मे २२ २०१०

स्मरणाआडचे कवी -८ ( गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ कवी गोविंद)

स्मरणाआडचे कवीस्मरणाआडचे कवी -
गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ कवी गोविंद

वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱया आणि वाहिन्यांवरून चालविल्या जाणाऱया सौंदर्यवर्धनविषयक सदरांसाठी त्या (सुंदर! ) कवितेतील तीन शब्दांचा वापर आजवर किती वेळा झाला असेल, याची गणतीच नाही. खरं तर त्या तत्त्वज्ञानपर कवितेची ओळख अशा प्रकारे करून देणं योग्य नव्हे;   पण... कालमहिमा!

(सहज - गेल्या पिढीतील सुविख्यात गायिका सुमती टिकेकर यांची ओळख आजच्या पिढीतील एका मुलीला सांगताना मला अशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. मला तिला सांगावे लागले होते की, सुमती टिकेकर म्हणजे आजच्या शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या सासूबाई... आणि अभिनेते उदय टिकेकर यांच्या मातुःश्री.   कारण...? कालमहिमा!!   उदय टिकेकर आणि आरती अंकलीकर-टिकेकर हे आजच्या पिढीला माहीत आहेत; म्हणजे असावेत... पण सुमतीबाई? शक्यता फार म्हणजे फारच कमी. ('आठवणी दाटतात... आठवणी दाटतात... । धुके जसे पसरावे । जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे.. '. एवढं एकच गाणं त्यांनी गाइलं असतं तरी संगीतक्षेत्रावर त्यांची झळझळीत नाममुद्रा उमटली असती! खरं तर सुमतीबाईंनी निवडकच गाणी गाइली आहेत... पण सगळीच एकाहून एक सरस... संगीतप्रेमींनी ही गाणी शोधून काढून जरूर ऐकावीत! आठेक वर्षांपूर्वी पुण्यातील एका नामवंत संगीत-दुकानात मी त्यांची काही गाणी कॅसेटवर भरून घेण्यासाठी गेलो होतो... पण त्यातील एकच (वर उल्लेखिलेले) गाणे त्यांच्याकडे उपलब्ध होते!!!  आणखी एकदा सहज -   उदय टिकेकर अभिनेते म्हणून आणि आरती अंकलीकर-टिकेकर शास्त्रीय गायिका म्हणून दोघेही मला खूप आवडतात, हेही इथे नमूद करणे आवश्यक आहे. असो. )

... तर मी सांगत आहे ते कवी गोविंद (जन्म - १८७४, मृत्यू - १९२६) यांच्याविषयी आणि त्यांच्या

सुंदर मी होणार, आतां सुंदर मी होणार!
सुंदर मी होणार । हो। मरणानें जगणार.


या कवितेविषयी.
आज या सदरातून कवी गोविंद यांचीच भेट आपण घेणार आहोत!

गोविंद त्र्यंबक दरेकर हे त्यांचे पूर्ण नाव. गाव नाशिक. निसर्गाने त्यांना कमालीची काव्यप्रतिभा दिली होती... याच निसर्गाने त्यांना आणखी एक गोष्ट दिली होती - अपंगत्व!!

गोविंद यांचे वडील नाशिकमध्ये गवंडीकाम करीत असत. गोविंद चार-पाच वर्षांचे असतानाच वडील वारले. स्वतः गोविंद यांनाही त्यानंतर काही दिवसांतच मोठा ताप भरला व त्यांचे दोन्ही पाय लुळे बनले. ते अपंग झाले. 

