आश्रमानुभव

वृद्धाश्रमांमध्ये जाऊन तिथल्या आजीआजोबांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे, व्यसनमुक्त होऊ इच्छिणाऱ्यांना मदत करणे किंवा कुठल्या रक्तदान शिबिरात भाग घेणे तर कधी पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रमात भाग घेणे असे माझे उद्योग हेच काय ते माझे सो कॉल्ड समाजकार्य होते. या सगळ्या उचापतींनी बाकी काही नाही तरी चांगल्या गोष्टी करण्यासाठी इतरांना बऱ्यापैकी उद्युक्त करू शकते असा विश्वास मला स्वतःवर वाटायला लागला होता. एक वेगळा वयोगट हाताळायला मिळाला तर छान होईल असं वाटलं आणि नेमकं तेव्हाच आमच्या कंपनीतर्फे अशी एक संधी मिळाली जी मी सोडली नाही. ती संधी होती - एड्सने पिडीत अथवा ग्रस्त मुलांच्या अनाथाश्रमातल्या मुलांसोबत ( वय वर्षे ३ ते १६ ) खेळण्याची, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्याची - त्यांची ताई बनण्याची. लहान मुले हा माझा अत्यंत आवडता प्रांत आहे आणि त्यामुळे या संधीत अपेक्षित काम काही खास अवघड जाईलसं वाटलं नाही. त्यातून काही शिकायला मिळेल का? याहीबद्दल साशंकता होती. दर महिन्याला एकच शनिवार जायला परवानगी मिळणार होती. त्यात जे काही अनुभव आले ते सांगावेसे वाटत आहेत म्हणून हा लेखनप्रपंच...

पहिली भेट :

त्या आश्रमामध्ये जाण्याची पहिलीच वेळ होती, त्यामुळे तिथल्या व्यवस्थापकीय लोकांशी जुजबी ओळख/गप्पा केल्या आणि आवश्यक गोष्टींची पूर्तता करून परवानगी मिळताच मी तिथल्या मुलांमध्ये गेले. काही मुलं मी त्यांच्यात जाताच माझ्याभोवती जमा झाली आणि 'ताई.. ताई..' करून माझं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करायला लागली. काही क्षणातच अखंड बडबड, प्रश्नांचा पाऊस, एकापाठोपाठ एक खेळांचा सपाटा.. असा एकंदर धमाल कार्यक्रम चालू होता आम्हा सर्वांचा. सर्वांचा?? खरंच? नाही. तिथल्या मुलांपैकी काही मुले माझ्याशी बोलायला अजिबात तयार नव्हती. कसलासा राग होता त्यांचा माझ्यावर की काय ते कळायलाही काही मार्ग नव्हता. या माझ्याशी भांडण असल्यासारखं वागणाऱ्या मुलांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करायचा असं मी ठरवलं आणि यात ज्यांनी मला आपसुकच त्यांची ताई मानलं होतं त्यांची मदत होणार होती. त्यांच्याशी खेळताना मीही त्यांच्यातलीच एक आहे हे त्यांना वाटेलसे वागण्याकडे माझा कल होता, जेणेकरून त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल. मी त्यांच्याशी खेळताना मुद्दामहून चुका करत होते, ज्या माझ्या लक्षात आणून देण्यात त्यांना मजा येत होती. मीही तोंड वेडवाकडं करत, "बऽऽरंऽ ! माझं चुकलं.. बस्स?" म्हणून चुका मान्य करत होते आणि त्या पुढे होणार नाहीत याची खबरदारी (!!) घ्यायचा प्रयत्न करतेयसं दाखवत होते.

दोरीच्या उड्यांचे नवीन प्रकार शिकवताना, ते प्रकार मी स्वतः खेळून जमाना झालेला असल्याने माझी दोरी सारखीसारखी पायात अडकत होती. दोरी अडकली की लगेच त्यांचा ओरडा सुरू व्हायचा,"ताई आऊट ताई आऊट" आणि मी एवढंसं तोंड करून बाजूला व्हायचे. त्यांच्या ताईला आऊट झालेलं पाहण्यात त्यांना जबरदस्त आनंद होत होता आणि त्यांना आनंदी बघणे हेच केवळ मला हवे होते. जे दोरीच्या उड्यांचे प्रकार ( कैची, रिंगण वगैरे ) मला स्वतःला आता जमेनासे झाले आहेत ( मी पुनश्च श्रीगणेशा करतेय ते शिकण्यासाठी.. बघुया ! ) ते प्रकार त्यांना शिकवता आले आणि ते त्यांना आता अगदी सहजगत्या खेळताही येतायत हे पाहून मला कोण आनंद झाला हे शब्दात सांगणेच शक्य नाही !

