माझा पहिला परदेश प्रवास : १० (तिसऱ्या रानडुकराची आरोळी.)
तिसऱ्या रानडुकराची आरोळी.
रोज सकाळी नाश्त्याच्या हॉलमध्ये शिरताना दारात आपला 'रूम नं.' सांगावा लागायचा. कोलंबो, पट्टाया आणि बॅंकॉक नंतरचं हे चौथं हॉटेल होतं. दर दोन दिवसांनी त्या-त्या ठिकाणचे नवीन क्रमांक लक्षात ठेवायचे म्हणजे भलतंच कठीण काम होतं. त्यादिवशी पण मी नाश्त्याला एकटीच खाली आले आणि नंबर विचारला गेल्यावर एकदम गडबडले. तिथला रूम नंबर सोडून आधीचे सगळे आठवले पण जो हवा होता तो आठवेचना !! बरं, 'कार्ड की' असल्यामुळे त्याच्यावरही लिहिलेला नव्हता ... पण अनपेक्षितपणे आदित्य माझ्या मदतीला आला. तो माझ्याआधीच आवरून खाली आला होता आणि त्या हॉलमधे दारासमोरच्याच टेबलवर बसला होता. नेमकं त्याचवेळी त्याचं माझ्याकडे लक्षं गेलं, काय गोंधळ झालाय ते तिथूनच त्याच्या लक्षात आलं आणि बसल्या जागेवरूनच तो ओरडला - 'आईऽऽऽ, ९७८' .... मी एकदम चमकून आत पाहिलं. तोपर्यंत मला पत्ताच नव्हता की तो तिथे आहे आणि आपल्याकडेच पाहतोय. '९७८' हे शब्द मेंदूपर्यंत पोचायला जरा वेळ लागला आणि मग माझी ट्यूब पेटली. हे सगळं अक्षरशः काही सेकंदांतच घडलं पण नंतर आम्हाला दोघांनाही आठवून हसू येत होतं.
नाश्ता उरकून खाली लॉबीत आलो. लिफ़्ट्सच्या समोरच एक अतिशय सुंदर लँडस्केप बनवलेलं होतं. आपले नर्मदेतले गोटे असतात तसे लहानमोठ्या आकाराचे गुळगुळीत दगड आणि त्यातून झुळझूळ वाहणारं कारंजं .... नेहेमीच्या लँडस्केप्सपेक्षा उंची एकदम कमी - जेमतेम ७-८ इंच. पण त्यामुळेच आल्यापासून ते लक्ष वेधून घेत होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यादिवशी तिथल्या त्या पाण्याचं परिक्षण चालू होतं!!! 'कारंज्यातलं पाणी दूषित तर नाही ना' याची तिथल्या लोकांना चिंता पडली होती!! तसंही ते योग्यच होतं म्हणा. कारण तिथे प्रत्येक नळांतून प्यायचं पाणीच वाहत असतं. त्यामुळे तिथे फिरताना जवळ पाण्याच्या बाटल्या बाळगण्याची कटकट नव्हती. तहान लागली की बागेतला एखादा नळ सोडा आणि पाणी प्या इतकं सोपं होतं. म्हणजेच त्या तिथल्या कारंज्यातही प्यायचं पाणीच वाहत असणार ... मला वाटतं ते लोक आपल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये नुसते डोकावले ना, तरी बेशुध्द पडतील बहुतेक!!!
