ओरडला 'अरे गोट्या (तो प्रत्येक वेटर ला गोट्याच म्हणतो) अरे गोट्या पांडवांची द्रौपदी आण रे... (म्हणजे मॅकडोवेल चा खंबा आण)
दोन पेग पोटातून डोक्यात गेल्यावर काकांची ओघवती वाणी सुरू झाली.
- सालेहो तुमच्या बेसिक मध्येच लफडा आहे. बायकोला शत्रू समजू नका. तिला सुखात भगीदार करा. तिचं मधून मधून कौतूक करा.
मध्या - च्यायला म्हणजे आता पुढल्या बैठकीला बायकांना पण आणायचं का? आधीच दारू चे भाव किती वाढलेत. त्यात बायकाही पिऊ लागल्या तर आपल्यालाच सोडावी लागेल.
काका - मध्या... मी बोलत असताना पुन्हा तू मधेच विनोदाचा प्रयत्न केलास तर हा तुझा शेवटचा पेग.
तर, तुम्हाला बायकांना हैंडल नाही करता येत. तापलेला तवा पेटलेल्या गॅस वर ठेवला की तो अजून तापणारच. पहिलं म्हणजे बायको रागवली की आपण शांत रहायचं. आणि ती ज्या कारणा साठी रागवली आहे ते चुक आहे हे महिती असूनही चुकलो हे लगेच कबूल करायचं. बायकोचा अर्धा राग इथेच शांत होतो.
दुसरं म्हणजे बायकोला घर कामात मदत करायची.
कोरस - क्काय???
काका - म्हणजे तसं दाखवायचं.
कोरस - हुश्श्श...
काका - एखाद्या रविवारी उगाच बटाटा हातात घेउन चिरून देउ का म्हणून विचरायचं. मग बायकोच म्हणते, असू दे रे, करते मी. बायकोनी आठवड्या भराचं सामान आणून ठेवलंय हे पहून कट्ट्यावर जाताना उगाच विचारायचं 'काही आणायचय का गं बाहेरून?' की बायको खुष.
आणि आता सर्वात महत्त्वाचे. तुमची बायको कारकून असो वा प्राईम मिनिस्टर, तिला करियर च्या कौतुका पेक्षा भाजी छान झाली आहे ह्या कौतूकाचं जास्तं अप्रूप असतं. त्यामुळे मधून मधून तेही करत रहायचं. पोळी जरा जास्तं भाजल्या गेली की लगेच 'अरे वा, आज जेवायला खाकरे वाटतं' असं नाही म्हणायचं. आणि तुमचं तर अजुनच बरं आहे. ह्या मॉडर्न मुलींना मी नोकरी करत असुनही घर देखील उत्तम सांभाळते हे दाखवून कौतूक करून घेण्याची हौस असतेच. त्या मुळे त्या फ्रंट वर फार चिंता नाही. असं जवळ जवळ २ तास काका बरंच काही बोलत होते. त्यांच लक्षं नाही हे पाहून मधूनच मध्या त्यांचा ग्लास उचलत होता. नि तो त्यांचा ग्लास पित असताना काका मध्याच्या ग्लास संपवत होते. शेवटी एकदा बार बंद व्हायची वेळ आली तेव्हा काकांनी समारोप केला.
- त्यामुळे बाळांनो, संसार सुखाचा करायचा असेल तर बायकोला कंट्रोल मध्ये ठेवायला शिका. चला आता उचला आप-आपले मद्याचे चषक आणि सुखी संसाराच्या नावाने होउन जाउ द्या बॉटम्स अप...
चियर्स...
चियर्स...
आबा, या T20 तील क्रिकेटने आमच्या अभ्यासाची पार वाट लावली आहे. आम्ही व आमच्यासारखे हजारो जरा कुठे शहाण्या प्रथम वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्यांप्रमाणे मन लावून शरीरशास्त्राचा अभ्यास करू लागलो, किंवा नृत्याचा अभ्यास करू लागलो की लगेच एखादा फलंदाज षटकार-चौकार मारून त्यात व्यत्यय आणतो. किती समजावले तरी ऐकत नाहीत. यांना काय वाटते, मैदानावर जमलेले सारे यांचा खेळ बघायला आलेले आहेत ? मैदानाच्या कडेला आमची शाळा भरते म्हणून आम्ही येतो. अहो, बारामतीकर साहेबांनी आमच्यासाठी खास गौरदेशातून छान छान शिक्षिका आणल्या आहेत. (अशा शिक्षिका आमच्या देशी शाळांमध्ये असत्या तर? 'अशीच अमुची टीचर असती...' ) त्याही भान हरपून, अंगविक्षेप करून शिकवण्यात दंग असतात आणि तेव्हढ्यात कोणीतरी *** विकेट घेतो आणि आम्हा मुलांचे लक्ष अभ्यासावरून उडते. नाव न सांगण्याच्या अटीवर काही शिक्षिकांनी याविषयी आमच्याकडे नाराजीही व्यक्त केली आहे. "आम्ही सामाजिक कर्तव्य समजून सतासमुद्रांपलीकडून तुम्हा आबालवृद्ध भारतीय विद्यार्थ्यांना एनॅटमी आणि शास्त्रीय नृत्य शिकवायला आलो पण आमच्या अध्यापनात या क्रिकेटमुळे सारखे अडथळे येतात. अशाने पोर्शन पूर्ण कसा होणार? "