फेब्रुवारी १३ २०१०

स्मरणाआडचे कवी-१ (एकनाथ यादव निफाडकर)

स्मरणाआडचे कवी

स्मरणाआड गेलेल्या कवींविषयी काही लिहावे, असे दोनेक वर्षांपासून मनात घोळत होते... पण वेगवेगळ्या कारणांमुळे या कवींना स्मरणाआडून पुढे आणणे काही आजवर जमत नव्हते! आज तो योग आला आहे.
'नव्या वर्षी तरी लिहायला सुरुवात करूच... ', असाही संकल्प केलाहोता... पण त्यासाठी 'नमनाला संपूर्ण जानेवारी महिना व फेब्रुवारीचेही जवळपास दोन आठवडे' वाया घालवावेलागले! असो.

इथे स्मरणाआड या शब्दाचा अर्थ शब्दशः घेतला जाऊ नये, ही विनंती. कोणताही कवीम्हणाकी कोणत्याही क्षेत्रातील कलाकार म्हणा; पूर्णतः कधीच स्मरणाआड जात नसतो. कुठे ना कुठे, कुणाच्या ना कुणाच्या मनात तो जिवंत असतोच. (नाहीतर मग मी तरी ही मालिका (! ) लिहिण्याचा संकल्प आणि त्यानंतरचा हा सारा खटाटोप कशाला केला असता! ). म्हणण्याचा अर्थ इतकाच की, जे कवी आजच्या पिढीला, किंबहुना आजच्या आधीच्याही किमान दोन पिढ्यांना फारसे ठाऊक नाहीत किंवा ठाऊक असतील तरी या पिढ्यांच्या मनांमधील ज्या कवींच्या आठवणी धूसर, पुसट झाल्या आहेत, अशा कवींबद्दल काही सांगण्याचा हा प्रयत्न असेल. काव्यरसिकांना, काव्यमर्मज्ञांना हे ' पांढऱ्यावरचे काळे' किंचीका होईना आवडावे, अशी अपेक्षा व आशा.


* * *

आजवर ज्याची एकही कविता वाचनात आलेली नाही, (वाचनात आलेली नाही, असे म्हणण्यापेक्षा वाचण्यासाठी ती प्रयत्नांतीही उपलब्धच होऊ शकलेली नाही), ज्याच्या जन्म-मृत्यूच्या तारखांचाही नेमका तपशील माहीत नाही, अशा एका कवीने मला कधीचे झपाटून टाकलेले आहे. त्या कवीची एकंदर कविता कशी आहे, हे वाचल्यानंतरच समजू शकेल; पण 'आननी'ही माहीत नसलेल्या कवीने असे पछाडणे म्हणजे जरा नवलाचेच. त्या कवीची कविता कशीही असो; पण एक नक्की की, त्याचे व्यक्तिमत्त्व नक्कीच 'अवलिया' या शब्दाला साजेसे असणार, अशी माझ्या मनाची खात्रीच पटून गेली. उगीच का कुणी कुणाला असे झपाटेल-पछाडेल? (... आणि नंतर शोध घेतला असता, ते खरेही ठरले! ). गेली किमान १८ वर्षे तरी माझी ही अशी स्थिती आहे. हा कवी साधारणतः १९९२ पासून माझ्या मनात मुक्कामाला आला व अजूनही मुक्काम हलविण्याचे नाव तो घेत नाही!

या कवीचे नाव आहे एकनाथ यादव निफाडकर.

