सप्टेंबर ११ २०१०

स्मरणाआडचे कवी - १६ (रामचंद्र अनंत ऊर्फ रा. अ. काळेले)

स्मरणाआडचे कवी

स्मरणाआडचे कवी - रामचंद्र अनंत ऊर्फ रा. अ. काळेले

कविवर्य रामचंद्र अनंत काळेले (जन्म २२ फेब्रुवारी १९०७) ऊर्फ रा. अ. काळेले. हे होते पोलिस खात्यात अधिकारी; पण त्यांनी त्या रुक्ष खात्यात राहूनही आपले कविमन जपले होते. त्यांचा आणखी एक विशेष म्हणजे चित्रकलेची आवड आणि त्यांनी उत्तमोत्तम चित्रांचा संग्रह! काळेले यांचे सारे आयुष्य मध्य प्रदेशात इंदूर येथे गेले. इंदूरच्या होळकरांकडून त्यांचा "राजकवी' म्हणून गौरवही झाला होता. काळेले यांचे निधन तसे अलीकडेच म्हणजे १२ जून १९८१ रोजी झाले. अवघ्या तीसच वर्षांपूर्वी त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या हयातीतही ते विशेष प्रसिद्धीला आले नव्हते. प्रसिद्धिपराङ्मुख स्वभाव हेच त्याचे कारण असणार. पण भवानीशंकर पंडित यांनी याविषयी वेगळे मत नोंदविलेले आहे.

पंडित म्हणतात, ""रा. अ. काळेले (आणि वा. रा. कांत) हे दोघे कवी पुण्या-मुंबईच्या परिसरापासून दूर असल्यामुळे व स्वभावाने चळवळे नसल्यामुळे त्यांच्या कवितांचा गाजावाजा जरा उशिरा झाला. '' काहीही असो. काळेले यांचे सात कवितासंग्रह (वाग्वसंत, ओळखीचे सूर, भावपूर्णा, वसंतागम, गीतनिर्वाण, हिमअंगार, रूपमती) प्रसिद्ध झालेले असूनही महाराष्ट्रीय जनतेला ते फारसे परिचित नव्हते, हे खरे. हे दुर्दैव काळेले यांचे नव्हे; तर महाराष्ट्रातील काव्यरसिकांचे!! असो. अशा विषयावर खूपच बोलता येईल; पण... काळेले यांचे हे सर्व संग्रह १९३४ ते १९६४ या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत.
त्यांच्या कवितांमध्ये नव्या-जुन्या विचारांचा सुयोग्य समन्वय आढळून येतो.

काळेले यांच्या कवितेबद्दल पंडित म्हणतात, ""त्यांचे हृदय निरभिमानी व निर्मळ असल्यामुळे कोणत्याही नवीन गोष्टीतला ग्राह्यांश उचलण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. म्हणून त्यांच्या कवितेत निराळेपण नाही, असे नाही. "वळवाचा पाऊस' या त्यांच्या कवितेवरून त्यांच्या तरल कल्पनाशक्तीची व कोमल भावनेची प्रतीती पटते. किसान, कामगार, कुली यांच्याकडे अनेकांचे लक्ष गेले आहे; परंतु बौद्धिक आणि शारीरिक कष्ट सारख्याच प्रमाणात करणाऱ्या दुर्दैवी कारकुनांकडे कुणी लक्ष दिल्याचे दिसत नाही. (कारकुनांना कुठले शारीरिक कष्ट पडतात, न कळे! ). काळेल्यांनी त्यांच्या (कारकुनांच्या) मूक दुःखाला वाचा फोडली आहे. काळेले यांनी प्रेमगीतेही लिहिली आहेत. ती सारीच भावमधुर आहेत. निसर्गावर कविता लिहिताना ते त्याचे निर्जीव वर्णन करीत नाहीत. त्यात ते बाहेरील आपला निसर्ग व आतील आपला आनंदभाव यांच्यात सीमारेषा ठेवत नाहीत. "ओहळा! कशास फुरफुरशी? ' या कवितेत त्यांनी निसर्गाचा उपयोग अन्योक्तीकडे करून घेतला आहे. काळेल्यांची भाषा भावानुगामी आहे. ती प्रसंगानुसार कोमल अथवा कठोर बनली आहे. ''

