जुलै ३१ २०१०

स्मरणाआडचे कवी- १३ (दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त)

स्मरणाआडचे कवी

स्मरणाआडचे कवी - दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त

आयुर्मानाच्या बाबतीत कविवर्य दत्त (२६ जून १८७५ ते १३ मार्च १८९९) हे कवी श्रीनिवास पाटणकर (स्मरणाआडचे कवी-२) यांच्याच पंक्तीतील. पाटणकर २१ व्या वर्षी; तर दत्त २४ व्या वर्षी वारले. गेल्याच्या गेल्या पिढीतील कवींच्या बाबतीतील एक (कु)विशेष म्हणजे यातील अनेक कवी चाळिशीच्या आत-बाहेरच निधन पावले. दत्त आणि पाटणकर यांच्यासारखे तर पंचविशीच्या आतच; पण या अल्पायु्ष्यातच त्यांनी विपुल आणि कसदार कविता लिहिली. चाळिशी काय किंवा पंचविशी काय, एवढ्या लहान वयात प्रतिभेचे विविध आविष्कार दाखविणाऱया या समस्त कविवर्गाच्या साहित्यविषयक कामगिरीचा नुसता विचार केला तरी आपण थक्क होऊन जातो.
कविवर्य दत्त यांची अलीकडच्या संदर्भात ओळख करून द्यायची झाल्यास ती अशी करून देता येईल :  ज्येष्ठ साहित्यिक वि. द. घाटे यांचे ते वडील. कवयित्री अनुराधा पोतदार यांचे आजोबा आणि कवी प्रियदर्शन पोतदार यांचे पणजोबा!
महाराष्ट्रकवी यशवंत दिनकर पेंढरकर यांनी दत्त यांच्या काव्यगुणांचे रसग्रहण करणारा लेख 
लिहिला होता. कवीचे अकाली जाणे आणि त्याचे काव्यवैभव यांची सांगड घालणे कसे अयोग्य आहे, ते एका इंग्लिश वचनाच्या आधारे त्यांनी त्या लेखात स्पष्ट केले होते.
यशवंतांनी म्हटले होते :  'एज डजंट मॅटर.   नो.   यू आर नॉट टू यंग;   पिट वॉज प्राईम मिनिस्टर ऍट 23, नो. यू आर नॉट टू ओल्ड; ग्लॅडस्टन वॉज प्राईम मिनिस्टर ऍट 83. ' पाश्चात्यांच्या इतिहासातील अनन्यसाधारण दाखल्यानी वयोमानाची निरर्थकता जशी या उताऱयांत व्यक्त केली आहे, तशी ती आपल्याकडील दाखल्यांनीही करता येईल. सारांश इतकाच की, वयाची आडकाठी कर्तृत्वाला येत नाही.
हे सांगतानाच यशवंतानी हेही स्पष्ट केले होते की, 'दत्तांच्या कवितेत असे पुष्कळ गुणधर्म सापडत नाहीत की, ते व्यक्त व्हायला त्यांना अधिक अनुभव, समृद्ध आयुष्याची आवश्यकता होती. ' असे असले तरी दत्त यांना लाभलेल्या आयु्ष्याच्या अवकाशात जी काही कविता लिहिली ती कसदार आहे, हे निश्चित.
कवी दत्त हे मूळचे नगर जिल्ह्यातील. श्रोगोंदे हे त्यांचे गाव. कविवर्य रेव्हरंड ना. वा. टिळक आणि कविवर्य चंद्रशेखर यांच्याशी दत्त यांचे विशेष सख्य होते. तिघांमध्ये खास जिव्हाळा होता. कवी दत्त म्हटले की आठवते ती 'बा नीज गडे' ही कविता. या कवितेवरूनच ते ओळखले जातात.
दत्त यांच्या मृत्यूनंतर तब्बल तेवीस वर्षांनी त्यांची कविता प्रकाशात आली. त्यांचे चिरंजीव, ज्येष्ठ साहित्यिक वि. द. घाटे यांनी दत्त यांच्या कविता प्रसिद्ध केल्या.
दत्त यांच्या कवितेविषयी कवी यशवंतांची काय निरीक्षणे होती, तीच येथे देत आहे. यशवंतांच्या लफ्फेदार व पल्लेदार भाषेचेही ओझरते दर्शन त्यातून होईल.
यशवंतांनी म्हटले होते ः दत्तांची भाषा मधुर, रचना सहज, रसपरिपोष स्वाभाविक आणि चढत्या पायरीचा. थोडक्यांत उपमा देऊन सांगावयचे म्हणजे, दत्तांची कविता अनारकळीप्रमाणे होय. फुलधारणा होऊन रसिकांना डाळिंबार्कमधू मिळावयाचा होता, तोच ती गळून पडली. लुसलुशीत पाकळ्या, भडक; पण नयनाल्हादक रंग, अल्पच; पण अनुग्र स्वाद असे स्वरूप दत्तांच्या कवितेचे होते. मानवी स्वभाव फार गूढ आहे. ह्या गूढतेची कोडी उकलण्याचे नाजूक हाताचे आणि कुशाग्र बुद्धीचे कार्य दत्तांच्या कवितेने अजून अंगीकारले नव्हते. जग आणि मानवी जीवित हा एक अफाट आणि अगाध सिंधू आहे. त्या सिंधूच्या पृष्ठावर वाहणारी व लहरींबरोबर हेलकावे खाणारी अशी एक हिरवी वनस्पती म्हणजे त्यांची कविता. तळाला भिडण्याइतकी तिची मुळे खोल शिरली नव्हती किंवा गगनाला गवसणी घालण्याइतक्या तिच्या शाखा फैलावून उंचावल्या नव्हत्या. मन अगम्य असून व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. मनाच्या सर्व पैलूंचे सर्व बाजूंनी निरीक्षण करताना प्रकृतिभिन्नत्वामुळे प्रतिबिंबित होणाऱ्या अनेकविध स्वभावछटा दत्तांना अजून दृग्गोचर झाल्या नव्हत्या. मायेच्या पोटी दगाबाजी दबा धरून असते, तर औदार्याच्या पांघरुणाखाली स्वार्थ सदैव जागा असतो. निःस्पृहतेचा नगारा प्रतारणेनेही निनादत असलेला ऐकू येतो. पाशवी निष्ठुरतेच्या फत्तरांतून दयेचा जिवंत आणि जोरदार पाझर फुटलेला दिसतो; तर प्रेमामृताच्या पेल्यांतून कुसुंबाही पाजण्याची तरतूद झालेली उघडकीस येते. निधड्या छातीच्या धनुर्धारीच्या धनुष्याची प्रत्यंचा ऐन वेळी शिथिल होऊन हातांतून बाण गळून पडलेला दिसतो; तर शेळीच्या भेकडपणातही प्रसंगी व्याघ्रवृत्तीचा संचार झाल्याचा दाखला येतो. मनुष्याचे मन अशा परस्परविरोधी गुणधर्मांच्या धाग्या-दोऱ्यांनी विणलेले आहे. मनाची ही गुंतागुंत, दसोडी न् दसोडी निराळी काढून, उकलण्याकरिता हवे असलेले अंतर्निरी
क्षण दत्तांच्या कवितेत अजून यावयाचे होते. तथापि, पुढे आलेल्या दत्तांच्या कवितेवरून एवढे खास म्हणता येईल की, माध्यान्हीस आपल्या प्रखरतेने आणि सायंकाळी मलूल रक्तिमेने आपले अनन्यसाधारण स्वयंप्रकाशित्व जगास पटविणारा सूर्य, दिवसाच्या पहिल्या प्रहरातही आपले स्वयंप्रकाशित्व प्रस्थापित करीत असतो.

