५२. संसारसिंधु हा दुस्तर । नुल्लंघवे उल्लंघितां पार ।
बहुत वाहाविले दूर । न लगेचि तीर पैल थडी ॥१॥
किती जन्म झाला फेरा । गणित नाहीं जी दातारा ।
पडिलों आवर्ती भोंवरा । बहु थोरा वोळसिया ॥धृ॥
वाढलों परि नेणती बुद्धि । नाहीं परतली धरिली शुद्धि ।
मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधि सांडूनियां ॥३॥
अनेक खाणी आहार निद्रा । भयमैथुनाचाचि थारा ।
बालत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥४॥
ऐसी उल्लंघूनि आलों स्थळें । बहु या भोवंडिलों काळें ।
आतां हें उगवावें जाळें । उजेडावें बळें दिवसाच्या ॥५॥