अमेरिकायण! (भाग ७: राजधानीतून१ [प्रथमदर्शन आणि सकुरा])

नववर्ष आलं आणि पहिल्याच दिवशी हिमवर्षाव चालू झाला. मी पाहिलेला तो पहिला 'हिमसेक'. रात्री पाहिलेला नजारा एका रात्रीत रंगहिन होऊन केवळ सफ़ेद हाच एक रंग संतिम सत्य आहे याची आठवण करून देणारा नजारा.. सफेद रंगाचं सौदर्य दाखवणारा असा हा हिमसेक! एखाद्या मुलानं साबणाचा फ़ेस मनसोक्त उधळून द्यावा तसा काहीसा प्रकार. त्या पहिल्या हिम-दृश्याचं वर्णन माझ्यासारख्याला शब्दात बांधणं खरचं कठिण! 'हिरवे हिरवे गार गालीचे..' तील हिरवा शब्द 'शुभ्र' असा बदलून पाहिला आणि काही ओळी स्फुरत गेल्या

शुभ्र सभोवती 'गार' गालिचे..
अतिशीतल तरीही मखमालीचे..
त्या शुभ्रतनू मखमाली वरती..
हिमगौरी ती खेळत होती..

असो, तर त्या हिमवर्षेने सारी सृष्टी थिजवून टाकली, पण तरीही लोकांचा उत्साह थिजवणं त्या हिमवर्षावालाही शक्य झालं नाहि. बाहेर लहान-थोर साऱ्यांचा दंगा चालू होता. आम्हीपण यथेच्छ "गोळाफ़ेक" करून घेतली. हिममानव करण्याचे काही माफक प्रयत्न करून पाहिले.. पण या सगळ्यापेक्षा वरचढ होता तो स्लायडिंगचा (घसरण्याचा?) अनुभव. छोट्याशा टेकडिवरून पोटाखाली सरकते-फ़ळकुट (स्लेज) घेऊन झोकून द्यायचे.. पुढे खाली ज्या भन्नाट वेगात आपण जातो त्याची तुलना करणे अशक्य!! मोठ्या मोठ्या रोलर कोस्टर (मराठी?)मध्येही ही नैसर्गिक मजा कधीच आली नाही. तसंच आईस स्केटिंग/स्किईंग इ. उपद्व्याप केले पण (कदाचित यात फ़ार कसब लागत नसल्याने असेल पण) या स्लायडिंगची मजा सगळ्यात जास्त!

हा हा म्हणता म्हणता हिवाळा पुढे चालला होता... "सकुरा", "चेरी ब्लॉसम" असे शब्द कानावर पडू लागले. आणि अमेरिका क्षणभंगुर पण इतरांना आनंद देण्याऱ्या अश्या चेरीच्या फुलांचा उत्सव साजरा करायला सज्ज झाली. 'सकुरा' हा शब्द पुलंमुळे परिचित होता(पुर्वरंग). त्यामुळे ही फुलं पहायची विषेश ओढ होती. नाजूक गुलाबी रंगाची ती फुलं म्हणजे जपानची अमेरिकेला मिळालेली भेट. पण आता हा सकूरा अमेरिकेतही चेरी ब्लॉसम म्हणून तितकाच जिव्हाळ्याचा विषय झाला आहे.  तर हा चेरी ब्लॉसम 'वॉशिंग्टन डि सी'ला सगळ्यात सुंदरप्रकारे आणि मुबलक बघायला मिळतो असं कळलं.  म्हणून लगेच स्वारी निघाली डि.सी.ला ऐन सकुरा सम्मेलनात (चेरी ब्लॉसम फ़ेस्टिवल). चायनाऊनची बस आरक्षित केली, रहायची एका ओळखीच्याकडे सोय केली आणि तडकाफ़डकी येऊन पोहोचलो 'डि‌.सी.'ला! खरतर अजूनपर्यंत अमेरिकेत कुठेही फ़िरलो नव्हतो, पण कोणी कंपनी मिळेना तेव्हा मी आणि माझा एक मित्र असे दोघेच केवळ सकुराच्या ओढीने एकटं इतकं लांब यायची 'रिस्क' घ्यायला तयार झालो.

