ख्यातनाम हिंदी साहित्यिक शरद जोशी यांच्या एका कथेचे हे स्वैर भाषांतर आहे.
पेकिंगच्या बाजारात अशी मंदी कधीच आली नव्हती. काय करावे हे दुकानदारांना कळत नव्हते. सगळे साठवलेल्या पुंजीतून खर्च करायला लागले होते. नव्या मालाकरता मागणी येणे जवळपास बंदच झाले होते. याचा परिणाम कारखान्यांवरसुद्धा होऊ लागला होता. त्यांची गोदामे भरलेली होती आणि यंत्रे बंद करायची पाळी आली होती. चिअँग-कै-शेक च्या सरकारला कळत नव्हते की काय करावे. रोजरोज मंत्र्यांच्या बैठकी होत, आणि आर्थिक प्रश्नांवर काय तोडगा काढावा याबद्दल वादविवाद चाले. ते वादविवाद आणि त्यातून निघालेले तोडगे रोज वृत्तपत्रांत छापले जात पण त्याचा काहीही उपयोग होत नसे. लोकांची वृत्तपत्र खरीदण्याची इच्छाच नाहिशी झाली होती. मंदीचे हे वातावरण बराच काळ चालू राहिले. पेकिंगमधील एका वरिष्ट पत्रकार च्याऊ प्याऊ यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर पेकिंगच्या अख्ख्या बाजारानेच जणू अफूचा मोठ्ठा डोस मारला होता. नेहमी गजबजलेला तो बाजार सकाळ-दुपार-संध्याकाळ आता निर्जन असे. मिचमिच्या डोळ्यांचे दुकानदार बाजारात आलेल्या एकट्यादुकट्या माणसाला न्याहाळत बसत आणि सदैव विचारत की त्याला काय घ्यायचे आहे.