तसाच काहिसा प्रकार क्रोशाच्या विणकामाचा झाला. काही मुली मोबाईलचे कव्हर्स वगैरे विणत होत्या तर मी त्यांच्या विणण्यातल्या चुका लक्षात आणून दिल्या आणि बरोबर कसं विणायचं तेही सांगितलं. मला विणता येतं हे बाकीच्या मुलींना कळल्याने मग त्या माझाकडे आल्या आणि "ताई, मलाही शिकव" म्हणाल्या. तिथल्या मोठ्या ताईंना क्रोशाच्या सुया आणि लोकरीबद्दल विचारलं तर त्यांनी मला ज्या सुया आणि लोकर आणून दिली ती बघूनच मला कसंतरी झालं. तरीही त्या मुलींचा उत्साह पाहून मी त्याच साहित्यात त्यांना खांब-साखळ्या शिकवायला सुरूवात केली. या शिकण्याशिकवण्याला थोडासा वेळ झाला असेलनसेल एक मुलगी माझ्याजवळ येउन बसली आणि म्हणाली,"दीदी, मुझेभी सिखना है बुनाई करना।" तिच्या हातातली सुई-लोकर घेऊन तिलाही साखळी कशी घालायची ते समजवून सांगितलं. तिचा चेहरा तरीही संभ्रमितच दिसत होता. मग मी तिचा हात हातात घेऊन कसं विणायचं ते समजवून सांगितलं आणि 'कळलं का?' विचारलं तर कसनुसं 'हो' म्हणाली आणि जसं सांगितलं तसं विणायचा प्रयत्न करायला लागली. नवीन कुठलीही गोष्ट शिकायला वेळ लागतोच असं मनातल्या मनात म्हणून मी बाकीच्या मुलींचे विणण्यातले प्रश्न सोडवायला लागले. थोड्यावेळाने बघते तर ही मुलगी चमत्कारिकच विणत होती.. ज्या हातात सुई धरायला पाहिजे त्या हातात तिने लोकर धरली होती आणि ज्या हातात लोकर धरायला हवी त्या हातात सुई धरलेली ! बरोबर कसं धरायचं आणि विणायचं ते तिला समजवावं असं माझ्या डोक्यात आलेलं पण अचानक एक प्रश्न विचारला गेला,"तुम बाये हाथसे काम करती हो क्या?". आधीच नाराज दिसत होती ती आणि त्यात माझ्या या प्रश्नाने भर पाडल्यासारखं वाटलं. तिच्या शेजारी बसलेली एक सहजपणे विणणारी मुलगी म्हणाली,"तोच तर प्रॉब्लेम आहे ताई तिचा. कित्तीवेळा शिकवलं तिला पण ती अशीच उलटं करून ठेवते म्हणून तिला कोणी शिकवायलाच जात नाही आता." मला एकदम पोटातून ढवळल्यासारखं झालं. मी स्वतः डावखुरी आहे पण मला डाव्या हाताने विणायला जमत नाही, या गोष्टीचं आयुष्यात पहिल्यांदा वैषम्य वाटलं मला. इतर मुली विणताना अडकत होत्या तेव्हा त्यांना हाताला धरून बरोबर कसं विणायचं ते मी शिकवू शकले पण हिच्या बाबतीत ते मला जमणार नव्हतं. "देखो, मैं तुम्हे हाथ पकडके तो नहीं सिखा सकती, लेकीन तुम जहां गलती करोगी वहा बता सकती हूं। चलो, शुरू करते है।" डावखुरी आहे कळूनही मी तिला शिकवू इच्छिते ही गोष्ट तिला आवडली होती आणि म्हणूनच की काय तिचा चेहरा थोडासा खुलला होता. निघायची वेळ होईतो ती बऱ्यापैकी चांगलं विणायला लागली होती आणि मूळ म्हणजे आपणही विणू शकतो हा आत्मविश्वास तिला आला होता, यातच सगळं कमावलं असं मला वाटलं.

दुसरी भेट -

यावेळी मला ज्या मुलांनी आधी रागारोसाने वागवलं होतं, त्यांनीही हसतखेळत प्रतिसाद दिला. सगळ्याजणांची चिवचिव चालली होती माझ्याभोवती. कोणाला त्यांच्या शाळेतल्या गमती सांगायच्या होत्या तर कोणाला दोरीच्या उड्या खेळून दाखवायच्या होत्या. कोणाला विणलेले मोबाईल कव्हर्स दाखवायचे होते तर कोणाला येत्या आठवड्यातला त्यांचा होणार असलेला नाच करून दाखवायचा होता. माझ्याकडून काहींना नवीन गोष्टी शिकायच्या होत्या त्यामुळे त्यांनी मला 'टीचर' म्हणायला सुरूवात केली तर काही त्यांना सांगत होते की "वो टीचर नहीं, दीदी है !"