माझी आणि निफाडकरांची 'ओळख' करून दिली ती रवींद्र पिंगे यांनी! पिंगे यांच्या कुठल्या तरी पुस्तकामधून निफाडकर मला सामोरे गेले! महाविद्यालयीन वयात त्या काळी रवींद्र पिंगे यांच्या शैलीदार ललित लेखांची पुस्तके मी एकामागोमाग एक वाचत सुटलो होतो. 'दिवे-लामणदिवे', 'पिंपळपान', 'अंगणातलं चांदणं', 'मुंबईचं फुलपाखरू', 'केशरी कमळं', 'आनंदाची फुलं', 'बकुळफुलं... फुलं मोहाची' असा 'रवींद्रसप्ताह'च मी लावला होता! धूसर आठवणीनुसार, यातीलच एका कुठल्यातरी पुस्तकात निफाडकरांचा उल्लेख सर्वात प्रथम माझ्या वाचनात आला व त्याच वेळी मनात नोंद करून ठेवली की, निफाडकरांविषयीचं जेवढं काही लेखन मिळेल, तेवढं मिळवायचं... वाचून काढायचं आणि शक्य झालं तर संग्रहीही ठेवायचं. हा निश्चय केला खरा; पण पुढे पोटापाण्याच्या धावपळीत तो हळूहळू अस्तंगतही होऊन गेला. मध्येच कधीतरी तो मनात उगवायचा आणि 'निफाडकरांचं पुढं काय झालं', असं विचारायचा... मग मीही चुटपुटायचो आणि आता लवकरात लवकर निफाडकरांना 'भेटलेच' पाहिजे, असे ठरवून टाकायचो! पण ती 'भेट' एवढी सोपी थोडीच होती?

निफाडकरांविषयीच्या लेखनाचा शोध घेऊ गेलो तर त्यांच्याविषयीचं लेखन मिळवणं एवढं सोपं काम नाही, हे कळून चुकलं. अशा वेळी केवळ शांत राहण्याशिवाय पर्याय नसतो. जुन्या पुस्तकविक्रेत्यांच्या पथाऱ्यांजवळ मात्र अधूनमधून मी टपून असे, तेवढाच! स्वस्थ बसलो तरी मन उसळी मारतंच होतं... मग ठरवलं की, 'रवींद्रसप्ताहा'त वाचलेली ती सगळी पुस्तक पुन्हा चाळायची... पण त्यातली काही मिळाली, काही मिळेनातच. जी पुस्तकं चाळली, त्यांत निफाडकरांचा संदर्भ काही सापडेना... मग पुन्हा एकदा स्वस्थ बसण्यावाचून पर्याय नव्हता. त्यानंतर कधीतरी एक जुनं पुस्तक हाती पडलं. गेल्याच्या गेल्या पिढीतील कविवर्य आणि मर्मज्ञ समीक्षक भवानीशंकर पंडित ('वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले... एकमेकांवरी उधळले, गेले ते दिन गेले... ' हे गाणे लिहिणारे! ) यांनी संपादित केलेलं. जुन्या मराठी वाङ्मयाविषयीचंच हे पुस्तक होतं. त्यात निफाडकरांचा ओझरता उल्लेख वाचनात आला. सावध झालो आणि आणखी काही माहिती मिळते का, हे पाहण्यासाठी सावकाश, जपून जपून एकेक पान उलटू लागलो. राष्ट्रभक्तिपर कविता करणारे कवी, अशी काहीशी ओळख त्या पुस्तकात निफाडकरांची दिलेली होती.... तो उल्लेख वाचला आणि का कुणास ठाऊक, पण आता यापुढे निफाडकरांच्या नादी लागू नये, असे मला वाटून गेले! कारण राष्ट्रावर गाणी लिहिणारा कवी अशी प्रतिमा निफाडकरांची माझ्या मनात मुळीचच नव्हती. (कविवर्य भा. रा. तांबे, बा. भ. बोरकर यांच्या धाटणीच्या हळुवार प्रेमकविता निफाडकरांनी लिहिलेल्या असाव्यात, असा समज माझा मीच करून घेतला होता!... आणि लिहिल्या असाव्यातही... अजून कुठे त्या वाचायला मिळाल्या आहेत? ) त्यामुळे मी तो उल्लेख वाचला आणि माझा उत्साह एकदमच ओसरला. आकाशात उंच उडण्याच्या तयारीत असलेल्या फुग्यातून अचानकच भस्सकन सगळी हवा निघून जावी तसा!