काळेले यांनी कवितेबरोबरच काव्यसमीक्षाही लिहिली. साहित्यप्रेमाचा वारसा त्यांना वडील अ. सी. काळेले यांच्याकडून मिळाला. काळेले यांचा कल संस्कृत वाङ्मयाच्या अध्ययनाकडे अधिक होता. काव्यतीर्थ ही त्या क्षेत्रातील पदवीही त्यांनी मिळविली होती. काळेले यांचे महत्त्वाचे समीक्षाग्रंथ म्हणजे ः "नवे अलंकार', "तांबे ः एक अध्ययन' (भा. रा. तांबे यांच्या कवितांवरील), "नवकवितेचे एक तप ः १९४५ ते १९५७'.

काळेले यांच्या कवितेने खऱ्या अर्थाने कूस बदलली ती १९४५ नंतर. त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये सांगायची तर प्रयोगशीलता, गेयता, प्रासादिकता. संस्कृत अभिजात काव्याचा त्यांचा मोठाच व्यासंग असल्याने साहजिकच विविध वैशिष्ट्यांनी त्यांची कविता नटलेली आढळते.
काळेले यांनी वेगवेगळ्या प्रतिमांचा वापर १९४५ नंतरच आपल्या कवितांमधून मोठ्या प्रमाणावर सुरू
केला. "रूपमती' आणि "हिमअंगार' या काव्यसंग्रहांत त्याची प्रचीती येते.

"सांग ना ताई, अशी गेली कुठे तरी आई? ' ही काळेले यांची इथे दिलेली कविता स्वतःच खूप बोलकी आहे. त्यावर वेगळे काही सांगायची आवश्यकता आहे, असे वाटत नाही. पण तरीही...! - दोन बहिणींची आई वारलेली आहे. धाकटीच्या अद्याप हे आकलनाबाहेरचे आहे. थोरलीला (पण तीही तशी वयाने छोटीच) धाकटी विचारत आहे, "आई कुठे गेली? ' शेवटी समर्पक असे काहीच सांगता न आल्याने थोरली तिला स्पर्शाच्या भाषेत उत्तर देते. छातीशी कवटाळते आणि तीही धाई धाई रडू लागते!
..................................................

काळेले यांची कविता
....................................................
सांग ना ताई, अशी गेली कुठे तरी आई? ।
......................................................
काल तिला तर उठवत नव्हते ।
म्हणती ती खिळली शेजेतें ।
आज सकाळी उठुनी पाहते । गेली तो आई ।
सांग ना ताई! ।।१।।

तू नि मीच ना इथली सारी ।
खिडक्या-दारे नीट लावली ।
वाट कशी मग तिला मिळाली ।
जावी कशी बाई ।
सांग ना ताई! ।।२।।

आजकाल मी हट्ट न केला ।
रडले नाही ठाउक तुजला ।
तिने बरोबर मग का मजला ।
घेतले नाही ।
सांग ना ताई ।।३।।

आई कुठे गेली असताना ।
उगी करावी तूच मला ना ।
आईसाठी तूच मग पुन्हा ।
रडसी कां ही?
सांग ना ताई ।।४।।

बाहुली माझी तूच फोडिली ।
चिमणी माझी तूंच हरविली ।
अगे लबाडे तूच लपविली ।
कुठे तरी आई ।
सांग ना ताई ।।५।।

बरें बरें जरी खाऊ न दिला ।
घेइ ताई जरी गोड गोडुला ।
पापा माझ्या दोन्हीकडला ।
दावी परी आई ।
सांग ना ताई ।।६।।

कवटाळुनी छकुलीला पोटीं ।
किती शहाणी ताई मोठी ।
होउनी छकुली वेडी धाकटी
रडली धाई ।। ७।।

-("वाग्वसंत' या काव्यसंग्रहातून, रचनाकाल ः १९३४)

Post to Feedकवितेतली भाषा ...
जन्म सालचा संदर्भ

Typing help hide