यावेळेस त्यांनी लोकरीचे वेगवेगळे प्रकार विणायला शिकले. रिचा आणि अनिलची परवानगी घेऊन मी त्यांच्यासाठी सुया आणि लोकर नेली होती. यावेळेस गंमत म्हणजे त्या मुलांना संभाळण्यासाठी असलेल्या त्यांच्या खरोखरीच्या टिचर्ससुद्धा विणकाम शिकायला बसल्या होत्या !

तिसरी भेट -

माझ्या बाबांची तब्ब्येत खूपच खालावलेली असल्याने त्यांना भेटायला मी घरी गेले होते. आश्रमाचा पहिला शनिवार चुकतोय हे लक्षात आलं होतं पण इलाज नव्हता. आश्रमाची परवानगी घेऊन मग मी चौथ्या शनिवारी गेले तिथे. ताई पहिल्या शनिवारी येणार म्हणून पोरं वाट बघत बसली होती कळताच मला गुन्हेगार वाटलं. काही मुलं पुढल्या आठवड्यात त्यांच्या शाळेच्या गावी जायची असल्याने त्यागोदर मला भेटायचं होतं त्यांना. मुलांमध्ये गेले तेव्हा कळलं की बाबांच्या आजारपणाबद्दल त्यांना आधीच कुठुनतरी कळलेलं होतं.. त्यामुळे लगेच प्रश्न सुरू झाले.. "दीदी, तुम्हारे पापाको क्या हुआ?" वगैरे.. बाबांची तब्ब्येत बरी झाली असली तरीही खूप काही बरी होती असं नव्हतं, त्यामुळे माझीच मानसिक अवस्था धड नव्हती. मलाही कदाचित आधार हवाच होता कोणाचातरी. मुलांमध्ये तो आधार शोधायला गेले असं म्हणून कदाचित मुर्खात काढेल मला कोणी पण तसं झालं खरं तेव्हा. मी गोष्ट सांगावी तसं त्यांना सांगत बसले की बाबांनी कसे हालाखीत दिवस काढले आणि कुटुंबाला इतकं सुंदर आयुष्य मिळवून दिलंय वगैरे.. त्यांची तब्ब्येत आता बरी राहत नाही म्हणून मी घरी गेले होते सांगितलं. बोलल्याने मला बरं वाटत होतं. मी काहिशी माझ्या भावविश्वातून बाहेर आले होते. मुलांना हे सगळं सांगायला नको होतं असं एकदम वाटून गेलं आणि मी बघितलं तर तीही त्यांच्या भावविश्वात गुंगलेली दिसली. बाहेरच्या जगातली माणसं नेहमी खोदूनखोदून त्यांच्या आयुष्याबद्दल विचारतात असं कळलं ( तुझ्या आईला एडस झालाय की वडलांना? असेही प्रश्न त्या चिमुकल्यांना विचारलेले ऐकून मी हादरलेच होते ! ) पण कोणी स्वतःच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल सांगत नव्हतं त्यांना. बाहेरची माणसं नेहमी त्यांच्याकडे मदतीच्या वस्तू फेकून देऊन चालू लागतात, त्यांच्याशी अंतर ठेवून वागतात असं कळलं. अजाणतेपणी का असेना पण मी हे अंतर पार करून त्यांच्यात जाऊन मिसळले होते, त्यांना माझी सुखदुःखं सांगत होते याचं त्यांना कुठेतरी समाधान मिळाल्यासारखं वाटलं. माझ्यावरचा विश्वास वाढल्यानेच की काय त्यांनी त्यांच्या आयुष्यातले 'खरे'प्रश्न मला सांगायला सुरूवात केली. शप्पथ ! त्या जगातली जबरदस्त भीषणता पहिल्यांदाच लक्षात आली माझ्या. मदत म्हणून देण्यात आलेल्या वस्तू प्रत्यक्ष त्या मुलांपर्यंत पोहोचतच नव्हत्या, तिथल्या काम करणाऱ्या बायका त्यांना दुखलंखुपलं तरी लक्ष द्यायच्या नाहीत वगैरे वगैरे.. हे सगळं ऐकून मला माझं दुःखं एकदम किस झाडकी पत्ती वाटायला लागलं. मी या विचारात गुंग असताना तिथे एक अंथरूणाला खिळलेला मुलगा मला म्हणाला,"तु.. तुम.. चिंता मत.. करो.. दीदी.. अंक..ल ज..ल्दीही.. ठी..क हो जा..एंगे". त्याचे हे शब्द ऐकून स्वतःच्याच रडण्याला रडत बसलेल्या माझ्या कोत्या मनाची लाज वाटली मला. त्याची शारिरीक अवस्था पाहून मला त्याच्याशी हातमिळवणी करावी असं धाडसच होत नव्हतं मला. मनात कुठेसं असा आखडता पवित्रा घेणं पटत नव्हतं. आजवर कधीही कुठलेही मूल मला ताई, मावशी, आत्या म्हटलंय आणि मी त्याच्याशी प्रेमाने वागले नाही असं झाल्याचं मला आठवत नाही. मग आजच असं का होतंय ते कळत नव्हतं पण चमत्कारिक शक्ती मागून ओढत असल्यासारखंही वाटत होतं ! मला साधा हात मिळवावासा वाटत नव्हता त्याच्याशी आणि तो मात्र मला इतक्या प्रामाणिक सदिच्छा देऊन मोकळा झाला होता !!! डोळ्यातले अश्रू गालावर कधी ओघळले माझं मलाच कळलं नाही. त्याला खूप त्रास होत होता आणि तो पलंग पंख्याखाली हलवायला सांगत होता. तो म्हणाला,"तुमने जो इन सबको सिखाया है, वो चीजे बेचने के लिये मैं दुकान निकालूंगा ! " जेव्हा मी त्याला म्हणाले की आपण तुझं हे दुकान नक्की काढुया तेव्हा त्याला अत्यंत आनंद झालेला दिसला पण का कोण जाणे मला मात्र माझं मन खात होतं कारण इतर कोणाला कळलं नसलं तरी मला कळत होतं की मी त्याच्यापासून जाणूनबुजून एक हात दूर राहत होते !

