एप्रिल १० २०१०

स्मरणाआडचे कवी -५ (श्रीनिवास रामचंद्र बोबडे )

स्मरणाआडचे कवी

स्मरणाआडचे कवी - श्रीनिवास रामचंद्र बोबडे

सकस, दर्जेदार कविता लिहूनही काही कवींना त्यांच्या हयातीत तर लौकिक लाभत नाहीच़, परंतु त्यांच्या नशिबातील उपेक्षा मृत्यूनंतरही काही दूर होत नाही. श्रीनिवास रामचंद्र बोबडे या कविवर्यांचे नाव या 'न्याया'संदर्भात घेता येईल. बोबडे यांची एकंदर कविता पाहता, त्यांच्या काळातील महत्त्वाच्या कवींमध्ये त्यांची गणना व्हायला काहीच हरकत नव्हती; पण तशी ती झाली नाही. बोबडे हे कमालीचे प्रसिद्धिपराङ्मुख होते. त्यांच्या या स्वभावामुळेही तसे घडले असण्याची शक्यता आहे.

बोबडे यांची संमग्र कविता साधारणपणे १९१५ ते १९२५ या दहा वर्षांच्या कालखंडातील आहे. त्यांच्या एकंदर कवितांचे संकलन 'बोबडे यांची कविता'या शीर्षकाने १९३७ मध्ये प्रसिद्ध झाले होते. आज हे पुस्तक शोध घेऊनही सापडेल, असे वाटत नाही!

बोबडे यांचा काळ सांगायचा तर ते माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन यांचे समकालीन होते. विदर्भातील चांदा येथे १८८९ साली बोबडे यांचा  जन्म झाला. केवळ ४५ वर्षांचेच आयुष्य त्यांना लाभले. कवींच्या बाबतीत विदर्भभूमी ही खूपच संपन्न आणि समृद्ध. एकाहून एक सरस कवी या भूमीने दिले आहेत.

बोबडे व्यवसायाने वकील होते; पण त्यांचे मन खऱया अर्थाने वकिलीच्या शब्दांत न रमता कवितेच्या शब्दांतच रमत असे. त्या काळी साहित्यविश्र्वात प्रसिद्ध असलेल्या'वागीश्र्वरी'या उच्च दर्जाच्या मासिकाच्या संपादक मंडळाचे बोबडे हे सदस्य होते. बोबडे यांची कविता कमालीची अंतर्मुख, अतितरल, सोपी, प्रासादिक आणि आशयघन आहे. त्यांच्या कवितेत संस्कृतप्राचुर्यही असले तरी एकंदरीत समजायला ती सुगमच आहे. जी कविता स्वतःशी संवाद साधते, ती वाचकाशीही साधतेच साधते. बोबडे यांच्या कवितेची जातकुळी अशीच होती. बोबडे यांच्या काही कविता पाहता, आपण कोण आहोत आणि कवी म्हणून आपले अस्तित्व असे कितीसे आहे, असे प्रश्र्न त्यांना पडलेले दिसतात. स्वतःचाच शोध घेत जाण्याची क्रिया-प्रक्रिया कलाकाराच्याही नकळत त्याच्या कलाकृतीतून घडत असते. (आणि दर्जेदार कलाकृतींच्या अनेक निकषांपैकी हा एक निकष होय. ) पुढे दिलेल्या बोबडे यांच्या दोन्ही कविता याची साक्ष देतील.

लोकान्तापासून दूर राहत बोबडे यांनी नेकीने आणि निष्ठेने कवितेची साधना आयुष्यभर केली. आपल्याला कवित्वाचे वरदान या जन्मी जसे मिळायला हवे होते, तसे मिळालेले नाही, याची खंत बोबडे यांनी व्यक्त केली आहे... पण तीही लयदार, प्रासादिक व आशयघन कवितेतूनच!! गंमत म्हणा की दुःखही म्हणा... पण पुढील जन्मी आपल्याला चांगली कवित्वशक्ती मिळावी, अशीही करुणा बोबडे यांनी'देवी शारदे'जवळ याच कवितेतून भाकलेली आहे. खऱ्या हळव्या कवीचे, त्याच्या भोळे-भाबडेपणाचेही दर्शन इथे घडते. एवढे चांगले लिहीत असूनही आपल्याला हवा तसा लौकिक मिळू शकलेला नाही, याची विषादपूर्ण जाणीव त्यांना मनातल्या मनात कुठेतरी होती की काय न कळे! किंवा ज्या अर्थी हवा तसा लौकिक मिळालेला नाही, त्याअर्थी आपल्या कवितेत कसच नाही, आपल्या 'स्फूर्तीचा पाळणा रिकामा'च आहे, असेच त्यांना वाटत असावे...
हे दोन्ही भाव या कवितेतून उत्तमरीत्या उतरलेले आहेत. श्रेष्ठ कवितेचे आणखी हेही एक लक्षण!

या अल्पायुषी कवीचे १९३४ साली निधन झाले.

बोबडे यांच्या खासगी आयुष्याबद्दलची काहीच माहिती शोध घेऊनही सापडली नाही; पण शोध सुरू आहे... पण तोवर जी काही मिळाली ती माहिती इथे नोंदवून ठेवीत आहे!


* * *

बोबडे यांच्या दोन कविता


होता कुणी जगात ।।


होता कुणी जगात

नाही ठिकाणठाव । नाहीच नावगाव ।।
येथे बसोनी गेला । कुणी एकटा अनाथ  ।।१।।

येथे जलप्रवाही । आला वाहत आला ।।
वाऱ्यावरी इथोनी । गेला वरी नभात ।।२।।

हसला कळ्याफुलांत । वसला विहंगमात ।।
शीतोष्ण तरुतळीचे ।। जिव गुंतला वनात ।। ३।।

प्रभुगीत आळवीत । ओठांतले मनात ।।
स्वानंदलीन झाला । एकांत निर्जनात ।। ४।।

मउ मोकळ्या धरेला । पानांत झाकलेला ।।
डोळे मिटूनी तेथे । विरला चिरंतनात ।। ५।।

* * *

प्रसाद नाही सरस्वतीचा

प्रसाद नाही सरस्वतीचा माझे मी जाणे
फुटक्या वीणेवरचे बेसुर, भेसुर हे गाणे ।। १।।

येथे केला नसे देविने सिंचन रस मधूर
नाही धाडुनी दिले वरुनिया तिने अलंकार ।। २।।

कवित्व नसता गुंफित बसलो शब्दांचे जाळे
गणमात्रांचे गणित मांडले कोऱ्यावर काळे ।।३।।

सरस मधुर जर हृदयच नाही कोठुनी मग गाणे
मोत्यांच्या शिंपल्यात होती मोत्यांचे दाणे ।।४।।

निरभिमान, निर्मल हृदयाने माझे मी जाणे
प्रसाद मज या जन्मी नाही दिला शारदेने ।। ५।।

या जन्मीचा निकाल झाला, माझे मी जाणे
पुढच्या जन्मी प्रसाद व्हावा म्हणुनी हे गाणे ।। ६।।

जन्मोजन्मी प्रसन्न व्हावी मज देवी वाणी ।
करितो आराधना म्हणुनी मी गाउन ही गाणी ।।७।।

हृदयाच्या गीतावर झुलतो स्फूर्तीचा पाळणा । - रिकामा
प्रसाद घेउनी ये ये देवी! माझ्या संकीर्तना ।। ८।।

* * *

Post to Feedविस्मरण
सहमत...
यशवंत जोशी यांना...
मनापासून आभार...

Typing help hide