मे २०१०

स्मरणाआडचे कवी-७ (वासुदेव वामनशास्त्री खरे )

स्मरणाआडचे कवी

स्मरणाआडचे कवी - वासुदेव वामनशास्त्री खरे

पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन ।
मी राजाच्या सदनिं अथवा घोर रानी शिरेन ।।

या चरणामधील पहिली ओळ अनेकांनी असंख्यवेळा आळवली असेल; बहुतेकांनी अनुभवलीही असेल. या कवितेचे कवी आहेत वासुदेव वामनशास्त्री खरे (जन्म -१८५८, मृत्यू-१९२४)
खरेशास्त्री हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची सुहृद. निकटचे मित्र. एवढे की, टिळक-चिपळूणकर आदींनी वृत्तपत्र काढायचे ठरवल्यानंतर त्याला नाव सुचविले ते खरेशास्त्री यांनी. त्यांनी सुचविलेले नाव अर्थातच मान्यही झाले. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीची पार्श्वभूमी तयार करण्यात "सिंहाचा वाटा' ज्या वृत्तपत्राने उचलला तेच हे "केसरी' वृत्तपत्र! नाटककार म्हणूनही खरे यांची विशेष ख्याती होती. "तारामंडळ', "कृष्णकांचन', "उग्रमंगल', "शिवसंभव' ही त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. विशेषतः "उग्रमंगल' हे नाटक त्या वेळी खूपच गाजले होते.
खरेशास्त्री यांना संशोधनकार्यात विशेष ऋची होती. त्यातही प्रामुख्याने मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधनात ते रमून जात. मिरजमध्ये काही काळ शिक्षकी पेशात घालविल्यानंतर पुढे त्यांनी या संशोधनकार्यासाठीच आपले सारे आयुष्य वाहिले. ऐतिहासिक लेखसंग्रहांचे तब्बल बारा खंड त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी करून ठेवलेले हे कार्य दोन्ही अर्थांनी "ऐतिहासिक'च होय! पुढे खुद्द इतिहासाचार्य राजवाडे यांनी त्यांचे हे अवाढव्य कार्य पाहून कौतुकाचे उद्गार काढले होते. "खरेशास्त्री यांच्याएवढा अवाढव्य माहितीचा माणूस एखाद्या राष्ट्रात वारंवार उपजत नसतो, ' असे राजवाड्यांनी म्हटले होते.
खरेशास्त्री यांचा जन्म कोकणातला. गुहागरचा. साहित्यसम्राट म्हणून पुढे ज्यांना साहित्यजगतात मान्यता मिळाली ते न. चिं. केळकर हे खरे यांना साहित्यातील आपले गुरू मानीत असत.
समुद्र , यशवंतराव महाकाव्य , फुटकळ चुटके ही खरेशास्त्री यांची काव्ये प्रसिद्ध आहेत.
"उज्जयिनी' ही खरेशास्त्री यांची कविताही त्या काळी खूप गाजली होती. मराठी समजू शकणाऱ्या उज्जयिनीतील
काही अमराठी लोकांनाही या कवितेचा काही भाग तोंडपाठ होता, म्हणतात. एकेकाळी वैभवात नांदणाऱ्या नगरीचे वैभव नंतर कसे लयास गेले, याचे विषादपूर्ण वर्णन या कवितेत आहे.
खरेशास्त्री यांच्या काही कवितांचा समावेश त्या वेळच्या मराठी क्रमिक पुस्तकांतही होता.

**** ***  

खरेशास्त्री यांच्या दोन कविता
.....................

१) जन्मभूमी

पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन ।
मी राजाच्या सदनिं अथवा घोर रानी शिरेन ।।
नेवो नेतें जड तनुस या दूर देशास दैव
राहे चित्ती प्रिय मम परी जन्मभूमी सदैव ।। १ ।।

या संसारी जरी निजशिरी वाहतो क्लेशराशी ।
चिंताज्वाळा निशिदिन जरी जाळिती मन्मनाशी ।।
होते जेव्हा स्मरणच तुझे जन्मभूमी क्षणैक
तेव्हा शांत स्थिर मन कसे होतसे जाय दुःख ।। २।।

वेळोवेळी तुजसी बघुनी नेत्र संतुष्ट व्हावे ।
इच्छा होते परी तुजकडे चित्त हे मात्र धावे ।।
यावें देहें परी अससी तू शेकडो कोस दूर ।
आहे त्याच्या त्वरित गमना विघ्न हा दुर्निवार ।। ३।।

पाहें नेत्रे बहुविध असे संपदेचे पसारे ।
नाना सौख्ये अनुभविती येथले लोक सारे ।।
येथे राहूं परी नच शिवे वासना ही मनाते ।
यावज्जीव प्रियतम अशी तूच होशील माते ।। ४ ।।
जेथे माझे जनन घडले पूर्वपुण्येच थोर ।
जेथे गेले दिवस असता बाळसौख्यांत फार ।।
जेथे होते करित वसती पूर्वज प्रेमभावे
कां त्य भूमिप्रत चिर न पूज्यभावे स्मरावे? ।।५ ।।

(एकंदर चार चार ओळींच्या ११ कडव्यांची ही कविता आहे. )

2) उज्जयिनी
जातां अस्ताही तेजे दिपवी रवी जसा संकटी थोर लोक ।
क्षिप्रेच्या पृष्ठभागी चमकती किरणे पीत त्याची सुरेख ।।

ऐशा वेळी तिथे मी भटकत असता फार झालो उदास ।
तेव्हा नाना विचार प्रकटुनी करिती क्षुब्ध माझ्या मनास ।।१।

शास्त्रे विद्या ललित कविता धर्मनिष्ठा प्रताप ।
होती जेव्हा करित वसती आर्यलोकी अमूप ।
जेव्हा होता विलसत जगी विक्रमादित्य राया ।
तेव्हा नादें प्रथित भुवनी उच्चनी त्याच ठाया ।।२।

पुरी पूर्वी गर्वे निरुपम निजैश्वर्य मिरवी ।
जिला वर्णू जातां थकती सुकृती संस्कृत कवी ।
तिच्या स्थानी आता पसरत असे निर्जन वन ।
बघोनी हे झाले मम समयी त्या दुःखित मन ।।  ३ ।।

(एकूण चार चार ओळींच्या १८ कडव्यांची ही कविता आहे)

-------------------------------------------------------

Post to Feedवाट
परीमी यांच्यासाठी
धन्यवाद
हेच म्हणतो
प्रदीपजी, धन्यवाद..
धन्यवाद.
धन्यवाद.
पुन्हा एकदा परीमी यांना...
पुन्हा एकदा परीमी यांना...
सगळ्यांचे मनापासून आभार...
सुरेख ...
सूचना शिरसावंद्य...
जन्मभूमी - संपूर्ण कविता

Typing help hide