सगळे निघायच्या तयारीत होतो पण आमची गाईड आलेली नव्हती अजून. मग हॉटेलच्या आवारात जरा इकडे-तिकडे करायला सुरूवात केली. प्रवासी येत होते, जात होते, बॅगांचे ढीग चढत होते, उतरत होते; कर्मचाऱ्यांची लगबग चालू होती. कोण सिंगापूरला प्रथमच आलंय, कोण अनेकदा येऊन गेलंय याच्याशी त्यांना काहीही देणं-घेणं नव्हतं. मी पायऱ्या उतरून खाली आले. आवारात रस्त्याच्या कडेला झाडं लावलेली होती आणि त्यांच्या कडेने ३-४ फ़ूट उंचीचे संरक्षक कठडे लावलेले होते. खरं म्हणजे, थोडा वेळ 'टेकायला' ती जागा एकदम मस्त होती - आसपास इतकी छान झाडंबिडं ... मला मोह आवरला नाही. जरा तिथे बसतीये न बसतीये तोच कुठूनतरी हॉटेलचा एक माणूस आला आणि मला त्याने तिथून उठायला लावलं. कारण काय - तर तसं तिथे बसल्याने झाडांची नासधूस होते. ऐकताक्षणी मला थोडा रागच आला, कारण आपल्यामुळे झाडांना काही त्रास होत नाहीये याची खात्री करूनच मी बसले होते. त्यात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी असं हटकलं जाण्याची आपल्या देशात आपल्यावर क्वचितच वेळ येते. उठले मग तिथून - करणार काय? पण माझ्यासारखेच इतर काहीजण जे बसले होते त्यांना मात्र खरंच त्या झाडांची पर्वा नव्हती असं लक्षात आलं. तसं होतं तर मग त्या माणसाने सगळ्यांनाच तिथून उठवलं त्यात त्याची काहीच चूक नव्हती!!! अजयच्या मते ते पाण्याचं परिक्षण काय, हे असं लोकांना बसल्या जागचं उठवणं काय, हे सगळे तारांकित हॉटेलचे नखरे होते. पण मला नाही तसं वाटलं कारण शिस्त, स्वच्छता आणि नियमांचं पालन या गोष्टी तिथल्या लोकांच्या दैनंदिन आयुष्याचाच भाग होत्या. आपल्या देशात जर असं प्रत्येक ठिकाणी नियमावर बोट ठेवायचं म्हटलं तर रोजची कामं सोडून दिवसभर तेच करत बसावं लागेल आणि तरीही शेवटी 'जनजागृती' वगैरे साध्य होणार नाही ती नाहीच!!! पण परदेश प्रवास हा अश्या विरोधाभासांमुळेच तर लक्षात राहतो ...
१० वाजत आले होते. धावत-पळत आमची गाईड आली. आमची रोजची बस बिघडली होती. दुसऱ्या बसची व्यवस्था करण्याच्या नादात तिला उशीर झाला होता. सिंगापूरमध्ये वेळेचं बंधन पाळणं किती महत्वाचं आहे, तसं केलं नाही तर कसा भरमसाठ दंड भरावा लागतो इ. गोष्टींची तिनं आम्हाला आल्या-आल्या, पहिल्या दिवशीच भीती घातली होती. आता तिलाच उशीर झाला म्हटल्यावर मंडळींची तिला दंड ठोठावण्याची फार इच्छा होती. नुसत्या कल्पनेनंच सगळे खूष झाले. ५-१० मिनिटांत सगळे निघालो. बसमध्ये ड्रायव्हरच्या सीटसमोर आपल्याकडे असतो त्याच्या चौपट मोठा आरसा लावलेला होता. त्यातून त्याला संपूर्ण बस व्यवस्थित दिसत असणार. आमचा मलेशियन ड्रायव्हर - मि. मलिक - बस चालवता-चालवता सुध्दा सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवून असायचा. बस निघाल्यावर वर ठेवलेल्या बॅगमधून काहीतरी काढण्यासाठी मी उभी राहिले तर त्याने माझ्याकडे त्या आरश्यातून असलं रोखून पाहिलं ना की मी बॅग उघडून त्यात हात घालून हवी ती वस्तू काढण्याऐवजी पटकन ती बॅगच खाली घेऊन बसले. चालत्या गाडीत उभं राहणं हा पण तिथे गुन्हा मानला जातो ... म्हटलं उगीच झंझट नको कसलं!! कारण आमची गाईड सुध्दा बहुतेक वेळा बसूनच आमच्याशी बोलायची.
त्या दिवशी आमचा दौरा होता 'ज्युरॉंग बर्ड पार्क' ला ... 'बर्ड पार्क' हे नावच मुळात मला फार आवडलं ... 'पक्षी अभयारण्य' पेक्षा 'पक्ष्यांची बाग' हे ऐकायलाही छान वाटतं. जगभरातले जवळजवळ ३००० प्रकारचे पक्षी तिथे पहायला मिळतात. सुरुवातीला निशाचर पक्ष्यांचं एक वेगळं दालन होतं. त्या दालनात जोरजोरात बोलायला किंवा कॅमेऱ्याचे फ़्लॅश मारायला मनाई होती. बहिरी ससाणे, अनेक प्रकारची घुबडं तिथे पाहिली.
बाहेर मात्र काही अपवाद सोडले तर सगळे पक्षी मुक्तपणे विहरत होते. पण त्यांची वावरण्याची ठिकाणं आणि माणसांना हिंडायला दिलेली पायवाट यांच्यात बऱ्यापैकी अंतर होतं. आपण केवळ निरिक्षणाशिवाय अन्य कुठल्याही प्रकारे त्या पक्षांच्या संपर्कात येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना हात लावायचा प्रयत्न करणं, त्यांना काहीतरी खायला घालणं असल्या प्रकारांना आपोआपच आळा बसतो. अश्या ठिकाणी ते प्राणी किंवा पक्षी हेच सर्वात महत्वाचे घटक असतात याचं तिथे सतत भान ठेवलेलं दिसलं. सकाळी फिरायला बाहेर पडलो आणि रस्त्यात किंवा झाडावर अचानक एखादा सुंदर पक्षी दिसला तर आपली कशी प्रतिक्रिया असेल तसंच होत होतं तिथे. मुळात त्या बागेचा आराखडाच असा होता की 'सहज दिसावा' असेच सगळे पक्षी समोर यायचे. 'पक्षी बघायला आलो आहोत' हे माहिती असूनही दर वेळेला तोंडातून आश्चर्योद्गारच बाहेर पडायचे.
