जुलै १७ २०१०

स्मरणाआडचे कवी- १२ (एकनाथ पांडुरंग रेंदाळकर ऊर्फ कवी रेंदाळकर)

स्मरणाआडचे कवी


स्मरणाआडचे कवी - एकनाथ पांडुरंग रेंदाळकर ऊर्फ कवी रेंदाळकर

कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर ऊर्फ कवी रेंदाळकर यांची आणि माझी 'ओळख' झाली ती कवयित्री शांताबाई शेळके यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या एका लेखातून. खूप वर्षांपूर्वी मी हा लेख वाचला होता. 'अजुनी चालतोची वाट' या रेंदाळकर यांच्या सुविख्यात कवितेचे रसग्रहण शांताबाईंनी त्या लेखात केल्याचे अंधूकसे आठवते. (ही कविता म्हणजे एका पोस्टमनचे मनोगत आहे, असेही वाचल्याचे अगदी पुसट पुसट स्मरते. ) 

रेंदाळकरांविषयीच्या माहितीचा व त्यांच्या कवितेचा शोध मग मी तेव्हापासून सुरू केला. मध्ये बरीच वर्षे तशी 'भाकड'च गेली! पण एके दिवशी अचानक फुटपाथवरील पुस्तकविक्रेत्याकडे आकर्षक मुखपृष्ठाचे एक पुस्तक दिसले. निळे निळे आकाश, हिरवीगार पर्वतराजी, पर्वतांवर ऊन्ह पसरलेले, उजवीकडे आकाशात घुसू पाहणारे सुरूचे झाड,   उन्हाने चमकणारी हिरवळीची वाट... आणि खांद्यावर पडशी टाकून त्या वाटेवरून दूरच्या पर्वतराजीच्या दिशेने निघालेला एक पाठमोरा पांथस्थ...असे मोठे मनोहर चित्र होते ते. ते चित्र पाहूनच मी पुस्तक चटकन उचलले. 'उघडी नयन' या शीर्षकाचे हे पुस्तक आहे. पुस्तक उघडण्याआधी तळाशी उजव्या कोपऱयात लाल पट्टयात 'संपादक ः भ. श्री. पंडित' असे लिहिलेले... मग पुस्तक उघडण्याआधीच मला अंदाज आला की, जुन्या पिढीतील एखाद्या कवीच्या कवितांचे हे संकलन असणार. कारण, स्वतः कवी आणि समीक्षक असलेल्या भवानीशंकर पंडितांनी अशी कामे मोठ्या निगुतीने केली असल्याचे मी मागेच कुठेतरी वाचल्याचे मला आठवत होते. (गेल्या पंधरवड्यात ज्यांची माहिती मी सादर केली त्या कवी विनायक यांच्या कवितांचे पुस्तकही पंडित यांनीच संपादित केलेले आहे. ) फक्त आता उत्सुकता होती की, या पुस्तकात कोणता कवी असणार? पुस्तक उघडताच खजिना हाती लागल्यासारखे वाटले. पुस्तक रेंदाळकरांविषयी माहिती देणारे आणि त्यांच्या निवडक १०१ कवितांच्या संकलनाचे होते! रेंदाळकरांवरील या पुस्तकामुळे माझा खूप वर्षांपूर्वीपासूनचा शोध एका निश्चित अशा मुक्कामावर येऊन पोहोचला होता.

मी आज इथे रेंदाळकरांची जी माहिती देणार आहे, ती या पुस्तकातीलच आहे. या संपूर्ण लेखाला आधार आहे तो पंडित यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाचा.

