माणसे: अरभाट आणि चिल्लर - १३

माणसे: अरभाट आणि चिल्लर - १२  पासून पुढे.

मास्तरांचा आवेश उतरला. त्यांनी टेबलावरचे पुस्तक उचलले, पण चुकून गोगलगाय उचलल्याप्रमाणे त्यानी ते चटकन खाली टाकले. ते पुन्हा म्हणाले, “गडकर्‍यांच्या घरी मेणबत्त्या, लाटन दिसणार नाहीत. तिथे रंगीत चंद्रज्योती, भुईनळे कारंजत असतात. त्यावर तुमची पिरपिर काय, तर उदबत्तीचे टोक देखील पुरे झाले असते?”

आता टेबलावरील पुस्तक तर त्यांच्या दृष्टीने मेलेच होते. पण घंटेला तर अजून अवकाश होता. तातूला आणखी काही तरी म्हणायचे होते, पण त्याला बोलू न देता मास्तरच म्हणाले,"आणखी एक सांगतो. त्याच्या नाटकांत खरी पात्रे आहेत ती त्यांची भाषणेच. एका भाषणाला दुसरे सामोरे जाते, संघर्ष घडतो, व काही वेळा तर लखलखाट होऊन डोळे दिपतात. सुधाकर,वृंदावन, भूपाल, धुंडिराज ही नावे आपली आहेत सोयीसाठी नायट्रिक अँसिड,तेजाब ही नावेही आहेत सोयीसाठीच. पण तेजाब म्हणजे काय, हे त्याला हात लावून बघ म्हणजे समजेल. अरे, अंग पुसायला राजापुरी पंचे आहेतच की दरिद्रयांनो; पण वरातीत पाहिजे ती पेठणच ! तरी सुध्दा घंटेला अवकाश होता. तातूने हात वर केला व म्हटले, "सर, मला बऱ्याच दिवसांपासून एक विचारायचे होते."

त्यावर आम्हाला एकदम उत्साह वाटला. अशा रीतीने तातूने सुरूवात केली की तो काही तरी भलतेच वेगळे बोलणार हे आम्हाला माहीत होते. तो म्हणाला, "सर. पासोडी म्हणजे काय ?"

मास्तर दचकून त्याच्याकडे पाहतच राहिले. ते म्हणाले, "पासोडी म्हणजे चादरीप्रमाणे जाड सुताडी पांघरूण. आता पासोडी का आठवली.?"

"सर, असल्या पासोडीवर कसल्या टाकाने, बोरूने लिहिता येते ? मी एकदा तसे लिहून पाहण्याचा प्रयत्न केला, तर दोऱ्यात अडकून बोरू दोनदा मोडला. मी दासोपंताच्या पासोडीविषयी कुठे तरी वाचले की त्यावर त्यांनी आपल्या कविता लिहिल्या. मला वाटते, पासोडी या शब्दाचा अर्थ वेगळा आहे."

"असे तुम्हांला वाटते का ?" कमरेवर हात ठेवून मास्तर म्हणाले, "मग पंडितराज, आपला अर्थ सांगून आम्हा सर्व पामरांना का धन्य करत नाही ?"

तो शब्द पासोडी नसून पासोदी असा असावा. पासोदी म्हणजे पासोदाची कविता. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, एकनाथांची भारूडे, भागवत त्याप्रमाणे."

"पण ज्ञानभास्कर, पासोदा म्हणजे तरी काय ?"

"पासोदा हे कवीचे नाव, पण ते त्याने उलट लिहिले आहे. खरे नाव दासोपा, दासप्पा किंवा दासोपा असे नाव असते, सर"

एकदम दडपण कमी झाल्याप्रमाणे मास्तर मोठ्याने हसू लागले. आमच्या घरी पूर्वी ते, आजोबा करंदीकर, आप्पा काळे बोलत असता त्यांचे असले मनमोकळे हसणे आम्हाला आत ऐकू येत असे. त्यांच्यातील ताण,राग सारे आता ओसरून गेले होते. आम्हाला अगदी जवळचे वाटणारे मास्तर दिसू लागले. ते म्हणाले, "तातू, तुझ्या डोक्याला झाकण असते तर बरे झाले असते बघ. म्हणजे कधी तरी ते काढून आत काय काय चालले आहे हे पाहता आले असते. कमाल गंमत झाली असती." तोच घंटा झाली. आम्ही उठलो, पण जात असता मास्तरांच्या चेहऱ्यावर अजूनही हसणे होते.

मला एकदा तरी वर्गातून हाकलून घातल्याखेरीज कोणतेच वर्ष जाऊ नये असे लिखितच होते की काय कुणास ठाऊक आणि या खेपेला एका दृष्टीने कांदेविक्या जबाबदार होता, याचा मला विशेष राग आला. हा कांदेविक्या अ तुकडीत होता. पण दहा मिनिटांच्या सुट्टीत तो कधी तरी आमच्याकडे येई व नंतरचा तास आमच्यातच बसे. आडनावाच्या बाबतीत पोरांच्या जिभा अगदी नाइलाज झाला तरच सरळ राहत. कांदेविक्या हे काही त्याचे खरे नाव नव्हते. ते होते कानविंदे. आणखी एक नाकाडी म्हणून विद्यार्थी होता. तो तर पहिल्याच दिवशी `नाकात काडी नाकाडी' होऊन बसला.

