ऑगस्ट १४ २०१०

स्मरणाआडचे कवी- १४ (बी. नागेश रहाळकर ऊर्फ कवी रहाळकर)

स्मरणाआडचे कवी


स्मरणाआडचे कवी - बी. नागेश रहाळकर ऊर्फ कवी रहाळकर

आज भेटू या 'कोणी तरी' या कविवर्यांना! तो काळ अशाच काही चमत्कारिक टोपणनावांनी कविता लिहिण्याचा होता. तो काळ म्हणजे केशवसुतांचा काळ. 'एक मित्र', 'एक कवी', 'क्ष-कवी' अशी अतिमोघम टोपणनावे त्या काळी कवी घेत असत;   तर दुसरीकडे 'विश्वराज', 'वनराज', 'जानकीजनकज' अशी भारदस्त नावेही घेतली जात. त्या काळी कुठलाही सोम्यागोम्या कवी उठे आणि स्वतःला याचा अग्रज, त्याचा सुत, अमक्याचा अनुज असे म्हणवून घेऊ लागे!   हे अर्थातच केशवसुत, गोविंदाग्रज आदी दिग्गजांचे अंधानुकरण होते, हे सांगणे नलगे!
हा असा टोपणनावांचा इतका सुळसुळाट तेव्हा झाला होता की, सगळीकडे टीकेचे पिंजरे लावण्यात येऊ लागले...! मग कुठे त्या सुळसुळाटाला आळा बसला.  
पण सुरवातीलाच नमूद करावे लागेल की, आज भेटीला आलेल्या कविवर्यांनी 'कोणी तरी' हे मोघम टोपणनाव घेतले असले तरी ते सोमेगोमे अजिबातच नव्हते. हे 'कोणी तरी' म्हणजे केशवसुतांचेच समकालीन; केवळ समकालीनच नव्हे तर केशवसुतांनाच काव्यातील गुरू मानणारे. बी. नागेश रहाळकर हे त्यांचे नाव. 'पुष्पांजली' हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. हा काव्यसंग्रह सध्या 'अतिदुर्मिळ' या प्रकारात मोडतो. या संग्रहातील त्यांच्या काही कवितांच्या केवळ काही ओळीच मला उपलब्ध झाल्या. या 'शितावरून भाताची परीक्षा' नक्कीच करता येते! आणि हा 'भात' आंबेमोहोर तांदळाचा, सुवासिक, घमघमाट पसरविणारा असावा. त्याचा घमघमाट भले त्या काळी सर्वत्र पसरला नसेलही... पण तो काही ठिकाणी निश्चितच घमघमला असावा, हे निश्चित!
रहाळकर हे केवळ कवीच नव्हते तर टीकाकार-समीक्षकही होते. 'केशवसुत आणि त्यांची कविता' हा प्रदीर्घ टीकालेख त्यांनी लिहिला होता. याशिवाय इतरही समकालीन कवींच्या काव्याचे रसग्रहण त्यांनी केले होते. केशवसुतांशी असलेले शिष्याचे नाते याच लेखात त्यांनी स्पष्ट केले होते. रहाळकरांनी म्हटले होते ः ""केशवसुतांच्या सहवासाने आपली दृष्टी बदलली. आपल्यास कवितेचे निराळेच स्वरूप दिसू लागले. आकुंचित दृष्टी विस्तृत झाली. कवितावाचनात अननुभूत असा निराळाच विलक्षण आनंद वाटू लागला व आपण केशवसुतांचे शिष्य बनून त्यांच्या भजनी लागलो. ''
कवी रहाळकर यांचे नाव जुन्या पुस्तकांमधून अनेकदा डोळ्यांखालून गेले होते. "बी. नागेश रहाळकर' अशी वेगळीच नामपद्धती त्यांनी स्वीकारलेली असल्यामुळे ते नाव लक्षातही राहिले होते. पण रहाळकर-कवींची ही दोन-चार ओळींची "गोष्ट' तेव्हा माझ्यापुरती तरी तिथेच संपली होती! पुढे 'काव्यचर्चा' हे जुन्यात जुने पुस्तक माझ्या हाती पडले. कवी आणि कविता यांविषयीच्या विविध लेखांचे हे संकलन आहे. त्यात 'पुष्पांजली'  या रहाळकरांच्या काव्यसंग्रहाचे रसग्रहण करणारा लेख मला आढळला. 'किरात' यांचा हा लेख आहे. हे किरात म्हणजे कुणीतरी मातब्बर समीक्षक असावेत आणि त्यांचा केशवसुतकालीन कवींशी-साहित्यिकांशी भेटी-गाठी घेण्याइतपत चांगला परिचय असावा, असे अनुमान काढता येते.
केशवसुतांनी स्वतःलाच 'नापसंत' वाटणाऱया सुरुवातीच्या काळातील कवितांचा होम केला असल्याचे आपल्याला प्रत्यक्ष भेटीत सांगितले होते, असा उल्लेख किरात यांनी या लेखात केलेला आहे. म्हणजे केशवसुतांच्या भेटी-गाठीतील आणि त्यांच्याशी काव्यचर्चा करण्याइतपत, तसेच केशवसुतही त्यांच्याशी कवितेविषयी बोलण्याइतपत ही जवळीक होती, असे दिसते.
या लेखात किरात यांनी रहाळकरांच्या 'पुष्पांजली'मधील कवितांचे रसग्रहण मोठ्या आलंकारिक पद्धतीने केलेले आहे. काही ठिकाणी ते बटबटीत झाले आहे खरे; पण त्या काळी तसेच लिहिण्याचा प्रघात होता! 'पुष्पांजली'त एकूण ७५ कविता असल्याचा सूचक उल्लेख किरात यांच्या लेखात आहे.
"पुष्पांजली'मधील कविता या 1898 ते 1904 या काळातील आहेत. तत्पूर्वी, रहाळकर यांच्या अनेक कविता "न्यायसुधा', "न्यायसिंधू', "हिंदुपंच', "इंदुप्रकाश' या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. रहाळकरांचा जन्म 1882 मधील. म्हणजे तेराव्या-चौदाव्या वर्षापासूनच रहाळकरांना कवितारचनेचा छंद लागला असावा.
रहाळकर यांचे आणखी किती काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले, त्यांची आणखी कोणती पुस्तके आहेत, याविषयीचा तपशील मिळू शकला नाही. पण एकंदरीत रहाळकर यांची कविता प्रासादिक, नादमय, विचारसमृद्ध, आशयसंपन्न असावी, असे उपलब्ध ओळींवरून म्हणता येते.