पण काही दिवसांनी पुन्हा लक्षात आलं की, हा कवी आपलं ' झाड ' काही असं-तसं सोडणार नाही.
मग म्हटलं, पाहू या वाट... बसू या धरून दबा... एव्हाना बराच काळ लोटला होता. एके दिवशी काही नवी पुस्तके विकत घेतली. त्यातील एका जाडजूड पुस्तकाच्या अखेरीअखेरीस मला एक उल्लेख आढळला. तो निफाडकरांबद्दलचाच होता. मी पुन्हा डोळे ताणले...! कारण हे पुस्तक काही साधंसुधं नव्हतं. ते होतं साक्षात जी. ए. कुलकर्णी यांच्या निवडक पत्रांचं. तिसरा खंड होता तो. जीएंनी अनेकांना लिहिलेल्या पत्रांचं हे संकलन होय. त्यांचे जवळचे मित्र व थोर साहित्यिक जयवंत दळवी यांनाही जीएंनी लिहिलेल्या काही पत्रांचा समावेश या पुस्तकात आहे. दळवींना लिहिलेल्या एका पत्रातून (११-१२-१९७२) मला हे निफाडकर पुन्हा एकदा असे अचानक 'भेटले'.

अद्वितीय, असामान्य नव्हेत; पण सामान्यही नव्हेत, अशा काही हयात साहित्यिकांची व्यक्तिचित्रे दळवींनी लिहावीत, असे जीएंनी त्यांना त्यात सुचविले होते. दुर्देवाने निफाडकर त्या वेळी हयात नव्हते. ते हयात असते तर जीएंनी दळवींकडे व्यक्तिचित्रणासाठी त्यांचा पहिला क्रमांक लावला होता! जीएंनी त्यांचा उल्लेख नाथ निफाडकर असा केलेला आहे. दळवींनी निफाडकरांचे व्यक्तिचित्र लिहिले असते, तर ते बहारदार झाले असते, यात काय शंका?

... आता निफाडकरांची माझ्या मनातील प्रतिमा अधिकच गूढ बनू लागली होती. जीएंनी ज्यांची आवर्जून, अपू्र्वाईने दखल घेतली, तो कवी नक्कीच विलक्षण असणार, (याचा अर्थ असा नव्हे की, जीए ज्याची दखल घेत असत, ते(वढेच) कवी विलक्षण होत! पण माझी जीएभक्ती आणि त्यात परत निफाडकरांचा उल्लेख त्यांच्याच लेखणीतून, या दुहेरी योगाचे अप्रूप मला निश्चितच वाटले. एवढेच. )

... पण निफाडकरांच्या लेखनाबाबतचा माझा शोध आता तसा संपल्यातच जमा होता. कारण, माझ्या आवाक्यातील सर्व काही मी केलेले होते. मी त्यांना विसरून जरी गेलो नसलो तरी काही काळासाठी त्यांना मनाआड करायचे मी ठरवले.

मग पुन्हा एक आश्र्चर्य घडले... दोन-तीन वर्षापूर्वी एक दिवस असेच पदपथावर मला एक पुस्तक मिळाले. नाव - हुंदके. लेखक - आचार्य प्र. के. अत्रे! रस्त्यावर उभ्याउभ्याच मी अनुक्रमणिका पाहिली आणि एक मोठा खजिना हाती लागल्याच्या आनंदात ते पुस्तक मी तातडीने विकत घेऊन टाकले... मृत्युलेखांच्या या पुस्तकात तिसराच लेख होता तो निफाडकरांवर. हे पुस्तक९-११-१९६९ रोजी प्रकाशित झालेले असून, प्रकाशक आहेत मुंबईचे परचुरे प्रकाशन मंदिर. एक शोध संपला होता. तब्बल पंधरा-एक वर्षांनी माझ्या हाती निफाडकरांवरील एक आख्खा (! ) लेख लागला होता. वा... जिंकलं!