रेंदाळकरांना आयुष्य लाभले ते अवघे ३३ वर्षांचे (जन्म : १ जुलै १८८७, मृत्यू : २२ नोव्हेंबर १९२०). कोल्हापूरजवळील रेंदाळ हे लहानसे खेडे त्यांचे जन्मस्थान. हे तसे कुग्रामच होते. माधव ज्यूलियन यांनी रेंदाळकरांना उद्देशून लिहिलेल्या कवितेत या खेडेगावाच्या स्थितीचे चित्रण केले आहे. 'स्वप्नरंजन' या माधव ज्यूलियन यांच्या काव्यसंग्रहात ही कविता आहे. रेंदाळची 'ओळख' सांगणारे ते कडवे असे आहे -
हमरस्त्याहूनी दूर चिमुकलाच गाव,
डाकवराचाही जिथे नेणवे अभाव,
कष्टकरी, दीनांचा मूठभर जमाव,
जीवन अज्ञात तिथे वाटे मज कोते
या अशा गावाचे 'कुलकर्णी'पण रेंदाळकराच्या घराकडे होते. सुरुवातीच्या काळातील रेंदाळकरांच्या कवितांवर 'रेंदाळकर' या आडनावाऐवजी 'कुलकर्णी' असे आडनाव आढळते, त्याचे कारण हेच होय. रेंदाळकरांचे बालपण रेंदाळ आणि कुरुंदवाड येथे गेले. कुरुंदवाड हे त्यांचे आजोळ. रेंदाळकरांच्या काही भावंडांनाही कविता कऱण्याचा छंद होता. परंतु पोषक वातावरणाअभावी त्यांचा छंद बहरू शकला नाही. रेंदाळ येथे केवळ प्राथमिक शिक्षणापर्यंतचीच सोय त्या काळी असल्याने चौथीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी रेंदाळकर कागलला गेले. कागल येथे रेंदाळकरांचे वास्तव्य असतानाच्याच काळात त्यांचे वडील वारले. पंधराव्या-सोळाव्या वर्षी झालेला हा आघात रेंदाळकरांना सोसणे फार जड गेले. ते विरक्त झाले. ज्ञानेश्वरी आणि तुकारामगाथा या दोन ग्रंथांमध्ये ते मनाचा विरंगुळा शोधू लागले. मात्र, हे तसे 'स्मशानवैराग्य'च ठऱले आणि नंतर पुन्हा ते शिक्षणाकडे वळले. पुढे १९०५ मध्ये त्यांनी बेळगाव जिल्ह्यातील कुन्नूर (ता. चिकोडी) येथे मास्तरकी केली. रेंदाळकरांना वाचनाचा दांडगा छंद होता. कुन्नूरसारख्या खेड्यात तो भागेना व एकंदरीतच तेथील नीरस जीवनालाही ते कंटाळून गेले व त्यांनी मास्तरकीचा राजीनामा दिला.

कविता मनात रुंजी घालत होतीच; परंतु अक्षरगण वृत्तात कविता लिहायची तर संस्कृत भाषेत प्रावीण्य हवे, असे त्यांच्या मनाने घेतले व संस्कृत शिकण्याचा निश्चय करून ते सांगलीत आले. तेथे संस्कृत पाठशाळेत ते जाऊ लागले. सांगलीत रेंदाळकरांचे वास्तव्य होते, ते वामन जनार्दन कुंटे यांच्या वाड्यात. कुंटे यांच्याशी त्यांची मैत्री झाली. पुढे ही मैत्री गाढ स्नेहात बदलली. पुढे रेंदाळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कवितांचे दोन खंड प्रसिद्ध केले ते या कुंटे यानीच. कुंटे यांच्यामुळेच रेंदाळकरांची कविता महाराष्ट्रापुढे आली.