डि‌‌.सी.ला आलो. आणि शनिवार असल्याने की काय कोण जाणे पण न्यूयॉर्कच्या मानाने फार म्हणजे फारच शुकशुकाट वाटला. डि‌.सी च्या निमित्ताने मी प्रथमच न्यूयॉर्कच्या बाहेर आलो होतो. स्टॉपवर 'आमच्या ओळखीचे 'काका' घ्यायला आले होते. त्यांना विचारलं " का हो इतका शुकशुकाट का डि.सी.मध्ये काही झालय का?" ते म्हणाले "अरे जर याला शुकशुकाट म्हणतोस तर बाकी अमेरिकेतल्या शहरातल्या 'गर्दी'ला काय म्हणशील? याच्या निम्म्याहून कमी गर्दी त्यांच्या कामाच्या दिवशी असते." मला एकदम विचित्रच वाटलं. आतापर्यंत शहर आणि गर्दी यांचं अतूट नातं आहे अशीच मनाची धारणा. अशी कमी गर्दीची शहरं पहिल्या प्रथम पहाताना फ़ारच रिकामं रिकामं वाटलं. ते थंड, स्थूल, थबकलेलं निर्जीव विश्व चित्रातलं वाटायला लागलं! आणि त्यात ही या देशाची राजधानी आहे यावर तर विश्वासच बसेना! ही आणि राजधानी?!? इतकी 'थंड'?? राजधानीचा डौल कसा न्यारा हवा. तुम्हि लाल किल्ल्यावर जा, संसदेसमोर जा, इंडियागेट ते राष्ट्रपती भवन पायी फ़िरा जी भव्यता मनात भरते तसं भव्य, 'विषेश' असं काहीच दिसलं नाहि. इतकं मोठं राजकीय घडामोडिंचं केंद्र पण 'प्रेस' लिहिलेली एकही गाडी दिसू नये? अगदी व्हाईट हाऊस समोरही? ऐन चेरी ब्लॉसम फ़ेस्टिवलला? इथे न्यूयॉर्क मधे २०-२५ जणांच्या मोर्च्यालासुद्धा तितकीच पत्रकार मंडळी दिसतात आणि इथे देशाच्या राजधानीत "नो प्रेस?!" काही कळेना असं का ते!

मी अश्या विचारांत असताना, आमच्या गाडिने अवचित वळण घेतलं आणि समोर होती चेरीच्या झाडांची रस्त्याच्या दुतर्फा रांग.... अहाहा!!! लोकं ह्या चेरीब्लॉसमला का महत्त्व देतात हे कोणीही सांगायची गरजच नव्हती. मंद गुलाबी रंगाची ती फुलं! काय त्यांचं सौंदर्य वर्णावं! त्या फुलांनी कित्येक कवींना त्यांचं सौंदर्य शब्दबद्ध करण्याचं आव्हान दिलं असेल कुणास ठाऊक! कित्येक चित्रकार ती छटा शोधता शोधता जेरीस (चेरीस  ) आले असतील! कित्येक संगीतकारांना या दृश्याकडे पाहून नव्या बंदिशी सुचल्या असतील! प्रत्येकातील अंगभूत प्रतिभेला आव्हान देतानाही सुखावणारं ते दृश्य.. मी ते दृश्य मनापासून पिऊन घेत होतो - डोळ्यात साठवत होतो. माझा मित्र अधाशा सारखा यांत्रिक डोळ्यांनी ते दृश्य पकडण्याचा प्रयत्न करत होता. त्या ऐन तारुण्याने मुसमुसणाऱ्या फुलांना मन भरून पाहून घेतले. पुढे बराच वेळ आम्ही काहीच बोललो नाही.

गाडितून डिसी दर्शन झाल्यावर काकांच्या घरी गेलो. आणि घरी तय्यार असलेल्या सुग्रास जेवणावर ताव मारला. 'घरगुती जेवण' या शब्दाचा तसा मराठी माणसाला पहिल्या पाहूनच सोस! या जेवणानंतर त्या बरेच दिवसांनंतर झालेल्या 'घरगुती ' जेवणाने तृप्त झालो. नंतर संध्याकाळी डिसी पासून दूर असलेल्या  एका नासाच्या म्युझियममध्ये गेलो. विविध विमानं, त्यांचा इतिहास, प्रचंड मोठी स्पेस शटल इ. गोष्टी इथे ठेवल्या आहेत. त्याही मोफत. मुलांच्या सहज शिक्षणाचा उत्तम मार्ग! इथे आम्ही "सिम्युलेटर" नावाच्या अनोख्या प्रकारात बसलो. एका छोट्या बंद गडिसरख्या रचनेत बसवत्तत. डोळ्यावर त्रिमिती चष्मे (३डी गॉगल्स) आणि पोटाला बेल्ट!! आत अंधार झाल्यावर आपण अंतराळ प्रवासासाठी सज्ज होतो! आणि जसजसं यान वर जाऊ लागतं तसतसं तुम्हाला असा भास होतो की तुम्ही स्वतः वर वर चालला आहात. आत झटके तर बसतातच पण अंतराळविरांना पार कराव्या लागणाऱ्या दिव्व्याची जाणीवही होते. फ़ार मस्त आहे हा प्रकार. बाकी आयमॅक्सचा डोम थेटरमधील शोदेखील फ़ार प्रेक्षणीय. मुंबईतही ह्यापेक्षा मोठं डोम असल्याने त्याचं अप्रूप नव्हतं पण तरिही डोममध्ये चित्रपट पहायची मजाच वेगळी!!

आता दुसऱ्या दिवशी खुद्द डिसी मध्ये फिरायचं होतं. ह्या पहिल्या संपूर्ण दिवसात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या. पण डोळ्यात भरल्या त्या दोन गोष्टी, रिकामे रस्ते आणि मंद गुलाबी रंगाची उधळणं करणारा सकूरा!!