हेमंत ऋतूतील सुरम्य रविवारची सकाळ. जुन्या भाषेत बोलायचं तर कोवळी उन्हं अशी ओटीवर - तूर्तास बाल्कनीत- पोहोचलेली. सौभाग्यवती, कुलदीपक आणि कुलदीपिका अद्याप साखरझोपेतच. ‘या निशा सर्व भू्तानां तस्यां जगर्ति संयमी’ असा मी संयमी. भल्या पहांटे सहा वाजता जागा झालेला. पोटात कोकलणार्या कावळ्यांना कसे शांत करावे या चिंतेत. एरवी मी एव्हाना एखाद्या क्षुधांशांति गृहात मिसळपाव हाणत बसलो असतो. पण ‘बाहेर जाऊन कुठे कांही हादडू नका’ अशी तंबी काल रात्रीच मिळाली होती. कारण आज घरी महिला मंडळाची किटी पार्टी ठरली हो्ती आणि त्यासाठीच्या मदतीसाठी मी रिझर्व्हड् होतो.
पार्टीचा मेनू अगदी यावेळेपर्यंत गुपित ठेवला गेलेला होता. पण मला त्याचीच खरी धास्ती होती. कारण गेल्या वेळेस अशाच किटी पार्टीचा मेनू आयत्या वेळेस ‘ आमरसातील कडबोळी ’ असा जाहीर झाला आणि त्यासाठी लागणारा आमरस बाजारात शोधता शोधता मला ऐन डीसेंबरात घाम फुटला होता. अशा नाविन्यपूर्ण पाककृतीचे प्रयोग करण्याची आमच्या सौभाग्यवतींना भलतीच हौस. त्यासाठी दूरदर्शनवरील पाकक्रियेचा एकही कार्यक्रम त्या सोडीत नसत. त्या पाककृतीही भलत्याच नाविन्यपूर्ण असतात. बहुदा नेहेमीच्याच दोन किंवा तीन पाककृतींचे भागश: केलेले कडबोळे असते.
चुकून एकदा दुपारी घरी आलो तर ‘ढंग मेजवानीचा ’ अशा नावाचा एक कार्यक्रम बघण्यात सौ तल्लीन झालेल्या. मला त्यांच्याशी महत्वाचे बोलायचे होते. पण त्या छोट्या पडद्यावर चालू असलेली ‘ बोहेमियन पिज्झा वुईथ गार्लिक सॉस ’ ही पाककृती संपेपर्यंत त्या माझ्याशी बोलणेच काय पण माझ्या अस्तित्वाची दखल घेतली जाणेही दुरापास्त होते. त्या मुळे ती पाककृती मला पहा्वीच लागली. मैद्याच्या वात्तऽड अशा भाकरीवर आलं-लसणीचा ठेचा सारवलेला, त्यावर बर्याचशा कच्च्या भाज्या किसून घातलेल्या आणि शेवटी त्याच्यावर चीझचा कीस. हे सारं छोट्या भट्टीत गरम करून खायचं. बोटीच्या भोंग्यासारखा टोप घातलेला एक खानसामा ती पाककृती करून दाखवत होता आणि एक गोर्या गोबर्या गालाची नाकेली मुलगी एकदा ओढणी आणि एकदा कपाळावर लोंबू पहाणारे केस सावरीत, त्यातून वेळ काढीत त्याची पाककृती प्रेक्षकांना समजावून सांगत होती. या पदार्थाला बोहेमियन पिज्झ्झा कां म्हणायचं हे मला कळेना. सौ ती पाकक्रूती ( हा तिच्याच वहीतला शब्द आहे) लिहून घेण्यात मग्न असल्याने माझ्या या प्रश्नाला उत्तर मिळणे शक्य नव्ह्ते. आमच्या घरी दुपारचे जेवण बाराच्या आत आणि तीनच्या नंतरच मिळू शकते. कारण दरम्यानच्या वेळात निरनिराळ्या वाहिन्यावरती प्रसारित होणार्या अशा पाककृतीचे कार्यक्रम असतात. त्यांच्या वेळांचे नियोजनही खुबीने केलेले असते. म्हणजे दुपारी बारा ते साडेबारा ‘ग’ वाहिनीवर असा कार्यक्रम असेल तर तसाचा प्रकार साडेबारा ते एक या वेळेत ‘ढ’ वहिनीवर असतो. त्यामुळे रोज किमान चार