चौथी भेट -

आज मी मनाशी पक्कं केलं होतं की त्या आजारी मुलाशी खूप गप्पा मारायच्या. त्याचे प्रश्न, दुःखं समजून घेऊन त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करायचा. त्याला विनोद सांगून हसवायचं, त्याला जे खायला आवडत असेल ते व्यवस्थापनाची परवानगी घेऊन त्याला आणून द्यायचं. मूळ म्हणजे मागल्यावेळी या माझ्या भावापासून उगाचच दूर रहायची केलेली चूक सुधारायची असा मी चंग बांधला आणि मगच तिथे गेले. आश्रमाच्या ऑफिसमध्ये गेल्यावर मी माझी इच्छा तिथल्या टिचरना बोलून दाखवली तर पहिल्यांदा तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं की मला तो मुलगा कसा माहिती आणि मी त्याला कशी काय भेटू शकले वगैरे. सर्व कळल्यावर त्या म्हणाल्या,"तुझी इच्छा खूप चांगली आहे पण ती आता पूर्ण नाही होऊ शकणार." कारण विचारता कळलं की तो मुलगा १५ दिवसांपुर्वीच वारला होता ! आसपासच्या सगळ्या वस्तू माझ्या भोवती गोलगोल फिरतायत असं वाटलं मला. "दीदी, तुम चिंता मत करो.."शब्द माझ्या कानात घुमायला लागले. डोळ्यात पाणी आणि विषण्ण मन झाल्याने काही समजेनासंच झालं मला. त्या टीचरने समजुतीचे शब्द सांगितले आणि याबद्दल आपण काही करू शकत नाही म्हणाल्या. त्याच्या आजाराबद्दल मी काही करू शकणार नव्हते हे जरी सत्य असलं तरी किमान त्याने पुढे केलेला हात तर अव्हेरायचा नव्हता ना मी.. त्याला भेटून त्याची माफी मागायची होती पण आता सगळंच संपलं होतं. एका अजबशा पोकळीने मला घेरून टाकलं होतं आणि मी घरी जायला निघाले. कुठल्या तोंडाने मी मुलांसमोर जाऊ असं वाटलं मला. ऑफीसमधून बाहेर पडत नाही तर एक छोटा मुलगा माझ्याकडे येऊन म्हणाला,"ताई, आज आपण काय खेळायचं?" काय उत्तर देणार होते मी त्याला? त्या मुलांमधून वाट काढून घरी जाणे शक्यच नव्हते. त्या दिवशी मी खेळले (?!) तर सही त्या मुलांशी पण त्यात राम नव्हता हे माझं मला जाणवत होतं.

