(दि.बा.मोकाशींचं 'पालखी' हे पुस्तक नुकतंच वाचलं. त्याचं रसग्रहण)
वर्षांमागून वर्षे जातात. तंत्रज्ञानात प्रगती होते. माणसाभोवतीचं भवताल कमालीचं बदलतं. पण माणूसपण बदलत नाही. हाडं जिथल्या तिथे राहतात. रक्ताचा रंग लालच राहतो. वृत्ती तशाच राहतात. षड्रिपूंचा धुमाकूळ देहात अविरत सुरूच राहतो...
या सगळ्याचा प्रत्यय ठायी ठायी 'पालखी'मध्ये येत राहतो.
पुस्तक म्हणजे लेखक स्वतः पालखीमध्ये सामील झाल्यावर त्याला आलेल्या अनुभवांची टिपणं आहेत. सासवड ते पंढरपूर असा रात्रंदिन प्रत्यक्ष केलेला तो प्रवास आहे. प्रश्नपत्रिकेच्या मदतीनं समाजाचा आरसा पाहावा, असा लेखकाचा उद्देश होता प्रत्यक्षात तो आरसा कागदाऐवजी त्याच्या मनातच तयार झालेला आहे.
एकेका मुक्कामाच्या आगे मागे नाना नमुने लेखकाला भेटतात. सुरूवातीला एक वारकरी बाईच फसवते, तेव्हा लेखकासह आपणही चमकतो. वारीची चुणूक मिळते. मुलं सांभाऴीत नाहीत म्हणून वारीला एक म्हातारा पालखीला आलेला आहे. पंचविशीतला केवळ आनंदासाठी क्षण जगणारा तरूण पालखीत आहे. पोर हरवलेली बाई आहे. हिशेब ठेवणारा संन्यासी आहे. स्वतःच्या समाजाचा रोष पत्करून पालखीत येणारी मुस्लिम स्त्री आहे. चार पैसे सुटतात म्हणून आणि वारीची सेवा घडते म्हणून येणारे न्हावी आहेत. अखेरच्या टप्प्यात समाजातील अभिजन वर्गातील प्राचार्य सोनोपंत दांडेकरांची उपस्थितीही पालखीत आहे.
या सर्वांशी लेखकाचे झालेले संवाद-विसंवाद नमुनेदार आहेत आणि म्हणून मुळातूनच वाचण्यासारखे आहेत.
पालखीचं व्यवस्थापन, मुक्कामांवर निर्माण झालेले तंबू , जेवणाखाणाची व्यवस्था अशा असंख्य गोष्टींशी नकळत परिचय होऊन जातो.
वर्णनाची अत्यंत साधी शैली लेखकाकडे आहे. मित्रापाशी मन मोकळं करावं, तसं लेखक लिहितो.
भजनाचे नाद दूर जात जात फक्त पावसाची थडथड राहिली, तेव्हा धावत्या लारीतून पडलेल्या पोत्यासाऱखा मी दचकलो.
मांडवीचा ओढा भल्या मोठ्य़ा कातळाला बगल देऊन वाहत आहे.
उजव्या हातास टेकडी आहे. मुरूम काढल्याचे लहानमोठे खड्डे तिच्यावर दिसत आहेत.
...अशी असंख्य वाक्यं सहज येऊन भेटतात.
माणसं, निसर्ग आणि एकूण जीवनमानाचं आगळं वर्णन लेखक करतो. 'जमीन मागे पडत आहे' ऐवजी लेखक म्हणतो 'पृथ्वी मागे पडत आहे'. वारीचे वर्णन मोकाशींनी कमालीचे चित्रमय केले आहे...
वारक-यांच्या उंच धरलेल्या पताका आकाश भगवं करीत दिलखुलासपणे नाचत-खिदळत होत्या.
पाच-पाचच्या रांगेत वारकरी चालत होते. सर्वांच्या उघड्या पोट-या नजरेत भरत होत्या.
साध्या शैलीमुळे वारीची निव्वळ बातमीदारी होत नाही तर समालोचन होतं. जणू आपणही वारीत आहोत पण काय घडत आहे ते केवळ मोकाशींनाच दिसत आहे. एकेक मुक्काम करत करत जेव्हा आपण पंढरपूरला येतो तेव्हा वारीमय होऊन गेलेलो असतो. पालखीने लेखकासह आपल्यालाही काय दिलं असा विचार आपण करतो, करतच राहतो.
पुस्तक 1964 सालचं आहे पण कोणी ते 2007 सालचं म्हणून सांगितलं तरी त्याला खोटं बोलणं म्हणू नये. कारण पालखी आजही तशीच आहे. आय.टी. युगातही.