१९०९ च्या सुमारास सांगलीतील मुक्काम हलवून रेंदाळकर कोल्हापुरी आले. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजातील विख्यात संस्कृतज्ञ बाळशास्त्री हुपरीकर हे त्यांचे आप्त होते. 'सिद्धान्त कौमुदी'चे अध्ययन करण्याची रेंदाळकरांची इच्छा होती. ती त्यानी हुपरीकरांना कळविली व होकार येताच कोल्हापूरला येऊन त्यांनी दोन वर्षे सिद्धान्त कौमुदीचे अध्ययन केले. रेंदाळकरांमधील कवित्व याच मुक्कामात हुपरीकरांच्या ध्यानी आले. त्यांनी रेंदाळकरांना प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात त्या काळी 'विजयी मराठा' हे साप्ताहिक निघत असे. याच साप्ताहिकात रेंदाळकरांच्या सुरवातीच्या काळातील कविता प्रसिद्ध झाल्या. मात्र, 'मंदार' या टोपणानावाने त्या प्रसिद्ध होत असत.
'वरिवरी जळे बाळे! डोळे अहा भरले किती! ' ही रेंदाळकरांची अगदी पहिली कविता मात्र प्रसिद्ध झाली होती ती १९०८ साली 'केरळ कोकिळा'मध्य़े. या मासिकाचे विख्यात संपादक कृष्णाजी नारायण आठवले हे चोखंदळ व चिकित्सक म्हणूनच प्रसिद्ध होते. रेंदाळकरांच्या काव्यगुणांची आठवले यांनी त्यांच्या कवितेखालीच मनमोकळी स्तुती केली होती. पुढे कोल्हापुरातील जगद्गुरू मठातर्फे 'धर्मविचार' हे मासिक प्रसिद्ध करण्याचे ठरले आणि तेथे हुपरीकरांचे आवडते शिष्य असलेले रेंदाळकर सहसंपादक झाले. हे काम एकीकडे सुरू असताना रेंदाळकरांचे कवितालेखनही जोमात होते. याच काळात 'मंदारमजरी' या शीर्षकाने १९१० रोजी रेंदाळकरांनी निवडक कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला. 'सुधारक', 'विविधज्ञानविस्तार', 'मनोरंजन', 'प्रगती' इत्यादी त्या वेळच्या नियतकालिकांत प्रशंसापर परीक्षणे प्रसिद्ध झाली. 'मंदारमंजरी'मुळे महाराष्ट्रातील मान्यवर कवींमध्ये त्यांची गणना होऊ लागली.

१९१२ मध्ये 'धर्मविचार'चे प्रकाशन एका वर्षापुरते स्थगित झाले. त्यानंतर रेंदाळकरांनी 'मासिक मनोरंजन'चे काशिनात रघुनाथ ऊर्फ का. र. मित्र यांच्याकडे नोकरीविषयी विनंती केली. ती लागलीच मान्य झाली व रेंदाळकर मुंबईत आले. 'मनोरंजन'मध्ये साहाय्यक संपादकपदी ते रुजू झाले. तेथे आधीच पदावर असलेल्या विठ्ठल सीताराम ऊर्फ वि. सी. गुर्जर यांच्याबरोबरच 'मनोरंजन'वर रेंदाळकरांचेही नाव झळकू लागले. गुर्जर यांचे ते साहाय्यक होते.   रेंदाळकर हे 'मनोरंजन'चे साहाय्यक संपादकच असल्याने तेथे त्यांनी साहजिकच विपुल लेखन केले. 'मनोरंजन'मध्ये प्रसिद्ध होणाऱया कवितांची निवड रेंदाळकरच करीत असत. गोविंदाग्रजांच्या कवितांचा मात्र अपवाद केला जात असे. कारण गोविंदाग्रजांनी आधीच गुर्जर यांच्याकडे कवितांच्या तीन-चार वह्या देऊन ठेवलेल्या होत्या. त्या वह्यांमधूनच एकेक कविता गुर्जर प्रसिद्ध करीत असत. 'मनोरंजन'शिवाय 'करमणूक', 'विविधज्ञानविस्तार' येथेही निरनिराळ्या काळी रेंदाळकर संपादक म्हणून कार्यरत होते.