आजही तिथे जाते तेव्हा 'ताई.. ताई..' म्हणणारे असंख्य आवाज ऐकू येतात पण तरीही 'दीदी' म्हणणारा तो आवाज ऐकू यावा असं खूप मनापासून वाटतं ! ही टोचणी आता कधीही पूर्णपणे जाईलसे वाटत नाही पण त्याच्यासारख्याच इतर मुलांशी एका 'ताई'प्रमाणेच वागून ती कमी करता आली तरी मिळवले असे म्हणता येईल. बघुया कितपत जमतेय ते..

- वेदश्री.

हसा पण लठ्ठ होऊ नका

हॅलो----ऱ्हॅलो----इज इट २४३००८१७ ?

नो--- धिस इज २४३००८१६.

मग, जरा बाजूच्या खोलीत द्याना.

ग़ुरुजी.

वारस

एका विषयात मनातल्या किती गोष्टी उतरवायच्या, असं होतं. खरं तर याविषयी काहीतरी लिहावं हे बऱ्याच दिवसांपासून मनात होतं. आज दादाच्या जिज्ञाच्या झालेल्या आगमनाच्या फोननं त्याला एक नवी जाग दिली.

पित्याची शाल अन मातेची उब घेऊन येणारं हे अर्भक. या चिमुकल्या जिवाला आपण किती स्वरूपांत पाहत असतो! एकमेकांच्या असीम समर्पणाची पावती, घराण्याचा वारस, वंशाचा दिवा, आई- वडिलांच्या म्हातारपणाची काठी, सक्षम पालक म्हणवून घेण्यासाठीची पात्रता की अजून काही? की फक्त निसर्गाचा नियम म्हणून झालेलं प्रजनन? या सगळ्याचं स्वरूप कालानुसार, प्रसंगानुसार आपण ठरवणार असतो. ज्या ज्या घरात हा जीवरूपी प्रकाश पडत नाही, ती सगळीच घरे अंधाराने भरलेली आहेत असं समजायचं का? काही कारणांमुळे जिथे हा अंकुर फुटत नाही, तिथे समर्पणच नाही? का जिथे हा वारस नाही त्या घराणेशाहीचा लौकिक केवळ तो नसल्यानेच वृद्धिंगत होणार नाही?

ऍपलचा आयफोन..

ऍपल कंपनीचा आय फोन हा एक विविध ऍप्लिकेशन्सची रेलचेल असलेला आखुड शिंगी आणि बहुदुधी(किंमत कळण्याआधी..)असा मस्त फोन आहे.आजच्या जमान्यात जे जे सर्वकाही जवळ असण्याची अपेक्षा तुम्ही करु शकता ते ते सर्वकाही या फोनमध्ये कोंबून अगदी नीट बसवलंय.कॅमेरा आहे,मल्टिमीडीया आहे,आंतरजाल सक्षमता आहे,बिनतारी माहितीदेवाणघेवाण करण्यासाठी ब्लु-टूथ आहे आणि अर्थातच हा फोन ऍपल कंपनीचा आय-पॉड आणि फोन याची मिश्र प्रजाती असल्याने आय-पॉड पण आहेच.
ऍपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव जॉब्ज यांनी ९ जानेवारी २००७ला Macworld conference& Expo वेळी आय फोनची घोषणा केली,आणि लगेचच प्रसिध्दीमाध्यंमांचं लक्ष वेधून घेतलं.तेव्हापासूनच जगभरात आय फोनची प्रतीक्षा होत होती.

स्तंभलेखन

                  वर्तमानपत्राचा अग्रलेख आणि थोड्याफार ओघाने येणाऱ्या  बातम्या वगळताआजकाल  उरलेले सर्व माध्यमाने फुलवलेले लेखन वाचायला मिळते.  शेवटी आपली दहा पाने लोकांनी खरेदी करून वाचायला हवी म्हटले की मागणी तसा पुरवठा हे आलेच.  आजकाल प्रत्येकाने आपली पुरवणी रोजच जोडायला सुरुवात केली आहे. देशातल्या तमाम निवृत्त आणि वेळ कसा घालवावा असा प्रश्न असणाऱ्या मंडळींना दूरदर्शन नंतर अजूनही वर्तमानपत्र आपलेसे वाटते.  डायपरच्या वाढत्या आक्रमणाने शहरी भागात वर्तमानपत्राचे महत्त्व थोडे कमी केले असले तरी अजूनही वाढत्या लोकसंख्येत चिल्लूपिल्लूंच्या महत्त्वाच्या कामासाठी वर्तमानपत्राला देशभरात योग्य असा पर्याय नाही. 

