ऑक्टोबर २३ २०१०

स्मरणाआडचे कवी-१९ (कविवर्य ना. वा. टिळक)

स्मरणाआडचे कवी


स्मरणाआडचे कवी - कविवर्य ना. वा. टिळक

आज साठीच्या आत-बाहेर असणाऱ्या काव्यरसिकांना कविवर्य नारायण वामन ऊर्फ ना. वा. टिळक हे नाव माहीत असेल; पण साठी-पन्नाशीच्या आतल्यांना हे नाव ठाऊक असेलच, असे ठामपणे म्हणता येणार नाही. कविवर्य ना. वा. टिळक हे लोकमान्य टिळक यांचे समकालीन. लोकमान्यांपेक्षा पाच वर्षांनी लहान. त्यांचा जन्म १८६१ चा आणि मृत्यू १९१९ चा. टिळक हे त्यांच्या काळचे सुविख्यात कवी होते. "फुला-मुलांचे कवी', "पश्चिम हिंदुस्थानचे टागोर' अशी प्रशंसा टिळकांना लाभली.

टिळकांच्या कविता अतिशय प्रासादिक आहेत. कवितांमुळे तर टिळक गाजलेच गाजले; पण त्याहून अधिक गाजले ते धर्मांतरामुळे! कविवर्य टिळकांनी हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला होता. १८९५ च्या फेब्रुवारी महिन्यात मुंबई येथे त्यांनी हे धर्मांतर केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील करंजगाव येथे जन्मलेल्या टिळकांचे पुढे पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर, राजनांदगाव, नगर, मुरबाड आदी ठिकाणी कार्यक्षेत्र राहिले. मध्य प्रांतात राजनांदगाव येथील संस्थानात काही काळ ते मोठ्या हुद्द्यावर नोकरीस होते. नगर येथून प्रसिद्ध होणाऱ्या "ज्ञानोदय' या ख्रिस्ती धर्माच्या विख्यात मासिकाचे ते सात वर्षे संपादक होते. १९०७ मध्ये जळगाव येथे पहिले मराठी कविसंमेलन टिळकांनीच घडवून आणले. त्यानंतरच बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचा उदय झाला आणि टिळकांनी त्यांना १९१० मध्ये आपल्या घरी आणले व त्यांच्यातील काव्यगुणांची जोपासना केली. टिळकांची आणि केशवसुतांचीही पहिली भेट नागपूर येथे १८८३ च्या आगेमागे झाली होती.

टिळकांच्या पत्नी लक्ष्मीबाई याही उत्तम कवयित्री होत्या. "भरली घागर' हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. मुख्य म्हणजे "स्मृतिचित्रे' हे रसाळ आत्मचरित्र त्यांनी लिहिले. हे आत्मचरित्र अमाप लोकप्रिय झाले. लक्ष्मीबाईंमधील प्रतिभासंपन्न साहित्यिक "स्मृतिचित्रे'त पानोपानी दिसतो! "स्मृतिचित्रे'ने मराठी आत्मचरित्रांमध्ये मापदंड निर्माण केला, हे मराठी साहित्याचे मर्मज्ञ जाणतातच. "भरली घागर'मधील लक्ष्मीबाईंची प्रतिभासंपन्न कविता हाही वेगळ्या लेखाचा विषय नक्कीच आहे. त्याविषयी नंतर कधी तरी!

