मार्च २७ २०१०

स्मरणाआडचे कवी-४ (वामन भार्गव ऊर्फ वा. भा. पाठक)

स्मरणाआडचे कवी

स्मरणाआडचे कवी  - वा. भा. पाठक


खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे
चिंधड्या उडवीन राई राईएवढ्या

शालेय वयात अभ्यासाला असलेली ही कविता अनेकांना आठवत असेल.

बालवीराचा तो लढाऊपणा आणि तोही साक्षात शिवाजीमहाराजांपुढे... नाट्य अगदी ठासून भरलेले...! कविवर्य वामन भार्गव ऊर्फ वा. भा. पाठक यांची ही कविता. आज या पाठकांचीच माहिती या लेखमालेत देत आहे. पाठक यांचा जन्म १९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला. म्हणजे ते आज हयात असते तर त्यांची जन्मशताब्दी उलटून वर पाच वर्षे झालेली असती. ८४ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभले. २७ जानेवारी १९८९ रोजी
कवितेच्या वाटेवरचा हा 'प्रवासी' काळाच्या पडद्याआड गेला.

कवी, कादंबरीकार, समीक्षक अशा विविध नात्यांनी पाठक यांनी वाङ्मयक्षेत्रात लेखन केले़; पण प्रामुख्याने त्यांची ओळख आहे ती कवी म्हणूनच. 'प्रवासी' हे त्यांचे खंडकाव्य विशेष प्रसिद्ध असून, 'आशागीत' या संग्रहात त्यांच्या निवडक कवितांचा समावेश आहे. प्रवासी, मानवता, ओढणी ही त्यांची खंडकाव्येही प्रसिद्ध आहेत. पुण्याच्या नौरोसजी वाडिया महाविद्यालयात १९३९ ते १९६८ अशी २९ व्रर्षे त्यांनी प्राध्यापकी केली.
प्रवासी, ओढणी ही त्यांची खंडकाव्ये जीवनविषयक चिंतन मांडणारी आहेत.
पाठक यांची कविता साधी, प्रासादिक, लौकिक जीवनातील अनुभूती शब्दबद्ध करणारी आहे. त्यादृष्टीने 'खेड्यातील आनंद' आणि 'विरोधी प्रेम'या कविता पाहण्यासारख्या आहेत. कवितेतून शब्दचित्र कसे रेखाटावे, असे कुणी विचारले तर 'खेड्यातील आनंद' या कवितेकडे खुशाल बोट दाखवावे!

आशादीप या संग्रहाच्या दुसऱया आवृत्तीत (१९५३) पाठक यांनी आपल्या कवितेविषयीची, प्रवासी या खंडकाव्याविषयीची भूमिका मांडलेली आहे. ती त्यांच्याच शब्दात इथे देत आहे -  'करमणुकीकरिता किंवा हौसेखातर क्वचितच लेखन केले; तरी मुख्यतः वरील हेतू बाळगूनच कवितालेखन करण्याच्या या प्रवृत्तीमुळेच बहुतेक कविता जीवनविषयक विचारांनीच व्यापलेल्या आहेत... आपल्या स्वतःच्या जीवनविषयक समजुती वेळोवेळी बदलत जातात, तथापि ज्या समजुतीमुळे एकेकाळी आपल्याला समाधान वाटत गेले. त्याचे महत्त्व कमी होत नाही. ऐन तारुण्यात ज्या ध्येयवादाने आपण कार्यप्रवृत्त होतो, तो ध्येयवाद पुढे आपणास विफलही वाटतो आणि त्याच्यात बदल करावासा वाटतो. तथापि, एकेकाळी आपण असमाधानी होतो आणि अजूनही आपण (ध्येयाच्या अप्राप्तीमुळे! )असामाधानी आहोत, या विचारानेही समाधान वाटतेच. "प्रवासी' या खंडकाव्यात अशाच एका ध्येयवादी व्यक्तीचे मी वर्णन केलेले आहे. मनुष्याच्या चमत्कारिक स्वभावाला वर्तमानकाळापेक्षा भविष्यकाळच फार रम्य वाटतो! दररोजची कर्तव्यकर्मे मनःपूर्वक केल्यास आपण सुखी होऊ, ही कल्पना त्याला नसते! अशा विचारसरणीचा एक प्रवासी वरील कवितेत आपले अनुभव निवेदन करीत आहे. आपण जरी पुष्कळ धडपड केली, तरी आपणास आपले ध्येय गाठता आले नाही, असे त्यास वाटते आणि आपले जीवन अजूनही अस्थिरच आहे, असा त्यास अनुभव येतो; परंतु या अस्थिरतेतच खरे सौंदर्य आहे, याची प्रचीती त्याला पुढे येते. आरंभी चिंतातुर असलेला प्रवासी अखेरीस कसा आशावादी होतो आणि समाधान पावतो, हे त्या काव्यात मी दाखविले आहे. ज्या समजुतीमुळे मनुष्याला खोटेच समाधान मिळू शकते, त्या समजुतीचे मला येथे समर्थन करावयाचे नाही. अज्ञानाने प्राप्त होणाऱ्या समाधानापेक्षा अस्थैर्य बरे, ही "प्रवासी' या काव्यातील विचारसरणी अजूनही मला श्रेयस्करच वाटते. मात्र, जीवनातील अमंगल गोष्टींविषयीचा रोष व्यक्त करीत मंगलप्रद गोष्टीसंबंधीचा आदर व्यक्त न करणे म्हणजेही एकांगीपणा होईल, यात शंका नाही. '
न. चिं. केळकर, दत्तो वामन पोतदार, श्री. म. माटे, आचार्य अत्रे आदींनी पाठक यांच्या कवितेची मनःपूर्वक स्तुती केलेली आहे. त्यापैकी अत्रे यांनी केलेली स्तुती मी इथे देतो.