ते पाच पाककृती क्रमाने पहाता येतात. एके ठिकाणी मात्र थोडी पंचाईत होते. कारण कुठल्यातरी दोन वाहिन्यांची असा पाककृतींचा कार्यक्रम दाखाण्याची वेळ दुपारी अडीच ते तीन अशी एकच आहे. त्यावेळेस सौंच्या डाव्या हातात ‘पाकक्रुती’ची वही, तोंडात(दातात) पेन्सिल आणि उजव्या हातात दूरदर्शन संचाचा दूरनियंत्रक अशी अवस्था असते. पाककृती लिहून घेते वेळी पेन्सिल दूरनियंत्रकाला खो देते आणि वाहिनी बदलते वेळी ती पुन्हा दातात येते. एकाच वेळी दोन निरनिराळ्या पाककृती लिहून घेणार्याला सव्यसाची वगैरे म्हणता येते किंवा नाही हा मला माहिती नाही. पण त्या वहीतल्या कांही पाककृतींची गणना ‘अपौरुषेय’ अशा सदरात करावी लागेल. ‘ट्रिच्ची पायसम्’ अशा शीर्षकाखालील एका पाककृतीत, ‘ शिजत आलेल्या शेवयामधे दूध, साखर, कांजू-बदामाचे काप घालावे त्यात... म्यारीनेट केलेले पापलेटाचे तुकडे अलगद सोडावेत, हलक्या हाताने ढवळावे ... चारोळ्या घालून फ्रीजमधे थंड करावे’ असा उल्लेख असलेला मी (चोरून) पाहिला आहे.
‘आभाळ पांघरून जग शांत झोपलेले, घेऊन एकतारी गातो कबीर दोहे’ ही ओळ गुणगुणत (मला तेवढीच येते) शांत झोपलेले जग जागे होई पर्यंत, माझ्या कडे एकतारी नसल्याने आलेली वर्तमानपत्रे चाळायला घेतली. रविवार असल्याने वर्तमान पत्राची साप्ताहिक पुरवणी आधी पहावी असा विचार केला. नाही तरी मुख्य पुरवणीत हल्ली ‘वाचलेच पाहिजे’ असें फारसें कांही नसतेच. इतक्यात ती पुरवणी कोणीतरी खस्सकन हातातून् ओढून घेतली. ती कोणी ओढून घेतली हे पहाण्यासाठी मान वर केली तर पुरवणी ओढून घेणारी व्यक्ती नीटशी दिसली नाही. ओळखीची मात्र वाटली. " असे काय बघताय बावळटासारखे?" कानावर आदळलेल्या या प्रश्नासरशी ‘कुठे बरं बघितलंय् हिला’ ही संभ्रमावस्था भंग पावली. डोळ्यावरच्या, वाचण्यासाठी म्हणून खास बनवून घेतलेल्या, चष्म्यातून जरासे पलिकडचेही अंधुकच दिसते. चष्मा बाजूला सारून बघेपर्यंत ती व्यक्ति पुरवणीमागे अंतर्धान पावलेली.
"अय्या, कित्ती छान!" आता मात्र आवाजाची ओळख पटली.
" काय कित्ती छान?.."
" अहो असं काय करता? आज आपल्याकडे पार्टी आहे ना?"
" बरं, मग? त्यात कित्ती छान काय?"
" त्यात काही नाही. हे बघीतलंत का? काय छान रेसीपी आलीय मधुरामधे"
" ही मधुरा कोण?"
" हे पहा जोक नका मारू हं सकाळी सकाळी. मधुरा म्हंजे बायकांची पुरवणी. छान छान रेसीपी असतात त्यात. नाही कां मागे मी ब्रिन्जल फ्रिटाटा केला होता. तो मधुरातलाच होता."
बापरे! अंडी घालून केलेला वांग्याचा तो गचका आठवून आत्ताही मला गरगरायला लागलं.
" बरं आता काय आलंय?"
" हे पहा, स्पॅघेटी इन सांबार. आज आपण तेच करूया. शिवाय मी टोफू हलवा करणार आहेच."
" अगं पण......"
" तुम्ही आता वेळ घालवू नका बाई. जा बाजारात पळा आणि सांबारासाठी भाज्या, पनीर, सगळं सगळं आंणून द्या गडे. मी पटकन् यादी करून देते"