कविवर्य टिळक यांची कवितेशिवाय प्रभावी गद्यलेखक, पत्रकर्ते, लोकसेवक, समाजसुधारक, संतपुरुष अशीही वैविध्यपूर्ण ओळख होती. "टिळकांची कविता-भाग 1' हा त्यांच्या कवितांचा संग्रह रेव्हरंड भास्कर कृष्ण उजगरे यांनी १९१४ मध्ये संपादित केला. साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण ऊर्फ तात्यासाहेब केळकरांची प्रस्तावना या संग्रहाला आहे. टिळकांनी विपुल कविता लिहिली. "गणतिस्तवा'पासून "अभंगांजली'पर्यंत, "संगीत गोदुःखविमोचना'पासून "शीलं परं भूषणं'पर्यंत, "कृष्णवियोगविलापा'पासून ते "ख्रिस्तायना'पर्यंत विविध विषयांवर त्यांनी काव्यलेखन केले. "टिळकांची कविता' या १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनेत कविवर्यांचे नातू अशोक देवदत्त टिळक यांनी लिहिले आहे ः टिळकांनी एकूण कविता लिहिल्या किती, याची गणती कुणी केलेली नाही आणि यापुढे तर ती होणे अशक्यच. १०-१५ वर्षे खटपट केल्यानंतर टिळकांच्या सुमारे २००० कविता माझ्या संग्रही जमा झाल्या.
थोडक्यात, टिळकांच्या कवितांची संख्या वरील आकड्याच्याही पुढे निश्चितच असणार. आपल्या काव्यांबाबत स्वतः टिळकांची भूमिका कशी होती? ही भूमिका त्यांनी एके ठिकाणी कवितेच्याच ओळीत व्यक्त केली आहे ः

झाली कांही विशीर्ण की हरवली, चोरीस गेलीं किती
कांही मूर्खपणे दिलीं अरसिकां साक्षात् विनाशाप्रती!

टिळकांचे चिरंजीव आणि अशोकरावांचे वडील देवदत्त टिळक यांनीही कविवर्यांच्या कवितांच्या संख्येविषयी एके ठिकाणी नमूद करून ठेवले आहे, ते असे ः १९१३ मध्ये टिळकांच्या कपाटांत त्यांच्या 10-12 वर्षांच्या जुन्या डायऱ्या होत्या. त्यांचा आता पत्ता नाही. त्यांची १८९४  ची डायरी व इतर कांही डायऱ्यांची थोडीफार पानें मजजवळ आहेत. यांतल्या प्रत्येक पानावर किमान एक तरी नवीन कविता आहेच. यावरून गणित मांडले तर त्या १०-१२ गायब डायऱ्यांत मिळून
४-५ हजार तरी कविता असणार! टिळकांची सारी उपलब्ध कविता या डायऱ्यांतून आली, असे मानले तरीही दोन-तीन हजारांची बाकी उरतेच.

"पाखरा! येशिल का परतून? ', "पुरे जाणतो मीच माझे बल',  "अता कोण्या वसंताचे म्हणू सांगा मला गाणे! ', "माझी फुले काय झाली? ' "माझे मला द्या', "शरीरी तुझे रक्त खेळोनी राहे', "परलोकवासी कविवर्य गोविंदाग्रज' या टिळकांच्या कविता प्रसिद्ध आहेत.

कवितेविषयी टिळकांचे स्वतःचे असे खास तत्त्वज्ञान होते. एके ठिकाणी त्यांनी म्हणून ठेवले आहे ः
काव्य म्हणजे व्याकरण नव्हे, शुद्धलेखन नव्हे. अलंकारशास्त्र नव्हे, काव्य म्हणजे काव्य! वस्त्राभरणें म्हणजे सौंदर्य नव्हे. आधी सौंदर्य मग ही उपकरणें.

किती खरे आहे हे!!

कविवर्य टिळकांचे काव्य आणि चरित्र वाचल्यानंतर जाणवते ते एकच की, खरोखरच हा एक
सत्पुरुष होता! आपल्या हळुवार कवितेत करुणेला गुंफणारा सत्पुरुष!

"शरीरी तुझें रक्त खेळोनी राहे' या कवितेत ते म्हणतात ः

".... करो कोणी निंदा धरो मत्सरातें.
न माझे अशांशी कशाचेंच नातें,
तुझ्यावांचुनी शून्य सारें मला हें;
शरीरी तुझे रक्त खेळोनी राहे!