घरी आल्यावर पहिल्या प्रथम लेख उघडला तो अर्थातच निफाडकरांचा. लेखाचे शीर्षक होते 'कै. एकनाथ यादव निफाडकर'. तो चार-पाच पानी लेख एका झटक्यातच वाचून काढला.

पण खरं सांगायचं तर, निफाडकरांचा शोध त्या लेखापासूनच खरा सुरू झाला आहे, असेच आता वाटू लागले आहे!
एक तर साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्यासारखा कसलेला लेखक... त्यात मृत्युलेख, तोही निफाडकरांवर. लेख वाचल्यानंतर एक विचित्र अस्वस्थता मनात दाटून आली. निफाडकर हा कवी अशा प्रकारचे आयुष्य जगून गेला? का? अशी वेळ त्याच्यावर का आली? ती त्यांनीच स्वतःवर आणली असावी का? हे सारे (किंवा सारे नाही तरी बरेचसे) आयुष्य त्यांच्या कवितेत उतरले असेल काय? प्रश्नांचे नाग मनात सळसळू लागले...

निफाडकरांचे व्यक्तिमत्त्व कसे होते, हे कळण्यासाठी अत्रे यांच्या लेखाचाच काही भाग इथे देत आहे... अत्रे यांनी म्हटले आहे,

 ''जगात मी अनेकांचे दारिद्रय आणि दैन्य पाहिले असेल, पण निफाडकरांच्या दैन्याला आणि दारिद्रयाला काही मर्यादाच नव्हती. त्यांनी आपल्या शरीराची, आयुष्याची आणि संसाराची अशी काही दशा दशा करून घेतली होती की, सांगता सोय नाही. गेली बारा-तेरा वर्षे ते अक्षरशः एखाद्या पिशाच्चाप्रमाणे वावरत असत. ते कुठे राहतात, घरात राहतात की रस्त्यावर राहतात, काय करतात, काय खातात, कसे जगतात, कुठे फिरतात याची कोणालाही फारशी माहिती सांगता आली नसती. मधून मधून ते मरण पावल्याच्याही बातम्या उठत. कुणी तरी सांगे, '' तुम्हाला कळले का, निफाडकर म्हणे परवा वारले! '' आणि त्यानंतर चार-आठ दिवसांनीच दुसरा कोणी तरी येऊन सांगे, ''अहो, ते वारले नाहीत. ते जिवंत आहेत. कालच मी त्यांना एके ठिकाणी पाहिले... ''... त्यांच्या जगण्याबद्दल आनंद वाटणारेही कोणी जगात नव्हते आणि मरणाबद्दल दुःख वाटेल, असेही कोणी राहिले नव्हते. इतकी या गृहस्थाच्या आयुष्याची परवड झालेली होती. वर्षातून कधीतरी ते माझ्याकडे यावयाचे किंवा वाटेतून कुठेतरी चाललेले मला ते दिसावयाचे. पण पाहिल्याबरोबर एकदम मी त्यांना ओळखले, असे क्वचितच होई. साधारण एक-दोन मिनिटांनंतर माझ्या ध्यानात येई की, हे निफाडकर असावेत. प्रत्येक वेळेला त्यांचा चेहरा आणि आकृती काहीतरी चमत्कारिकच दिसत असे. मूळचाच त्यांचा काळा रंग आणि अंगकाठी उंच अन हाडकुळी. तो त्यांचा काळा रंग दारिद्रयाने आणि उपासमारीने इतका ठिक्कर आणि कळाहीन झाला होता की, पुण्याच्या मेडिकल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना फाडण्यासाठी एक प्रेत आणून ठेवलेले मी मागे एकदा पाहिलेले होते, त्याची मला निफाडकरांना पाहून आठवण होई. कमरेला एक फाटके आखूड पंचावजा धोतर, अंगात बिनगुंड्यांचा सदरा, डोक्याला एक चुरमुडलेली मळकट टोपी आणि पायांत काही नाही, असा निफाडकरांचा अवतार असे. त्यांच्या अंगाला अन कपड्यांना कित्येक वर्षांत तरी पाणी लागले होते की नाही, अशी पुष्कळ वेळा शंका वाटे. त्यांना पाहून माझ्या मनात नक्की कोणती भावना निर्माण होत असे, हे वर्णन करून सांगणे कठीण आहे. थोडासा त्यांचा रागच येई, चीड येई, थोडा तिरस्कारही वाटे आणि मागून त्याचे दयेत रूपांतर होई.