***
दत्त यांची कविता
.......................................
निज नीज माझ्या बाळा
.......................................
बा नीज गडे नीज गडे लडिवाळा
निज नीज माझ्या बाळा

रवी गेला रे सोडुनी आकाशाला । धन जैसे दुर्भाग्याला ।।
अंधार वसे चोहिकडे गगनात । गरिबांच्या जेवी मनात ।।
बघ थकुनी कसा निजला हा इहलोक । मम आशा जेवी अनेक ।।ध्रृ।।
खडबड हे उंदिर करिती ।
कण शोधायाते फिरती ।
परी अंती निराश होती ।
लवकरी हेही सोडतील सदनाला । गणगोत जसे आपणाला ।। ध्रृ ।।
बहू दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती । कुजुनी त्या भोके पडती ।।
त्यांमधुनी त्या दाखविती जगताला ।दारिद्य्र आपुले बाळा ।।
हे कळकीचे जीर्ण मोडके दार । कर कर कर वाजे फार ।।
हे दुःखाने कण्हुनी कथी लोकांला । दारिद्य्र आपुले बाळा ।।
वाहतो फटींतून वारा ।
सुकवीतो अश्रूधारा ।
तुज नीज म्हण सुकुमारा ।
हा सूर धरी माझ्या ह्या गीताला । निज नीज माझ्या बाळा ।।ध्रृ।।
जोवरती हे जीर्ण झोपडें अपुले। दैवाने नाही पडले ।।
तोवरती तू झोप घेत जा बाळा । काळजी पुढे देवाला ।।
तद्नंतरची करू नको तू चिंता । नारायण तुजला त्राता ।।
दारिद्य्र चोरिल कोण? ।
आकाशा पाडिल कोण? ।
दिग्वसना फाडिल कोण? ।
त्रैलोक्यपती आता तुजला त्राता । निज निज माझ्या बाळा ।।ध्रृ।।
तुज जन्म दिला सार्थक नाही केले । तुज काही न मी ठेविले ।।
तुज कोणी नसे, छाया तुज आकाश । धन दारिद्य्राची रास ।।
या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा । गृह निर्जन रानीं थारा ।।
तुज ज्ञान नसे अज्ञानाविण काही ।भिक्षेविण धंदा नाही ।।
तरी सोडुं नको सत्याला ।
धन अक्षय तेच जिवाला ।
भावें मज दीनदयाळा ।
मग रक्षिल तो करुणासागर तुजला । निज नीज माझ्या बाळा ।।ध्रृ।।
(रचना : सन १८९७)

Post to Feedकाय भयंकर कविता
घाबरून जाऊ नका...
प्रदीपजी, या सुंदर मालिकेखातर आपले शतशः आभार!
ज्ञात तरीही विस्मृत
तुमच्याशी सहमत
एक प्रश्न
मदतीचा हात...
कवितेचा संदर्भ माहीती असला तर
आठवणीतले अंगाईगीत
चांगली लेखमाला
मालिका चढत्या क्रमानें रंगते आहे ...
असहमत
कदाचित मी चूकही असेन. तेव्हा चूक भूल देणे घेणे.

Typing help hide