कचरा कोंडी

नमस्कार,

"अशिक्षित लोकांना समज आहे याची, आता शिक्षित लोकांनी समज दाखवावी" - संगमनेरच्या एका महिला कामगारांनी ताडकन थोबाडात लगावली (शाब्दिक)!

'कचरा कोंडी' या अतुल पेठे दिग्दर्शित माहिती पटाच्या, पहिल्या प्रदर्शनाच्या वेळी हा प्रसंग घडला.

हसा पण लठ्ठ होऊ नका.

रात्रीचे १० वाजले होते. टेलिफोनची बेल वाजली. टिरींग----टिरींग.

श्री. गजाभाऊना झोप डोळ्यावर आली होती.सौ. ठमाकाकूनी फोन उचलला. " हॅलो----ऱ्हॅलो.

श्री. गजाभाऊ एक डुलकी घेऊन जागे झाले. सौ. ठमाकाऊनी नुकताच फोन खाली ठेवला होता. श्री. गजाभाऊनी घड्याळात  पाहीले. " अरे वा, अर्धा तास चांगली डुलकी लागली. "

एक थरारक अनुभव...(भाग सहावा)

वटवाघळं निघुन गेली पण पोटात कावळे ओरडायला लागले होते. झपझप पावलं उचलत डाव्या बाजुअखेरच्या कमानींमधुन असलेल्या छोट्या पॅसेजमधून आम्ही सगळे एकदाचे त्या गच्चीत पोचलो. "जितम जितम जितम" आम्ही आमच्या ष्टाईलनं एकमेकांना चिअर्स केलं. सगळ्यांचा उत्साह वाढला. पण पुढे काय वाढून ठेवलंय याची कुणालाच कल्पना नव्हती...

लग्न

त्यानं गुलाबाचं फूल तिला दिलं आणि त्याच्याकडे क्षणभर बघत तिनं ते घेतलं. गोड, लाजरं हसली ती हातातल्या फूलाकडे बघत. परत एकदा तिची नजर क्षणभरासाठी वर झाली, त्याच्या नजरेत गुंतली आणि लगेच खाली, हातातल्या फूलाकडे वळली.त्याचं हृदय धाडधाड उडू लागलं. हाच! अगदी हाच होता तो क्षण. तो क्षण ज्याची त्यानं नजाणे किती जन्मांपासून वाट पाहिली होती. ’नेहा!’ किंचित घोगऱ्या आवाजात त्यानं तिला साद घातली. ’माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझी होशील का?’

लायसन्स, एक गुलबकावलीचे फूल (भाग २)

लायसन्स, एक गुलबकावलीचे फूल (भाग 1)

परदेशात गाडी चालवण्याचा अनुभव नगण्य होता. त्यामुळे मनावर नाही म्हटलं तरी थोडंसं दडपण होतंच. आज गाडी भाड्याने घ्यायची आणि उद्या परीक्षा द्यायची आणि उद्या संध्याकाळी गाडी परत करायची असं ठरलं. मी ऑफिसातून निघता निघताच धो धो पाऊस पडायला लागला. छत्री बाळगणं हे मी लहानपणापासून कमीपणाचं लक्षण मानत आलेलो आहे. त्यामुळे भिजत भिजतच मी त्या भाड्याने गाड्या देणाऱ्या स्वस्तोत्तम कंपनीच्या दुकानात शिरलो.

आतमधला कर्मचारी चिनी होता. त्याने माझ्या अवताराकडे बघून एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकला. बहुदा या आधीची नोकरी त्याने पुण्यात केली असावी. किंवा माझ्या अवताराकडे बघून एकंदरीत ह्या माणसाची लायकी फार फार तर गाडी धुण्याची असू शकेल असा त्याचा समज झाला असावा. मी बुकींग केलेले आहे हे मी त्याला सांगू लागलो. ते त्याला समजेपर्यंत, आणि मी सांगतोय ते त्याला समजलंय, हे मला समजेपर्यंत, थोडा वेळ गेला. आपण कितीही हिंदी चिनी भाई भाई असं म्हटलं, तरी हे भाई जेव्हा एकमेकांशी इंग्रजीत बोलायला लागतात, तेव्हा ह्या भाईचं त्याला आणि त्या भाईचं ह्याला काही कळत नाही. आम्हा बांधवांची परिस्थिती ह्याहून अधिक वेगळी नव्हती.