कविवर्य सोपानदेव चौधरींनीही निफाडकरांना एकदा कशा अवस्थेत पाहिले होते, तेही अत्रे यांनी या लेखात लिहिले आहे. ते असे,

''सोपानदेव चौधरी एक दिवस अतिशय वाईट चेहरा करून मला (अत्रे यांना) सांगू लागले, ''आज मी एक अतिशय हृदयद्रावक दृश्य पाहिले. '' मी विचारले, '' काय पाहिलेत? '' सोपानदेव आवंढा गिळत म्हणाले, ''ठाकूरद्वारच्या रस्त्यावर एका कोपऱयावर समोर एक फडके आंथरून निफाडकर भीक मागत बसलेले मी आज पाहिले. माझ्या डोळ्यांवर माझा विश्र्वास बसेना. मी तेथे बाजूला बराच वेळ उभा राहिलो. निफाडकरांच्या बाजूला एक मुलाग बसलेला होता. ते डोळ्यांना चष्मा लावून कसले तरी पुस्तक वाचत बसलेले होते. त्यांच्या समोरच्या फडक्यावर एक-दोन आणेल्या पडलेल्या होत्या! '' सोपानदेवांच्या तोंडचे वर्णन ऐकून मलाही अतिशय वाईट वाटले. निफाडकरांचा मला पुष्कळ वेळा राग येत असे, तरी पण त्यांनी भर रस्त्यावर बसून उघडपणे भीक मागावी ही गोष्ट मला रुचणारी नव्हती... ''मग काय केलेत तुम्ही? '' मी सोपानदेवांना विचारले. ''काय करणार? '' ते म्हणाले, ''त्यांच्या समोरच्या त्या फडक्यावर दोन आण्यांचे नाणे हलकेच ठेवून आणि त्यांना नमस्कार करून मी तसाच मागल्या मागे परतलो. त्यांनी मला काही ओळखले नाही! '' सोपानदेवांनी सांगितलेला हा प्रसंग आठवला म्हणजे माझे डोके अद्यापिही बधीर होते आणि काही सुचेनासे होते. निफाडकरांच्या दुर्दैवी आयुष्याच्या करुण कहाणीचे हे अगदी शिखरच होते, असे म्हणावयाला हरकत नाही. कोणत्याही व्यसनाच्या आधीन न होता केवळ आपल्या विक्षिप्त आणि हेकेखोर स्वभावामुळे निफाडकरांनी 'एकच प्याला'मधील सुधाकराप्रमाणे आपल्या आयुष्याचे अशा रीतीने अगदी वाटोळे करून घेतले. त्यांना व्यसनच जर कशाचे असेल तर ते वाङ्मयाचे- लेखनाचे! पण त्यामध्ये तरी त्यांनी काही यश किंवा सिद्धी मिळवून दाखविली म्हणता की काय? तर तेही नाही. त्यांच्या बुद्धीची आणि स्वभावाची बैठकच अशी काही चमत्कारिक होती की सांगता सोय नाही. त्यामुळे त्यांच्या वाङ्मयाचाही विचका झाला आणि आयुष्याचाही निकाल लागला. एक गोष्टदेखील त्यांना हयातीत कधी साधली नाही. ''

