आमच्या कॉलेजचा परिसर. आज परीक्षेचा शेवटचा दिवस असतो. जूनच्या कडक उन्हात तो सुंदर दिरवा परिसर भाजून निघत असतो. जगजीतसिंगची गझल सतत बॅक्ग्राउंडला वाजत असते. "कोई चिट्ठी ना सन्देस, वह जाने कौनसा देस जहाँ तुम चले गये" सिम्मी, फ्रेडी आणि मी, कँटीनमध्ये बसून बोलत असतो. आम्ही तिघेही मनांतून रिते झालो असतो. आमची मैत्री अशा वळणावर उभी असते, की जिद्दीने चालत राहिली तर आयुष्यभरासाठी मिळविली आणि थांबली तर संपून गेली. सिम्मी जाणार असते आगरतला-आसामला, मी, नागपूर-महाराष्ट्रात आणि फ्रेडी.... त्याच्या त्या सोनेरी धूळ उडणार्या. खमंग वासाचे साफे घातलेल्या जैसलमेरला.
म्हणजे असं तो म्हणत असतो. तो खरंच कुठे जाणार हे सिम्मीला आणि मलाही माहिती असतं. आमचा जीव आतल्या आत गुदमरत असतो. त्याच्यासमोर बसवतही नसतं आणि त्याला सोडून उठवतही नसतं. मी जगजीतसिंग्च्या त्या बॅकग्राउंडला वाजणार्या रेकॉर्डसारखी परतपरत फ्रेडीला घरी येण्याबद्दल बजावत असते आणि तो उठतो. संध्याकाळची गाडी असते त्याची. म्हणतो,"चलो, हम तीनों कॉलेज का एक राउंड मार आते हैं, फिर पता नही...." माझ्या पोटात खड्डा पडतो. मी सिम्मीकडे बघते. तिच्या लालसर मोठ्ठ्या डोळ्यांमध्ये बघते. पापण्या ओलावल्या असतात. ओठ दाबून ती मानेनेच नाही म्हणते. "तेरे बस की बात नही है, हिम्मत चाहिये". मी यांत्रिकपणे उठते. कॉलेज,लायब्रेरी, पार्किंग, कट्टा परत कँटिन आणि फ्रेडी शेकहँड करायला हात हातात घेतो. "मै आऊंगा तेरे घर. फिर मिलेंगे" माझ्या हाताची पकड पक्की होते. मनातला सावरून धरलेला बांध फुटतो. "हम फिर कभी नही मिलंगे फ्रेडी, कभी नही. कारण तू मरणार आहेस या जूनमध्ये. तू नेहमीसाठी जाणार आहेस. कधीच भेटणार नाहीस. आपली दोस्ती संपून जाणार आहेस. कधीच भेटणार नाहीस. आपली दोस्ती संपून जाणार आहे धाडकन. मी सुरू ठेवली असती रे माझ्याकडून. मीच तुला पत्र पाठवलं असतं, फोन केला असता. पण मलातरी काय माहिती तू कुठे जाणार आहेस ते. फ्रेडी, कुणालाच नाही माहिती." पण माझे शब्द आतच कोंडून जातात. नुसतीच जीवाची घालमेल होते. मी कसेबसे डोळे उघडते. अवघडलेले हात खाली घेते. कोंडलेले गरम अश्रू माझ्या कानशिलावरून खाली घसरतात. फ्रेडी, सिम्मी कॉलेज काहीही नाही. मी? आहे. थँक गॉड. मी नेहमी माझ्याजवळ असते. थँक्स टु मी. मी माझ्या खोलीत असते आणि हे सगळं स्वप्नं असतं. मी किंचित सैलावते.