शेवटी हो नाही करता करता, सोपस्कार पार पडले. त्याने माझ्याकडे पैसे मागितले. ते बहुदा बरेच डॉलर आणि पंधरा सेंट असे काहीतरी होते. पैसे भरण्याकरता मी त्याला माझं बँकेचं कार्ड दिलं. त्या कार्डाला इथे EFTPOS असं म्हणतात. ते कार्ड पाहून हा भाई "एपॉ" "एपॉ" असं काहीतरी बरळायला लागला. मला काहीच कळेना. शेवटी त्याच्या उच्चारांवरून आणि हावभावांवरून तो वरचे पंधरा सेंट सुटे मागतो आहे असा माझा समज झाला. म्हणून मी सुटे पंधरा सेंट काढून त्याच्या हातावर ठेवले. ते पाहून तर तो शब्दशः वैतागला. आम्हा एकमेकांना इंग्रजी अजिबात येत नसल्याचा, आमच्या दोघांचाही समज झाला आणि तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.

शेवटी तो ते कार्ड EFTPOS आहे हे का Credit हे मला विचारत होता हे मला कळले. गैरसमजाचा आट्यापाट्या संपून मी त्याला पैसेही दिले. त्याने मला गाडीची चावीही दिली आणि मी जाणार, इतक्यात मला त्याने, मी गाडी कुठे घेऊन जाणार असं विचारलं. आपण पडलो "सत्याजीराव". खरं काय ते सांगितलं. त्यावर त्याने "कसं पकडलं" अशा आशयाचे काहीतरी भाव चेहऱ्यावर आणत चावी माझ्या हातातून घेतली. पैसे परत केले आणि मी लायसन्स च्या परीक्षेला त्यांची गाडी घेऊन जाऊ शकत नाही हे जाहीर केलं.

परीक्षा दुसऱ्या दिवशी होती म्हणून बचावलो. लगेच घरी गेल्यावर इंटरनेटवर दुसरी एक स्वस्तोत्तम कंपनी निवडली आणि गाडी बुक केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच परीक्षेच्या दिवशी मी जाऊन ती माडी भाडं भरून घेतलीसुद्धा. ह्यावेळी माझ्या, तिथल्या कर्मचाऱ्याशी झालेल्या संभाषणात मी परीक्षेचा "प" देखील येऊ दिला नाही. सोबत शहराचा नकाशाही मागून घेतला. इंटरनेटवरून, त्या दुकानापासून परीक्षेच्या ठिकाणापर्यंतचा, मार्गही काढून घेतला. एकदम सोपा रस्ता होता. तुरक रोडवरून फ्रीवेला लागायचं आणि मग वारिगल (Warrigal) रोडला डावीकडे वळायचं. वर तिथे पोहोचायला अर्धा तास लागेल अशी माहितीही मिळवली.

गाडी मी चालवणार असल्याने आणि माझा रस्ते आणि दिशा ह्यांचा अंदाज वादातीत वाईट असल्याने, मी दीड तास आधीच निघालो. तुरक रोड येईपर्यंत सगळं सुरळीत होतं. फ्रीवेला लागलो. पहिली पाटी दिसली त्यावरच "वारागल" (Warragul) असं लिहिलेलं दिसलं आणि बाण सरळ दाखवला होता. म्हटलं चला आता पाट्या बघत बघत योग्य ठिकाणी पोहोचू. जरा हायसं वाटलं. दहा मिनिटं झाली, पंधरा झाली, अर्धा तास झाला. तरी आपलं वारागल सरळ दिशेने असल्याच्या पाट्याच येत होत्या. हळूहळू काहीतरी चुकत असल्याचा संशय यायला लागला. कारण फ्रीवेवर फक्त दहा मिनिटं जायचं होतं आणि अर्धा तास होवून गेला होता. पुन्हा एक पाटी आली आणि पुन्हा तेच. वारागल सरळ दिशेने. काहीच कळेना. शेवटी मी मोबाईल फोनवरून एका मित्राला फोन केला आणि त्याला विचारलं. त्याच्या म्हणण्यानुसार मला ज्या रोडवर (Warrigal) जायचं होतं तो बरीच योजने मागे राहिला होता. आणि मी मूर्खासारखा वारागल (Warragul) च्या दिशेनं चाललो होतो.