पाठक यांच्या कवितेचे गुणगान करताना अत्रे यांनी म्हटले होते, ''... पाठकांच्या काव्यगुणाचा प्रथम परिचय मला त्यांच्या 'शिवराज आणि बालवीर' (सुरवातीलाच उल्लेखिलेली)या सुंदर नाट्यगीतामुळे झाला. 'खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या! उडवीन राइ राइएवढ्या! ' अशा झणझणीत इशाऱयाच्या शब्दांनी सुरवात झालेल्या या तडफदार काव्यात चिमुकल्या सावळ्याच्या तेजस्वी स्वभावाचे व तिखट इमानाचे चित्र पाठक यांनी भरदार रंगात रंगविलेले आहे. शितावरून भाताची परीक्षा करणे हे वाङ्मयात पुष्कळ वेळा धोक्याचे असते, हे माहीत असूनसुद्धा त्या एकाच कवितेवरून पाठकांच्या उच्च काव्यशक्तीसंबंधी त्या वेळी मी जी अटकळ बांधिली होती, ती तदनंतर त्यांच्या वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या कवितांच्या व आता एकत्रितस्वरूपात प्रसिद्ध होत असलेल्या या त्यांच्या गीतसंग्रहाच्या (आशादीप) वाचनाने खरी ठरली आहे, हे पाहून मला फार आनंद वाटतो. ''
पाठकांचे बालपण एखाद्या लहानशा खेडेगावात गेले असावे म्हणूनच तेथील नैसर्गिक सौंदर्याचा व आनंदी वातावरणाचा गोड ठसा त्याच्या अंतःकरणावर चांगला उठलेला दिसतो. 'खेड्यातील आनंद' या त्यांच्या कवितेत त्यांनी खेडेगावातील एका दिवसाच्या आय़ुष्यक्रमाचे मनोहर चित्र मोठ्या कौशल्याने चितारलेले आढळते. ''

* * *

पाठक यांच्या दोन कविता ः

विरोधी प्रेम

'माझ्या दारावरून होते तुमचे येणे-जाणे
झाले नाही परंतु तुमचे वरती चुकून पाहणे
तुमच्या मार्गी सामोरी मी असेन कितिदा आले
दृष्टीचे पण तुमचे-माझे मीलन नाही झाले
अपुल्या कानी यावे म्हणुनी वदले मी मधुबोल
कर्णपथावर परंतु तुमच्या झाले सारे फोल
करत राहिले स्तुती आपुली तुम्हा कळेल म्हणून
थक्क जाहले निर्विकार पण आपण हे ऐकून
गायन-वादन यावर कळले फार आपुली गोडी
म्हणून राहिले गात लागता चाहुल अपुली थोडी!
गभीर वृत्ती परी न याने अपुली ढळली काही
आणिक तेव्हापासून मजला गाणे रुचले नाही!
-वरपांगी नच तुम्ही दाविले प्रेम कधी असलेले
म्हणून माझे मानस आहे तुमच्यावर बसलेले! '

* * *


खेड्यातील आनंद

फुटे क्षितिजी तांबडे जो न थोडे
तोच जागे होतसे सर्व खेडे
तरुण आखाड्याकडे धाव घेती
वृद्ध भूपाळ्या प्रभुस आळवीती
उठून गृहिणी लगबगा अंगणात
सडासंमार्जन करत राहतात
आणि वृंदावन कुणी परसदारी
नम्र भावे साष्टांग नमस्कारी
सान-थोरांना समय पहाटेचा
असा वाटे उत्साह-उमेदीचा
मीही मिळुनी त्यांच्यात गमे जावे
आणि सौख्यी त्या भागिदार व्हावे

* * *
सूर्य माध्यान्हावरी चढत आहे
पूर्ण शांती खेड्यात नांदताहे,
गाव-शीवेच्या वृश-साउलीस
बसे कोणी पांथस्थ विसाव्यास
निघे पाण्यावर गुरा-वासरांचा
थवा येई वर लोट तो धुळीचा
नाद कानावर पडे घुंगरांचा
नाद मिसळे त्यामध्ये पावरीचा!
मोट सुटली मोकळे बैल झाले
गडी सारे एकत्र जमुनी आले
बसून पाटाच्या वाहत्या कडेला
सोडू आता लागले न्याहारीला
सान-थोरांना समय शांततेचा
असा वाटे हा गोड विसाव्याचा
मीही वाटे त्यांच्यात मिळून जावे
आणि सौख्यी त्या भागिदार व्हावे

* * *
उन पसरे कोवळे सोनियाचे
कळस पिवळे शोभती देवळाचे
थवा आकाशी उडे पाखरांचा
मार्ग धरुनी आपुल्या कोटरांचा
दावणीशी वासरे ओढ घ्याया
आणि आता लागली हंबराया!
सांज झालेली सुटे मंद वात
घरामधुनी लागेल सांजवात
समय सर्वांना हाच विसाव्याचा
एकमेकांना सुखें भेटण्याचा
मीही वाटे त्यांच्यात मिळून जावे
आणि सौख्यी त्या भागिदार व्हावे

* * *

Post to Feedप्रवाही लेखन...
सुरेख!
खानसाहेबांशी सहमत
सुंदर
सहमत
छान छान.
छान
भास्कर यांना...
सगळ्यांचे मनापासून आभार...

Typing help hide