* * *

रहाळकर यांची ही काही काव्य'शिते'!   :

सूर्य उदेला; अस्ता गेला । शशी विकसला; विलया गेला
उदया तारा आला; गेला । क्षितिजाच्या खाली
जिकडे-तिकडे शून्य जहाले । सौख्याचे ते स्वप्न संपले ।
नभी कृष्णघन दाटून आले । भरला अंधार

***
खरी कविता ती खऱया कवीमागे
निघुनी गेली रमण्यास तयासंगे ।।

***
सुंदरतेने ज्यास ढकलिले, प्रीतीने लोटिले
तयाचे व्यर्थ जिणे जाहले!

***
कोवळी, स्मिताची कळी, कोवळ्या गाली -
विकसली, कपोली खळी गोड किती पडली
कुणिकडे लपवू? या गडे जगापासोनी
कां हृदय फाडुनी ठेवू आत लपवोनी!

***

होतो कुठे इतुके दिन मी तरी?
वाटे आलो आजची जन्मा परी
असुनी होतो जिवंतमृत मी जरी
उरलेली रंगभूमिका यथायोग्य वठवुनी
जाइन नाव इथे ठेवुनी

***
गाउ मी कसले गाणे, मज न कळे, हृदय मम शून्य हाय दुबळे!
हृदयींची तारा ज्या दिवशी तुटली, त्या दिनी कविता मज विटली
... जाहले मूक, मूक जरी गान, हृदय परी पिळते आंतून!

***
संगम नलगे, वियोग नलगे
नकार नलगे, रुकार नलगे
काया नलगे, माया नलगे
नलगे काही
यापलीकडे मज नेई!

***

Post to Feedमार्गदर्शनासाठीं प्रतिसादांच्या प्रतीक्षेंत होतों ...
इक मुसाफिर भी काफला है मुझे ।

Typing help hide