वधस्तंभ मी घेतला स्कंधदेशीं,
खिळोनी तया घेतलें आपणाशीं,
पुन्हा ऊठला ख्रिस्त तो मीच आहे,
शरीरी तुझे रक्त खेळोनी राहे

जिथे मी तिथें तू सदा व्यापिलेला
असा प्राशिला मी प्रभो आज पेला!
मनीं स्वर्ग माझ्यापुढे स्वर्गता हे
शरीरी तुझें रक्त खेळोनी राहे!

..................................................

कविवर्य ना. वा. टिळकांची कविता

अता कोण्या वसंताचे म्हणू सांगा मला गाणे!

तुम्हां जैसे रुचे तैसें रसज्ञांनो! कसे गांऊ?
कुठें गेलों कुणा ठावे! कसा वाटेवरी येऊं?
क्षमा मागें, नका रागें भरूं, ऐकून घ्या सारें,
कसे तेंव्हा किती माझ्या भरे अंगी नवें वारें!

वनीं एका दिनी गेलो पहायाला वसंताला,
विचारीता कुणालाही नसे ठावे कुठें गेला!
मनीं नाहीं, जनीं नाहीं, वनीं भेटेल आशा ही
मला होती; परी आशा दुजी स्वप्नाहुनी नाहीं!

घरी येणार, तों कोणी मला भासे मला बाही,
क्षणामध्ये पुढें येई, करीं माझ्या करा घेई.
अहो! दिव्याहुनी दिव्य स्वरूपाची जणूं खाणी!
अहो! ब्रह्माण्डगोलाची उभी तेजस्विनी राणी!

तिला पाहून स्वत्वाचें त्यजी सारें मला भान,
कुणा ठावें कुठें होती वपू, होते कुठें प्राण!
पुन्हा झालों क्षणें जागा, क्षणें होणार जो मुग्ध,
तिचें आणि मला शुद्धीवरी संबोधवैदग्ध्य

मला सप्रेम गोंजारी, पडे तेणें मला भूल -
वयाची वा प्रतीतींची, क्षणार्धीं मी बनें मूल!
मला अंकावरी घेई जशी माझीच ती आई!
बघे प्रेमें, हसे प्रेमें नुरे प्रेमाविना कांही!

जिथें प्रीती तिथे भीती, न हें केव्हांही होणारे!
नये बोलूं "प्रकाशाला स्वयें पाहीन' अंधारें!
करें झांकी पसारा हा, वदे आतां "दिसे काय? '
"अहा! सारेंच सौंदर्य'-प्रमोदें मी म्हणे "माय! '

करा काढी, म्हणें "पाहों जगीं कोठें दिसेना ते! '
मुका झालों बघोनी मी नव्या सौंदर्यविश्वातें!
गुलाबाची फुलें रम्यें दिसे तैशीच कोऱ्हाटी!
नुरे भिन्नत्व ते सांचे मनुष्याच्या सदा हाटी.

फुले सारीच नक्षत्रें; खडे सारे हिरे होती!
भरे सौंदर्य हें विश्वीं. भरे नेत्रीं! भरे चित्ती!
म्हणे "जाऊं चला स्वर्गीं! ' "नको देवी' म्हणालो मी,
"तिथें नाहीं नवे कांही धरीना जें इथें भूमी! '

म्हणे, "जा जा, वसंताला तुझ्या कोठेंही धुंडाळ! '
म्हणालो मी, "वसंताच्या मुठीमध्ये दिशा, काळ! '
बरें माना, बुरें माना, खरें सारें; दिसो गूढ,
गणी गूढा न हो खोटें कधीं ज्ञाता, परी मूढ.

अता कोण्यां वसंताचे म्हणू सांगा मला गाणे?
निधीमाजी रमे मासा कशाला तो घडा जाणे?
असो, आज्ञा रसज्ञांनो! तरी आतांही गाईन-
तया रागामध्ये संज्ञा जया देतां तुम्ही मौन!

(प्रसिद्धी ः मनोरंजन, एप्रिल १९१४)

................................................

Post to Feedलक्ष्मीबाई टिळक
आमच्या पिढींत हे रेव्हरंड टिळक म्हणून ...
उत्तम लेख

Typing help hide