दड्डीकराचे धड्ड होणे, गोखल्यांचे खोकल्या, बोरकराचे बोऱ्या हे सारे रीतसरच होते. प्रभाकरला देखील त्याचा `प्र' अगदी परवापरवाच परत मिळाला होता. तोपर्यंत त्याला भाकरवरच समाधान मानावे लागत होते. या मुद्रदानातून सुटायची ती तीनच नावे. कुलकर्णी, देशपांडे आणि जोशी. या तीन नावांची पेदासच अशी भयानक होती, की निव्वळ संख्येच्या आधारावरच टिकून राहणे फारसे अवघड नव्हते. पण त्यात जर आद्याक्षरेच धोकेबाज असतील तर कपाळाला हात लावायचा, व गप्प बसायचे. एक पी.जी.जोशी पाजी जोशी झाला; एक डी आर. कुलकर्णी ढोर कुलकर्णी झालाच; आणि डी.एम.व टी. आर जोशी ढम्म जोशी आणि टर्र जोशी झाले.!

कानविंदे इकडे यायचा म्हणजे तो काही आम्हाला प्रेमाने भेटायला यायचा नाही. त्याचा एक वीतभर लेख कुठल्या तरी मुलांच्या मासिकात प्रसिध्द झाला होता. तेव्हापासून तो कपाळावर दोन विचारी सुरकुत्या टाकून इकडे-तिकडे भटकत विश्वाची चिंता करत असे. तो आमच्याकडे आला की आम्ही ओळखत असू की, त्याने नवीन काही तरी लिहिले आहे. आम्ही मुद्दामच वेगळे विषय काढून त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला उतावीळ करत होतो. त्याला पाहताच तातूने अफगाणिस्तानातील नद्यांची माहिती द्यायला सुरूवात केली, तर प्रभाकरने चीनमध्ये माणसे झुरळांचे किती प्रकार खातात याचे अत्यंत सविस्तर आणि काल्पनिक वर्णन द्यायला सुरूवात केली. अखेर न राहवून कानविंदेच म्हणाला, "काल मी एक कविता केली आहे. तिचे नाव आहे `हा चांदोबा आहे सुंदर." हे नाव ऐकताच तातू अंगाला गाठ मारून मागे कोपऱ्यातसरकला. प्रभाकरने आपल्या कपाळावर तर हात मारून घेतलाच, पण आम्हा दोघा-तिघांच्या कपाळावर देखील हात मारला.

आभाळाचे निळे पाणी पोहायला
कोवळ्या तारका त्या खायाला
ढगांचा सावरी कापूस झोपायला
पण अमावास्येला असतोस कुठे रे ?
हसतो बिलंदर ! हा चांदोबा आहे सुंदर.

आणि त्याबरोबर हसण्याचा स्फोट झाला. प्रभाकर तर एक पाय वर करून `हसतो बिलंदर, हसतो बिलंदर' म्हणत नाचू लागला. तोपर्यंत सुट्टी संपल्याची घंटा झाली, आणि कणकेच्या गोळ्याप्रमाणे चेहरा झालेला कानविंदे बाहेर पडायच्या आत दातार मास्तर वर्गात आले. तेव्हा तो खाली मान घालून आमच्याच वर्गात बसला.

"सर, या कानविंदेने एक अप्रतिम कविता लिहिली आहे." प्रभाकर म्हणाला.

"त्यात एक बिलंदर चंद्र आहे. तो सुंदर आहे म्हणून बिलंदर आहे की बिलंदर आहे म्हणून सुंदर आहे, हे मात्र आम्हाला समजले नाही."

"मला आणखी काही तसल्या ओळी माहीत आहेत," तातू म्हणाला, "का न खाशी गोमय ताजे ? एखाद्याला शेण खायला सांगताना सुध्दा त्यातल्या त्यात त्याने ताजे शेण खावे हे सांगण्याइतके सौजन्य आजकाल दिसत नाही."

"माती असशी, मातीत मिळशी. पण लक्षात ठेवा, हे आत्म्याला लागू नसे."

प्रभाकर म्हणाला, "एखाद्या औषधाच्या बाटलीवर लिहितात तसे हे फक्त बाहेरून लावायचे. पोटात घ्यायचे नाही. आत्म्याला हे लागू नसे." तातूने मळकट डायरीसारखी एक वही काढली होती, व तिच्यातून तो मधून मधून वाचत होता -

उठा उठा रे बांधा कंबर
तुमच्यापुरती ही घी-शक्कर
टाकुनि रूढीशी द्या टक्कर !
खुबी ओळखा, क्या हे अंदर !