 गोविंद आधी शृंगारिक लावण्या, पद्ये लिहिण्यात गोविंद रमून जात असत
. पण पुढे पुढे ते वीररसयुक्त, देशभक्तिपर कविता लिहू लागले. 'स्वातंत्र्यशाहीर' अशीच मुळी गोविंद यांची ओळख होती आणि आहे. याला  एक कारण होते व ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर यांचा त्यांना लाभलेला सहवास.  नाशिकमध्ये सावरकरबंधू काही काळ गोविंद यांच्या शेजारीच राहायला होते. सावरकरबंधूंनी 'मित्रमेळा' ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेत गोविंद रमू लागले. गोविंद यांच्या देशभक्तिपर रचना 'लघू अभिनव माला'मध्ये प्रसिद्धही होऊ लागल्या. पुढे हाच 'मित्रमेळा' 'अभिनव भारत' या नावाने ओळखला जाऊ लागला. गोविंद या संस्थेचे एक महत्त्वाचे सदस्य होते. 
स्वातंत्र्यप्राप्तीच्या विराट उद्देशाने भारून गेलेला स्वातंत्र्यप्राप्तीचा तो काळ. साहजिकच याच विषयावर त्यांची बरीच कवने आहेत.

'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? ', 'कारागृहाचे भय काय त्याला? ', 'नमने वाहून स्तवने उधळा', 'मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे? ' (लोकमान्य टिळकांवरील काव्य) अशा त्यांच्या किती तरी कविता त्या काळी महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले.


याच काळात राम गणेश गडकरी हे 'गोविंदाग्रज' या नावाने कवितेचा प्रांत जिंकत चालले होते, हे जाणकारांना ठाऊक आहेच. अशा या भारलेल्या काळात साहित्यक्षेत्रात दोन  'मुरलीं 'चा नाद भरून राहिला होता! पहिली म्हणजे अर्थातच गोविंदाग्रजांची - 'बजाव बजाव मुरली, कन्हैया बजाव बजाव मुरली' ही सरळसरळ कृष्ण-राधेची प्रीतिकथा सांगणारी प्रेमकविता, तर दुसरी  'मुरली ' होती ती कवी गोविंदांची. ही रचना ओघानेच देशभक्तिपर होती.
प्रखर देशभक्तिपर कविता लिहिणाऱया या स्वातंत्र्यशाहिराच्या काही कविता स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारकडून जप्तही करण्यात आल्या होत्या!

* * *
गोविंद यांची कविता 

* * *
मुरली

* * *

भारता तार या कालिं कालिं । हरी वाजिव गीता मुरली ।। ध्रू ।।
नाचून कालियामौली मौली । हरी वाजिव गीता मुरली ।।

परतेचा हल्ला झाला । फितुरीचा मारा झाला ।
ऐक्याचा किल्ला पडला । धनराशी चोरी गेला ।
परतंत्र मायभू झाली झाली । हरी वाजिव गीता मुरली ।। १ ।।

कापट्यखड्ग उपसून । ये गुलामगिरी धावून ।
करी स्वातंत्र्याचा खून । मोदास नेई पळवून ।
ऐक्याची करुनी होळी होळी । हरी वाजिव गीता मुरली ।। २ ।।

कलहाचे नाचे भूत । समतेचा झाला अंत ।
पडलेच ज्ञान बंदीत । हे सत्य करी आकांत ।
न्यायश्री अश्रू ढाळी ढाळी । हरी वाजिव गीता मुरली ।। ३ ।।

विघ्नांचा वणवा आला । सुगुणांचा मळा जळाला ।
पापांचा सुकाळ झाला । बाजार भ्रांतिचा भरला ।
हृदयाची लज्जा गेली गेली ।  हरी वाजिव गीता मुरली ।। ४।।

लोकांस कळेना धर्म । मानिती अधर्मी धर्म ।
तत्त्वांचे सरले प्रेम । प्रेमाचे नुरले नाम ।
नरकाने जनता न्हाली न्हाली । हरी वाजिव गीता मुरली ।।५।।

हरी वाजिव गीता मुरली । धाव रे धाव वनमाली ।
तुजवीण नाही कुणी वाली । आम्हास तार या काली
तुझी आशा केवळ उरली उरली ।  हरी वाजिव गीता मुरली ।।६।।


(ही कविता दहा कडव्यांची आहे. )

Post to Feedछान ...
कांदळकरसाहेब...
आवडला
प्रदीप,
श्रावण मोडक यांना...
धन्यवाद
धन्यवाद
आम्ही
सगळ्यांचे मनापासून आभार...
आजारपणाच्या काळांत नव्हे ...

Typing help hide