त्याच्या सूचनेप्रमाणे मी गाडी वळवली आणि विरुद्ध दिशेने परतू लागलो. थोड्या वेळाने मला अपेक्षित असलेला वारीगल रोड आला. येताना वारीगल रोडवर डावीकडे वळा असं इंटरनेटच्या सूचनांमधे लिहिलेलं होतं. त्यामुळे उलट दिशेने येताना उजवीकडे असा विचार करून मी उजवीकडे वळलो आणि परीक्षेचं ठिकाण दिसतं का ते पाहू लागलो. पुन्हा तेच. जी जागा पाच मिनिटात यायला हवी होती, ती जागा पंचवीस मिनिटं झाली तरी येईना. तितक्यात मी वारीगल रोडला क्रॉस होणाऱ्या एका रस्त्याचं नाव पाहिलं. त्या रस्त्याचं नाव वाचून तर मला चक्करच यायची बाकी राहिली. कारण तो रस्ता दुसरा तिसरा कुणीही नसून ज्या रस्त्याने मी फ्रीवेला लागलो तो तुरक रोड होता. म्हणजे गेला तासभर ड्रायव्हिंग करत मी जिथून निघालो होतो तिथेच परत पोचलो. परीक्षा तीन वाजता सुरू होणार होती आणि आता सव्वा तीन वाजले होते.

पुढच्या गल्लीत गाडी वळवली आणि थांबवली. मित्राला पुन्हा फोन करायचा प्रयत्न केला. पण हाय रे दैवं. हॅलो म्हणताक्षणी माझ्या फोनच्या बॅटरीने मान टाकली. आता झाली का पंचाईत. बोंबला. आता करायचं तरी काय? शेवटचा प्रयत्न म्हणून गाडीबरोबर घेतलेलं नकाशाचं पुस्तक उघडलं. ते कसं वाचायचं हे समजल्यावर मी वारीगल रोडवर डाव्या बाजूला वळण्याऐवजी उजव्या बाजूला वळलो हेही समजलं. घड्याळात साडेतीन झाले होते. खरंतर परीक्षेचेच बारा वाजले होते. पण मनात विचार केला, जाऊन तर बघू.

शेवटी चार ला पाच मिनिटं असताना मी परीक्षेच्या ठिकाणी पोचलो. मला माहीत होतं की चूक माझी होती त्यामुळे पुन्हा परीक्षेची वेळ घेणं क्रमप्राप्त होतं. माझं गाडी भाड्यानं घेण्याचं आणि स्वस्तात परीक्षा देण्याचं गणित चांगलंच चुकलं होतं. एक शेवटचा प्रयत्न म्हणून माझ्या अभिनयक्षमतेचा पुरेपूर वापर करायचं मी ठरवलं. आतमध्ये जाऊन, अधिकाधिक भारतीय ऍक्सेंट काढत, मी माझी आता ड्रायव्हिंगची परीक्षा असल्याचं सांगितलं. समोरचा माणूस माझ्याकडे "आ" करून बघायलाच लागला. तो म्हणाला की दिवसाची शेवटची परीक्षा तीन वाजता होते आणि साडेचार वाजता आमचं ऑफिस बंद होतं.

आता "आ" करायची वेळ माझी होती, कारण आता माझी परीक्षा होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. तितक्यात मला एक नवकल्पना सुचली. मी परीक्षेची वेळ फोनवरून घेतली असल्याने, मला फोनवर चाराची वेळच देण्यात आली, अशी चक्क मी लोणकढी थाप ठोकली. हे करताना मी जड भारतीय ऍक्सेंटचा पुरेपूर वापर करण्याची काळजी घेतली. वर जितका शक्य आहे तितका केविलवाणा चेहरा केला. बहुतेक समोरच्या माणसाला माझी दया आली. मला बहुदा इंग्रजी नीट समजत नसल्याने माझा घोटाळा झाला असावा असा बहुदा त्याने समज करून घेतला. चक्क त्याने मला आजची वेळ बदलून उद्या दुपारची दिली (म्हणजे गाडी परत करायच्या वेळेआधीची). उपकृत भाव चेहऱ्यावर घेऊन मी तिथून बाहेर पडलो.

दुसऱ्या दिवशी तासभर आधीच तिथे पोचलो. परीक्षा झाली. माझ्या अंगभूत हुशारीमुळे म्हणा किंवा माझ्या गाडी चालवण्याच्या कौशल्यामुळे म्हणा, शंभरी पंचाण्णव होतात तसा मीही पास झालो. लायसन्स मिळालं.

तात्पर्य. इंटरनेटवरून पत्त्यापर्यंत पोचवणाऱ्या सूचना घेऊ नयेत. घेतल्यास त्या तंतोतंत पाळाव्यात. विशेषतः रस्त्यांच्या नावांची स्पेलिंग्ज काळजीपूर्वक पाहावीत. नाहीतर "वारी"गल च्या ऐवजी "वारा" गल च्या पाठी लागून आमच्यासारखी हवा टाइट होते. तेही जमले नाही, तर आपली अभिनयक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करावा.