छोटे चिमण्यांसारखे पक्षी, जे जमिनीवर कमी चालतात, असे मात्र काहीसे बंदिस्त होते. पण ते ही कसे ... तर मोठ्ठंच्यामोठ्ठं आवार आणि त्याला १५-२० फ़ूट उंचीवरून बारीक मच्छरदाणीसारखी जाळी लावलेली. म्हणजे ऊन, पाऊस, वारा याला कुठलाही अडसर नाही, पण ते पक्षीही इतरत्र कुठे उडून जाऊ शकणार नाहीत. कळस म्हणजे अश्या ह्या पक्ष्यांचं निरिक्षण करण्यासाठी त्या मच्छरदाणीच्या वरून फिरवून आणणारी एक छोटीशी लहान मुलांच्या बागेत असते तसली रेल्वेगाडी होती. त्या रेल्वेगाडीतून एक फेरी मारून आलो.
बॅंकॉकप्रमाणेच इथेही दोन 'शो' पाहिले - 'Birds for Pray Show' आणि 'Birds-N-Buddies Show'. पहिल्या शो मध्ये सगळे शिकारी पक्षी अगदी जवळून पहायला मिळाले. लांब अंतरावरून सावज टिपण्यासाठी त्यांनी घेतलेली झेप, त्यांची तीक्ष्ण नजर इ. ची प्रात्यक्षिकं फारच छान होती. दुसरा शो लहान मुलांना आवडेल असा होता. तिथेही अनेक नवखे पक्षी पहायला मजा आली.
नेहेमीप्रमाणेच, त्या बागेत घालवलेला तास-दीड तास आम्हाला कमी वाटला....
तिथून निघायची वेळ झाली होती. आदित्यला तेवढ्यात एक आईसक्रीमचं दुकान दिसलंच. पण सकाळपासूनच ढगाळ हवेमुळे इतकं उकडत होतं की त्यानं आईसक्रीमची मागणी करण्याची मी वाटच पाहत होते. आम्ही तिघांनी मारे अगदी 'डबल लार्ज स्कूप' वगैरे खाल्ले पण नंतर बिलाचा आकडा पाहून माझ्या आणि अजयच्या पोटात त्या 'डबल लार्ज स्कूप' पेक्षा मोठा गोळा आला!!! तेवढ्या किंमतीत इथे महिनाभर आम्हाला तिघांना भरपूर आईसक्रीम खाता आलं असतं!!! पण आता त्याचा विचार करून काय फायदा होता? गुपचूप पैसे दिले आणि आदित्यनं अजून कशाची मागणी करण्याच्या आत तिथून काढता पाय घेतला.
आता बसनं न जाता आम्ही मेट्रो ट्रेनने हॉटेलवर परतणार होतो. सिंगापूरची MRT Train ही लंडनच्या मेट्रो ट्रेनच्या तोडीस तोड समजली जाते. MRT म्हणजे Mass Rapid Transit. नावाप्रमाणेच ती माणसांची वेगानं वाहतूक करणारी व्यवस्था होती. साहजिकच काही विशिष्ट नियम पाळणं गरजेचं होतं. चुंबकीय तिकिटांनी उघडणारे स्वयंचलित दरवाजे, गाडीची आपोआप उघड-बंद होणारी दारं, त्यांचा कालावधी - या सगळ्यांबद्दल सौ. शिंदेनी खबरदारीचे उपाय सांगायला सुरूवात केल्यावर समस्त आजी-आजोबा मंडळी जरा चपापलीच होती. चुंबकीय तिकिटानं ओळख पटवून दार उघडल्यावर पट्कन त्या दारातून पुढे जावं लागतं नाहीतर मग एकदा दार बंद झालं की पुन्हा दुसरं तिकिट घ्यावं लागतं हे कळल्यावर तर बहुतेकांचं अवसानच गळालं. 'आम्ही आपले बसनं जातो ... आम्हाला नको ती ट्रेन राईड' असाही प्रस्ताव आला. मग आम्ही तरण्याताठ्यांनी त्यांना जरा धीर दिला आणि एकदा अनुभव घेतला पाहिजे असं म्हणून येण्याचा आग्रह केला.