रेंदाळकरांविषयी माहिती देताना पंडित म्हणतात : तेहेतीस वर्षांच्या अल्प आय़ुष्यात रेंदाळकरांनी विपुल व विविध वाङ्मय निर्माण केले आहे. त्यात नाटके आणि कथा हे वाङ्मय गौण आहे आणि काव्य हे वाङ्मय प्रमुख आहे. रेंदाळकरांची प्रतिभा बहुप्रसू (बहुप्रसवा) होती. एखाद्या वासंतिक वेलीला वर-खाली, जिकडे-तिकडे अगणित फुले यावी, त्याप्रमाणे, त्यांना असंख्य कविता स्फुरत. असंख्य फुले उमलणाऱया वेलीवरील काही फुले देवतार्चनाकरिता खुडण्यात येतात, काही फुले युवतींचे केशपाश मंडित करतात, काही पंडितांच्या गळ्यांत पडतात आणि काही जागच्या जागी कोमेजतात आणि मातीत गळून पडतात. रेंदाळकरांच्या अमर्याद कवितांची स्थिती काहीशी अशीच आहे.
रेंदाळकरांची कविता विपुल आहे. पण फारशी विविध नाही. त्याच्यात वृत्तवैचित्र्य आहे. पण वृत्तिवैचित्र्य नाही. त्यांचे विषय ठराविक होते. पण त्यांतील भाव, विचार व कल्पकत्व रेंदाळरांच्या मनात स्पष्ट असत. त्यामुळे त्यांना समर्पक शब्द सुचत. त्यांची लेखणी भराभर चाले आणि ती भाराभर वाङ्मय निर्माण करी. याचा परिणाम असा झाला आहे की, त्यांच्या कवितांची संख्या अकारण फुगली आहे.
रेंदाळकरांनी चरितार्थाकरिता लेखनाचा व संपादनाचा व्यवसाय पत्करला होता. महाराष्ठ्रातील मनोरंजन, करमणूक, विविधज्ञानविस्तार इत्यादी नावाजलेल्या नियतकालिकांत त्यांचा हात होता. त्यामुळे त्यांचे बरेचसे लेखन 'मागणी तशी पुरवणी' या अर्थशास्त्रातील नियमानुसार आणि ही सर्व नियतकालिके हाताशी असल्यामुळे 'तळे राखील तो पाणी चाखील' या व्यवहारातील अनुभवानुसार निर्माण झाले आहे.
हे सर्वच लेखन सारख्या योग्यतेचे नाही, याची स्वतः रेंदाळकरांना स्पष्ट कल्पना होती. 'आधुनिक कवींच्या ज्या शेकडो कविता प्रसिद्ध होतात, त्यांत खरे काव्य थोडेच असते, ' या एका आरोपाला उत्तर देताना ते (रेंदाळकर) लिहितात, ''आधुनिक कवितेची प्रत्येक ओळन्ओळ अलौकिक आहे, असे कोणी म्हणत नाही. स्वतः त्या कवीलाही वाटत नाही. पण अशी स्थिती प्राचीन कवितांचीही नाही काय? का जुनी सर्वच बाडे उज्ज्वल प्रतिभेने मंडित झाली आहेत? विद्यमान कवींविषयी टीका करणे मोठे अवघड आहे. सांप्रत लोकदृष्टीपुढे वावरणारे सर्वच पद्यकार कवी नाहीत. आधुनिक कविता कालवन्हीतून अद्याप तावून-सुलाखून निघावयाची आहे. (करमणूक : १३ नोव्हेंबर १९१५).

रेंदाळकरांचे लग्न तेविसाव्या-चोविसाव्या वर्षी; म्हणजे त्या काळच्या वहिवाटीच्या तुलनेत जरा उशिराच झाले! पत्नीच्या आणि आपल्या आवडी-निवडी खूपच वेगवेगळ्या आहेत, हे पुढे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीचा काही काळ नीट गेला; पण मग पुढे सगळा नूर बिघडत गेला तो गेलाच. रेंदाळकरांच्या पत्नी काहीशा 'स्वयंमन्य' होत्या. त्यांना पुढे हिस्टेरिया जडला. वाढत गेला. झटका आला की त्या तास तास बेशुद्ध असत आणि खोलीत गडबडा लोळत.
पत्नीने शिकावे, आपल्या कवितांचे कौतुक करावे, असे रेंदाळकरांना फार वाटत असे. पण अखेरपर्यंत हे होऊ शकले नाही. रेंदाळकर पती-पत्नीला दोन मुली आणि एक मुलगा होता. पत्नीच्या आजारपणामुळे मुलांचे अतोनात हाल होत असत. पत्नीला अर्भक समजून रेंदाळकरानी तिची अखेरपर्यंत सेवा-शुश्रूषा केली. १९१९ मध्ये पत्नीचे निधन झाले.
योगायोग म्हणा की अन्य काही.... पत्नीच्या निधनानंतर बरोबर एक वर्ष आणि एका आठवड्याने रेंदाळकरांनीही या जगाचा निरोप घेतला!  