अत्रे यांनी निफाडकरांबद्दल पुढे म्हटले आहे,

'आपण कोणीतरी शेले, बायरन किंवा कीटस यांच्या तोडीचे कवी आहोत, दिसावयालाही पण त्यांच्याप्रमाणेच मोठे सुंदर आहोत आणि समाजातील सर्व नैतिक संकेत मोडायचा आणि वाटेल तसे स्वैर वर्तन करावयाचा आपल्याला परमेश्र्वराने जणू काही जन्मजात परवानाच देऊन ठेवलेला आहे असा निफाडकरांच्या डोक्यात तरुणपणापासून एक भ्रम भरलेला होता. पुढेपुढे शेक्सपीअऱ, दॉंते, कालिदास किंवा भवभूती हे महाकवी निफाडकरांना अगदी खिजगणतीत वाटू लागले आणि काही वर्षांनी तर आपण कोणी तरी एक अलौकिक पुरुष या हिंदुस्थानात जन्माला आलेले आहोत आणि आपण बोलू ते उपनिषद आणि लिहू तो वेद अशी स्वर्गीय प्रतिभा आपल्या अंगी वास करते आहे, असा त्यांना साक्षात्कार झाला. युरोपमधल्या मध्ययुगीन सरदारांच्या प्रेमाच्या आणि पराक्रमाच्या कादंबऱया वाचून डॉन क्विक्झोटची जी स्थिती झाली तीच मराठी, इंग्रजी आणि संस्कृत काव्ये वाचून निफाडकरांची अवस्था झाली... ''

... अत्रे यांच्या लेखणीतून उभे राहिलेले निफाडकर हे असे आहेत. अधुरे... अपुरे... स्वतःविषयीचे गूढ आणखीच वाढविणारे... निफाडकरांचा संचार पुणे, मुंबई, नाशिक या शहरांत असे व 'गोदाकाठी गुंजारव' हा नाशिकच्या कवींचा जो काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला होता, त्यात निफाडकरांच्या अनेक विक्षिप्त कविता आहेत, अशी माहिती अत्रे यांच्या लेखातून मिळते... पण हाही काव्यसंग्रह खूप शोध घेऊनही मला मिळू शकलेला नाही. निफाडकरांची जन्मतारीखही सापडू शकलेली नाही... पण 'हुंदके'वरून असे अनुमान करता येते की, ते अत्रे यांचे समकालीनच असावेत... किंवा वयाने थोडे त्यांच्यापेक्षा मोठेही. याच लेखावरून असाही अंदाज करता येतो की, निफाडकर हे नोव्हेंबर १९६९पूर्वी वारले असावेत... पण नेमकी तारीख सापडत नाही...! म्हणजे ४१ वर्षांपूर्वी या जीवनापासून ज्याची सुटका झाली आहे, त्या कवीचा शोध मी घेऊ पाहत आहे... त्याला पुन्हा जिवंत करू पाहत आहे...! पण निफाडकरांचे एकंदरीत आय़ुष्य पाहता मृत्यू हा त्यांच्यासाठी वरदानासारखा होता, असेच म्हटले पाहिजे... तरीही माझ्या मनात ते जिवंत राहतीलच!

ही शिक्षा त्यांनाही अन मलाही!!!

- प्रदीप कुलकर्णी

Post to Feedछान
पकड घेणारा लेख
उत्कृष्ट लेखन..
मनापासून धन्यवाद...
अतिशय उत्कृष्ट
वाचत राहावी अशी मराठी.
सहमत
अस्वस्थता
निफाडकर, एकनाथ यादव
अपेक्षेपेक्षा वेगळी माहिती
धन्यवाद
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद
सुंदर लेख ....
अतिशय सुंदर लेख
सहमत
नविनच ओळख झाली

Typing help hide