......................................
रेंदाळकर यांच्या दोन कविता
......................................

अजुनी चालतोचि  वाट

अजुनी चालतोचि वाट! माळ हा सरेना
विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना!

त्राण न देहात लेश, पाय टाकवेना,
गरगर शिर फिरत अजी होय पुरी दैना!

सुखकर संदेश अमित पोचविले कोणा,
भार वाहुनी परार्थ जाहलो दिवाणा!

काट्य़ांवरी घातलाची जीव तयासाठी,
हसवाया या केली किती आटाआटी!

हेच खास माझे घर म्हणुनी शीण केला,
उमगुनी मग चूक किती अश्रुसेक झाला;

दिन गेले, मास तसे वत्सरेही गेली,
निकट वाटते जीवनसंध्या ही आली!

कुठुनी निघालो, कोठे जायचे न ठावे,
मार्गातच काय सकळ आयू सरुनी जावे!

काय निरुद्देश सर्व जीवन मम होते
मरुसरितेपरी अवचित झरुनी जायचे ते?

पुरे! पुरे ही असली मुशाफरी आता,
या धूळित दगडावर टेकलाच माथा

मे १९२० ('मासिक मनोरंजन'मध्ये प्रसिद्ध)

......................................
प्रबोधन
......................................
जुनि  किती निजसी!
सुंदरा! 
जुनि किती निजसी!
ही प्रभात झाली तरी पुरेशी होय न झोप कशी!
मधुरजनी सरली,
गडे ही
मधुरजनी सरली,
दशदिशा फाकल्या, प्रकाशलहरी विश्वांगणी भरली!
नक्षत्रे लपली,
अंबरी
नक्षत्रे लपली,
हे गुलाब हसले उपवनी, कमले सरोवरी फुलली!


हा प्रभातवायू मंद सुशीतल वाहे!
चहुंकडे उषेचे हास्य भरुनिया राहे!
ऊठ नेत्र उघडी,
सुंदरा!
ऊठ नेत्र उघडी,
शुभशांतिरसाची चिरमंगलमय आहे हीच घडी!
वाट तुझी बघती
सर्वही
वाट तुझी बघती,
तुज उठवाया तिकडे रानी ओढे खळखळती!
प्रकाश हा गगनी
पातला
प्रकाश हा गगनी,
तुजसाठी आहे अरुण थांबला पाहा तरी अजुनी!
तुजसाठी भरली
नभी ही
तुजसाठी भरली
खगगीते मंजुळ मधुर स्वर्गामधुनी पाझरली!


हा ओघ तुंबला मम हृदयी प्रेमाचा,
हा हार सांचला नयनी अश्रुमुक्तांचा,
वाहीन तव चरणी
आदरे
वाहीन तव चरणी,
तव दृष्टिसंगमे होइल पावन नाथा! ही धरणी!
व्योमास्तव रवी हा,
निर्मिला
व्योमास्तव रवी हा,
रविसाठी आहे व्योमही उत्सुक अनंत काल पाहा!  
कमल असे सृजिले,
सरास्तव
कमल असे सृजिले,
हे सरही कमलासाठी दिसते उतावीळ कसले!  
तरुसाठी वेल,
उगवली
तरुसाठी वेल,
हा पसरुनी बाहू प्रेमे तरुही तिज आलिंगील!  


सौंदर्य़ तसे तव माझ्या दृष्टीसाठी!
ही प्रीतिवाहिनी माझीही तुजसाठी!
अजुनी न का उठसी?
सांग मग
अजुनी न का उठसी?
ही प्रभात झाली तरी पुरेशी होय न झोप कशी!

२१ ऑगस्ट १९१५ ('करमणूक'मध्ये प्रसिद्ध)


Post to Feedउघडि नयन रम्य उषा ...
उत्तम!
काव्यपंक्तीवर आधारित शीर्षके
अशी पाखरे येती
आणखी काही
पाहिजे जातीचे
उत्तम लेख
या मालिकेतील सर्वोत्तम लेखांपैकीं एक ...

Typing help hide